नागोराव सा. येवतीकर

Monday, 8 April 2019

IPL

आय पी एल मुळे ........

सन 2007 मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग नावाची टी20 क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून क्रिकेट विश्वात खूप मोठा उलाढाल चालू झालंय. भारतीय क्रिकेट संघात संपूर्ण देशातील इन मिन 15 ते 20 खेळाडू समाविष्ट व्हायचे. काही जणांकडे क्षमता असून देखील ते आपली।प्रतिभा जगाला दाखविण्यापासून वंचित राहायचे. काही नशीबवान खेळाडू संघात निवडले जायचे तर काही जणांची आयुरसिमा संपून जायची, प्रतीक्षा करून करून शेवटी ते एखाद्या अकॅडमी चे कोच व्हायचे इतकी दयनीय अवस्था या खेळातील खेळाडूची होती. पण आय पी एल।ला सुरुवात झाली आणि भारतातील अनेक खेळाडू ना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळू लागली. त्याच सोबत रग्गड पैसा देखील मिळू लागला. आय पी एल मुळे हा एकच काय तो स्पष्ट दिसणारा फायदा आहे मात्र याच आयपीएल मुळे इकडे देशातील नवयुवक आणि काही मंडळी वाम मार्गाला लागत आहे याकडे दुर्लक्षून चालणार नाही.
क्रिकेट आणि मॅच फिक्सिंग हे एकाच नाण्यांचे दोन बाजू आहेत. फार पूर्वी खेडेगावात कुस्तीचे खेळ व्हायचे. कुस्ती खेळणाऱ्या दोन पहिलवान विषयी लोकं पैजा लावायचे. कोण जिंकणार ? यावर पैज लावण्याची ही जुनी पद्धत हळूहळू क्रिकेट मध्ये स्थिरावली. अगदी सुरुवातीला सामना कोण जिंकणार कोण हरणार यावर पैज म्हणजे सट्टा लावले जाऊ लागले. याच सट्टापायी भारताचा माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार स्व. हनसी क्रोनिए यांना संघातून बाहेर व्हावे लागले होते. पूर्ण सामन्यावर तेंव्हा सट्टा लावले जायचे. हे सामने वर्षातून काही ठराविक वेळेतच व्हायचे. पण आय पी एल ने मात्र रोजच सामना आणि रोजच सट्टा सुरू केला आहे. टॉस कोण जिंकते ? पहिल्या सहा, दहा आणि शेवटच्या चार षटकात किती धावा निघतील ? यावर आजकाल पैजा म्हणजे सट्टा लावल्या जात आहे. याचे लोण आता घरात येऊन पोहोचले आहे. घरातील लहान मुलांना आय पी एल एक मनोरंजनाचे साधन तर झालेच शिवाय  घरातल्या घरात साध्या साध्या गोष्टी लक्षात धरून पैजा लावल्या जात आहेत. एका घरात दोघे भाऊ राहत असतील तर तू कोणाकडून आणि मी कोणाकडून अशी भाषा ऐकायला मिळत आहे. मनोरंजनाच्या नावाखाली आय पी एल ने भारताची संस्कृती देखील बिघडवून टाकते की काय अशी अनामिक भीती देखील वाटत आहे. एखादा युवक सट्टा मध्ये हजार एक रुपये जिंकला की मित्रांमध्ये त्यांची पार्टी आयोजित केल्या जात आहे. त्यात मग दारू सिगारेट आणि इतर काही व्यसनांचा शिरकाव त्यांच्या जीवनात नकळत होत आहे. या दोन महिन्यात लागलेली सवय नंतरच्या दहा महिन्यात त्यास स्वस्थ बसू देत नाही आणि विचार ही करू शकत नाही या स्थितीच्या पलीकडे त्याचे जीवन होते. आय पी एल ने देशातील चाळीस खेळाडूना आपली प्रतिभा दाखवायला संधी दिली हे सत्य जरी वाटत असले तरी शेकडो युवक मात्र या खेळावर पैजा लावून देशोधडीला जात आहेत, हे ही सत्य नाकारून चालणार नाही. रोजच्या या खेळांमुळे देशातील कोणकोणत्या बाबीचा अपव्यय होत आहे त्याचा विचार केला तर खूप मोठी यादी तयार होईल. एकीकडे कोरडा दुष्काळ असून लोकांना घोटभर पिण्यासाठी पाणी नाही. हंडाभर पाणी घेण्यासाठी कोसो मैल दूर पायी जावे लागते आणि इथे आय पी एल सामन्याच्यासाठी मैदान तयार करतांना किती तरी लीटर पाणी जमिनीवर ओतावे लागते. किती तरी विद्युत खर्च केला जातो. प्रत्येक खेळाडूसारखे आपण दिसावं म्हणून मुले त्यांच्या प्रमाणे हेअर स्टाईल करण्याच्या फंदात पडतात. मुलांच्या ऐन परीक्षेच्या तोंडावरच या स्पर्धेची सुरुवात होते. त्यामुळे मुलांचे अर्धे लक्ष परीक्षेत तर अर्धे लक्ष क्रिकेटच्या स्पर्धेकडे असते. खेळ हे मनोरंजन म्हणून जितका वेळ असेल तितका वेळ खूप छान असतो पण तोच खेळ स्पर्धेच्या रुपात उतरतो ना तेंव्हा खूपच घातक ठरत जातो. आय पी एलची स्पर्धा बंद करा असे ओरडून सांगून काही फायदा नाही फक्त आपली मुलं या खेळापासून जास्तीत जास्त दूर कसे राहतील याचा प्रत्येकांनी विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment