नागोराव सा. येवतीकर

Friday, 22 March 2024

पुस्तक परीक्षण - सीता-शक्ती ( Seeta-Shakti )

स्त्रीचं मन सांगणारी सीता-शक्ती कादंबरी
भारताच्या इतिहासाला हजारो वर्षांची परंपरा आहे. रामायण हे महर्षी वाल्मिकी रचित आदिमहाकाव्य असून त्याचा चरित्र नायक मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भारतीयांचे श्रद्धेय दैवत आहेत. मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम यांचे गुणगान समस्त लोक नेहमी करत असतात. मात्र त्यांची पत्नी सीता यांच्याविषयी फारसे बोलल्या जात नाही. काही काही जण तर सीतेमुळे रामायण घडलं असे बोलतात. कदाचित ते सत्य ही असेल ! मात्र संपूर्ण जीवनात सीतेला किती त्रास सहन करावा लागला असेल ? तिने त्रास का सहन केला असेल ? कोणासाठी सहन केला असेल ? कधी सीतेच्या भूमिकेत जाऊन आपण विचार केला आहे का ? नाही. पण हैद्राबादच्या मीना खोंड यांनी तसा विचार केला आणि सीतेच्या भूमिकेत जाऊन त्यांनी " सीता-शक्ती " नावाची कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी प्रत्येक स्त्रीचं मन काय सांगत असते ? काय बोलत असते ? हे सीता बनून लिहिले आहे.
रामायणाची कथा आपणा सर्वांना तोंडपाठ आहे. रामायणात अनेक पात्र आहेत आणि प्रत्येक पात्राचे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे. त्याच्यातील मुख्य पात्र आणि त्यांच्या घटना आपणांस माहीत आहेत. पण लेखिकेने फक्त सीता ही मध्यवर्ती कल्पना डोळ्यासमोर ठेवून सुंदर असं सितायन लिहून काढलं आहे. कुणाच्या प्रारब्धात काय लिहून ठेवले आहे ? हे कसे कळणार ? नशिबात जे लिहिलं आहे ते घडणारच आहे, फक्त त्यासाठी कोणीतरी निमित्त होत असते !
कैकयीने राजा दशरथ यांना दोन वर मागितले नसते तर श्रीराम वनवासात जाण्यासाठी निघाले नसते. सुख असो वा दुःख पती-पत्नी नेहमी एकत्र असावेत ही भावनिक परंपरा पूर्वीपासुन चालत आलेली आहे. 'जेथे राघव तेथे सीता ‘ त्यानुसार सीता श्रीरामासोबत वनवासाला गेली . तिच्या नशिबात हा पहिला वनवास होता आणि तिने हा वनवास स्वेच्छेने  स्वीकारला होता .राज्य, ऐश्वर्य भोगण्याच्या मनस्थितीत असतांना परिस्थिती बदलली आणि वनवास भोगावा लागला. सीतेने वनवास खंबीरपणे संकटं संघर्ष सहन करत भोगला. सुख दुःखात पतीला साथ देण्याची सीता शक्ती अलौकिक आहे .
            या कथेतून अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे तो म्हणजे स्त्री हट्ट. कैकयीने राजा दशरथ जवळ हट्ट केला आणि सीतेने श्रीरामाला कांचनमृग आणून देण्याचा हट्ट धरला. स्त्री हट्टामुळे कधी कधी जीवनात अडचणीचे प्रसंग निर्माण होतात. म्हणून स्त्रियांनी आपला हट्ट पूर्ण करून घेतांना संसाराची देखील काळजी घ्यावी.
सीतेला पती रामाचा अतिशय अभिमान होता. ती म्हणते “ तुम्ही संघर्ष करून समुद्रपार करून त्या कपटी राक्षस रावणाचा वध केला आणि लंकेतून माझी मुक्तता केली. हा तुमचा पराक्रम माझ्याकरिता प्रेम, अभिमान, उपकार, अलौकीक दिव्य होते. अश्वमेध यज्ञाच्या वेळी आपली वामांगी सुवर्णप्रतिमा बघून प्रेमाची एकपत्नी व्रताची साक्ष पटली!”
" सीते तू माझी आंतरिक शक्ती होतीस. मी रावणवध करून हे युद्ध जिंकले आणि महत्वाचे म्हणजे तुझी सुटका झाली." राम सीतेचे असे अद्वैत होते.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना महत्व दिले जात नाही. तसेच संशयाचे बळी स्त्रियाच ठरतात. कधी ही पुरुषावर असे संशय घेतल्या जात नाही किंवा घेतले तरी काही होत नाही. पण स्त्रीवर संशय घेतल्यावर अग्निपरीक्षा द्यावी लागते. सीता गरोदर असतांना देखील एका व्यक्तीच्या बोलण्यावरून श्रीराम सीतेला अरण्यात सोडून देतात. त्यावेळी सीता चलबिचल होते. पण गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी ती सर्व विचार बाजूला ठेवून सकारात्मक विचार करते. कारण मातेने नाराज, उदास होऊन नकारात्मक विचार केला तर त्याचा परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो. सीतेचे उच्च विचार लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी कसे वागावे ? एकल मातेने संस्कार कसे करावे ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीतामाता होय.
व्यक्तीगत जीवनापेक्षा राजाला राज्य महत्वाचे, व्यक्तीगत नात्यापेक्षा प्रजा महत्वाची हे तत्व राजारामाला पाळावे लागेल ! प्रजा प्रथम, नाती दुयम्म राहतील. राजाला नाती नसतात. राजा फक्त प्रजेचा असतो. श्रीराम हे प्रथम अयोध्येचे राजा आहेत आणि त्यानंतर आपले पती ! म्हणून श्रीराम अडचणीत किंवा संकटात येऊ नये म्हणून त्यांनी 14 वर्षाच्या वनवासानंतर दुसरा वनवास भोगला होता. मानसकन्या सीतेला वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमात घेऊन गेले .वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र रामायणात लिहिल्यामुळे आजच्या लोकांना रामायण वाचायला मिळत आहे. त्यांच्या संस्कारामुळे लव-कुश यांच्या माध्यमातून श्रीरामाची भेट झाली. पण सीता मात्र आपल्या धरतीमातेच्या कुशीत गेली. पुस्तकातील लेखिकेची भाषा सहज, सोपी, हळवी आणि मनाला भावणारी आहे.
जीवनात संघर्ष, संकटं, परीक्षा, वनवास, एकटेपण, अपमान, कलंकितेचा चारित्र्यावर असलेला संशयाचा आघात सहन करणं हे सारं सीतेच्या आत्मिक शत्तीमुळे शक्य झालं. पतिव्रता आणि माता दोन्ही भूमिका तिने यशस्वीपणे पार पाडल्यात.
जन्म भू मातेच्या उदरी
मृत्यू भू मातेच्या अंतरी
सीता-राम मनामनात जनाजनात
जोवर चंद्र सूर्य आहेत भूवरी
सीता-शक्ती या पुस्तकाविषयी लेखिका म्हणते, ' मी सीतेवरील अन्यायाच्या दृष्टीकोनातून सीताशक्ती लिहायला घेतली. जसा जसा मी अभ्यास करायला लागले, तशी मी श्रीरामाच्या गुणसमुच्चय, चारित्र्य, आदर्श या सार्‍या मूल्यामुळे मर्यादा पुरुषोत्तमाकडे आकर्षित व्हायला लागले. माझे चिंतन वाढले आणि... रामाचे एकपत्नी व्रत, सीतेचा त्याग, सीतेचा आत्मघात या प्रश्नांची उत्तरे मला मिळत गेली.'
खरंच काही प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना आपणाला त्या प्रश्नाचे उत्तर तर सापडतेच. शिवाय त्याच्याशी निगडित अन्य माहितीची देखील भर पडत असते. म्हणून प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारून त्याचे उत्तरं शोधण्याचा नक्की प्रयत्न करावे.
लेखिकेने स्त्री भावना अतिशय संतुलितपणे मांडल्या आहेत हे विशेष. श्रीरामाला कुठलेही दुषण न देता सीतेच्या भावना व्यक्त करणं हे फार कठीण काम आहे, पण लेखिकेने ते फार छान प्रकारे लिलया केलंय हेच मला या पुस्तकाचे यश वाटते. हे सीताशक्ती निश्चित वाचनीय आणि संग्रह ठेवण्यासारखे आहे.

पुस्तकाचे नाव :- सीता-शक्ती
लेखिकेचे नाव :- मीना खोंड, हैद्राबाद
प्रकाशन - विजय प्रकाशन, नागपूर
पृष्ठे :- 84
मूल्य :- 125 ₹

पुस्तक परिचय -
नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment