नागोराव सा. येवतीकर

Friday, 22 March 2024

पुस्तक परिचय - नजराणा ( Najarana )

विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट गीतांचा " नजराणा " काव्यसंग्रह

अक्षरक्रांती प्रकाशन मुंबई द्वारा प्रकाशित आणि वृषाली सुरेश खाडये यांच्या अथक परिश्रमातून संपादित झालेलं " नजराणा " प्रातिनिधिक काव्यसंग्रह शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना देखील आनंद देणारा असा आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक असून पुस्तक वाचताना मुलं कसे रममान होतात ? याची प्रचिती प्रत्यक्षात हे पुस्तक वाचतांना मिळेल. एकापेक्षा एक सुंदर व सुरस अश्या कविता यात समाविष्ट आहेत जे वाचताना वाचक नक्कीच दंग होतील. राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, कवी आणि कवयित्री यांनी " शाळा व विद्यार्थी " केंद्रबिंदू मानून कविता लिहिल्या आहेत आणि संपादिका वृषाली सुरेश खाडये यांनी उत्तमरित्या संकलन करून त्यावर संपादन करण्याचे काम केले आहे. पर्यावरण, निसर्ग, शाळा, शिक्षक, तंत्रज्ञान, अभंग, देश या विषयावर बालकवितांचा समावेश केलेला आहे. यातील सर्वच कविता वाचनीय, काही लयबद्ध तर काही बडबड गाण्याच्या स्वरूपात आहे. त्यापैकीच काही विशेष म्हणजे दिलीप यशवंत माने आपल्या श्रावण कवितेतून म्हणतात, 

ओथंबून नभ आले
अवनीच्या रे भेटीला
श्रावणात असा सारा
घननिळा बरसला

श्रावण महिन्यात आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि धरतीच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात याचेच वर्णन कवी आपल्या या कवितेतून केले आहे. 
अंगाईगीत सहसा आईच्या मुखातून ऐकायला मिळते मात्र प्रा. प्रकाश पुना चऱ्हाटे यांनी मुलाला झोपविण्यासाठी वडिलांनी म्हणजे बाबांनी गायलेलं अंगाई गीत लिहिले. ते म्हणतात

बैल झोपले वाड्यात, खोप्यामध्ये चिमणदादा
परसातील बागेमध्ये, झोपला रे गुलाब-चाफा
अंगावर घे पांघरूण, वाट आता नको पाहू

शाळेतील विद्यार्थ्यांना आवडणारे प्रतिभा बोबे यांचे अंक गाणे, प्रभाकर शिंदे यांचे बे एके बे हे पाढ्यावरील गाणे लयबद्ध आहेत. ती कविता वाचतांना विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळणार आहे. संध्याराणी कोल्हे यांच्या पाऊस या कवितेतून कवयित्री म्हणतात की, 

पावसाचे गाणे भिजत भिजत गाऊ
वृक्षासव आपणही आनंदाने न्हाऊ

लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते. त्याच बाबीचा संदर्भ लक्षात घेऊन वृक्षाचे महत्व ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. 

पाणी हेच आपुले जीवन
काटकसरीने वापरू हे धन
असा छानसा संदेश सौ. रोहिणी राजेंद्र गायकवाड हे पर्यावरण या कवितेतून दिला आहे. 
साने गुरुजी यांची खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेतून गायले जाते. त्याच काव्याचा आधार घेऊन सौ. स्नेहल अमित ओंबळे यांनी खरा तो एकचि धर्म ह्या कवितेतून ते म्हणतात, 

कुणा ना व्यर्थ तोडावे
कुणा ना व्यर्थ मोडावे
समस्ता जीव गणावे
निसर्गा मित्र मानावे

कोणतेही झाड विनाकारण तोडू नये, मोडू नये, प्रत्येक सजीवात जीव असतो हे जाणून घेऊन संपूर्ण निसर्गाला मित्र मानावे असा सुंदर संदेश आपल्या कवितेतून दिले आहे. तंत्रस्नेही शिक्षक, संगणक आणि देशावर आधारित कवितांचाही यात समावेश केलेला आहे. 
प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना बडबडगीते खूप आवडतात. सुनीता पांडुरंग अनभुले यांच्या माणसा जग वाचव .... सायली राणे यांची उंदीरमामा, प्रवीणा वाघमारे यांची वृक्षगीत या बालानो या रे या अश्या अनेक सुंदर बडबड गीतांच्या कविता यात आहेत. भारत देशावर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर देखील कविता येथे वाचायला मिळतात. एकापेक्षा एक अश्या सुंदर व छान छान कविता या काव्यसंग्रहात वाचकांना वाचण्यास मिळतात. 
या काव्यसंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. सुरज कुदळे, संदीप सोनार, दिलीप जाने, वर्षा चोपदार आदीनी संपादकीय मंडळात काम करून काव्यसंग्रह उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण 65 पृष्ठात महाराष्ट्रातील साठ कवी-कवयित्रींच्या कविता आहेत. या काव्यसंग्रहाचे स्वागतमूल्य 150 रु. आहे. प्रत्येक मराठी शाळेत संग्रही असायलाच हवे असे हे काव्यसंग्रह तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक मुख्याध्यापकानी, शाळा प्रमुखांनी व जाणकार वाचकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे त्यासाठी संपादिका वृषाली सुरेश खाडये यांच्याशी 9967001411 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्पद्वारे संपर्क करून सदरील काव्यसंग्रह पोस्टाने मागविता येईल. येत्या काळात असेच अजून छान छान काव्यसंग्रह वाचण्यास मिळो हीच सदिच्छा .....!

पुस्तक परिचय - 

नासा येवतीकर, कवी तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment