नागोराव सा. येवतीकर

Sunday, 27 October 2019

आठवणीतील दिवाळी

आठवणीतली दिवाळी

लहानपणी दिवाळी सणाचे खूप आकर्षण असायचे. खास करून फटाक्यांसाठी ही दिवाळी लक्षात असायची. शाळेला सुट्या लागल्या पासून दिवाळीची मौजमजा चालू व्हायची. तोटे आणि मोठे बॉम्ब फोडायची भीती वाटायची पण ते मिळायचे देखील नाही. आवडते फटाके म्हणजे टिकल्या वाजविणे. मोठ्या दगडावर टिकली ठेवायची आणि दुसऱ्या छोट्या दगडाने ती वाजवायची. कधी कधी अंगठा आणि पहिलेबोट यात टिकली धरून दगडावर घासायची. टिकलीचा आवाज झाला की आनंद व्हायचा. यात कधी कधी नखाला दुखापत व्हायची, पण असे साऱ्यांना करता येत नसायचे म्हणून अभिमान वाटायचं. पुढे काही वर्षांनी टिकली वाजवायचे बंदूक आले आणि त्याच्या पाठोपाठ रोलच्या टिकल्या आल्या. झाड लावणे आणि भुईचक्कर फिरविण्यासाठी सुरसुरीचा वापर करणे एवढंच काय ते दिवाळीचे फटाके. जेमतेम पन्नास रुपयांत दिवाळीचे फटाके यायचे आणि त्यातच मौज मानून घ्यायचं. गावात काही श्रीमंत मंडळी होती जे की खूप फटाके वाजवित असत, आणि मी दुरून पाहून आनंद घ्यायचो. माझे काही मित्र हातात तोटे धरून वाजवत असत. असे करतांना एक दोनदा त्यांचे हात भाजल्याचे माझ्या आज ही आठवणीत आहे. माझ्या एका मित्राने वरच्या खिशात तोटे भरले, हातात उदबत्ती घेतली आणि वाजवू लागला. त्याला काही कळण्याच्या आत त्याच्या वरच्या खिशात कुठूनतरी ठिणगी पडली आणि खिशात फटाके वाजायला सुरूवात झाली तसे तो उड्या मारू लागला. त्याचा दिवाळीचा नवा कोरा शर्ट खराब झाला. काही सेकंदात तो अंगातून शर्ट काढला म्हणून विघ्न टळलं, नाही तर त्याचा अंग नक्कीच भाजला असता. काही खोड्या काढणारे मित्र ही होते सोबतीला. एखाद्याच्या पाठीमागून त्यांच्या पायाखाली तोटे लावायचे आणि मजा बघायची. कधी कधी असे करतांना त्याला शिव्या देखील मिळायचे पण तो काही तसे करायचं सोडायचं नाही. दिवाळीच्या आदल्यादिवशी गावात जे दुकानंअसायचे ते लक्ष्मीपूजन करायचे आणि सायंकाळी खूप फटाके वाजवायचे. ते पाहतांना खरंच खूप मजा यायची. त्याच दुकानासमोर मग मोठी माणसे आणि लहान मुले पत्ते ( जुआ ) खेळायची. दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटे उठून अंगाला उटनं लावून अंघोळ करायचं. दिवाळीसाठी घेतलेले नवीन कपडे अंगात टाकून खेळायला बाहेर पडायचं. या दिवशी खास करून एक क्रिकेटची मॅच असायची. गावापासून दूर तलावात जाऊन सर्व मित्र क्रिकेट खेळायचं आणि घरी आल्या बरोबर बोटवे आणि वरण भात खाण्याचा बेत असायचा. सायंकाळी आमच्या गावात लक्ष्मी मंदिरात पूजा असायची आणि त्यासाठी गावातल्या सर्व सुवासिनी बायका डोक्यावर दोन माठ आणि त्यात वर दिवा लावून आळंक्या काढायचे. त्यावेळी सुद्धा खूप फटाकेवाजविले जात असे. दिवाळीच्या निमित्ताने गाव सोडून गेलेले अनेकजण मूळ गावी येत असत त्यामुळे गाव भरून जात असे. पण आज तसे काही दिसत नाही. गावातली दिवाळी आज हरवल्यासारखी वाटते. फटाक्यांचा आवाज वाढलंय मात्र प्रेमाचा जिव्हाळा हळूहळू कमी होत चाललंय. दिवाळीचे हे क्षण जरी आज आठवले तरी मन प्रसन्न होऊन जाते.

सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .....!

- नासा येवतीकर, धर्माबाद
संयोजक, फ्रेश मॉर्निंग बुलेटीन
9423625769

No comments:

Post a Comment