नागोराव सा. येवतीकर

Sunday, 13 May 2018

लेख क्रमांक 04

लेख क्रमांक 04
दिनांक 14 मे 2018 सोमवार

*तुज आहे तुजपाशी*

जीवनात प्रत्येकाला सुख हवेहवेसे वाटते तर दुःखाचा ससेमिरा कोणालाही नकोसा वाटतो. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे " सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे " सुख मिळवण्यासाठी मग आपली रात्रंदिवस नेहमी धडपड चालू असते. बहुतांश जणांना वाटते की भरपूर संपत्ती, गाडी, टुमदार बंगला, उंची फर्निचर, अंगावर दागिने, चांगले कपडे, खिशात महागडे मोबाईल मिळाले की आपण सुखी राहू. परंतु जसे दिसते तसे नसते. वर उल्लेखिलेल्या सर्वच्या सर्व वस्तू त्यांच्याजवळ आहेत त्याला विचारले की तू सुखी आहेस का ? समाधानी आहेस का ? तर त्याचे उत्तर नाही असे येते. कारण वरील कल्पना केलेल्या सुखी वस्तू थोड्याच अवधीत दुःख द्यायला सुरुवात करतात. या सर्व महागड्या वस्तूंची काळजी घेण्यात त्यांच्या जीवनातून सुख कधी निघून गेले ?  हे कळतच नाही. सदानकदा चिंतेच्या विचारात गढून गेलेल्या व्यक्ती खरोखरच सुखी असू शकते का ?
यापेक्षा विपरीत परिस्थितीत असलेला व्यक्ती ज्याच्याजवळ वरीलपैकी काहीही नाही, त्याची स्थिती भुकेला कोंडा अन निजेला धोंडा अशी गरीब व दरिद्रीची आहे ती व्यक्ती श्रीमंत व्यक्ती पेक्षा नक्कीच सुखी असतो. गरिबी व दारिद्र्यामुळे त्याला कष्ट करावे लागते त्यामुळे या व्यक्तीला भूक सुद्धा लागते आणि झोपही शांत लागते. याला कोणत्या महागड्या बाबींच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे मन स्थिर राहते व समाधानी राहते. म्हणूनच तो सुखी राहतो. गरिबीमुळे समाजात त्याचे चित्र थोड्या वेगळ्या पद्धतीने रंगविण्यात आले आहे. मात्र श्रीमंत लोकांपेक्षा गरीब व्यक्ती कधीही धनाने नव्हे तर मनाने श्रीमंत व सुखी असतो. कस्तुरीच्या शोधाप्रमाणे श्रीमंत लोक सुखाच्या मागे धावत राहतात. परंतु सुख त्यांना काही केल्या मिळत नाही. काखेत कळसा गावाला वळसा म्हणीप्रमाणे सुखाची परिभाषा न समजल्यामुळे सुखाच्या मागे पळणाऱ्या लोकांसाठी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांनुसार " तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी " असे म्हणावेसे वाटते. त्यास्तव सुखाला समजून घेणे क्रमप्राप्त आहे
जीवनात सुख मिळवायचे असेल तर आपल्याजवळ असलेल्या गोष्टीत संतुष्ट आणि समाधानी राहणे आवश्यक आहे. आपले मन कल्पवृक्षाखाली बसलेल्या व्यक्तीसारखे आहे. ज्याची कामना कधीच पूर्ण होत नाही शेवटी त्याचा अंत होतो पण त्याला सुख किंवा समाधान मिळत नाही. कारण आपली इच्छा कधीच संपत नाही. अति सुखाची लालसा हे माणसाचे जीवन रसातळाला नेते. रोज एक।सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापून त्याच्या पोटातील सर्व अंडी एकदाच प्राप्त करू इच्छिणार्‍या व्यक्तीच्या हातात अतिलालसेमुळे काय मिळाले ? अति तेथे माती. त्यास्तव अति संपत्ती किंवा इतर वस्तु प्राप्तीची लालसा ही सुखाला झाकोळून दुःख देऊन जाते. या बाबींची जाणीव सर्वप्रथम ठेवावी लागते.
मनात लालसा ठेवू नये आणि त्याचसोबत आपण जीवनात सुखी राहावे असे वाटत असेल तर आपणाला शक्य होईल तेवढ्या तन-मन-धनाने इतरांना मदत करावी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपण कोणाच्या दुःखात मदत केल्यास आपल्या दुःखात कोणीतरी धावून येतील. दुखी व्यक्तींना मदत केल्याने जे समाधान मिळते ते प्रत्यक्ष अनुभवल्यानेच कळते. त्याची मोजदाद कशातच करता येत नाही. इतरांविषयी द्वेष, मत्सर, वैरभाव न ठेवता नेहमी गोड बोलावे. बहुतांश वेळा बोलण्यातून सुद्धा पदरी निराशा येते. त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेले केव्हाही बरे. इतरांचे काही चांगले करता येत नसेल तर निदान त्याचे वाईट तरी करू नये, इतरांचे दुःख वाटुन घ्यावे व आपले सुख मुक्तहस्ते द्यावे.
नेमके आपण याच्या उलट वागतो त्यामुळे आपण नेहमी दु:खी वाटतो. याउलट संत-महात्मे निर्धन असून सुखी वाटतात कारण त्यांना जीवन जगण्याचा खरा सार कळलेला असतो. तुज आहे तुजपाशी याचा शोध लागला की रात्रीला झोप येण्यासाठी झोपेची गोळी घेण्याची काहीच गरज नाही

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment