Friday, 26 February 2016


* परीक्षेला जाता जाता .... *

फेब्रुवारी महिना उजाडला की, सर्वांना परीक्षेचे वेध लागतात. महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक परीक्षा मंडळाद्वारे या परीक्षेच्‍या कार्यक्रमाचे उदघाटन बारावीच्‍या परीक्षेने दरवर्षी करीत असते. तसे बारावीच्या परीक्षेला फेब्रुवारी महिन्याच्या 18 तारखेपासून सुरुवात झाली. त्‍यानंतर दहावीच्‍या परीक्षेला उद्यापासून सुरूवात होत आहे. मग इयत्‍ता पहिली ते नववी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांची परीक्षा होते. विद्यापीठाच्‍या परीक्षेने या परीक्षांचा शेवट होतो. परीक्षेच्‍या काळात मुलांवर एक वेगळ्याच प्रकारचे दडपण जाणवते. वर्षभर केलेल्‍या अभ्‍यासाची फक्त दोन ते तीन तासात परीक्षा द्यावी लागते. बहुतांश वेळा असे होते की ऐनवेळी विद्यार्थी प्रश्‍नाचे उत्‍तर विसरतात. परीक्षेच्या काळात गोंधळून जाऊ नये किंवा मनावर जास्‍तीचे दडपण घेवू नये. परीक्षेच्‍या आदल्‍या दिवशी जागरण करून अभ्‍यास न करता निश्चित झोपी जावे. उद्याचा पेपर कसा जाईल ? याची अजिबात काळजी न करता आपले डोके शांत ठेवल्‍यास त्‍याचा परिक्षेच्या काळात निश्चितपणे फायदा होतो. नावडता विषय आपणाला अवघड वाटतो, त्‍याची जास्‍तच काळजी वाटते. त्‍यामुळे त्या विषयातील येत असलेला भाग सुध्‍दा आपण विसरून जातो. असे होऊ नये यासाठी त्‍या विषयाची धास्‍ती मनात न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. इयत्‍ता पहिली ते आठव्‍या वर्गाची परीक्षा पध्‍दत बंद केल्‍यामूळे विद्यार्थ्‍यांचा परीक्षेला जाण्‍याचा सराव  कमी झाला असे म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. पूर्वी पहिल्‍या वर्गापासून घटक चाचणी व सहामाही म्‍हणजे प्रथम व द्वितीय सत्र परीक्षा होत असत. परिक्षेच्या काळात शाळेमध्‍ये सर्वत्र परीक्षेचे वातावरण असायचे, जो तो आपले डोके पुस्‍तकांत खुपसून अभ्‍यास करीत बसायचे, शक्‍यतो गृहपाठाच्‍या वह्या वाचून काढले जायचे कारण त्‍यातीलच प्रश्‍न परीक्षेत विचारल्‍या जायचे. परीक्षेला जातांना आपल्या उजव्या हाताच्या करंगळीने सामसोळीच्या शेपटाला स्पर्श केला तर पेपर सोपा जातो असं परीक्षेच्या आदल्या दिवशी मित्रांमध्ये चर्चा व्हायची. नेमकं परीक्षेला निघताना ती सामसोळी मात्र कुठच दिसायची नाही. पेपर सोपा गेला तर त्याची आठवण सुध्दा यायची नाही. परंतु जर पेपर अवघड गेला असं जर वाटलं तर मनात रुखरुख लागायची. परीक्षेतला जातांना अजून एक प्रकर्षाने व्हायचं परीक्षेच्या पॅडला तुळशीचे दोन पान लावायचे. त्याचं काय गुपित आहे ते आजपर्यंत कळले नाही. आज शहरात अंगण नाही तर तुळस कुठं दिसणार. पण ही बाब अजूनही घरोघरी दिसून येत आहे. परीक्षेचा दिवस उजाडला की, सकाळी सर्व कामे आटोपून परीक्षेला पॅड घेऊन निघतांना आई ओरडून म्‍हणायची " अरे देवाच्‍या पाया पड, पेपर सोपा जाईल"  तिच्‍या या बोलण्‍याचं मला हसू यायचे आणि  मी म्‍हणायचो ‘वर्षभर अभ्‍यास केल्‍यामूळे माझं पेपर सोपं जाणारच आहे. त्‍यासाठी देव काय मदत करणार आहे. तो काय स्वत: येऊन मला लिहायला मदत करणार आहे कां ? असा प्रति प्रश्‍न तिला विचारायचा. आपल्‍या देवाला कुणी काही असं बोललेलं तिला खपायचे नाही, रुचायचे नाही. ती मला समजावून सांगे की, ‘देवाला पाया पडल्‍याने आत्मिक समाधान लाभते, बळ मिळते, एक वेगळा उत्‍साह येतो. यामूळे देवाला नमस्‍कार करायचा’. मग शेवटी आईचे मन रहावे म्‍हणून देवासमोर नतमस्तक व्‍हायचो. पहिला पेपर सोपा गेला की, आपसुकच दुस-या दिवशी परीक्षेला जाण्‍यापूर्वी पाय देवघरांकडे वळायचे. मग यानंतर जीवनात कोणती ही परीक्षा असो त्‍यापूर्वी आपले पाय देवघरांकडे वळतातच. आज ही आम्‍ही हीच प्रथा किंवा परंपरा आपल्‍या मुलांपर्यंत पोहचवित आहोत. आज आपली मुले जेंव्हा परीक्षेला निघतांत त्यावेळेस ‘जा देवाचे पाया पड आणि मग परीक्षेला जा’ असे आपण अगदी सहज म्‍हणतो. परीक्षेला जातांना देवाच्या पाया पडावे किंवा नाही हा वादातीत विषय आहे. त्‍यावर चर्चा केल्‍यास वादंग होण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. मात्र देवाच्या पाया पडल्यानंतर जो आत्‍मविश्‍वास मनात तयार होतो, ते अत्‍यंत महत्‍वाचे आहे.  परीक्षा म्‍हणजे एक कसोटी, आयुष्‍यात घेत असलेले महत्‍वाचे वळण. या कसोटीत निर्भेळ यश मिळविण्‍यासाठी देवांसोबत घरातील वाड-वडिलांचे आशीर्वाद घेणे सुध्‍दा अत्यंत महत्‍वाचे आहे असे वाटते. ज्‍याप्रकारे पूर्वी रंणागणावर जातांना राजे महाराजे आपल्‍या पूर्वजांचे आशीर्वाद घ्‍यायचे तसेच काहीसे या परीक्षेच्‍या बाबतीत होत असते. स्‍वामी समर्थाच्‍या ‘भिऊ नकोस  मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्‍याने त्‍यांच्‍या भक्‍तात एक नवी प्रेरणा, उत्साह दिसून येतो दे रे हरी  पलंगावरी अशी ज्‍याची वृती नाही त्‍याला परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. परीक्षेत जास्‍तीत गुण मिळावे यासाठी नकला मारणे ही स्वतः सोबत केलेली फार मोठी चूक आहे. त्‍यामूळे नकला मारून पास होण्‍यात काही अर्थ नाही. या परीक्षेत कदाचित तुम्‍ही पास व्‍हाल पण आयुष्‍याच्‍या परीक्षेत नकलाच  नसतात तिथे मात्र नापास होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. नकला मारणे म्‍हणजे चोरी करणे. आणि चोरी  कधी  ना कधी पकडली जाते. म्‍हणून मुलांनो, परीक्षेत यशस्वीपणे तोंड देण्‍यासाठी परमेश्‍वर आपणास सुबुध्‍दी देवो, आत्मिक बळ देवो. दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
मो. 9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...