नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 30 October 2019

सायकल .......!


*सायकल ......*


शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल. लहानपणी ती सर्वांचीच आवडती. अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात. तीन चाकी सायकलला रिक्षा असे म्हटले जाते. सहसा ते माणसांना आणि सामान वाहून नेण्यासाठी वापर केला जातो. आपल्या वयाचा कोणी सायकल चालवत असे तर आपल्या मनात देखील सायकल चालविण्याची उत्कट इच्छा निर्माण व्हायची. पण सायकल खरेदी करण्याऐवढं पैसे जवळ असायचे नाही म्हणून एक तर त्या सायकलवाल्या मुलांशी मैत्री करायची आणि एखादं चक्कर मिळवायची. गावात काही दुकानदार छोटी छोटी चार पाच सायकल ठेवायची आणि घंटाच्या हिशोबाने सायकल फिरविण्यास किरायाने द्यायचे. खाऊसाठी दिलेला पैसा मग या किरायाच्या सायकलसाठी खर्च करायचं. घंटा ओलांडून गेल्यास तो जास्तीचे पैसे घेई म्हणून तीन चार वेळा त्याला विचारायचं झाला का घंटा, तो नाही म्हणे पर्यंत फिरवीत राहायचं. सुट्टीच्या दिवसांत आम्ही सारेच मुलं सायकल फिरवायचो त्यामुळे किरायाची सायकल देखील कधी कधी वेळेवर मिळायची नाही. छोटी सायकल चालविणे सोपे असायचे, त्याच्यासाठी कोणी शिकविणे गरजेचे नसायचे पण मोठ्यांची सायकल चालवणे जरासे अवघड जायचे. मग सुरुवातीला कोणी तरी सायकलला धरायचे आणि चालवायचे. एकदा तोल सांभाळता आले की मग मोठी सायकल देखील चालवायचो. सुरुवातीला कैंची सायकल चालवायची म्हणजे सीट च्या खाली एक दंडी असायची त्यात पाय घालून चालवायची. काही दिवसांनी सीट वर बसून सायकल चालवायची जरी पायडलला पाय पुरत नसेल तरी. जेंव्हा मोठी सायकल चांगली चालविता येऊ लागली की मित्रांना डबल सीट बसवून सायकल चालवायची. असा सायकल चालविण्याचा प्रवास चालू असायचा. त्याकाळी मोटारसायकल फार कमी पाहायला मिळायचे. लग्न कार्यात नवरदेवाला खास करून सायकल दिल्या जायचं. जवळच्या शहरात जाणे असो वा शेताला जाणे असो त्यासाठी सायकलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होता. प्रत्येकाच्या घरी एखादं सायकल हमखास असायची, त्याची जागा आज मोटारसायकलने घेतली आहे. गावातले एखादं कोणी व्यक्ती सायकल मागितले की त्यांना ते दिले जायचे कारण त्याला सायकल दिल्याने आपला काही खर्च व्हायचा नाही. कारण त्याला ना पेट्रोल लागतो ना डिझेल, त्यामुळे मागेपुढे काही विचार न करता मागितल्या बरोबर सायकल मिळायची. गावात कोणाचं मृत्यू झाला असेल तर त्याची बातमी सगेसोयरे, नातेवाईक यांना सांगण्यासाठी सायकलवर जावे लागत असे. दळणवळण साठी बैलगाडीच्या नंतर सायकलचा क्रमांक लागत होता. सायकलवरून कोणाचा अपघात झाला तरी कोणाचा मृत्यू झालेले आजपर्यंत ऐकण्यात नाही. जास्तीत जास्त खरचटते किंवा मुका मार लागतो.

सायकल हे पर्यावरण पूरक आहे कारण याला कोणत्याच प्रकारचे इंधन लागत नाही, त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याचसोबत सायकल चालविण्यासाठी हातपाय हलवावे लागते त्यामुळे आपला शारीरिक व्यायाम देखील होतो. जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे. सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आत्ता व्यायामशाळेत सायकलने आपली वेगळी जागा निर्माण केले आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे. सायकल लहानांपासून ते वृद्ध व्यक्ती चालवू शकतात. सायकल उत्पादनासाठी पंजाब आणि हरियाना ही राज्ये अग्रेसर आहेत. अगदी सुरुवातीला अटलास ही एकच कंपनी सायकल बनवत असे. आज सायकल वापरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. आम्हांला माध्यमिक शाळेत शिकत असतांना सायकल मिळायची आणि ती एकच सायकल शिक्षण पूर्ण होईपर्यंत सोबत असायची. स्वतःची नोकरी लागल्यावरच हातात गाडी यायची आणि ते ही स्वतःच्या पैश्याने. शाळा महाविद्यालयात जाणारी मुलं देखील सायकल ऐवजी गाडीची मागणी करतांना दिसत आहेत. तसेच आजची पालक मंडळी पैश्याने समृद्ध असल्या कारणाने ते आपल्या मुलांना गाडी घेऊन देत आहेत. मात्र पालकांनी यावर एकवेळ विचार करावा आणि आपल्या मुलामुलींना शाळा महाविद्यालयात किंवा शिकवणीला जाण्यासाठी गाडी ऐवजी सायकलचा पर्याय निवडावा. त्यामुळे एक फायदा होऊ शकतो, आपल्या मुलामुलींची शारीरिक हालचाल होईल, आणि इंधन भरण्यासाठी पॉकेटमनी द्यावे लागणार नाही. शालेय जीवनातील मुलांसाठी सायकलचे महत्व आपण जाणून घ्यावे आणि सायकलच वापरण्याची सक्ती करावी. तरुण वयातील ही मुले हातात गाडी आल्यामुळे बेफामपणे गाडी चालवितात, ज्यामुळे स्वतःच्या मुलामुलींना दुखापत होतेच शिवाय दुसऱ्यांना देखील त्रास होतो. जीव कोणाचेही असेल ते अनमोल आहे, असे हकनाक जीव जाण्यापासून वाचवावे.

*सायकलच्या इतिहासातील काही नोंदी

उत्तराखंडच्या 72 वर्षे वय असलेल्या मोहम्मद अहमद ज्यांना 'देशप्रेमी' अहमद म्हटले जाते त्यांनी सायकल वर भारतभ्रमण केल्याची नोंद आहे.
छत्तीसगढच्या दिल्ली यूनिवर्सिटी मधील विद्यार्थी मोहम्मद आफताब फरीदी भारताच्या सैनिकांच्या सन्मानासाठी दिल्लीहुन आपली सायकल यात्रा चालू केली होती. गोल्ड मेडलिस्ट आफताब फरीदी संपूर्ण भारत भ्रमणचा रेकॉर्ड बनविण्याच्या निर्धाराने बाहेर पडला
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जवळगाव येथील धोंडीराम ने विना ब्रेक ची सायकल घेऊन संपूर्ण भारतभर प्रवास केला आहे. सडक सुरक्षा आणि बेटी बचावचा संदेश त्यांनी आपल्या प्रवासात जनतेला दिला.
आजकालचे युवक सायकल चालविण्यात संकोच करतात. महागडी गाडी आणि कार चालविण्यात त्यांना स्वतः ची शान वाटते. सायकल चालविल्यामुळे आरोग्य चांगले राहते. प्रदूषण होत नाही. सायकल चालविणे सर्वासाठी चांगले आहे, त्यामुळे सर्वांनी असा विचार करणे आवश्यक आहे असे बिहार राज्यातील मुजफ्फर जिल्ह्यातील सैनिक शाळेतील विद्यार्थी सचिन राज यांनी म्हटले आहे जो की स्वतः सायकल वर भारतभ्रमण केला आहे.
विदेशातील काही मंडळी विश्व भ्रमण करण्यासाठी सायकलचा वापर केल्याची नोंद इतिहासात मिळते
पुणे जिल्ह्यातील वेदांगी कुलकर्णी जिचे वय अवघे 20 वर्षे तिने सायकलने सर्वात लवकर विश्व भ्रमण करणारी पहिली आशियाई नागरिक बनली तिने 29 हजार किलोमीटर सायकलने प्रवास केला आहे. तिने 159 दिवसांत 14 देशात रोज 300 किमी प्रवास करून विश्वभ्रमण पूर्ण केली. 
जगामध्ये पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरने तयार केल्याची नोंद आहे

- नासा येवतीकर, 9423625769

2 comments: