नागोराव सा. येवतीकर

Friday, 22 March 2024

पुस्तक परिचय - अभंग समतेचे( Abhang Samteche )

विविध अंग मानवाचे, सांगे अभंग समतेचे
मानवी मनाची घालमेल सांगणारा काव्यसंग्रह
महाराष्ट्रातील संत आणि अनेक कवींनी अभंग रचना तयार करून जनप्रबोधन करण्याचे काम केले आहे. कमी शब्दांत जास्त अर्थ सांगण्याचे सामर्थ्य अभंगात आहे. अभंग रचना वाचतांना जरी सहज आणि सोपे वाटत असले तरी ती तयार करतांना खूप कठीण आहे. त्यासाठी कविजवळ दांडगी शब्दसंपत्ती असायला हवी, जे की चंद्रकांत गायकवाड यांचा अभंग समतेचे हा काव्यसंग्रह वाचतांना जाणवत राहतो. तसा त्यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह जरी असला तरी रचना वाचतांना कुठेही तसे जाणवत नाही. मुरलेल्या कविसारखे शिर्षकाला अनुसरून अभंग लिहिले आहेत. संतांनी आपल्या अभंगातून आध्यत्मिक बाबी सांगितल्या आहेत तर चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या अभंगातून समाजात समता कशी प्रस्थापित होऊ शकेल ? याचे विचार पेरण्याचा प्रयत्न केला आहे. आज सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागोजागी विषमता दिसून येते. ती विषमता संपविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणे आवश्यक असल्याचे कवी आपल्या रचनेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सर्वच रचना ह्या इतरांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. स्त्रियांच्या समस्या, रोजीरोटी, मुलगी, माहेर, भूक दारिद्र्य, गरिबी, शेतीभाती, नातीगोती, समाजातील विसंगती यावर त्यांनी आपल्या अभंगातून विचार व्यक्त केले आहे. 
मनुष्याचा विकास फक्त शिक्षणानेच होते असे अनेकांनी सांगितले आहे. शिक्षणाने माणसाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश पसरतो हे सांगताना विवेक मध्ये कवी म्हणतो

शिक्षणाचे मळे
आनंदाचे खळे
भेदू तम जाळे
विवेकाने

पुस्तकातून मिळालेले जगाचे कल्याण करते. जसे संत गाडगेबाबा माणसात देव शोधा म्हणून संदेश दिले होते तसे कवी आपल्या पुस्तक या रचनेतून म्हणतात

उद्धार नाही हो
देव दर्शनात
पहा पुस्तकात
विश्व सारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते कारण दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी देशाचे संविधान लिहिले. याच संविधानामुळे आज भारतातील लोकशाही टिकून आहे. संविधान हे सर्व प्रकारच्या समस्येवर जालीम औषध आहे हे लोकांनी जाणले पाहिजे आणि देशाला दिलेले सर्वात मोठे दान आहे असे सांगताना संविधान मधून कवी म्हणतो, 

उतारा औषध
संविधान जाण
हेची जना दान
भीमराया

भिमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत कवी खूप दुःखी होऊन सिदनाक अभंग रचनेत म्हणतो

माणसांचा गाव
उभारू नव्याने
पशूचे वागणे
नको आता

आज माणसाचे जीवन पशू पेक्षा हिंस्त्र झाले आहे. जो तो गटातटात विभागल्या जाऊन माणुसकी विसरला आहे. म्हणूनच कवीला तसे खेदाने म्हणावे लागते. 
म्हणायला गेलं तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याला संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. पण तोच पोशिंदा येथे कुपोषित आहे. शेतात पिकणाऱ्या मालाला कधीच भाव मिळत नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मातीत काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था आपल्या निरंजन काव्यातून मांडताना कवी म्हणतो

काबाडाचा धनी
मातीत मरतो
तोंडच मारतो
लेकरांचे

माणूस हा समाजप्रिय आहे. समाजशिवाय तो जीवन जगणे अशक्य आहे. समाज म्हटले की नातेसंबंध येतातच. पण काही नाते एवढे स्वार्थी आणि आपमतलबी झाले आहेत की, लोकांना नाते त्या आरश्यासारखे वाटायला लागले असे नाते या काव्यातून मांडले आहे.
  
जोडू नवे नाते
गाऊ नवे गाणे
आरशाचे जिणे
माणसाचे

पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणतेही काम करू शकतो. राजेश खन्ना यांच्या रोटी या चित्रपटातून देखील असाच काही संदेश दिला तसाच संदेश लूट या अभंगातून कवी सांगण्याचा प्रयत्न करतो

भूक माणसाला
दावी रूप नवे
जगावे मरावे 
पुन्हा पुन्हा

महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचा राज्यकारभार करण्याचा दृष्टिकोन प्रजाहितदक्ष असेच होते. पर स्त्री मातेसमान माना असा आदेश ते आपल्या मावळ्यांना देत असत. शीलवंत या काव्यातून कवी शिवराय विषयी म्हणतो 

नर नारी कधी 
भेद नाही केला 
मावळ्यांना सल्ला 
विवेकाने 

पौराणिक कथेतील स्त्रियांच्या जीवनाकडे एक कटाक्ष टाकला तर लक्षात येते की, त्यांना किती छळ सहन करावा लागला होता. पण आधुनिक काळातील स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांनी लावलेले स्वातंत्र्याचे दीप आज घरोघरी दीपमाळ बनून सदोदित जळत आहेत. म्हणूनच कवी स्वयंदीप या शिर्षकातून खूप मार्मिक लिहिलं आहे 

सीता द्रौपदीचे
किती झाले छळ 
जिजा साऊ बळ 
आत्मभान

जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशमय जीवन जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे अनेक विचारवंत लोकांनी सांगितले आहे. असत्य काही क्षण आपणांस आनंद देऊ शकतो पण कायमचा नाही म्हणून प्रकाश कवितेतून कवी वाचकांच्या डोक्यात प्रकाश टाकू इच्छितो.  

बारुद दारुखाने
असत्य रिकामे 
ज्ञान प्रकाशाने 
उजळले

मानवी जन्म मिळाले आहे तर त्याचा सदुपयोग करायला हवे. हा जन्म पुन्हा मिळणार नाही. स्वर्गात जाईन की नरकात या सगळ्या गोष्टी निव्वळ भूलथापा आहेत असे म्हणतात

जन्म नाही पुन्हा
हाती मानवाच्या 
स्वर्ग नरकाच्या 
भूलथापा

शिक्षणाने मानवाचा विकास होतो. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा सारा भेद कमी होतो. समाजात मान-सन्मान मिळवायचा असेल तर ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. असाच संदेश अक्षर या काव्यातून देताना म्हणतो 

अक्षर जागर
जीवनाचा साज 
सौजन्याने आज 
वागविते

जगावर कोरोनाचे संकट आल्यावर माणसाला माणुसकी शिकायला मिळाली. या लाटेत कित्येकजण आपल्या जीवाला मुकले तर काहीजण या संकटातून वाचले. जीवन हे क्षणभंगूर आहे याची प्रचिती या निमित्ताने झाली. म्हणूनच कवी फासे या अभंगातून खूप छान संदेश देतो

फुटू दे, पालवी
नवीन अंकुरी 
तू ही सदाचारी 
हो, ना जरा !

संविधानामुळे एक चांगला भारत देश घडेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मात्र येथील राजकारणी मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी सर्व समाजात फूट पाडली आणि आपण मात्र आलिशान मजेत जीवन जगत असल्याचे विदारक चित्र शेज या काव्यातून मांडतात

राजस्वार्थापायी
तोडला समाज 
रंगविली शेज 
आलिशान

या राजकारणी लोकांच्या भूलथापाना बळी न पडता सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं असा संदेश द्यायला देखील कवी विसरत नाहीत
जनहिता या काव्यातून म्हणतात की, 

प्रेमाची करूया
जीवनी कदर 
जातीचा कहर 
सोडू चला

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याची देणं असा समज पसरत गेल्याने मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दर हजारी पुरुष मुलांच्या जन्ममागे मुलींच्या जन्माचा दर शंभरने कमी होत आहे. जे की खूपच चिंताजनक आहे. म्हणून कवी खुपच चिंताग्रस्त होऊन अवकळा काव्यातून म्हणतो 

सम नर नारी 
एकच रे खाण 
जन्म एक जाण 
प्रत्येकाचा

पुढे जाऊन लेकी जन्म मधून कवी एक छान संदेश देतो. 

वसुंधरा तुझे 
निर्मितीचे देणे 
स्त्री जन्माचे लेणे 
माय होणे

धरती आणि स्त्री ह्या दोन्ही निर्मितीचे उगमस्थान आहे. याच्यावर अन्याय करून कसे चालेल. प्रत्येक स्त्री ही आई झाल्यावर परिपूर्ण होत असते. म्हणून आई होणाऱ्या मातेच्या उदरातील बालकांना हे जग पाहू द्या. गर्भातच कळी खुडू नका असा छानसा संदेश आपल्या काव्यातून देतात. 
आपल्या संग्रहातील शेवटच्या कवितेत सर्व कवितांचा सार मांडला आहे असे वाटते. कोणालाही खरं बोललं की राग येतो. तोंडावर स्तुती करणारे माणसं प्रत्येकाला आवडत असतात आणि खरं बोलणाऱ्या माणसाशी कोणाचेही लवकर जुळत नाही. येरझारा या अभंगातून कवी म्हणतो

सत्य मांडू जाता
मस्तकात जाळ 
खोट्याचा रे काळ 
सरो बापा

एकूणच अभंग समतेचे काव्यसंग्रहातील सर्वच रचना सहज शब्दातील, सोपी रचना आणि गर्भित आशयाचे आहेत. लातूरच्या डॉ. नरसिंग वाघमोडे यांची या पुस्तकाला सुंदर अशी प्रस्तावना लाभली असून मुखेडचे प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक दा. मा. बेंडे यांचे पाठराखण लाभले आहे. 

 अभंग समतेचे काव्यसंग्रह
कवी चंद्रकांत गायकवाड
प्रकाशक - पांडुरंग पुठ्ठेवाड, गणगोत प्रकाशन
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
अक्षरजुळवणी सौ. कलावती घोडके
मुद्रक रामकृष्ण प्रिंटर्स हैद्राबाद
किंमत 150 ₹

No comments:

Post a Comment