नागोराव सा. येवतीकर

Saturday, 23 March 2024

पुस्तक परिचय - पाऊलवाट ( Paulwat by Digambar Kadam )

*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक*
    पुस्तक परिचय – दिगंबर गं.कदम
दिसामाजी काहीतरी लिहित जावे | 
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।। 
असे संत रामदासांनी म्हटले आहे. ह्या ओळी मला वाटते शिक्षकांना उद्देशून, अखंडपणे वाचन करणाऱ्या वाचक प्रेमीसाठी म्हटले असावे. शिक्षकांनी तर आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात नेहमीच वाचन करावे असे वाटते . कारण आजची पिढी खूप पुढे गेलेली आहे, अशा परिस्थितीत शिक्षकांनी नेहमी अपडेट असावे आउटडेट असता कामा नये. आजचा विद्यार्थी संगणक जाणतो आहे. त्यातून त्याला हवे असणारे ज्ञान प्राप्त होत आहे. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या पुढचे ज्ञान हवे म्हणून शिक्षकांनी नेहमीच वाचनाच्या अगदी जवळ गेले पाहिजे. असा शिक्षकच विद्यार्थ्यांचा आवडीचा गुरुजी होऊ शकतो. त्याच्याजवळ माहितीचे भांडार असणे ही काळाची गरज झाली आहे. यातलेच एक उत्तम, सुसंस्कारित गुरुजी म्हणून ज्याचे नाव घेतले जाते ते म्हणजे धर्माबाद येथील प्राथमिक शिक्षक नागोराव सा. येवतीकर. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाचे वारंवार स्वरूप जाणून घेऊन ते विद्यार्थ्यांच्या अंगी कसे बाणवता येतील याचे प्रात्यक्षिक ते नेहमीच करत असतात. त्यांच्या *पाउलवाट* या पुस्तकातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एक नवी दिशा मिळते असे एक सर्वांग सुंदर पुस्तक त्यांनी लिहून शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारची क्रांतीच केली आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    शिक्षण क्षेत्रात जी धडपडणारी शिक्षक आहेत, त्यात नागोराव येवतीकर हे एक. पाऊलवाट हे वैचारिक दर्जाचे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचावे व संग्रही  ठेवावे असे आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर शिक्षकास आपणही काही तरी करावे असे वाटते. शिक्षक हा नेहमी चौफेर दृष्टी ठेवणारा असावा असे लेखकाना वाटते. अगोदर स्वतः माहिती करून घ्यावी आणि नंतर ते आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रांरभीच सांगतात,  
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे | शहाणे करुनी सोडावे सकळ जन |
  या पुस्तकात त्यांनी तीन टप्पे पाडले आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणजे आपले दैवत विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी बचत कशी करावी. यात फक्त पैशाचीच बचत एवढा संकुचित अर्थ न ठेवता विजेची बचत, पाण्याची बचत, कागदाची बचत, वेळेची बचत हे अतिशय साध्या सोप्या शब्दात त्यांनी वर्णन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त असावी. शिस्तीत केलेले काम चांगले होते. शिस्त ही असलीच पाहिजे. सत्य बोला, बोलणे महत्त्वाचे नाही तर कृतीला ही महत्त्व आहे . कृतीशिवाय उक्ती ही कामाची नाही दुसऱ्यावर विसंबून राहू नये, राग धरू नये. मित्र सावधानतेने निवडावेत. मित्रावरून आपली परीक्षा होते. जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. यावर देखील नागोराव येवतीकरानी आपली मते मांडली आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन यावर भाष्य करताना पाप आणि पुण्य काय असते याचे विवेचन त्यांनी पाऊलवाट मध्ये केले आहे . लोभामुळे माणसाचे किती अधःपतन होते आहे ते ही गमावून बसतो .म्हणून लोभ धरू नये,  तसा क्रोधाला जवळ येऊ देऊ नये असेही ते सांगतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडा होऊ नये .मैदानी खेळ खेळावेत. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते. मग मस्तिष्क बरोबर चालते .जे जे वाचले, पाहिले, ते ते कायम लक्षात राहते .म्हणून शरीराची काळजी घ्या असेही ते सांगतात. विद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक विचार करावा नकार हा शब्द त्यांच्या जवळ येऊच नये. कारण संत तुकाराम महाराज सांगतात
असाध्य ते साध्य | करिता सायास कारण अभ्यास | तुका म्हणे || 
अलीकडे मुले आई-वडिलांना विसरायला लागलीत. त्यांचे प्रती, ज्येष्ठाप्रती आदराची भावना ठेवा. कृतज्ञतेची भावना ठेवा. कृतज्ञतेची भावना ठेवून उतराई होण्याचा प्रयत्न करावा हे नीतिशास्त्र  विद्यार्थ्यांनी आत्मसात केले तर वृध्दाश्रम ओस पडतील. प्रत्येक विद्यार्थ्यांना आजी आजोबा भेटतात. त्यांच्याकडून गोष्टी , भजने , गीते  शिकतील . आजीच्या हातच्या भाकऱ्या किती गोड लागतात. ते खाल्ल्याशिवाय कळत नाहीत, म्हणून आई-वडील हीच आपली खरी दौलत आहे, हे लक्षात ठेवण्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. माणसे जोडणे महत्त्वाचे. तोडणे वाईट. एकदा मन वैरी झाले कि कितीही जरी जुळवण्याचा प्रयत्न केला तरी वेल्डिंग ही कायम राहतेच. म्हणून एकजीवपणा आपल्या अंगी ठेवावा. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. गरीब असो, श्रीमंत असो, दलित असो कि सवर्ण, त्यांची सेवा करा .खरा ईश्वर त्यांचातच दडलेला आहे. वाचनाची गोडी ही जीवन जगण्यातली गोडी आणते. म्हणून विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्त्वाचे जाणावे असे वाचाल तर वाचाल या वैचारिक लेखात त्यांनी मोठ्या मार्मिकपणे विवेचन केले आहे.
पाऊलवाटाचा दुसरा टप्पा आहे पालकासाठी . पालकांनी विद्यार्थ्याचे मित्र बनावे. वाढदिवसाला मेणबत्त्या विझवण्यापेक्षा वृक्षलागवड करून वाढदिवस साजरा केल्यास किती तरी वृक्ष तयार होतील. विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार असणे गरजेचे आहे. संस्काराच्या बाबतीत कुठेही तडजोड करू नका. याचेही विवेचन त्यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. सुख आणि दु:ख एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत दोन्ही काळी माणसाने खंबीर असावे. सुखात आणि दु:खात आनंदी असाल तर जीवन जगण्याची मजा येते. आहारात जेवढे महत्त्व मिठाला आहे, तेवढेच महत्त्व दु:खाला आहे. दु:ख आहे म्हणून तर सुखाची किंमत कळते. आजचा विद्यार्थी बौद्धिक दृष्ट्या खूपच पुढे गेलेला आहे. तेंव्हा त्यांच्या बुध्दीचातुर्याकडे पालकाने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. जे जे होईत ते ते पहावे ही वृत्ती माणसाला अधोगतीकडे नेणारी आहे. एखादी बाब आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून तिची काळजी घ्यावी. माणूस जन्माला येतो पण माणुसकी जन्माला येत नाही. ती निर्माण करावी लागते. माणुसकी हाच खरा धर्म आहे त्याला विसरता कामा नये असे ही लेखक पालकाना या ग्रंथातुन सांगतात.
पाऊलवाट पुस्तकातील तिसरा टप्पा आहे शिक्षकांसाठी. शिक्षक हा खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे. त्याला कितीही कष्ट पडले तरी हरकत नाही. शिल्पकाराच्या भूमिकेला बाधा येईल असे कुठलेही कृत्य त्याच्याकडून होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठीचा विकास शासन करणार नाही. मराठी भाषेचा विकास तमाम मराठी शिकवणारे शिक्षकच करतील यावर माझा विश्वास आहे, असे लेखक आपल्या *मराठीचा विकास आपल्याच हाती* या लेखात अगदी तळमळीने सांगतात. शिक्षक जेव्हा फळ्यावर लिहितो. तेव्हा विद्यार्थ्याला ते चांगले वाचता आले पाहिजे. बिनचूक, सुंदर, वळणदार अक्षर, हा शिक्षकाचा दागिना आहे. आपल्या विद्यार्थ्यांना साने गुरुजीचे मातृप्रेम द्या. मग पहा शाळेविषयी विद्यार्थांना लळा लागेल. गुरुजीच्या वागण्यातून, बोलण्यातून विद्यार्थ्यांवर नकळत संस्कार घडत असतात. म्हणून शिक्षकाने समाजात शिक्षक, लोकशिक्षक, प्रवचनकार, शिल्पकार ही भूमिका बजावायची आहे. या विषयीची यात मते मांडली आहेत.
    लेखकानी सहज, सोपी, ओघवती भाषा, म्हणी, वाक्प्रचार, उदाहरणे देवून पाऊलवाटला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षकासाठी, शिक्षणप्रेमीसाठी, वाचनालयासाठी संग्रही ठेवावे असेच आहे. पुस्तकाची बांधणी व मांडणी अमरावतीचे प्रकाशक शशी प्रिंटर्स रमेश एन. बाहे यांनी उत्तम केली आहे. मुखपृष्ठ उत्तम आणि दिशादर्शक आहे. नागोराव येवतीकरांच्या लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असेच वैचारिक पुस्तके विचार करायला भाग पडतील, अशी आशा.

दिगंबर गं. कदम 
संवेदना, नांदेड हौसिंग सोसायटी 
विजयनगर, नांदेड 
मो. ९४२२८७०३८१

No comments:

Post a Comment