Good Bye 2016
माझ्या नजरेत 2016 वर्ष
पाहता पाहता 2016 वर्ष संपले. वेळ कुणा साठी कधीही थांबत नाही. सेकंद काटा सरकतो, तो मिनीट काट्याला हलवतो, मिनीट काटा तास काट्याला पुढे ढकलतो आणि तास जसे जसे पुढे जातो तसे तसे दिवस संपतात. दिवस सरु लागले की वर्ष संपायला येते. म्हणजेच या प्रक्रियेत सेकंदाला खुप महत्त्व आहे कारण तेथून आपली क्रिया प्रारंभ होते. वर्षा मागून वर्ष सरत गेले तसे 2016 हे ही वर्ष सरले पण या 2016 वर्षाने माझ्या नजरेस काय दिले ? या वर्षात मी काय शिकलो किंवा अनुभव घेतला याचा थोडक्यात सारांश घेण्याचा हा प्रयत्न.
भारत स्वातंत्र्य होऊन 69 वर्षाचा कालावधी उलटून गेली परंतु भारता समोरील काही ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक अजुनही झाली नाही. पुढील काही वर्षात तरी होईल किंवा नाही याबाबत ही काही सांगता येत नाही. भारत-पाकिस्तानचा काश्मीर बाबत काही तोडगा निघत नाही. त्यामुळे रोज सैनिकांमध्ये गोळीबार ची धुमश्चक्र चालूच आहे. भारतातील कोणाच्या ना कोणाच्या घरातील दिवा विझत आहे. देशाच्या संरक्षणसाठी सैनिक जीवाची बाजी लावत आहे. यावर्षी बरेच सैनिक लढाईत मृत्यू मुखी पडले. आपल्या शेजारी किंवा गाव शेजारी मधील सैनिक मृत्यू मुखी पडल्यावर आपणास खरे दुःख कळून आले. शहीद झालेल्या वीर पुत्रास श्रध्दांजली अर्पण करून त्यांचे दुःख कळणार नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे. जागतिक शांतताचे पुरस्कार्त्यनी याविषयी लक्ष देऊन ही समस्या सोडविली पाहिजे. अन्यथा हे असेच चालू राहील आणि विनाकारण आपले युवक जवान मारले जातील. त्यामुळे यावर्षी प्रकर्षाने प्रत्येक भारतीय व्यक्तीला जाणवलेले दुःख म्हणजे भारतीय जवानाचे बळी.
भारतातील जातीयता हा एक न संपणारा विषय. यावर्षी पूर्ण ताकदीने डोके वर काढल्याचे जाणवले. आरक्षण आणि इतर मुद्दे लक्षात घेऊन मराठा समाजाने मूक मोर्चाचे आयोजन जिल्हा पातळीपासून राज्य पाताळीपर्यंत करून समाजातील प्रत्येक घटकाचे आपल्या कडे लक्षवेधून घेण्यात यशस्वी झाले. शासनाने देखील त्यांच्या मूक मोर्चाचे कौतुक केले. मोर्चा काढायाचे आणि सर्वत्र घाण व्हायचे हे जे चित्र पूर्वी होते ते चित्र या मोर्चाने पार बदलून टाकले. कुठला गोंधळ नाही, झालेला कचरा साफ करणे, इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, लोकप्रतिनिधी कुठे ही समोर दिसले नाही त्याऐवजी सामान्य जनता बाल गोपाळ, महिला ह्या आघाडीवर दिसत होते. यामुळे लोकांना खुप चांगली शिकवण मिळाली. सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल किंवा नाही माहित नाही मात्र लोकांची एकजुट दाखविण्यात त्यांना यश मिळाले. ही जमेची बाजु धरल्यास याचे समाजात प्रतिकूल परिणाम बघायला मिळाले. त्यांचा आरक्षण पाहिजे म्हणून मोर्चा तर इतर त्याच्या विरोधात मोर्चा. प्रत्येकजण आपल्या जातीचा किंवा समाजाचा मोर्चा काढून समाजाचे शक्तिप्रदर्शन करण्याची शर्यत लागल्यासारखे मोर्चे निघाले. जे की सामाजिक समतेच्या अगदी विरुध्द आहे. स्वतः पुरते विचार करणाऱ्याची संख्या वाढू लागली. जे की देशाच्या विकासासाठी खुप घातक ठरू शकते. यावर्षी हे समाजातील प्रत्येक जात आणि जमात निहाय काढण्यात आलेले मोर्चे लक्षात राहण्यासारखे झाले आहे. त्याचे काय परिणाम होतील ते पुढील वर्षात पहायला मिळतील असे वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 08 नोव्हेंबर रोजी रात्री 08 वाजता नोटा बंदी जाहीर केली. हे कोणताही भारतीय विसरु शकणार नाही. ज्या व्यक्तीला या नोटा बंदी चा त्रास झाला असेल तो तर आजन्म सुध्दा विसरणार नाही अशी ही ऐतिहासिक घटना 2016 मध्ये घडली. ज्याची नोंद इतिहास ही घेईल. देशातील काळा पैसा संपवावे आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्यासाठी मोदी सरकार ने उचललेले पाऊल खुप कठीण होते याची जाणीव त्यांना होती पण देशातील जनतेला अच्छे दिन यावे म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय किती चांगला होता हे पन्नास दिवसाच्या काळात दिसून आले. कित्येक श्रीमंत लोक जे की आपल्या जवळ पैसा बाळगुन होते त्यांच्या पाया खालची जमीन सरकली, कित्येक व्यापारी कर न भरता आपला पैसा दाबून ठेवत होते. खरा व्यवहार कधीही दाखवत नव्हते. अश्या सर्व लोकांना एका ट्रैकवर आणण्याचे काम कैशलेश व्यवहार मुळे आले आहे. जनतेला थोडा त्रास होईल पण भविष्य चांगले असेल तर त्रास ही सोसायला हवे. त्यामुळे 2016 मधील न विसरणारी घटना म्हणजे पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटावर आणलेली बंदी.
भारतीय लोकांवर चित्रपटाने नेहमीच भुरळ घातलेली आहे. काळ बदलत गेला तसे नट-नटी ही बदलत गेले मात्र प्रेमकहाणी ला तेंव्हा जेवढा प्रतिसाद मिळत होता तेवढाच प्रतिसाद आज ही मिळतो आहे, ही सत्य बाब आहे. दरवर्षी कोणता न कोणता चित्रपट सगळ्याचे लक्ष वेधुन घेतो आणि वर्षभर त्याच चित्रपट, कलाकार आणि गाणे याविषयी चर्चा होत राहते. प्रत्येक वर्षी हिंदी चित्रपटाची चलती राहते मात्र यावर्षी मराठी मधील नागराज मंजुळे यांचा चित्रपट सैराट ने सर्वाना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. पटकथा, संवाद, गाणे आणि इतर सर्व बाबीने हा चित्रपट सर्वत्र गाजला. नविन कलाकार घेऊन चित्रपट यशस्वी नव्हे तर यशोशिखर गाठणे खुप अवघड असते. मात्र पहिल्या वहिल्या चित्रपटाने रिंकू राजगुरु ला देश स्तरावर पुरस्कार मिळावे यातच या चित्रपटाचे यश लपलेले आहे. वर्ष संपेल तरी सैराटची जादू अजुनही ओसरली नाही. जशी सपना-वासू ची जोडी एक दूजे के लिए प्रसिध्द झाली. या चित्रपटानंतर सैराट चित्रपटमध्ये गाजलेली परश्या-आर्ची ची जोडी लोकांच्या लक्षात राहील असे वाटते.
थोडसे खेळ जगताकडे पाहिलो तर अनेक घटना डोळ्यासमोरुन तरळतात. भारतीय क्रिकेट संघासाठी विराट कोहली हा एक कसोटी कर्णधार म्हणून पर्याय उपलब्ध झाला आहे. यावर्षी विराटने आपले पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केल्यामुळे इंग्लैडच्या संघाला व्हाईटवाश देता आले. तसेच आयसीसीच्या रैंकिंगमध्ये आर.अश्विन या भारतीय क्रिकेटपटु ला अव्वल स्थान मिळाले एवढेच नाही तर आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअरसाठी त्याच्या नावाची घोषणा झाली हे प्रत्येक भारतीयासाठी नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे, यात शंकाच नाही. आशिया चषक टी - 20 मध्ये भारतीय महिला संघाने पाक महिला संघाचा पराभव करीत चषक भारताच्या नावे केला आहे, हे ही अभिमानास्पद आहे. करुण नायर सारखा त्रिशतक फटकावणारा सर्वात युवा फलंदाज भारताला लाभला. वीरेंद्र सेहवाग नंतर अशी कामगिरी करणारा हा दूसरा खेळाडू. 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताने श्रीलंकेवर 34 धावांनी विजय मिळवित चषक आपल्या नावावर केले त्यामुळे भारताचा या खेळातील दबदबा कायम राहिला. भारताची बॅडमिंटनपटु पी. व्ही. सिंधूने मिळविलेले यश प्रत्येक भारतीय खेळाडूला नक्कीच प्रोत्साहित करेल.
जरा साहित्य क्षेत्रात काय घडामोडी घडल्या याचे अवलोकन करू या. साहित्य क्षेत्रात डोंबिवलीमध्ये होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अक्षयकुमार काळे 700 मतांनी विजयी झाले. परभणीचे प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली भाषेतील प्रसिध्द कवी शंख घोष यांना जाहीर झाला अश्या अनेक सुखदायी चांगल्या गोष्टी घडल्या तर काही गोष्टी कधीही त्याची झीज भरून निघणार नाही अश्या घडल्या ज्यात ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे पुण्यात निधन झाले. ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे वयाच्या 78 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तामिळनाडुच्या मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतात अम्मा या नावाने सुप्रसिध्द असलेल्या जयललिता यांचे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात निधन झाले. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी असलेले गायक, संगीतकार एम. बालमुरलीकृष्ण यांचं 86व्या वर्षी निधन झाले.
जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका कवी केशवसुताच्या ओळीनुसार झाले गेले विसरून नविन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज राहु या. गेल्या वर्षी झालेल्या चूका पुन्हा यावर्षी होणार नाहीत याची काळजी घेतली तर प्रत्येक वर्ष आपणास आनंद देत राहील असा विश्वास वाटतो.
येणारे नविन वर्ष 2017 सर्वासाठी सुखदायी आणि उत्साहवर्धक असो, स्वच्छ भारतात स्वच्छ व्यवहार करणारे असो अशी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment