नागोराव सा. येवतीकर

Friday, 30 July 2021

sri Gopatwad sir retirement articale

पर्यावरण प्रेमी विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री पुंडलिक गोपतवाड

धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूर येथील शिक्षक श्री पुंडलिक लच्छीराम गोपतवाड आज दिनांक 31 जुलै 2021 रोजी नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

श्री पुंडलिक लच्छीराम गोपतवाड यांचा जन्म बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव या ठिकाणी 2 जुलै 1963 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. वडील शेतकरी असले तरी मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिले .आईचे नाव गंगाबाई आहे. पुंडलिक गोपतवाड यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती गुरुजनांनी सांगितलेल्या  सूचनेचे पालन ते अगदी मनापासून करत .पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आपल्या मूळगावी जिल्हा परिषद शाळा कोल्हे बोरगाव येथे झाले. त्यापुढील शिक्षण सगरोळी येथील श्री छत्रपती विद्यालयात यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अध्यापक विद्यालय उमरदरी येथून त्यांनी आपले डीएड शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी डीएड पदवी घेतल्यानंतर लगेच नोकरी लागत होती. त्यानुसार डी एड उत्तीर्ण झाल्याबरोबर 02 जानेवारी 1988 रोजी  धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनुर येथे त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक झाली. त्याच बरोबर जिल्हा परिषद हायस्कूल धर्माबाद, जिल्हा परिषद प्रा शाळा बाचेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघलवाडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूर व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूर येथे शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवण्याचे  कार्य केलेले आहे. जिथे जावे तिथे प्रामाणिकपणे काम करावे हा त्यांचा स्वभाव गुण आहे .आपल्या जीवनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानले. त्यांनी अनेक चरित्र ग्रंथाचे वाचन केले या सर्व वाचनाच्या व्यासंगातून आपण देखील सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा म्हणून ते अविरत कार्यरत राहिले. आपल्या कार्यातून त्यांनी पाणीबचतीचा संदेश दिला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आपल्या घराच्या छतावर वरील वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी तयार केला असून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी ते सदैव आग्रही असतात. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वृक्ष जगली तर माणूस जगेल म्हणून ' वृक्ष लावा' असे ते आवर्जून सांगतात. ज्या ठिकाणी त्यांनी सेवा केली आहे त्या प्रत्येक शाळेत त्यांनी वृक्षारोपण केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, स्काऊट गाईड, शाळेचे सुशोभीकरण या कामामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडली आहे. स्काऊट गाईड मधून त्यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीपर्यंत घेऊन जाऊन आपल्या शाळेला जिल्हा पुरस्कार मिळवून दिले आहे. लहान मुलांना गोष्टी आवडतात म्हणून त्यांनी गोष्टी रूपाने विद्यार्थ्यांवर संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला. शिक्षक म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो याचे भान त्यांनी नेहमी ठेवले. प्रौढ साक्षरता, बेटी बचाव, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या शासनाच्या मोहिमेमध्ये त्यांनी स्वतः गीते तयार करून लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ' 'आधी केले मग सांगितले " याप्रमाणे त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे नेहमी समाजाची व पर्यावरणाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. सुंदर अक्षर, शुद्धलेखनाचा ध्यास, चांगल्या गुणांचा स्वीकार अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील. आदर्श शिक्षक म्हणून तालुका पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'माणसे जोडणे' हा त्यांचा छंद. प्रत्येक गावात आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी मित्र जमवली. आज त्यांचा मित्र वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीची गोष्ट विद्यार्थी वर्गात पसरली, सर शाळेत येताच छोटे विद्यार्थी 'सर आप रिटायर्ड हो रहे हो ' 'तुम्ही रिटायर होऊ नका ,इथेच राहा' असे म्हणत त्यांच्या भोवती जमा झाले एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठी कामाची पावती कोणती असेल !
 आज त्यांच्या वयाची 58 वर्षे पूर्ण होत असून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची पत्नी सौ. शोभा गोपतवाड ह्या गुरुकुल मित्रमंडळ सेवाभावी संस्थेचे सचिव आहेत. त्यांना दोन अपत्य असून मुलगा गजानन हा धर्माबाद येथे विज्ञान विषयाची खाजगी शिकवणी घेतो तर मुलगी सुप्रिया विवाहित असून जावई राहुल दोडेवार चंद्रपूर येथे शासकीय सेवेत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. एकूणच काय 'सुखी कुटुंबाचे' त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा
- मनमोहन कदम, मुख्याध्यापक, गुरुकुल विद्यालय, धर्माबाद
— ———— ————
शुभेच्छा - 
पर्यावरण प्रेमी व चांगला सहकारी - पुंडलिक गोपतवाड हे नेहमी माझ्या कामात मदत करतात. पर्यावरण प्रेमी त्यांची ओळख आहे .ते चांगला सहकारी म्हणून त्यांची आठवण कायम मनात राहील

संतोष नाईक मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापुर
—————————
श्री गोपतवाड हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रभागी असतात. आज निवृत्त होत असले तरी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळेल ही अपेक्षा. पुढील जीवनासाठी त्यांना शुभेच्छा.
सुधाकर जाधव
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बाळापूर
- - - - - - - - - - - - - - - - - 
करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी त्याचे या साने गुरुजी च्या उक्तीप्रमाणे कार्य करणारे शिक्षक म्हणजे श्री गोपतवाड त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो

लक्ष्मण आगलावे सहशिक्षक जि प प्रा शाळा वाघलवाडा

1 comment:

  1. शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले श्री गोपतवाड सर यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांचे पुढील दीर्घायुष्य सुखी निरोगी व आनंदमयी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    ReplyDelete