Friday, 14 October 2016

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन निमित्त

वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आपल्याकडे प्रसिध्द आहे. वाचन हा प्रत्येक मानवाच्या मेंदुचा खुराक आहे. वाचन केल्यामुळे आपणास बरीच माहिती मिळते. ज्ञानाचा साठा वाढतो. त्याच सोबत आपण प्रगल्भ देखील बनत असतो. आजकाल वाचन करणे फार कमी होत चालले आहे अशी समाजात ओरड सुरु आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. याउलट सोशल मीडिया नावाच्या whatsapp आणि फेसबुक मुळे लोकांची वाचन संस्कृती वाढली असे म्हणण्यास काही हरकत नसावी. दिवसातुन अनेक ग्रुपच्या माध्यमातुन बरीच अनोळखी माहिती बघायला आणि वाचायला मिळत आहे. हे काय कमी आहे. त्यातल्या त्यात ebook लाईब्रेरी मुळे तर पुस्तकांच्या पुस्तके pdf मध्ये वाचता येत आहेत. आज जे पुस्तक म्हटले त्या पुस्तकाची माहिती नेट वर उपलब्ध होत आहे आणि त्यातून वाचन संस्कृती मध्ये वाढ होत आहे. असे जरी दिसत असेल किंवा भास होत असेल तरी वास्तव थोडे वेगळे आहे. हे ही नाकारुन चालत नाही.
वाचनाच्या प्रक्रियेला शाळेतुन सुरु होते. तसे मुले लहान असताना चित्र वाचन अगदी छान रित्या करतात. तेथून त्यांच्या वाचन कौशल्य विकसित होण्यास सुरु होते. मग त्यानंतर अक्षर आणि अंकाची ओळख होते. हळूहळू वाचन कला जमायला लागते. भाषा कौशल्यामध्ये श्रवण व भाषण हे फार महत्वाचे आहे. कारण त्यावरच वाचन ही क्रिया पूर्णपणे अवलंबून आहे. ज्यांच्या वरील दोन क्रिया योग्य प्रकारे होते त्या मुलांचा विकास योग्य दिशेने होतो. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना श्रवण व भाषण ही क्रिया जमवण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी केला जातो. तेथे प्रगती नक्की दिसते. खाजगी शाळेत यावर आवर्जून लक्ष दिले जाते. तर इकडे सरकारी बालवाडी मध्ये खाऊ वाटप करण्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. यात मला त्यांना दोष द्यायचा नाही पण पाया मजबूत करण्याकडे कुणाचेच अजिबात लक्ष नसते आणि मुले वरच्या वर्गात गेली की त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून त्या दोषाचे खापर शिक्षकांच्या अंगी फोडून मोकळे होणे एवढे मात्र सर्वाना जमते. एखादा रस्ता ख़राब होताना वेळीच लक्ष दिले आणि तातपुरती दुरुस्ती केली तर रस्ता दीर्घकाळ टिकू शकतो. त्याकडे लक्षच दिले नाही तर रस्ता पुन्हा नव्याने करावा लागतो. विद्यार्थ्यांचे जवळपास तसेच आहे. प्राथमिक वर्गात असताना त्यांच्या चूका व त्रुटी लक्षात घेऊन त्यात दुरुस्ती केल्यास ती मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाणार नाहीत. अमुक विद्यार्थ्याला लिहिता वाचता येत नाही हे वरच्या वर्गात गेल्यावर लक्षात आल्यास काहीच करता येत नाही. रस्ता पुन्हा नव्याने करता येऊ शकेल पण विद्यार्थ्यांना पुन्हा पाहिली किंवा दूसरी चा अभ्यास शिकवून तयार करणे फार कठीन आणि जिकरीचे आहे. त्यासाठी वेळीच पालक शिक्षक यांनी जागरूक होऊन त्यांच्या प्रगती कडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांच्या एकूणच शैक्षणिक प्रगती मध्ये वाचनाचा सिंहाचा वाटा आहे. जी मुले योग्य गतीत वाचन करतात त्यांची प्रगती नियमानुसार होत राहते. वाचन केल्याचा खरा आनंद जर आपणास पहायचा असेल तर ते पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावर पाहता येईल. वर्गातील एक दोन मुले खुप छान वाचन करतात तेंव्हा ज्याना वाचन करता येत नाही त्यांना त्या मुलाचा हेवा वाटते. वर्गातील सर्वच्या सर्व मुले वाचू लागली की त्याचा खरा आनंद त्या शिक्षकाना होतो. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ठळक दिसून येते. असा आनंद मिळविण्यासाठी मात्र शिक्षक मंडळींना खुप प्रयत्न करावे लागते हे ही सत्य आहे. वाचन प्रेरणा दिवस साजरा करून कोणाची वाचन कौशल्य मध्ये प्रगती होणार नाही त्यासाठी दररोज अर्धा तास तरी मुले वाचन करतील असे नियोजन शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. दिनविशेष पुरते त्याला बंधनात न ठेवता ती प्रक्रिया रोज राबविण्यासाठी मुलांकडून पाठाच्या उताऱ्यातील पाच वाक्याचे रोज वाचन करून घ्यावे. वाचन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण कितीही वाचन केलो तरी नित्य नविन माहिती मिळविण्यासाठी वाचन हे करावेच लागते. रोज पाच वाक्य वाचन करण्याचा सराव कधी पाठ वाचन करण्यात होते हे कळतच नाही. मुले सुद्धा अगदी योग्य गतीत वाचन करतात. वर्गातील धीम्या गतीने वाचन करणारा मुलगा देखील येथे गती घेतो. हा प्रयोग मात्र सतत चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सतत वाचन करण्यात व्यस्त असत त्या वाचनातुन ते विद्वान झाले. असेच अजून एक महान व्यक्ती म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांनी सुद्धा आपल्या जीवनात वाचनाला खुप महत्त्व दिले आहे. ते दिवसाचे सोळा-सतरा तास वाचनात घालवित असे. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर  संपूर्ण महाराष्ट्रात *वाचन प्रेरणा दिवस* म्हणून गेल्या वर्षीपासून साजरी केली जात आहे. फक्त आजच्या दिवशी एक तासभर वाचन करण्यापेक्षा रोज किमान पाच वाक्याचे वाचन प्राथमिक वर्गात केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...