नागोराव सा. येवतीकर

Sunday, 13 May 2018

लेख क्रमांक 01 अनाठायी खर्च टाळू या

लेख क्रमांक 01 
दिनांक 11 मे 2018 शुक्रवार

*अनाठायी खर्च टाळू या*

लहानपणी शाळेत शिकत असताना घरात आणि शाळेत पैशांची बचत करण्याविषयी सांगितले जायचे. घरात कोणी पाहुणे आले की किंवा बाबा  गावाला जात असताना हातावर दहा पैशाची मोठी बंदी द्यायचे. त्या बंदीला पाहून मन हरखून जायचे आणि नकळत पाय दुकानाकडे वळायचे. घराशेजारीच दुकान असल्यामुळे जास्त कष्ट कधी लागायचे नाही. बालपणीचा काळ असा सर्वांचाच सुखाचा असतो. मात्र वय वाढत जाते तसे घरातील मंडळी आणि पाहुणे सुद्धा लाड कमी करतात. पूर्वी जो पैसा हातात यायचा ते आता कोणी देत नसत तेव्हा मनात कुठेतरी वाटायचे बाबा आणि पाहुण्यांचे पैसे द्यायचे ते जर मी खर्च न करता वाचविले असतो तर माझ्याकडे भरपूर पैसा जमा राहिला असता. माझ्यावर असे हात पसरण्याची वेळ कदापिच आले नसते. हा विचार जेव्हा मनात येतो त्याचवेळी पासून व्यक्ती पैशाची बचत करायला शिकतो. काही व्यापार नाही आणि काम धंदा किंवा नोकरी नाही त्या व्यक्तीला एक तर पैसा फार मुश्कीलीने मिळतो आणि मिळालेला पैसा बचत करण्याचा विचार करण्यापूर्वी खर्चून जातो. मात्र जी व्यक्ती व्यापार कामधंदा किंवा नोकरी करते त्यांच्या हातावर पैसा सदोदित खेळत असतो. त्यामुळे अशा लोकांनी पदोपदी अनाठाई खर्च करण्याचे टाळून त्याठिकाणी पैशाची बचत कशी करता येईल ? याचा विचार करणे आवश्यक आहे. मी कमावलेला पैसा आहे आणि माझा पैसा आहे, मी वाट्टेल त्या पद्धतीने खर्च करणार असा विचार एक ना एक दिवस आपणाला नक्कीच रसातळाला घेऊन जाणार यात शंका नाही. पण काही श्रीमंतांनी किंवा करोडपती मंडळी लग्नसमारंभ, वाढदिवस या सारख्या कार्यक्रमातून लाखो रुपयांचा चुराडा करतात. त्यांना वाटते की समाजात माझी जी इमेज किंवा स्टेटस आहे ती फार वरच्या वर्गाची आहे साधेपणाने कार्यक्रम साजरे कसे करणार ? या स्वतःच्या इगोमुळे प्रचंड प्रमाणात अनावश्यक खर्च केला जातो. हीच पद्धत वरून खालपर्यंत पसरत आहे मराठीतील प्रसिद्ध म्हणीनुसार अंथरूण पाहून पाय पसरावे याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा अनेक ठिकाणी आपण आपल्याला गरज नसतानाही त्या गोष्टीवर पैसा  खर्च करतो. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही तेव्हा खर्च करताना मी का विचार करू ? ही विचार करण्याची वृत्ती समाजास कधीही घातकच आहे. तेव्हा आजपासून आपण ठरवले पाहिजे आणि अनावश्यक खर्च टाळलेच पाहिजे तरच स्वतःचा आणि देशाचा विकास होऊ शकतो अन्यथा नाही. प्रत्येकाने अनाठाई खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांनी दुकानातील रंगबिरंगी दिसणारे आकर्षक वस्तूकडे आकर्षित न होता ते खाण्याचा मोह टाळावा. बहुतांश वेळा घरातील मंडळींना बालहट्ट पूर्ण करावाच लागतो. दुकानातल्या त्या वस्तूपासून मुलांना कोणते विटामिन मिळत नाही उलट पोटाचे विकार सुरू होतात. म्हणजे पहिल्यांदा खाऊसाठी पैसा खर्च करायचा आणि त्यानंतर दवाखान्यासाठी दुपटीने खर्च करायचा. या बाबीचा विचार करून प्रत्येक मुलाने शहाण्या लेकराप्रमाणे दुकानातील ते आकर्षक वस्तू खाण्याचा मोह टाळून रोज जे दहा-वीस रुपये होणार खर्च वाचविता येतो याचा जरूर विचार करावा. पुरुष मंडळींनी घराबाहेर खर्चावर स्वताबद्दल बंधने टाकणे गरजेचे आहे. बहुतांश पुरुष मंडळींना तंबाखू, दारू आणि सिगारेट यांचे व्यसन लागलेले असते. या व्यसनामुळे काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर काहीजणांचे जीवन संपले आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा मी खूप पैसे कमावतो तेव्हा थोडा शौक केला तर काय बिघडते अशी विचारधारा मनात ठेवून काही मंडळी या व्यसनाकडे वळतात. परंतु या शोधामुळे आपला रोजचा अनाठायी खर्च किती वाढला याचा लेखाजोखा एखाद्या दिवशी काढल्यास आपणास धक्काच बसतो. पानटपरीवर बाबारत्ना गुटखा साधारणपणे वीस ते पंचवीस रुपयाला मिळते आणि बहुतांश जण दिवसातून तीन ते पाच वेळा गुटखा खातात म्हणजे एका दिवसाचा गुटख्यावरचा खर्च 80 ते 100 रुपये आणि महिन्याचा 2000 ते 3000 रुपये. एवढा खर्च फक्त गुटखा खाऊन थुकल्या जाते. तंबाखू खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो, छातीत जळजळ होते, भूक लागत नाही, पाय दुखतात अशा अनेक त्रास संभवतात. गुटखा खाण्याचा अतिरेक झाला की एक दिवस दवाखान्यात जावे लागते. तेथील खर्च तर सांगता सोय नाही. असेच काही दारू पिणे आणि सिगारेट सोडणे या व्यसनाबाबत सुद्धा घडते. खरोखरच या व्यसनापासून शरीराला काही चांगल्या बाबी मिळतात का ? मग या गोष्टीवर आपण तो नित्य खर्च करतो तो अनाठायी आहे किंवा नाही याचा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शासन तंबाखू निर्मिती व विक्री या दोन्हीवर कायदेशीर बंदी घातलेली आहे तरी त्याची खरेदी आणि विक्री नेहमीपेक्षा दुप्पट होत आहे. अशा गोष्टींवर बंदी घातल्याने तंबाखू खाणे बंद होणार नाही तर त्यांचे मन परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे. स्वतःच्या कुटुंबाची आपल्या माघारी काय होणार ? याची काळजी आपण करायलाच हवे. कुटुंबाला आपली आज खरी गरज आहे. त्यामुळे तंबाखू,दारू, सिगारेट सोडा आणि अनाठाई खर्च वाचवा. आपल्या कुटुंबाला प्रेम द्या, माया द्या तर समाजात शांतता राहिल. लहान मुले आणि पुरुष मंडळी यानंतर खर्च करण्यात सर्वात पहिला क्रमांक लागतो ते म्हणजे महिलांचा.  बालहट्ट जसे पूर्ण करावे लागते तसेच स्त्रीहट्ट सुद्धा पूर्ण करावा लागतो. स्त्री हट्टापुढे कोणाचे काही चालत नाही. महिला वर्गांच्या मागण्यांकडे जर लक्ष दिले तर खरोखरच त्यांची मागणी किती अनाठाई खर्चाची आहे हे लक्षात येईल. महिलांचा सर्वात जास्त आवडीचा भाग म्हणजे साडी खरेदी करणे आणि सोन्याचे दागिने तयार करून घेणे.  विवाहाचा योग सुरू झाल्यापासून तर पुढे आयुष्यभर पती-पत्नी या दोघांमध्ये साडी आणि सोने या विषयावर कधी वाद तर कधी संवाद घडत असतो. ज्या पुरुषाची पत्नी साडी व सोने याविषयी हट्ट करत नाही तो पती खूपच सुदैवी आहे. असा सुदैवी पती मिळणे मात्र दुर्मिळ आहे. दागिनेशिवाय कोणतीही स्त्री सुंदर दिसत नाही हे त्रिकालबाधित सत्य असेलही कदाचित मात्र अवाजवी सोने अंगावर टाकून मिरवणे हे सौंदर्याला लुप्त करते असे वाटत नाही का ? सुंदर स्त्रीला कोणत्याही आभूषणांची गरज नाही. परंतु मी किंवा माझे कुटुंब किती श्रीमंत आहेत हे पुढच्यांना नकळतपणे सांगण्यासाठी कदाचित हा खटाटोप असू शकतो. मात्र या साड्या आणि सोने यामुळे आपल्या व्यक्तिगत जीवनात काय प्रगती झाली. चोरी होण्याच्या भीतीमुळे घरात सोने असणाऱ्या बायकांना रात्रभर झोप येत नाही,  याउलट आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या आवश्यक तेवढे साडी आणि सोने बाळगले तर आपल्याच कुटुंबाचा खर्च आवाक्यात राहू शकतो. ज्या कुटुंबातील महिला छोटी-छोटी बचत करीत संसार करतात तेच कुटुंब भविष्यात चांगले आयुष्य बघू शकतात. घरात लागणार्‍या वस्तू असो वा स्वयंपाक घरातील वस्तू त्या प्रत्येकाची योग्य काळजी घेऊन विनाकारण ते नष्ट होणार नाही किंवा वस्तू वापरात न आणता पडून राहणार नाही याची काळजी घेणारी महिला घराला अनाठाई खर्चापासून वाचवून पुढे आणू शकते. तिचेच  संस्कार घरातील प्रत्येक लहान बालकावर होत असतात. हीच लहान मुले भविष्यात मोठी होऊन आईच्या पावलावर पाऊल ठेऊन चालायला लागतात. त्यास्तव महिलांनी आजच्या आपल्या आयुष्यासाठी आणि उद्याच्या लेकरांच्या आयुष्यासाठी अनाठायी  खर्च करण्याचा मोह टाळला तर संसार सुखाचा होईल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769

No comments:

Post a Comment