नागोराव सा. येवतीकर

Friday, 22 March 2024

पुस्तक परिचय - फुंकर ( Funkar )

मानवी मनातील घालमेल व्यक्त करणारा - फुंकर कवितासंग्रह
        
                मोबाईल स्मार्ट फोन आल्यामुळे आजकाल पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली अशी ओरड सध्या ऐकायला येत आहे मात्र पुस्तकं लिहिणाऱ्यांची संख्या या स्मार्टफोनमुळे किंचित का होईना वाढू लागलेली आहे, असे कोणी म्हणताना दिसत नाहीत. पण हे सत्य आहे. स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे वाचक संख्या वाढली. तळहातावरील छोट्याशा मोबाईलवर एका क्लीक मध्ये हवी ती माहिती हवे तेव्हा मिळू लागले त्यामुळे वाचकांची भूक वाढीस लागली. तसेच साहित्याला ताबडतोब प्रसिद्धी मिळत असल्याने लिहिणाऱ्यांची संख्या देखील वाढली. आज समाजात फक्त साहित्यिक क्षेत्राला संपुर्णपणे वाहून घेतलेले अनेक व्हाट्सअप्प समूह आढळून येत आहेत, ज्यातून गोविंद कवळे सारखे नवकवी जन्म घेतांना दिसत आहेत. ही तशी साहित्य क्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे.
          नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोदावरीच्या काठावर वसलेल्या अगदी छोट्याशा इळेगाव गावातील शेतकरी कुटुंबात कवी गोविंद कवळे यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे कवीवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ज्यामुळे आपले शिक्षण त्यांना अर्धवट सोडावे लागले. संसाराचा रहाटगाडे चालविण्यासाठी काहीतरी काम करणे भागच होते. ते काम करता करता त्यांनी सामाजिक चळवळीत सहभाग घेतला, त्यात अनेक चांगल्या सद्विचारी लोकांचा सहवास घडला ज्यातून कविमनाचा माणूस " फुंकर " च्या माध्यमातून समाजात प्रतिबिंबित झाला. उमरी तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक कै. ग. पि. मनूरकर यांच्या साहित्याने ते पूर्वीच प्रभावित झाले होते आणि त्यांच्यामुळेच लिहिण्याची उर्मी मिळाली असे कवी स्वतः म्हणतात. कवीला कसल्याही प्रकारचा साहित्यिक वारसा नसतांनाही त्यांनी साहित्यिक क्षेत्रात घेतलेली गरुडझेप लक्षवेधी आहे. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातील अनेक नामवंत दैनिकातून यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. फुंकर हा त्यांचा पहिलावहिला कवितासंग्रह आहे.
       कवी स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांचे कष्ट, दुःख, हाल-अपेष्टा, निसर्गाची अवकृपा आणि सावकाराकडून होणारी फसवणूक हे सारे त्यांनी याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहिले आहे म्हणून फुंकर मधील शेतकऱ्यांविषयीच्या प्रत्येक कवितेत त्याविषयीची तळमळ दिसून येते. म्हणूनच कष्ट करणारा बाप या कवितेत कवी म्हणतो,


शेतात पेरणी करतांना, तोचतो पायात काटा
कोणा सांगेल हे दुःख करतो सहन एकटा
                           

            शेतकरी किती जरी दुःखात राहिला किंवा स्वतः ला कितीही कष्ट सहन करावे लागले तरी दारावर आलेल्या कोणालाही तो माघारी फिरवत नाही, तो इतरांना मदत करायला वा दान करायला विसरत नाही म्हणून कवी शिवार फुलला या कवितेतून म्हणतो,

रास केला धान्याची, लाव हात पायलीला
दे चार चार पसा, आलेल्या आपुल्या दाराला

                                                 शिक्षणाचा गंध सुटला होता, संसाराची जबाबदारी वाढली होती. त्यातही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत काम करतांना अनेक सद्विचारी लोकांचा सहवास लाभला. श्रीपाद राऊतवाड, नागोराव डोंगरे, गुरू नागोराव तिप्पलवाड, कवी कट्टाचे संयोजक अशोक कुबडे यांच्या ओळखी झाल्यामुळे त्यांच्या लेखणीला खरी गती मिळाली. म्हणूनच कवी जगण्याचा मागमूस मध्ये आपली कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणतो की,
काय कमावलो काय गमावलो, कसला आला हिशोब
भेटत गेली गुणी माणसे, उजळून आलं नशीब
                                      

               भारत देशाला घडविण्यात संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, कर्मवीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे अनेक थोर, महात्मा, शूरवीर व शैक्षणिक विचारवंतांनी आपले जीवन पणास लावले. त्या सर्व महापुरुषांना काव्यरूपाने कवी वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त मागासवर्गीय लोकांसाठीच नाही तर सर्वांसाठी संविधान लिहून खरे स्वातंत्र्य दिले आहे  ही भावना वंदन तुम्हांस या कवितेतून व्यक्त करताना कवी म्हणतो,
संविधानाचे निर्माते तुम्ही, दिला आम्हा प्रकाश
सर्वावरी माया तुमची, केले मोकळे आकाश
                                     

            स्वच्छतेचे प्रसारक आणि समाजातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी गावोगावी फिरून समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांच्याविषयी कवी म्हणतो,
हातात असायचे झाडू, मुखात असायचे कीर्तन
त्यातूनच करायचे, समाजप्रबोधन
                                              

            सामाजिक चळवळीत काम करतांना कुटुंबातील सदस्यांना विसरून चालणार नाही. शेवटी त्यांची साथ असेल तरच जीवनातील आनंद दीर्घकाळ टिकून राहतो आणि मानसिक समाधानाचे सुख मिळते. म्हणूनच कवी आपल्या पत्नीवर, लेकीवर स्वप्नातल्या प्रेयसीवर देखील रचना लिहिल्या आहेत. मानवाच्या आयुष्यातील एक सोनेरी पान म्हणजे विवाह. दोन विभिन्न मन एकत्र येण्याचा तो प्रसंग, संसार फुलविण्याचा आनंदी क्षण, तो विसरणे कदापि शक्य नाही. पण तो दिवस नेहमी लक्षात राहावं म्हणून एक कविता लिहीत असल्याची संकल्पना सांगताना लग्नाचा वाढदिवस या कवितेत कवी म्हणतो,
येत आहे लग्नाचा वाढदिवस, उत्साहाने मन भरत आहे
आठवण ठेवू प्रत्येक वर्षी, म्हणून लिहितो आहे
                   या कवितासंग्रहात सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि भावनिक काव्यरचनासह श्रावण, पाऊस, शेतकरी, पांडुरंग, शाळा, मैत्री, महापुरुष असे अनेक विषयाच्या कवितांचा समावेश केलेला आहे. कवीने आपल्या साध्या, सोप्या आणि इतरांना सहज समजेल अश्या भाषेत आपल्या मनातील भावना सुंदररित्या व्यक्त केल्या आहेत. ६४ पृष्ठांच्या कवितासंग्रहात एकूण ५१ रचना आहेत. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार दिगंबर ग. कदम यांनी या संग्रहाची प्रस्तावना केली असून प्रसिद्ध कवी देविदास फुलारी यांनी पाठराखण केली आहे. या कवितासंग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी केले तर देगलूरच्या पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या गणगोत प्रकाशन संस्थेने हे प्रकाशित केले आहे. या कवितासंग्रहाचे मूल्य १४० ₹ असे आहे.
             एकूणच मानवी मनातील घालमेल सांगणारी व बळीराजाच्या जीवनातील दुःख व्यक्त करणारी ह्या फुंकर कवितासंग्रहाचे साहित्यिक नक्की स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. तसेच गोविंद कवळे यांच्या पुढील काव्यलेखनासाठी मनस्वी शुभेच्छा ........!

पुस्तक परिचय :-
नासा येवतीकर, भाषा विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

1 comment:

  1. आमच्या पुस्तकाला स्थान दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

    ReplyDelete