नागोराव सा. येवतीकर

Friday, 18 May 2018

लेख क्रमांक 05 बदल्या

*अखेर शिक्षकांच्या बदल्याना सुरुवात*

मे महिना म्हटले की बदल्यांची सुगी असते. प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. तसे विशेष करून शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वांचे खास लक्ष लागलेले असते. शिक्षक हा सर्वांच्या ओळखीचा आणि जिवाभावाचा कर्मचारी असतो. गावातल्या प्रत्येक क्षेत्राशी त्याचा संबंध येतो. गावात काही अडचण निर्माण झाली तर लोकं शाळेतील शिक्षकांकडे मदतीसाठी धावून येतात. लोकांची मदत मागण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यामुळे कधी पूर्ण होते तर कधी अपूर्ण राहते. पण शिक्षकांच्या शब्दाला आजही गावात मान आहे, यात शंका नाही. तसे आजकाल शिक्षकांचे संबंध फक्त गावपूरतेच मर्यादित राहिले नसून आजचा शिक्षक थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या शिक्षकांच्या बदल्याविषयी थोडी फार माहिती घेतली तर लक्षात येईल की सूर्य छाप जर्दाच्या चिटोरीवर शिक्षकांचे नाव लिहून बदल्या झाल्या आहेत. लोकप्रतिनिधीच्या आजूबाजूला असलेल्या लोकांद्वारे ह्या बदल्या व्हायच्या. पूर्वीचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते माणुसकी तसेच संबंध या गोष्टी लक्षात घेऊन काम करीत असत. परंतु शिक्षकांच्या बदल्यात लोकप्रतिनिधींचा हस्तपेक्ष सर्वांसाठी एक डोकेदुखी बनली होती. प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांना या बदल्याच्या कालावधीत रजेवर जावे लागायचे. त्याशिवाय बदल्या होत नव्हत्या. म्हणजे अधिकारी वर्गासाठी कमाई कमी आणि डोकेदुखी जास्त होते. त्यांच्या मनात नसेल तरी बदल्याच्या प्रक्रियेवर सह्या कराव्या लागत असे. त्यामुळे पैसेवाले सर्व चांगल्या ठिकाणी बदली करून घेत असत आणि जे पैसे खर्च करू इच्छित नाही त्यांना मात्र अवघड क्षेत्रांत किंवा शहरापासून दूर नोकरी करावे लागत. पण या सर्व बाबीला फाटा देऊन पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या स्तरावरून होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच ग्रामविकास मंत्रालयातून होत आहेत. शासनाचा हा निर्णय खरोखरच स्तुत्य आणि वाखाणण्याजोगे आहे. या प्रक्रियेमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि सहज बदल्या संपन्न होत आहेत. आत्तापर्यंत राज्यतील दहा एक जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 25 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण होण्याचे संकेत आहेत. अगदी सुरुवातीला या प्रक्रियेचा अभ्यास न करता अनेक शिक्षक संघटना आणि इतर शिक्षक मंडळींनी यास विरोध केले होते. मात्र सरल ऑनलाईन प्रणालीच्या बळावर यावेळी शिक्षकांच्या बदल्या करून दाखविण्यात येत आहे. प्रत्येकांनी आपल्या पसंदीचे आवडीचे 20 गावांची यादी दिलेली असल्यामुळे शिक्षकांच्या इच्छेनुसार बदली होत असल्याचे चित्र निर्माण होत आहेत. ज्यांची बदली झाली आहे ते निश्चित आहेत तर ज्यांची बदली होणे शिल्लक आहे ते मात्र अस्वस्थ आहेत. त्यांचे हृदयाचे ठोके वाढत चालले असून रात्रीची झोप उडाली आहे. मात्र यावर्षी शिक्षकांच्या होत असलेल्या बदल्या न भूतो न भविष्यती अश्याच आहेत असे म्हणावेसे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment