नागोराव सा. येवतीकर

Friday, 3 September 2021

Teacher's Day

तस्मै श्री गुरवे नम:

'गुरूब्रम्हा, गुरूविष्णू, गुरूदेवो महेश्‍वर:
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप मोठे आदराचे व मानाचे स्थान आहे. गुरूमुळे जीवनातील अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरतो. म्हणूनच पुरातन काळ म्हणजे रामायण व महाभारताच्या काळापासून गुरूला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या काळातील राजे-महाराजे गुरूच्या सल्ल्याशिवाय पुढील मार्गक्रमण किंवा काम ठरवीत नसत. राजेमंडळी गुरूंना आदर व सन्मान देत असत त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा त्यांचा आदर करीत असत. गुरूच्या मनाविरूद्ध वागल्यास गुरू क्रोधीत होतील, त्यांना संताप येईल आणि रागाच्या भरात शाप देतील अशी भिती सुद्धा लोकांच्या मनात होती. याचाच अर्थ पूर्वीच्या काळी समाजात गुरूचा फार मोठा दबदबा होता. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी करून घेण्याची कला राजा जवळ असणे आवश्यक होती. त्याकाळात गुरूगृही जाऊन विद्या शिकण्याची पद्धत होती ज्यास 'गुरूकूल' पद्धत असे संबोधल्या जाई. परंतु या गुरूकूल मध्ये काही ठराविक लोकांनाच विद्यादान केल्या जात असे. कारण द्रोणाचार्य गुरूंनी एकलव्यास विद्या शिकविण्यास नकार दिला होता परंतु त्याच्या गुरू भक्तीमुळे त्याला ज्ञान मिळविता आले. याचा एक अर्थ आपण असा काढू शकतो की, त्याकाळी सुद्धा गुरूंना शासनाचे (राजांचे) ऐकावेच लागत असे. राजाच्या परवानगी शिवाय राजगुरूला कोणालाही शिकविता येत नव्हते.
कालाय तस्मै नम: नुसार काळ बदलत गेला आणि त्या अनुषंगाने समाज सुद्धा बदलत गेला. गुरूच्या घरी जाऊन शिकण्याच्या पद्धतीत म्हणजे गुरुकूल हळूहळू बदल होत गेला. गुरूची जागा शिक्षकाने घेतली. समाजात आज वेगवेगळया क्षेत्रात वेगवेगळे प्रकारचे गुरू आहेत. मात्र समाजाचा सर्वात जास्त विश्‍वास ज्या गुरूवर आहे तो म्हणजे शिक्षक. परिस्थितीनुसार काळ बदलत राहतो आणि काळानुरूप परिस्थिती बदलते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले, त्यांना शाळेतला गुरू लाभलाच नाही तर ते एवढे मोठे साहित्यिक कसे झाले? गुरूदेव रविंद्रनाथ टागोर एक दिवस शाळेत जाऊन एवढे महान कवी कसे बनले? कवयित्री बहिणाबाई चौधरी एकही दिवस शाळेत न जाता प्रसिद्ध साहित्यिक कसे बनू शकल्या? तर त्याचे उत्तर आहे अनुभव. त्यांचा गुरू होता अनुभव आणि विलक्षण बुद्धीमत्ता यामुळे ते शक्य झाले. परंतु आपण सामान्य असलेले व्यक्ती आपणाला पदोपदी मार्गदर्शन करणारे, दिशा देणारे आणि रस्त्यावरून चालवत नेणार्‍या गुरूची गरज भासते. गुरूविना आपले जीवन अपूर्ण आहे.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अपार कष्ट सोसले. लोकांकडून फुले दाम्पत्याचा खूप छळ केला गेला पण त्यांनी शैक्षणिक कार्य थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फुले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे आणि तळागाळातील व्यक्ती सुध्दा शिक्षण घेत आहे.
आज शासनाचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असे सध्या जे बोलल्या जात आहे ते महात्मा फुलेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले होते की " सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना  मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले जावे " परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी शिकविण्यासाठी कोणीच तयार होईना. शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच शिकविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाह, त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा समज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर श्क्षिणाचा खेडोपाडी दरी खोर्‍यात प्रसार केला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. सन १९९0 च्या दशकापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.
निस्व:र्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले.
आज शाळेतील शिक्षक मंडळी तणावाखाली वावरत आहेत असे म्हटले तर शिक्षकी पेशा सोडून जी मंडळी आहे त्यांना हसू येते आणि विनोदबुद्धी सुचते. मात्र जे या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना हे सत्य आहे असे वाटेल. शाळेमधून मुलांवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांनी करणे खरे तर आवश्यक आहे. मात्र किती शाळेतून मुलांवर संस्कार केले जातात. याची चाचपणी केल्या जात नाही. कारण आज त्यांना अभ्यासक्रमासमोर संस्कार काहीच वाटत नाही. दिलेला अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर त्यांना वाईट बाबीशी सामना करावा लागतो त्यामुळे ते मुलांना समजेल अश्या भाषेत न शिकविता एका पाठोपाठ एक धडे संपविण्याचा सपाटा चालवितात. अपेक्षित बदल पाहण्यापेक्षा त्याच्या गुणाकडे शिक्षकासोबत पालक ही लक्ष देत आहेत त्यामुळे मुले भावनाहीन बनत आहेत. येथूनच समाज रसातळाला जाणे प्रारंभ झाली म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.


नागोराव सा.येवतीकर
विषय शिक्षक व लेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
09423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

* शिक्षकांच्या हातात खडू द्या . . . . . !
गेल्या वर्षी दिवाळीची सुट्टी सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला संपूर्ण महाराष्ट्र विजय नकाशे सरांच्या आत्महत्येच्या बातमीने हादरून गेला.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पंचायत समितीअंतर्गत असलेल्या सेमाडोह येथील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक जे की मुख्याध्यापकपदाचे अतिरिक्त कारभार पाहत होते ते विजय नकाशे यांनी पंचायतराज कमिटी अर्थात पीआरसीच्या दौर्‍यानंतर शाळेतच आत्महत्या केली. फारच क्षुल्लक करणावरून त्यांनी आत्महत्या केली. ते कारण म्हणजे तांदळाच्या हिशेबात ३० किलो तांदूळ कमी दिसून आले आणि तारीख संपलेली मिरची पावडर पाकीट आढळून आले, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची खात्री झाली. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष गुरुजींचा बळी गेला. शाळेतील मुलांना शिकवले नाही, तिथे हलगर्जीपणा केला, हयगय केली यामुळे जर शिक्षकांना निलंबित करण्यात आले असते तर कदाचित योग्य झाले असते. कारण ज्या कामासाठी नेमणूक करण्यात आली ते काम जर केले नाही तर कोणीही यात चूक दाखवणार नाही. मात्र इथे शाळेतून सध्या शिकवणे फारच कमी म्हणण्यापेक्षा नाही म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. कधी कधी तर असे वाटते की, शिक्षकांची नेमणूक ही अध्यापनापेक्षा इतर अवांतर कामांसाठीच जास्त प्रमाणात उपयोगी पडते. शासनाच्या काही योजनांतून शिक्षक जर वजा केले तर त्यांच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचतच नाहीत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे संपवली जातील, त्यांना निवडणुका किंवा जनगणना याशिवाय इतर कामे लावण्यात येणार नाहीत असे फक्त म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र काही होत नाही. या लोकांचे बोलायचे दात आणि खायचे दात पूर्णत: वेगळे आहेत. यांना ‘बोलावे तैसे चालावे’ ही संतांची वचने माहीत आहेत. कळतंय, पण वळत नाही अशी परिस्थिती आहे.
प्राथमिक शिक्षकांची नेमणूक ही शाळेतील ६ ते १४ वयोगटातील बालकांना अध्यापन करण्यासाठी होते. नव्यानेच रुजू झालेला शिक्षक मोठ्या उत्साहाने आणि जोमाने शिकवायला प्रारंभ करतो. उद्याचा हिंदुस्थान सक्षम असावा आणि तो मी घडविणार या प्रेरणेने तो काम करीत असतो. सुरुवातीचे काही दिवस त्याच्या मतानुसार घडतेसुद्धा. अध्यापनात त्याला बहुतांश वेळा अडथळा येतो. ज्यावेळी त्याच्या हातात खडू यायचे त्याच नेमक्या वेळी नाइलाजास्तव पेन घेऊन बसावे लागायचे. वारंवार असेच घडत राहिल्यामुळे तो पूर्णत: खडू बाजूला ठेवून हातात फक्त पेनच धरायला लागला. त्याच्या मनात कधीच असे आले नाही, मात्र ते जर पेन हातात घेतले नाही तर वरिष्ठ कार्यालयातून हातात कागद यायला वेळ लागत नाही याची भीती त्याच्या मनात नेहमीच असते. त्यामुळे तो कागदी घोडे (अहवाल) पूर्ण करण्यात असा काही रुततो की शाळेत विद्यार्थी अध्ययनासाठी आले आहेत याचे जरासुद्धा भान नसते. शिक्षकांच्या हातात खडूशिवाय काहीच राहू नये अशी परिस्थिती कधी तयार होईल देव जाणे! ज्या दिवशी अशी परिस्थिती तयार होईल त्याच दिवसापासून ‘प्रगत महाराष्ट्र’ दिसायला लागेल.
शिक्षकांच्या हातात खडूऐवजी पेन घ्यायला कोणी लावले? विजय नकाशे या शिक्षकाचा बळी या अशैक्षणिक कामाने घेतला नाही काय? असे नाना प्रकारचे प्रश्‍न मनामध्ये निर्माण होतात. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका याविषयी शिक्षक संघटनासुद्धा विरोध करीत असते, मात्र येथे ‘आले सरकारच्या मना तेथे कुणाचे चालेना’ अशी परिस्थिती आहे. सरकारी कर्मचारी म्हणजे गप्प गुमानपणे, खाली मान घालून, सांगेल ते काम करणारी व्यक्ती अशी स्थिती निर्माण केली. कुणालाही वर तोंड करून बोलण्याची मुभा नाही. जर एखाद्या कर्मचार्‍याने तशी हरकत केली तर त्याची मुस्कटदाबी केली जाते. त्याचा आवाज बंद केला जातो. निलंबनाची धमकी तर कर्मचार्‍यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. त्यास्तव त्या कर्मचार्‍यांच्या मानेवर नेहमी टांगती तलवार असते.
गावातील शाळेचा विकास गावातील लोक आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. शाळेतील कमतरता शिक्षकांना ग्रामपंचायतीकडे मागणी करता यावी अशी परिस्थिती असावी. सध्या उलट परिस्थिती आहे. ग्रामपंचायतच शाळेची, मुख्याध्यापक व शिक्षक यांची तक्रार करते. शाळेत पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी उलट्या बोंबा मारते. हे कुठे तरी थांबले पाहिजे. शिक्षकाच्या हातात फक्त खडूच द्या. शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल यात शंका नाही.
*शिक्षक बनला बांधकाम मजूर
शिक्षक आज अध्यापनाऐवजी काय काय कामे करतो. शिक्षकांच्या हातात आज खडूऐवजी काय काय आहे? सर्वात पहिल्यांदा शिक्षकांना शाळा व वर्गखोली बांधकामात गुंतवून अभियंता व मिस्त्री बनवले आणि त्यांच्या हातात थापी, वीट, वाळू, सिमेंट आणि गजाळी दिली. शासनाचा बांधिलकी असलेला कर्मचारी असल्यामुळे बांधकामाबाबतचा दर्जा चांगला मिळत गेला म्हणून शासनाने सन २००१ पासून सर्व बांधकामे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापकांच्या माध्यमातून करण्यास प्रारंभ केला. यातसुद्धा आतापर्यंत अनेक ‘विजय’ पराजित होऊन आत्महत्या केली आहे. खडूऐवजी त्यांच्या हातात झाडू देण्यात आली. शालेय साफसफाई आणि स्वच्छतागृहाच्या नियमित वापरासाठी मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येऊ लागले. शालेय पोषण आहार योजनेमधून आचारी बनविण्यात आले. भाजीपाला घेऊन येणे आणि स्वयंपाक तयार होईपर्यंत त्याकडे लक्ष देणे ही नित्याचीच बाब झाली आहे. जेवणात काही कमी जास्त झाले की निलंबनाची टांगती तलवार तर नेहमीच तयार राहते. निवडणूका आणि जनगणना करणे हे तर राष्ट्रीय कार्य असल्यामूळे ते टाळता येत नाही. शिक्षक आत्ता हायटेक झाला आहे. सर्वच शिक्षक स्मार्टफोन धारक झाले आहेत. मोबाईल मुळे माहिती तंत्रज्ञानात सुध्दा आमूलाग्र बदल झाले आहेत. याचा फायदा शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा व्हावे म्हणून शालेय शिक्षण विभागाने राज्यांतील सर्व शाळा ऑनलाइन करण्याच्या हेतूने सरल प्रणाली विकसित केली. मात्र यात परत एकदा शिक्षकानाच वेठीस धरण्यात आले. अल्पसंख्यकांचे शिष्यवृत्ती असो की मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती त्यांची माहिती सुध्दा ऑनलाइन भरावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक आत्ता सॉफ्टवेअर इंजिनीयर सुध्दा बनला आहे. शाळेत विद्युत सुविधा नाही, संगणक नाही ना त्याला इंटरनेट नाही तरी ऑनलाइन काम करण्याच्या सूचना वरच्या पातळीवरून दिल्या जातात आणि शिक्षक मुकी  बिचारी कुणी ही हाका प्रमाणे सर्वांचेच बोलणे ऐकून काम करीत असतो. कधी कधी हे सरकारी काम पूर्ण करीत असताना शाळा वाऱ्यावर असल्याचे वृत्त सुध्दा वाचण्यास येतात. तेंव्हा यांस खरोखरच शिक्षक जबाबदार असतो का ? याचा सारासार विचार ही कोणी करीत नाहीत. शिक्षकाच्या डोक्यावर खापर फोडून सर्वजण मोकळे होतात. म्हणून राज्यांतील तमाम शिक्षक बांधवाची करुण हाक आहे की " शिक्षकाच्या हातात खडू द्या "
समाजात आज सुद्धा तस्मै श्री गुरवे नम: ची खरी गरज आहे. फक्त शिक्षक दिन आले म्हणून शिक्षकांचा सन्मान किंवा सत्कार न करता या दिवसांसारखे रोजच त्यांना सन्मान देणे खरेच गरजेचे आहे असे वाटते.

नागोराव सा.येवतीकर
विषय शिक्षक व लेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
09423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शिक्षकांचा सन्मानाचा दिवस

शिक्षक दिन जवळ आले की आपल्या सर्वाना आपणास शिकविलेल्या शिक्षकांची आठवण येते. समाजतील प्रत्येक व्यक्ती या दिवशी शिक्षकांचा मान सन्मान करतो. प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला असतो त्याप्रमाणे शिक्षक मंडळी साठी 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे दूसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकी पेशेपासून आपल्या जीवनाला सुरुवात करणारे राधाकृष्णन् भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदापर्यन्त पोहोचले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शिक्षकानी  राहावे, आचरण करावे, दिशाभूल होणाऱ्या शिक्षकांना परत रस्ता मिळावा यासाठी हा दिवस शिक्षक बांधवासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसे पाहिले तर शिक्षकासाठी सर्वच दिवस महत्वाचे आहेत. रोजच त्यांचा संबंध सजीव असणाऱ्या मुलांशी येतो. त्यामुळे त्यांना रोजच जिवंत वेगवेगळे अनुभव येतात. शेतकरी आपल्या शेतातील, घरातील आणि बाहेरील भरपूर कामे वर्षभर बैलाकडून करवुन घेतो त्याबदल्यात पोळ्याला त्याला सजवुन धजवून त्याला गोड धोड खाऊ घालून पूजा अर्चा केली जाते असाच काही प्रकार शिक्षक मित्राच्या बाबतीत घडते असे मनात नेहमी शंका डोकावत असते. फक्त आजच का म्हणून सन्मान करायचा ? वर्षभरात असे अनेक दिवस किंवा महत्वाचे दिन आहेत ज्यावेळी शिक्षक मित्राचा सन्मान करता येतो. मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटविणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनी राज्यातील तमाम महिला शिक्षिकाचा गौरव गाव स्तरा पासून देश स्तरा पर्यन्त केला जावा. मुलीसाठी पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी राज्यातील उत्कृष्ट शिक्षण प्रणालीत काम करणाऱ्या शिक्षका पासून तर अधिकारी मंडळी पर्यन्त सत्कार करावा. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी तरुण तडफदार युवक शिक्षकाचा सन्मान करावा. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी फक्त ध्वजारोहण न करता शाळेतील उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव सर्वा समक्ष करावा. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर उत्तम संस्कार केले म्हणून स्वराज्य निर्मितीची कल्पना सत्यात साकारण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्त समाजातील अश्या थोर माता जे की शिक्षिका आहेत आणि त्यांचे पाल्य जीवनात यशस्वी झाले आहेत अश्याचा सत्कार करणे आवश्यक आहे. ज्यांच्या अंगी नेतृत्व गुण चांगले आहेत असे शाळा प्रमुख मुख्यध्यापकाचाही सन्मान भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी करण्यात आल्यास यथोचित होईल असे वाटते. काही वेळा शाळेत विविध स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य किंवा देश स्तरावर चमकतात तेंव्हा विद्यार्थ्या सोबत मार्गदर्शक असलेल्या शिक्षकाचा ही गौरव केले तर चांगले प्रोत्साहन मिळेल. सोशल मिडियात वाचण्यात आले की पाच सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करायचा आम्ही, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची अशी काय कामगिरी केली त्यापेक्षा महात्मा फुले यांच्या जयंती दिनी हा दिवस साजरा केला जावा ह्या मतप्रवाह मध्ये बरीच मंडळी दिसून येतात. अशा आणि इतर मत असणाऱ्या लोकांसाठी वरील पर्याय सर्वोत्तम आहे असे वाटते. एखादे दिवस साजरे करीत असताना त्या दिवसामागची संकल्पना स्पष्ट करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र समाजात शिक्षकांना आजच्या 5 सप्टेंबर चा दिवस सोडला तर बाकीच्या दिवशी फारच विचित्र अनुभव येतो त्याचा कुठे तरी विचार व्हायला हवा.

शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. आरश्यावर धूळ साचली असेल तर त्यातील प्रतिमा स्पष्ट न दिसता धूसर दिसते आणि त्यावरील धूळ साफ केल्यावर अगदी स्पष्ट दिसते. असेच काही काम शिक्षक मंडळीचे आहे. गावातील अनाड़ी, अनपढ आणि अज्ञान अश्या लोकांना साक्षर करणे हे शिक्षकांचे काम आहे. शाळेतील मुलांना अक्षर व अंक ज्ञान दिले तर भविष्यात ही मुले जेव्हा भारताचे नागरिक होतील त्यावेळी त्यांच्यावर अनाड़ी, अनपढ आणि अज्ञान हा ठपका लागू नये याची काळजी प्रत्येक शिक्षकांने घ्यावे यात गैर काही नाही. मात्र ही भावना व्यक्त करताना परिस्थिती आणि उपलब्धता या गोष्टीचा ही विचार करायला हवा. मात्र समाजात या बाबीचा विचार न करता शिक्षक मंडळीना दोष दिले जाते, मुलाच्या अपयशाचे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडले जाते. कदाचित काही ठिकाणी काही अंशी शिक्षक जबाबदार असतील ही पण त्यावरुन सर्व शिक्षक एकाच माळेचे म्हणी समजणे योग्य आहे का ? गव्हासोबत कीडे रगडण्याची ही प्रक्रिया समाजतील होतकरु आणि उपक्रमशील शिक्षकांना घातक आहे. त्यामुळे त्यांच्या मनात निरुत्साह आणि नाउमेदपणा तयार होतो. काम करणाऱ्या शिक्षकावर कौतुकाची एक थाप पुरेसे असते, कसल्याही प्रकारचे नियम किंवा बंधन नसताना ही मग तो मन लावून काम करू शकतो. पण याच ठिकाणी कमतरता जाणवते. शाळेत येणारा अधिकारी, पदाधिकारी किंवा अन्य कोणी त्यांच्यावर कौतुकाची थाप तर दूरची गोष्ट साधी त्यांची प्रेमळपणाने विचारपुस देखील करत नाही. त्यामुळे शिक्षक नाराज होतात निराश होतात. समाजात एक नियम आहे , जो करतो तो चुकतो. जो करतो त्यालाच इतर लोकांचे बोलणे खावे लागते. जो काहीच करत नाही त्याला कोणी काहीच करत नाही "जाऊ दया हो त्यांच्या मागे लागून काही फायदा नाही तो जन्मात कधी काही केला नाही तो आज काय करेल ? " असे म्हणून काम न करणाऱ्याच्या मागे कोणी लागत नाही ही सत्य परिस्थिती आहे. इथे शिक्षक मंडळीच्या बाबतीत ही असेच घडत असताना दिसत आहे. मन लावून , जीव आतून शिकविणाऱ्या शिक्षकला कधी ही मान सन्मान मिळत नाही आणि हातात खडू न धरलेल्या शिक्षकास भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार किंवा जिल्हा पुरस्कार दिला जातो. ही शिक्षण प्रणालीत असलेली फार मोठी शोकांतिका आहे. पुरस्कार मिळविण्यासाठी भरपूर अटी ची पूर्तता करावी लागते. एखादा नविन शिक्षक मुलांना खूप छान अध्यापन करीत असेल तरी त्यास तालुका स्तरीय पुरस्कार सुद्धा दिल्या जात नाही. पुरस्कार मागून घ्यावा लागतो. मी अमुक वर्षे सेवा केली असून अमुक सामाजिक, शैक्षणिक कार्य केले आहे त्यामुळे यावर्षीचा पुरस्कार मलाच द्यावे अशी याचना करावी लागते. वेळप्रसंगी शिफारस लावावी लागते आणि शेवटी धनलक्ष्मीचा ही वापर करावा लागतो. मला सांगा त्या पुरस्काराला काही महत्व आहे का ? माझा एक शिक्षक मित्र याच धोरणामुळे पुरस्कारापासुन दूर आहे. त्याचे म्हणणे असते की माझ्या नावाची शिफारस माझ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केली तर मला पुरस्कार घेताना खूप आनंद होईल. त्याही पेक्षा माझी मुले मला हसत हसत नमस्कार करतात आणि भविष्यात ते मला विसरणार नाहीत हेच माझ्या साठी पदक आहे व पुरस्कार पण. खरोखर जे शिक्षक विद्यार्थी हेच दौलत आणि सर्व काही मानतात त्यांना कोणत्या पुरस्काराची किंवा पदकाची गरज आहे का ? मला पुरस्कार दया म्हणून याचना करणारी पद्धत भविष्यात बंद होईल असा विश्वास यावर्षीच्या ऑनलाइन पुरस्कार नोंदणी मुळे होईल असे वाटते. आजचे पाऊल भविष्यात नक्कीच आशादायी चित्र तयार करेल असा विश्वास ठेवण्यास काही हरकत नाही. समाजाचा ही शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आज सकारात्मक विचारधारा चालू आहे ती अंखड़ित रहावी. 

स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य नंतर जर शाळा आणि शिक्षक या दोन बाबीचा आपण विचार केलो तर आजचे शिक्षक सर्व बाबतीत समाधानी आहेत. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, उणीव नाही. दळणवळणच्या सुविधेमुळे आज शिक्षकास कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही तरी शाळेतील गुणवत्ता म्हणावी तशी का नाही ? याचे कारण शोधण्यासाठी संशोधनच करावे लागते. त्यातील काही महत्वाचे मुद्दे म्हणजे आज शिक्षक हा पेशा नसून तो एक व्यवसाय बनला आहे. सन 1990 ते 1998 या काळात शिक्षक होणाऱ्या लोकांकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जायचे. मागता येईना भीक तर मास्तरकी शीक असे याबाबतीत बोलले जायचे. त्यानंतरच्या काळात मात्र हा झटपट नोकरी आणि भरपूर पगार यामुळे प्रत्येक जण याक्षेत्राकडे आकर्षिले गेले , आणि या क्षेत्रात आमुलाग्र बदल होत गेला. आज भावी शिक्षक होण्यासाठी लाखों मुले गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र सरकार गेल्या पाच सहा वर्षापासुन शिक्षक भरती बंद केल्यामुळे डी टी एड धारक मुलांची ससेहोलपटचालू आहे. शिक्षक होण्यासाठी लाखों मुले तयार आहेत, समाजात आज ते जरी शिक्षक नसतील म्हणून काय झाले ते सुद्धा खाजगी शिकवणी किंवा इतर काही माध्यमातून शिकविण्याचे काम करीत आहेत त्यांचा ही कुठे तरी मान सन्मान होणे आवश्यक आहे. पुरस्काराने माणसाला स्फूर्ती मिळते, चेतना मिळते, आणि त्यांच्यात ऊर्जा तयार होते. त्यामुळे लहान वयात पुरस्कार द्यावे की सेवानिवृत्ती जवळ आलेल्या व्यक्तीला द्यावे हा विचार करण्यासारखा प्रश्नांची सोडवणूक करावी एवढी अपेक्षा आजच्या शिक्षक दिनानिमित्त व्यक्त करावे वाटते.

  - नागोराव सा.येवतीकर
    मु. येवती ता. धर्माबाद
    09423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शिक्षक हेच शिल्पकार

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून गुरूला समाजात मानाचे स्थान आहे. येथील संस्कृतीने शिक्षकाला ब्रह्मा, विष्णु आणि महेश एवढेच नाही तर परब्रह्म असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीने शिक्षकाला एवढे मोठे मानाचे स्थान का दिले असेल ? या प्रश्नाचा सद्सद्विवेक बुद्धीने थोडासा विचार केला तर लक्षात येते की, शिक्षक हाच फक्त आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. ज्याप्रमाणे पाथरवट दगडावर घाव टाकून टाकून सुंदर मूर्ती तयार करतो. पाथरवटा शिवाय दगडाची मूर्ती दुसरा कोणी करू शकत नाही. कच्या मातीला आकार फक्त कुंभार देऊ शकतो. अगदी तसेच व्यक्तीचे जीवन यशस्वीरीत्या जगण्यासाठी शिक्षकाची प्रत्येकाला गरज असते. त्याशिवाय आपण यशस्वी जीवन जगू शकत नाही.

पूर्वीच्या काळी गुरुगृही म्हणजे आश्रमामध्ये जाऊन शिकावे लागत असे. धनुर्विद्या असो किंवा इतर विद्या हे शिकणे फक्त राजघराण्यातील लोकांचे काम होते. त्यामुळे एकलव्यासारख्या कनिष्ठांना गुरु द्रोणाचार्यांनी शिकविण्यास नकार दिला. मात्र त्या गुरूंच्या पुतळ्यानेच एकलव्याला बरेच काही शिकविले. आज तशी स्थिती नाही. शिक्षक आज कोणाला विद्या घेण्यापासून रोखू शकत नाही. उलट सर्वांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर टाकलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांच्यासारखी आई आणि गुरू मिळाली म्हणूनच राजे शिवाजी घडले. त्यांनी तलवार चालविणे, घोडेस्वारी करणे इत्यादी रणनीती तर शिकविल्याच तसेच रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगून शिवाजी महाराजांना त्यांनी माणुसकीचे धडे ही दिले. डॉक्टर बाबासाहेब यांना आंबेडकर आणि केळुस्करासारखे चांगले शिक्षक मिळाले म्हणून आपणाला महामानव मिळाले. त्यांच्या शिक्षकाने आपल्या शिष्यांना आडनाव दिल्याची घटना कदाचित पहिलीच आहे. परमपूज्य साने गुरुजी यांनी तर जगालाच प्रेमाचा संदेश देऊन शिक्षकांचे समाजात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ज्यांच्या जीवनात चांगले शिक्षक येतात त्यांचे जीवन फळाला येऊन नक्कीच यशस्वी होते. म्हणून सर्वांनी चांगल्या शिक्षकाचा शोध घ्यावा, कारण शिक्षक हाच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. शिक्षक ते भारताचे राष्ट्रपती अश्या पदापर्यंत पोहोचणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्व शिक्षकांसाठी एक आदर्श होय. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. त्यानिमित्ताने देशातील सर्व शिक्षक बांधवाना शिक्षक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा


- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक 

मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शिक्षक आणि उपक्रम

देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतो. शिक्षक जेवढा उत्साही आणि उपक्रमशील असेल तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे, मुलांना शिकविण्याचे. वार्षिक आणि मासिक नियोजनानुसार जे शिक्षक फक्त धडेचे धडे पूर्ण करून विहित वेळेत अभ्यासक्रमपूर्ण करतात त्याच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील कदाचित मात्र सर्वगुणसंपन्न राहणार नाहीत. विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक आवडतात ? या प्रश्नांवर जरासा विचार केला तर लक्षात येईल की, जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन शिकवितात तेच शिक्षक विद्यार्थ्यांना खूप आवडतात. विद्यार्थ्यांना नेहमी आनंदी ठेवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. पण बहुतांश ठिकाणी असे पाहायला मिळते की, शिक्षक विद्यार्थ्यांवर चिडचिड करतात, रागावतात आणि प्रसंगी शिक्षा देखील करतात. अश्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना खूप भीती वाटते आणि विद्यार्थी शिक्षकांच्या जवळ जाण्यासाठी घाबरतो. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी भीती किंवा राग असेल तर विद्यार्थ्याची प्रगती म्हणावी तशी होत नाही. तेच जर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळा आणि शिक्षण याविषयी लळा निर्माण होते. अर्थातच त्यांची शाळेतील उपस्थितीदेखील वाढते आणि शिक्षणाच्या प्रवाहातून शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होण्यास मदत मिळते. माजी शिक्षण संचालक आणि शिक्षणतज्ञ मा. वि. वि. चिपळूणकर हे शिक्षकांनी उपक्रम करत राहावे असे म्हणत. शिक्षकांचा आणि समाजाचा खूप जुना संबंध आहे. पूर्वीच्या काळी गावात शिकलेला एकच व्यक्ती राहत असे आणि तो म्हणजे शाळा मास्तर. शिक्षकांच्या शब्दाला त्या काळीमान होता तसा मान आज मिळत नाही तरी देखील चांगल्या शिक्षकांची समाजात आजही वाहवा होतांना दिसून येते. शिक्षकांच्या वर्तनावर त्याचे शालेय आणि समाजातील स्थान निर्माण होते. म्हणून शिक्षकाने शाळेत आणि समाजात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी चांगले वर्तन करणे आवश्यक आहे. शाळेतील लहान लहान मुले आपल्या प्रत्येक बाबीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. शिक्षकांचे प्रत्येक वर्तन मुलांसाठी एक दिशा देत असते. आज शिक्षक दिन आहे म्हणजे शिक्षकांचा गौरव आणि सन्मान करण्याचा दिवस. काही उत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्लीला, राज्यपालांच्या हस्ते मुंबईला तर जिल्हा स्तरावर देखील पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. ज्यांना पुरस्कार मिळाले तेच आदर्श शिक्षक असून बाकीचे काही कामाचे नाहीत, असे नाही. सर्वच शिक्षक आदर्श आहेत, जे मुलांसाठी नेहमी धडपड करतात, मुलांना नवनवीन गोष्टी शिकवितात, मुलांना नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवतात. सक्षम देशाच्या उभारणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे, हे प्रत्येक शिक्षकांनी लक्षात घेऊन उद्याचा सक्षम नागरिक करण्याकडे लक्ष द्यावे. 

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शिक्षक दिन

मुलांना देउनी आत्मज्ञान
जागरूक त्यांना बनवी
शिक्षणाने होतो विकास
गुरुजीं सदा हेच शिकवी

जगण्याची रीत कळते
शत्रू असो की दानव 
गुरुच्या संपर्कात येऊन 
बनतात सर्व मानव

गुरु शेवटी गुरु असतो
त्याला जगत नाही तोड
त्यांचे बोलणे ऐकलो नाही
जीवनाला मिळते वेगळे मोड

प्रत्येकाला असतो गुरु
त्याविना मिळत नाही यश
आपल्या अज्ञानामुळे
कोणी ही करतो वश

म्हणून गुरुला देव मानूनी
सदा त्यांची सेवा करू
शिक्षकदिनाच्या निमित्ताने
सदविचाराची कास धरु

 नासा येवतीकर
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तोच खरा शिक्षक

मुलांच्या हृदयात जाऊन
त्यांच्या संवेदना जाणून
घेऊन जो शिकवितो
तोच खरा शिक्षक

मुलांच्या मनात काय आहे
आपणास करायचे काय आहे
हे ज्याला कळते 
तोच खरा शिक्षक

मुलांची आवड निवड
त्याला मिळणारी सवड
ओळखून जो शिकवितो
तोच खरा शिक्षक

पुस्तकाच्या मागे न लागता
अनुभवाचे बोल ऐकविता
मुलांचे विश्व जो घडवितो
तोच खरा शिक्षक

शिकून मोठे झाले
शहाणे सवरते बनले
रस्त्यात ज्यांना आदराने 
नमस्कार केला जातो
तोच खरा शिक्षक

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शिक्षकाभिमान

शिक्षकांचा सदा मला अभिमान आहे
शिक्षकांविषयी मला स्वाभिमान आहे

माणूस घडविण्याचे काम करतो
त्यामुळे समाजात मला सन्मान आहे

माझी वागणूक एक आदर्श ठरते
म्हणून चार लोकांत मला मान आहे

काय करावे अन काय करू नये
पदोपदी याचे मला अवधान आहे

नव्या तंत्रज्ञानांविषयी मुलांना
सजग करण्याचे मला ज्ञान आहे

प्रगतीपथावर नेणारा सुजाण असा 
नागरिक घडविण्याचे मला भान आहे

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मला शिक्षक का व्हावे वाटते ?

बालपणी शाळेत शिकत असतांना मोठी माणसं हमखास एक प्रश्न विचारायचं की, तुला मोठे होऊन काय बनायचं आहे किंवा तुझं स्वप्न काय ? तेंव्हा त्या बाळबोध वयात काही कळायचं नाही. मात्र ज्या नोकरीमध्ये रुबाबदारपणा दिसायचा तो म्हणजे पोलीस म्हणून सहसा सर्वांचे उत्तर पोलीस असेच यायचे. काहीजण डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हायचं आहे असे म्हणायचे. काहीजण मात्र मला शिक्षक व्हावेसे वाटेल असे उत्तर द्यायचे. त्याकाळी शिक्षक हा एक रुबाबदार आणि लोकांमध्ये मानाचे स्थान मिळविणारा होता. लोकं त्यांना आदराने बोलत होती. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. गुरुजी माझ्या मुलांना शिकवितात, ते आपल्यापेक्षा हुशार आहेत, ज्ञानी आहेत असे त्याकाळी लोकांना वाटायचे. वास्तविक पाहता तीस चाळीस वर्षांपूर्वी शिक्षकांचा पगार चार आकडी देखील नव्हता. म्हणून सरकारची चाकरी कोण करावं ? असे म्हणून शिक्षकांची नोकरीवर पाणी सोडलेले किमान एक तरी व्यक्ती आज गावोगावी सापडतात. कारण पूर्वीच्या काळी शिक्षक होणे हे फारच कमीपणाचे समजले जायचे. मागता येईना भीक तर मास्तरकी शीक असे त्याकाळी म्हटले जायचे. त्याचबरोबर दळणवळण यंत्रणा विकसित नव्हती त्यामुळे घर आणि शेती सोडून कोठे जावे ? असा प्रश्न त्यांना पडत होता. म्हणूनच नोकरीपेक्षा त्यांना शेती बरी वाटत होती. परंतु गावोगावी शिक्षकांची पत खूप मोठी होती. काही गावात तर शिक्षक जे बोलेल तेच खरे आणि अंतिम असे म्हणणारे खूप होते. त्या शिक्षकांनी सुद्धा लोकांच्या भावनेचा कधी खेळ केला नाही. पूर्वी गुरुजी म्हणजे सर्वाना आदरयुक्त भीती वाटत होती. गुरुजींची शिकवण आणि शिक्षा दोन्ही गोष्टी चिरकाल स्मरणात राहत असे. गुरुजी म्हणजे मुलांवर संस्कार करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व होते.

मात्र आज तशी परिस्थिती पाहण्यास मिळत नाही. आज सारे काही उलट्या दिशेने वाहत आहे. तुला मोठे होऊन काय बनायचं आहे ? याचे उत्तर प्रत्येकजण वेगवेगळी देतात. मात्र कोणी गुरुजी होतो म्हणून अगोदर म्हणतच नाहीत. आताच्या मुलांना सन्मानाची आणि भरपूर पैसा मिळवून देणारी नोकरी हवी आहे. शिक्षकांची नोकरी करणे बहुतेक जणाला नकोसे वाटत होते. असे असले तरी काही मंडळींना हीच नोकरी करावं असे का वाटत असेल ? याचे जरासे निरीक्षण केले तर लक्षात येते की, या नोकरीत आजच्या घडीला भरपूर पैसा आणि भरपूर सुट्या, विश्रांती आहे. म्हणून लोकं याकडे पाहत आहेत. सर्वात जास्त सुट्टीचा उपभोग शिक्षक म्हणून घेता येते. आज शिक्षकी पेशा हा व्यावसायिक बनत चालला आहे. पूर्वीच्या काळी शिक्षकांचा जो दर्जा होता, जे स्थान होतं ते आज राहिले नाही. परिस्थिती तशी राहिली नाही आणि आजचा शिक्षक देखील तसा राहिला नाही. तरी ही आज शिक्षक होऊ पाहणाऱ्या अनेक तरुणांना हा प्रश्न राहील की, तुम्हांला शिक्षक का व्हावे असं वाटतं ? या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनाला एकदा विचारून पहावं. त्याचे उत्तर जर पैसा असेल तर शिक्षकांची नोकरी करण्यात काय अर्थ आहे ? या नोकरीशिवाय देखील पैसा अन्य काम केल्याने मिळते. शिक्षक होऊन काही विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करायचे असेल तर या नोकरीत खूप समाधान आहे जे की कोणत्याही संपत्तीमध्ये मोजता येत नाही. मानसिक समाधान मिळवायचे असेल तर पैश्याच्या मागे न धावता चांगल्या कर्माच्या मागे धावत राहावं म्हणजेच आत्मिक सुख मिळेल. म्हणून पैसा कमवायचे आहे म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारण्यापूर्वी एक वेळ जरूर विचार करावे. या नोकरीत जे समाधान मिळते ते अन्य कोणत्याच नोकरीत मिळत नाही. कारण शिक्षकांच्या हातून देशाचे नागरिक घडविण्याचे महान कार्य घडत असते. शिक्षकांच्या हाताखाली घडून गेलेले विद्यार्थी शिक्षकांना चिरकाल स्मरणात ठेवतात. यशस्वी विद्यार्थ्यांना पाहून सर्वात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर ते शिक्षकांना होतो. शिक्षकी पेशा सोडून इतर व्यवसायात संपत्ती, मानमरातब या साऱ्या गोष्टी मिळतात पण मनाचे सुख मात्र येथेच मिळते. मिसाईल मॅन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदाची शपथ घेतांना निमंत्रित पाहुणे म्हणून कोणाला बोलावले होते तर शिक्षकांना. एवढा सन्मान यापूर्वी कोणाला मिळाला नाही. म्हणून आपल्या मनाला एकदा विचारा की, मला शिक्षक का व्हावेसे वाटते ?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षकी पेशेतून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले होते. त्यांचा आज जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. हे भारतातल्या सर्व शिक्षकांसाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे. सर्व शिक्षक वृंदाना शिक्षक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा ....!

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9523625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका

शिक्षक हा समाजसुधारणा करणारा देशातील सर्वात महत्वाचा समाजसेवक आहे. प्रत्यक्षपणे जरी नसेल तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचे मानले जाते. अगदी पुरातन काळापासून गुरु किंवा शिक्षकांच्या कार्याचा मागोवा घेतला तर ही बाब नक्की आपल्या मनाला पटेल. प्राचीन काळात गुरुला फारच महत्वाचे असे स्थान होते. शिक्षक समाजात कश्याप्रकारे आपली भूमिका करीत असतो हे पाहणे आवश्यक आहे. रामायण आणि महाभारताच्या काळात गुरुच्या घरी म्हणजे गुरुकुलमध्ये जाऊन विद्या प्राप्त करण्याची पध्दत होती. घरापासून कोसो दूर असलेल्या आश्रमात शिष्य मंडळी आपले देहभान विसरून निसर्गरम्य वातावरणात गुरुनी दिलेली विद्या आत्मसात करीत. गुरुची आज्ञा न पाळणारा शिष्य शोधूनही सापडत नसे. जो व्यक्ती आपल्या गुरुच्या प्रति श्रध्दा ठेवतो त्याला नक्कीच विद्या प्राप्त होते असे त्याकाळचे गुरुवर्य मंडळी म्हणत. त्याकाळी गुरुना राजगुरु म्हणून त्यांना महत्वाचे असे पद होते. त्या काळातील राजे मंडळी सुद्धा गुरुच्या सल्या किंवा मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणतेच कार्य करीत नव्हते, एवढे त्यांचे महत्त्व होते. गुरुशिवाय कुठेही विद्या प्राप्त होत नाही, अशी परिस्थिती त्यावेळी होती. एकलव्य अशीच विद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्यच्या गुरुकुल मध्ये गेले होते मात्र त्यास नकार मिळाला तेंव्हा त्यांनी द्रोणाचार्य गुरुचा पुतळा तयार करून विद्या प्राप्त केली. आपल्या मनात गुरुविषयी असलेली श्रद्धा आपणास ज्ञान देऊन जाते यांची शिकवण मिळते. पूर्वीच्या काळी त्यांना जे ज्ञान मिळत होते ते अगदी मुखोद्गत पध्दतीने. कुठल्याही प्रकारची लिखित सामग्री तेंव्हा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांना सर्व काही पाठांतर करावे लागायचे. पाठांतर करण्यासाठी रोजचा सराव अत्यंत महत्वाचे असते त्याशिवाय शक्य नाही. हा सराव घरापासून दूर असेल तरच पूर्ण होऊ शकते हे ही सत्यच आहे. म्हणूनच ब्रह्मचर्य आश्रमची अवस्था पूर्ण होईपर्यंत गुरुच्या घरी विद्या प्राप्त करायचे ज्यात जीवन विषयक विचार आणि संस्काराच्या बाबी सांगितले जात असत. काळ थोडा पुढे सरकला. गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घेण्याची प्रथा हळूहळू संपुष्टात येऊ लागली. प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा मूळतः अधिकार आहे आणि ते त्याचा हक्क आहे ही बाब समोर येऊ लागली. तशी लोकांना आपल्या घराजवळ शिक्षण देणारी संस्था अर्थात शाळा अस्तित्वात येऊ लागल्या आणि सर्वाना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा विचार पुढे आला. याच विचारातून गाव तेथे शाळा स्थापन करण्यात येऊ लागले. भारत देशावर इंग्रज लोकांचे राज्य होते त्यावेळी त्यांनी फक्त मिशनरी शाळा चालू केल्या होत्या. त्यांना ऑफिस कामासाठी लागणारे कारकुन तेवढे निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश्य होता. तेंव्हा या प्रक्रियेला महात्मा फुले यांनी तीव्र विरोध दर्शविले आणि हंटर कमीशनपुढे प्राथमिक शिक्षणाविषयी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींना सरसकट मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे. तळागाळातल्या आणि गोरगरीब पालकांच्या मुलामुलींसाठी त्यांनी शाळा उघडल्या. त्यांची पत्नी सावित्राबाई ही देखील त्यांच्या कार्यात मोलाची अशी भूमिका निभावली. भारताच्या शिक्षण विकास प्रक्रियेत फुले दाम्पत्यची खुप मोलाची कामगिरी आहे, ज्यास कोणतेही भारतीय नागरिक विसरु शकणार नाहीत. भारत देश इंग्रज्याच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर शासनापुढे पहिला प्रश्न होता तो भारतातील शिक्षण व्यवस्था कशी सुधारता येईल.
देशात असलेली निरक्षरता आणि शाळेतून दिले जाणारे प्राथमिक शिक्षण ह्या दोन प्रमुख समस्या शासनासमोर आ वासून उभे होते. त्यासाठी गाव तेथे शाळा निर्मिती करणे आणि शाळेत शिकविण्यासाठी शिक्षकांची भरती करणे शासनास क्रमप्राप्त होते. परंतु शाळा शिकविण्यासाठी कोणीही पुढे येण्यास तयार होत नव्हते. याचा अनुभव महात्मा ज्योतिबा फुले यांना सन 1848 मध्ये त्यांनी जेंव्हा मुलीसाठी शाळा काढली. तेंव्हा शिकविण्यासाठी कोणी ही पुढे येत नव्हते. त्यावेळी त्यांनी आपली निरक्षर पत्नी सावित्रीबाई फुले हिला अक्षर ज्ञान देऊन देशातील पहिली मुख्याध्यापिका होण्याचा सन्मान मिळवून दिला. स्वातंत्र्यानंतर देखील परिस्थिती मध्ये काही बदल झाला नाही कारण त्याकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजले जायचे. सरकारी नोकरी करणे बहुतांश लोकांना गुलामगिरी सारखे वाटत होते त्यामुळे शाळेत शिक्षकांची वानवा असायची. सातवी उत्तीर्ण झालेल्याना सुद्धा नोकरी मिळत असे. आज परिस्थिती त्याउलट आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे नोकरी मिळणे खुप जिकरीचे बनले आहे. त्याकाळी ज्यानी ज्यानी नोकरीला नकार दिली होती ती मंडळी आज पश्चाताप करताना आढळून येतात. त्याकाळी शिक्षकांना शाळेत शिकविताना अनेक समस्याना तोंड द्यावे लागले. जसे की बऱ्याच गावात शाळेला स्वतः ची इमारत नव्हती. झाडांखाली शाळा भरविली जात होती. तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तर काही ठिकाणी गावातील पाटलांच्या वाड्यात शाळा भरत असे. ग्रामीण भागातील शाळांची स्थिती खुपच भयानक अशी होती. दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे शिक्षकांना त्याच गावात रहावे लागायचे. आपल्या कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती तेवढी चांगली राहत नव्हती किंवा ते इतर वाईट व्यसनाला बळी पडलेले अनेक उदाहरण यापूर्वी अनुभवण्यास मिळाले आहे. याच संदर्भात श्रीराम लागू यांचा पिंजरा हा चित्रपट खुप काही सांगून जातो. कठिण आणि विपरित परिस्थिती मध्ये देखील त्याकाळातील शिक्षकांनी ज्या पध्दतीने अध्यापनाचे कार्य पूर्ण केले ते खरोखरच नोंद घेण्यासारखी आहे. कसल्याही प्रकारची सुविधा किंवा साधने उपलब्ध नसताना त्यांनी अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे एवढे मात्र खरे. मात्र आज तशी परिस्थिती नाही. प्राचीन काळाप्रमाणे आजची शिकण्याची आणि शिकविण्याची पध्दत नक्कीच नाही. काळानुरूप गुरु आणि शिष्य यांच्यात खुप बदल झालेला आहे, हे मान्य करावेच लागेल. 
आज सर्वत्र सुखसोयीची साधने, दळणवळण करण्यासाठी गतिमान अशी व्यवस्था निर्माण झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वीसारख्या शाळा आज बघायला मिळत नाहीत. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत झाडांखाली भरणाऱ्या सर्व शाळा आत्ता भव्य दिव्य ईमारत जरी नसेल तरी चार भिंतीच्या आत भरल्या जात आहे. शालेय वातावरणात शिक्षकांच्या सहवासात वाढणारी ही चिमुकली मुलेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावर योग्य संस्कार टाकून गुणवत्ता पूर्ण पिढी तयार झाली तरच देशाची प्रगती संभव आहे. मुलांवर संस्कार टाकण्याची जबाबदारी जेवढी कुटुंबातील आई-वडिलांची आहे तेवढीच शिक्षकांचीपण आहे. शिक्षकांना यात हात झटकून मोकळे होता येणार नाही, हे सत्य आहे. शिक्षकी पेशा हा एक असा व्यवसाय आहे जो जिवंत माणसांशी संबंधित आहे. एखादे वेळी अभियंता एखादी चूक केली तर थोडा फार नुकसान होईल मात्र एखाद्या शिक्षकांने शिष्याना विद्या प्रदान केली नाही तर त्याची पिढी बरबाद होईल. शिवाय त्या नंतर ची पिढी देखील बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास्तव शिक्षकांनी आपल्याजवळ असलेले अचूक ज्ञान मुलांना देणे आवश्यकच नसून अत्यंत महत्वाचे देखील आहे. ज्ञान ही एकच अशी वस्तू आहे जी की दिल्याने वाढत जाते आणि नुसते साठवून ठेवले तर गंजून जाते, म्हणून त्याचा नियमित वापर होणे आवश्यक आहे.
सध्या शाळेत सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. खडू - फळा मोहिम मागे पडली असून मोबाईल संगणकाच्या मदतीने शाळा चालविले जात आहेत. राज्यातील बहुतांश  शाळा डिजिटल झाले आहेत. त्या शाळेत मुलांना संगणक आणि प्रोजेक्टरद्वारे शिकविले जात आहे. दृकश्राव्यच्या माध्यमातून मुलांना दिलेले ज्ञान लवकर आत्मसात करता येऊ शकते. मात्र सदरील ज्ञान देण्याची क्षमता / कुवत शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे. या बदलत्या काळात शिक्षकांनी आपले ज्ञान अपडेट केले नाही किंवा जुनाट पध्दतीनुसार चालत राहिले तर जमणार नाही. काळाच्या गतीनुसार जो पाऊले उचलतो तोच त्या प्रवाहात राहू शकतो अन्यथा बाहेर फेकल्या जाऊ शकतो.
चाळीशी ओलंडलेले शिक्षक मंडळी आत्ता संगणक शिकून काय करायचे आहे ? अशी भूमिका घेतात. मात्र हे शिकणे शिक्षकांसाठी नसून शाळेत शिकणाऱ्या मुलांना ज्ञान देता यावे यासाठी आहे, हे सर्वप्रथम ओळखून घ्यावे. म्हणूनच शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2007 पूर्वी संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणे सरकारने बंधनकारक केले होते. मात्र बहुतांश शिक्षक मंडळीनी आपले संगणक शिकणे पूर्ण केली नाही, हे खरे तर चिंतनीय बाब आहे. त्याशिवाय डिजिटल युगात आपले काही खरे नाही याची जाणीव सर्वप्रथम शिक्षकांना होणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या काळातील मुले डिजिटल तंत्रज्ञानाच्या बाबतीत खुप पुढे गेलेली आहे. शिक्षकांनी काही गोष्टी माहित नसलेल्या बाबी मुलांना माहित आहेत. पूर्वी फक्त गुरु किंवा शिक्षक तेवढेच ज्ञान देऊ शकत होते. मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज ज्ञान मिळविण्याचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध झाली आहेत. संगणक किंवा टीव्हीच्या माध्यमातून खुप ज्ञान मिळत आहे. सर्वत्र स्पर्धा वाढली आहे. जे चांगले शिकवितात त्यांच्या शाळा टिकून आहेत तर जे काही मेहनत घेत नाहीत तेथील शाळेची संख्या रोडावत चालली आहे. संसदेत जसे आमदार आणि खासदार पळविले जातात तसे एकमेकाच्या परिसरातील शाळेवाले विद्यार्थी पळवित आहेत. आज शिक्षकांना आपले स्थान टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही बाब काय दर्शविते ? भविष्यात शिक्षकांची पदे अत्यंत धोक्यात आहेत. पूर्वी सारखे सरकारचे जावई म्हणून निश्चितपणे वावरता येणार नाही. शिक्षकांनी बदलत्या काळातील आपली बदललेली भूमिका लक्षात घेऊन वागले तरच टिकाव लागेल अन्यथा आपले जीवन अंधकारमय होण्यास वेळ लागणार नाही. थांबला तो संपला हे गृहीत धरणे साहजिक आहे.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769
( लेखक जिल्हा परिषद नांदेड मध्ये उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तंत्रस्नेही शिक्षक : काळाची गरज

         नागोराव सा. येवतीकर
         मु. येवती ता. धर्माबाद
        09423625769

आजचे युग हे संगणकीय आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे आहे. रोज काही ना काही नवीन महितीची भर पडत आहे. संगणक, मोबाईल आणि स्मार्ट फोन मुळे घरबसल्या बरीच माहिती मिळत आहे. एका क्लिक वर हवी ती माहिती क्षणात मिळण्याची सुविधा आत्ता निर्माण झालेली आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेतील अध्ययन आणि अध्यापनात झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास शालेय विभागाचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब, शिक्षण संचालक मा. गोविंद नांदेडे आणि शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांना वाटतो. त्याच मुळे त्यांनी राज्यातून तंत्रस्नेही शिक्षकांची फौज तयार व्हावी यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर तंत्रस्नेही शिक्षकासाठी कार्यशाळेचे आयोजन करीत आहेत.
आज राज्यात सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहेत. अनेक गावातील जनता स्वयंस्फुर्तीने समोर येऊन शाळेला समृध्द कसे करता येईल ? याचा विचार करीत आहेत. 14 व्या वित्त आयोगातुन शाळेला मदत मिळत आहे. गावचे सरपंच इतर सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेत यापूर्वी शिक्षण घेतलेले आणि सध्या चांगल्या पदावर काम करणारे गांवकरी, तसेच शाळेतील कार्यरत शिक्षक यांनी सर्वानी मिळून शाळा डिजिटल आणि ज्ञानरचनावादी करण्याचा जणू विडा उचलला आहे असे चित्र सध्या राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षकास सुध्दा बदलणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वीचा शिक्षक आणि त्याची अध्यापन पध्दती आत्ता मागे पडली आहे. तीच ती पुरातन पद्धत वापर करण्या पेक्षा काही तरी नवीन शोध लावून त्या मार्गाचा वापर केले तर समाजात आपला टिकाव त्याशिवाय आपली धडगत नाही हे आत्ता शिक्षकांना कळून चुकले आहे. त्यामुळे आज प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही होण्याचा प्रयत्न करतोय आणि ते गरजेचे आहे. काळानुरूप जर आपण आपल्यात बदल केला नाही तर आपली विद्यार्थ्यात पालकात आणि समाजात काही पत राहणार नाही 
आज शाळेतील सर्व योजना मग ते मुलांची शिष्यवृत्ती असो किंवा विद्यार्थ्याची सरल मध्ये माहिती भरणे असो ते आत्ता ऑनलाइन झाले आहे. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत रोजच्या रोज लाभार्थी विद्यार्थी संख्या ऑनलाइन करण्याचे काम यावर्षी 15 जून पासून चालू करण्यात आले. स्वच्छ विद्यालय पुरस्कारसाठी ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय शाळेचा पुरस्कार साठी विचार केला जाणार नाही. शिक्षकांना राज्य पुरस्कार मिळविण्यासाठी या वर्षी पासून ऑनलाइन द्वारे च अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे शालेय कारभारात आत्ता ऑनलाइन चे काम फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शिक्षकांचा पगार सुध्दा आज शालार्थ या ऑनलाइन प्रणाली द्वारे दिल्या जात आहे परंतु सध्या ही प्रक्रिया शिक्षक किंवा मुख्याध्यापक स्वतः तयार करीत नसून बाहेरील कमर्शियल व्यक्ती कडून करून घेत आहेत त्यामुळे शासन ज्या उद्देश्यासाठी प्रणाली सुरु केली ती असफल होताना दिसत आहे शिक्षक आणि मुख्याध्यापकच नाही तर अधिकारी मंडळी सुध्दा याच मार्गावरुन वाटचाल करीत आहेत यासाठी आर्थिक झळ सोसावे लागत आहे ती गोष्ट वेगळी नुकतेच बदल्याच्या प्रक्रिया पार पडल्या यात जवळपास हजारांच्या घरात बदल्या झाल्या पूर्वी च्या पद्धतीनुसार एका ठिकाणाहुन गमन आणि दुसऱ्या ठिकाणी उपस्थित झाले की संपले पण आज या शालार्थ प्रणाली त पूर्वी सारखे तर प्रक्रिया कराविच लागते तयशिवाय
ऑनलाइन सुध्दा गमन आणि उपस्थित व्हावे लागते आणि त्यासाठी ज्याना जसे जमेल तसे ह्या बाहेरील व्यक्तिनी पैसे उकळले असल्याची चर्चा आज शिक्षक खाजगी स्वरुपात बोलत आहेत याला कारण एकच आहे आपण तंत्रज्ञानाशी मैत्री न करता त्यापासून दूर पळत राहिलो आणि त्याचा फायदा या व्यक्ती घेत आहेत यात त्याची काहीच चूक नाही ज्यप्रकरे आपणास काही आजार झाला असेल तर आपण
डॉक्टर कडे जातो तो डॉक्टर एकही इंजेक्शन किंवा औषध न देता फक्त कागदावर ट्रीटमेंट लिहून देतो आणि आपण त्याला त्याची जे काही फी असेल 60 रूपया पासून 500 रूपया पर्यन्त त्याला देतो कारण त्याने त्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा वापर आपल्या साठी केलेला आहे
त्यामुळे बाहेरील लोक अमुक काम करण्यासाठी तमुक पैसा घेतात एवढा खर्च शाळेच्या मुख्याध्यापकानी कसे समायोजन करावे यास फक्त एक आणि एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही सुध्दा तंत्रस्नेही बना संगणक शिका आणि त्या संगणकाचा वापर शालेय अध्यापनासोबत शालेय कामकाज मध्ये सुध्दा वापरल्याशिवाय पर्याय नाही आपली जुनी परंपरा थोडासा बाजूला सारून या नव्या तंत्रज्ञानाने मुलांना शिकवित राहिलो आणि शालेय व्यवस्थापनात याचा वापर केला तर आपल्या शाळेला, शाळेतील विद्यार्थ्यांना आणि वैयक्तिक आपणाला ही याचा फायदा नक्की होईल.
तेंव्हा चला तर मग आपण सारे तंत्रस्नेही शिक्षक बनू या आणि येत्या वर्षात संपूर्ण महाराष्ट्र प्रगत करू या

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद



शिक्षकांचा सन्मान नेहमी व्हावा

शेतकरी आपल्या शेतातील, घरातील आणि बाहेरील भरपूर कामे वर्षभर बैलाकडून करवुन घेतो त्याबदल्यात पोळ्याला त्याला सजवुन धजवून त्याला गोड धोड खाऊ घालून पूजा अर्चा केली जाते असाच काही प्रकार शिक्षक मित्राच्या बाबतीत घडते असे मनात नेहमी शंका डोकावत असते. फक्त आजच का म्हणून सन्मान करायचा ? वर्षभरात असे अनेक दिवस किंवा महत्वाचे दिन आहेत ज्यावेळी शिक्षक मित्राचा सन्मान करता येतो. मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटविणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनी राज्यातील तमाम महिला शिक्षिकाचा गौरव गाव स्तरा पासून देश स्तरा पर्यन्त केला जावा. मुलीसाठी पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी राज्यातील उत्कृष्ट शिक्षण प्रणालीत काम करणाऱ्या शिक्षका पासून तर अधिकारी मंडळी पर्यन्त सत्कार करावा. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी तरुण तडफदार युवक शिक्षकाचा सन्मान करावा. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी फक्त ध्वजारोहण न करता शाळेतील उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव सर्वा समक्ष करावा. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर उत्तम संस्कार केले म्हणून स्वराज्य निर्मितीची कल्पना सत्यात साकारण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्त समाजातील अश्या थोर माता जे की शिक्षिका आहेत आणि त्यांचे पाल्य जीवनात यशस्वी झाले आहेत अश्याचा सत्कार करणे आवश्यक आहे. ज्यांच्या अंगी नेतृत्व गुण चांगले आहेत असे शाळा प्रमुख मुख्यध्यापकाचाही सन्मान भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी करण्यात आल्यास यथोचित होईल असे वाटते. काही वेळा शाळेत विविध स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य किंवा देश स्तरावर चमकतात तेंव्हा विद्यार्थ्या सोबत मार्गदर्शक असलेल्या शिक्षकाचा ही गौरव केले तर चांगले प्रोत्साहन मिळेल. सोशल मिडियात वाचण्यात आले की पाच सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करायचा आम्ही, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची अशी काय कामगिरी केली त्यापेक्षा महात्मा फुले यांच्या जयंती दिनी हा दिवस साजरा केला जावा ह्या मतप्रवाह मध्ये बरीच मंडळी दिसून येतात. अशा आणि इतर मत असणाऱ्या लोकांसाठी वरील पर्याय सर्वोत्तम आहे असे वाटते. एखादे दिवस साजरे करीत असताना त्या दिवसामागची संकल्पना स्पष्ट करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून सांगावेसे वाटते की, शिक्षकांचा सन्मान नेहमीच व्हावे. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769


No comments:

Post a Comment