नागोराव सा. येवतीकर

Friday, 22 March 2024

पुस्तक परीक्षण - यौवन ते विवाह ( Youvan te Vivah )

तारुण्याचा दिशादर्शक प्लॅटफॉर्म सांगणारा लेख संग्रह - यौवन ते विवाह
तारुण्यावस्था म्हणजे मनास उमलविणारा व तनास फुलविणारा आयुष्यातील एक महत्वाचा संक्रमण काळ, याच काळावरून प्रत्येकांची पुढचे भविष्य ठरले जाते. या तारुण्याच्या वयात नकळतपणे चुका होतात आणि भविष्य उध्वस्त होऊन जाते. म्हणून या उमेदीच्या वयात थोडीशी काळजी आणि थोडीशी जागरूकता ठेवल्यास संपूर्ण आयुष्य निरोगी, निरामय आणि यशस्वीपणे कसे जगता येईल याचे उत्तम असे मार्गदर्शन प्रा. देवबा शिवाजी पाटील यांच्या यौवन ते विवाह या लेखसंग्रहात वाचण्यास मिळतात. प्रा. देवबा पाटील हे एक सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांचे आजपर्यंत खूप साहित्य प्रकाशित झालेले आहे. आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांसाठी त्यांनी लेखन केले आहे. पुणे येथील कृष्णायन प्रकाशन द्वारे प्रकाशित झालेले यौवन ते विवाह हा लेखसंग्रह फक्त वयात आलेल्या तरुण-तरुणी यांच्यासाठीच नाही तर किशोरवयीन मुलामुलींना, पालकांना, महिलांना या सर्वांसाठी उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे. या पुस्तकात त्यांनी सदतीस विषयाच्या माध्यमातून तारुण्यातील अनेक घटनांचा मागोवा घेतलेला आहे. रस्ता चुकलेल्या वाटसरूला जर रस्त्यात कोणी वाटाड्या भेटला आणि त्याने खऱ्या रस्त्याच्या मार्ग सांगितला तर वाटसरू आपल्या इच्छित स्थळापर्यंत निश्चित पोहोचतो. प्रा. देवबा पाटील यांचे हे पुस्तक देखील तरुण मंडळींना वाटाड्या म्हणून काम करेल, यात शंकाच नाही. 
आपल्या पहिल्याच यौवनारंभ या प्रकरणात लेखकाने तारुण्यावस्था म्हणजे काय ? याचे योग्य वर्णन केले आहे. या वयात आई-वडिलांच्या भूमिका काय असायला पाहिजे हे सांगताना ते म्हणतात, केवळ आईवडिलांचे निर्मळ प्रेमच त्यांचा हा उत्साह नियंत्रित करू शकते. मुलांना सुधारण्यासाठी प्रेमाचा मार्ग हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाएवढा खरा व सार्वकालिक आहे. खरे प्रेम हे शहाणे असते व ते मुलांना नीट शिस्त लावते. घरात मुलांना प्रेमपूर्वक व मोकळे वातावरण मिळाले नाही तर ती मुले इतर मार्गावर वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
तरुण किंवा युवा कोणाला म्हणावे यांची खूप चांगली व्याख्या युवा सजगता या प्रकरणात वाचायला मिळते. सर्व प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्याची ज्याच्यात हिंमत असते ते युवा असे ते म्हणतात. या युवा काळात अनेक गोष्टीचे आकर्षण असते परंतु त्यावेळी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले ठेरवलेले ध्येय गाठण्यासाठी मनात जिद्द ठेवून अतोनात मेहनत करण्याचे गुण अंगी बाणले पाहिजे. तरुणपणात जो आळस करतो आयुष्यभर मग त्याला कष्ट सोसावे लागतात. या वयात मुला-मुलींना एकमेकांचे आकर्षण असते. म्हणून आपले पाऊल चुकीच्या दिशेने टाकू नये असा मोलाचा सल्ला ते देतात. 
आपले जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी करायचे असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे. सदानकदा काहीतरी नवीन शिकले पाहिजे. शिक्षणाची गरज या प्रकरणात लेखक शिक्षणाविषयी खूप मौलिक विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणतात, स्वतःचे निरीक्षण करणे, स्वतःचे आत्मपरिक्षण करणे आणि स्वतःमधील दोष शोधून, ते दूर करून स्वतःमध्ये स्वतः सुधारणा करणे व जीवन घडविणे हीच खरी शिक्षणाची क्रिया आहे. शिक्षण घेणे म्हणजे नोकरी मिळविणे हे नसून त्या शिक्षणाने आपल्या जीवनात बदल करणे होय. तरुणांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी अखंडित शिक्षण घेत राहिले पाहिजे. ज्याचे शिक्षण थांबला तो तिथेच संपला. 
लेखकाला तरुणांशी हितगुज करायला खूप आवडते. आजचे तरुण हे देशाचे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत. ते जर पोकळ, निरुउद्योगी आळशी आणि व्यसनी असेल तर देशाचा विकास कसा होईल ? तरुणाईशी हितगुज या प्रकरणात लेखक तरुणांना टाईमपास न करता आपला फावला वेळ पुस्तके वाचनात, आपला छंद जोपासण्यात घालावा. ज्यामुळे आपले मन अजून परिपक्व होण्यास मदत मिळते. 
ईश्वराने फक्त मानवाला बुद्धी दिली आहे. त्यामुळे माणूस आपल्या बुद्धीच्या बळावर विचार करू शकतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीनुसार प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि त्याची विचार करणारी बुद्धी देखील वेगळी असते. लेखकाच्या मते ज्याला आपल्या बुद्धीचा उपयोग करून घेणे हे सुयोग्य तऱ्हेने जमते तोच पुढे जातो. बुद्धिमता देई सुबत्ता या प्रकरणात लेखकाने बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक असल्याचे सांगताना आहार आणि व्यायाम हे देखील महत्वाचे आहे असे सांगितले आहे. जर शरीर साथ देत नसेल तर बुद्धी देखील साथ देत नाही म्हणूनच योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य पुस्तकांचे वाचन करून आपल्या बुद्धीचा सर्वांगीण विकास करता येऊ शकते. 
माध्यमिक शाळेचा निकाल लागला की प्रत्येक तरुणाला कॉलेजचे स्वप्न पडत असते. कॉलेजच्या जीवनाचे प्रत्येक तरुणाला विशेष आकर्षण असते. महाविद्यालयीन जीवन या प्रकरणात कॉलेजमध्ये युवकांचे जडणघडण कशी होते ? याचे यथार्थ वर्णन केले आहे. नो कॉलेज नो नॉलेज असे फार पूर्वीपासून म्हटले जायचे. पण आजकाल मुलं कॉलेजमध्ये कमी आणि कोचिंग क्लासेसमध्ये जास्त वेळ दिसून येतात. त्यामुळे कॉलेज मधील अनेक घटनांच्या अनुभवापासून मुकत आहेत, हे ही सत्य आहे. 
जीवनाचा खरा आनंद लुटायचा असेल तर सोबतीला एक तरी मित्र असावा. मित्राशिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय भाजी जशी सपक आणि बेचव लागते अगदी तसेच आहे. मित्र/मैत्रीण कसे असावेत ? या प्रकरणात लेखकाने मित्राचे खूप छान वर्णन केले आहे. चांगले मित्र मिळणे ही खरी संपत्ती आहे. मित्रांमुळे जीवन सुधारू शकते तर त्यांच्यामुळे बिघडू ही शकते. आपली ओळख ही आपल्या मित्र परिवारावरून केली जाते. 9म्हणून मित्राची निवड करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. 
आजकालच्या मुलांमुलीत सैराट प्रेम वाढीस लागले आहे. म्हणून क्षणभंगुर प्रेमाच्या जाळ्यात न पडता या वयात अभ्यास करणे व यश मिळविणे आवश्यक आहे. त्याच कामावर फोकस करण्याचा मार्मिक सल्ला आभासी प्रेमाचे मृगजळ या प्रकरणात सविस्तरपणे मांडले आहे. 
एखादा व्यक्ती दिसायला खूप सुंदर दिसतो पण मनाने तो तितकाच सुंदर असेल असे ठामपणे सांगता येत नाही. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ? या ओळीनुसार कुणाच्याही वरवर दिसण्यावर न जाता त्याचे चारित्र्य, गुण पाहायला हवे. उत्तम चारित्र्य हाच जीवनाचा पाया आहे. आपल्याकडे किती पैसा, किती बंगले, किती संपत्ती आहे ? यापेक्षा आपले चारित्र्य किती चांगले आहे ?हे अत्यंत महत्वाचे आहे. लेखकाने याविषयी चारित्र्य हेच खरे सौदर्य या प्रकरणात उत्तमरीत्या केले आहे.
व्यक्तिमत्व विकास या लेखात लेखक म्हणतो, 
माणसाचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा, व्यक्तिमत्वाचा निदर्शक असतो. आपले चालणे, बोलणे, आपली कार्यपध्दती, आपल्या सवयी यातून आपल्या व्यक्तिमत्वाचे लोकांना दर्शन होते. मनात जसे विचार असले त्याप्रमाणे आपला चेहरा बनतो, दिसतो. दुःखद विचारांनी चेहरा कोमेजतो, वाईट विचारांनी चेहरा आक्रसतो, दृष्ट विचारांनी चेहरा उग्र बनतो तर चांगल्या विचारांनी चेहरा आपोआप प्रफुल्लित होते. 
विचार प्रबळ जीवन सबळ या लेखात लेखक आपले विचार व्यक्त करताना म्हणतो की, 
जीवनात यशस्वी होण्यासाठी विचारआचार उच्च असायला पाहिजेत. ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो. विचार हे वाहत्या पाण्यासारखे असतात. पाण्यात जे मिसळले तसे पाणी बनते. सकारात्मक विचार जीवनाला उचित वळण देतात. सकारात्मक विचारांनीच आपण आपल्या जीवनाचा विकास करू शकतो. नकारात्मक विचार हे प्रत्येक कामातील अडथळा असतात आणि त्यांच्यामुळे अनेक कामे खोळंबतात.
प्रत्येक तरुण तरुणी आणि वैवाहिक जीवनात नुकतेच प्रवेश केलेल्या नावदाम्पत्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शक पुस्तक आहे. 

पुस्तक - परिचय 

नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment