नागोराव सा. येवतीकर

Thursday, 11 April 2019

रामनवमी

रघुपती राघव राजाराम

भगवान श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे व जनतेचे अधिष्ठान आहेत. पुन्हा पुन्हा ऐकू येणारी श्रीराम जय राम जय जय रामचा उदघोष याची साक्ष आहे. भारतातील ग्रामीण भागात आजही दोन व्यक्ती समोरासमोर आले की परस्परांना दोन्ही हात जोडून " रामराम " म्हणतात. यातून एक अर्थ असाही निघतो की, प्रत्येक व्यक्तीत राम वसलेला आहे. कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्यव्यवस्थेसाठी रामराज्य हा शब्द पर्याय म्हणून वापरला जातो. कारण त्यांचे राज्यच होते तसे आदर्श. एखाद्या व्याधी, समस्येवर किंवा संकटावर शेवटचा उपचार म्हणजे रामबाण उपाय होय. कारण त्यांचा प्रत्येक कर्म हा जीवनातील प्रत्येक समस्येवर शेवटचा उपाय आहे. भगवान श्रीरामाचे प्रेमशासन भारतीयांच्या हृदयावर आजतागायत चालू आहे. 
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात झाला. जेंव्हा जग आणि जीव आधि, व्याधि आणि उपाधी यात तप्त होत होते तेव्हा जगाला सुख, शांती देण्यासाठी प्रेम, पावित्र्य व  प्रसन्नतेचा हा पुंज जन्म घेतला. त्यांचा जन्माने संपूर्ण जगाला जीवन जगण्याचा आदर्श मार्ग लाभलेला आहे. श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास करून एक-एक गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास रामो भुत्वा राम यजेत अर्थात राम होऊन रामाची पूजा करणे असा उजाडेल यात शंका नाही. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय या सर्वच क्षेत्रात वावरताना आपली मर्यादा कोणती ? हे कळण्यासाठी भगवान श्रीराम चरित्रांचा अभ्यास करावा. श्रीरामांनी आपल्या विचारात, विकासात किंवा व्यवहारात सर्वच कार्यात कधीही मर्यादा ओलांडली नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. आजच्या श्रीरामनवमीच्या दिवशी त्यांच्या गुणांचा परामर्श घेऊन त्याचा स्वीकार केल्यास खऱ्या अर्थाने नवमी साजरी केल्यासारखे होईल.
भगवान श्रीरामांनी आपल्या समोर एक कौटुंबिक आदर्श ठेवले आहे. रामाला दुसरे तीन बांध होते. परंतु त्यांच्यात कधीही कलह किंवा वाद झाला असे आपण कधी ऐकलेले नाही. त्यागात पुढे व भोगात मागे असा त्यांचा जीवन मंत्र होता. येथे नेहमी दुसर्‍यांचा विचार करण्यात येतो, त्यागाची तयारी ठेवण्यात येते, तेथे क्लेश, भांडण, झगडा, कलह, वाद  हे सर्व शेकडो कोस दूर रहातात. आज आपणाला या विचारांची नितांत आवश्यकता आहे. पिता राजा दशरथाने वनात जाण्याची आज्ञा दिल्यावर ते थोडेदेखील दुःखी झाले नाही वडिलांची आज्ञा पाळणे हे मुलांचे परमकर्तव्य आहे त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसणारा पुत्रच आदर्श बनू शकतो.
वृद्ध माता पित्याला सहारा देण्यात यावे असा कायदा सरकारला तयार करावा लागतो. यात आपली फार मोठी नामुष्की आहे. जिच्या वचनामुळे श्रीराम यांना वनवास भोगावा त्या कैकयी मातेवर त्यांनी कधीच राग धरला नाही. आईला समजून घेणारे पुत्र बनणे म्हणजेच तिने आपणाला जन्म देताना घेतलेल्या त्रासाची परत केलेली पावती नव्हे काय ? श्रीरामाचे तीन ही आईवर सारखेच प्रेम होते. रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवून आणल्यानंतर अयोध्या नगरीतील लोकांची कुजबुज लक्षात घेऊन श्रीरामाने आपली पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. यामागे राज्यातील लोकांचा विश्वास संपादन करणे हे राजाचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे श्रीरामाने सीतेचा त्याग केला. त्यांच्या हृदयात फक्त एकच स्त्रीसाठी जागा होती ती म्हणजे सीता. एकपत्नी निष्ठ पती राहणे म्हणजेच त्याला सितापती म्हटले जाते. आज भारतात जो अनैतिक किंवा अत्याचार बोकाळला आहे त्यावर सितापती हा पर्याय सर्वोत्तम आहे, असे वाटते. 
ऋषी विश्वामित्र हे श्रीरामाचे गुरू होते. विश्वामित्रांचे श्रीरामावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा जास्त श्रीरामाचे विश्वामित्रावर होते. आश्रमात एक हृदय दुसऱ्या हृदयाशी बोलत होते. विश्वामित्रांनी श्रीरामांना धनुर्विद्येसोबत जीवन जगण्याचा आदर्श मार्ग सुद्धा नकळत शिकविले. श्रीरामाच्या गुरुभक्तीमुळे व गुरुवर असलेल्या अपार श्रद्धेमुळे त्यांना ऋषींनी जगातील सर्व ज्ञान दिले. गुरुविना जीवन नाही आणि गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. याची जाणीव त्यांच्या चरित्राच्या अभ्यासावरून होते. कष्किंध्येच्या असुरी व जुलमी वाली वानराला मारून श्रीरामाने सुग्रीवाचे मन जिंकले आणि सुग्रीवाने लंकेतील सीतेला सोडविण्यात श्रीरामाला सर्वतोपरी मदत करून मैत्री कायम केली. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे त्यांचे कार्य होते. संकटात मदत केलेला मित्रच खरा मित्र म्हणून ओळखला जातो. रावण हा रामाचा शत्रू होता. त्यांच्या निधनानंतर बिभीषण अग्निसंस्कार करण्यास नकार देतो त्यावेळी स्वतः श्रीराम हे काम करण्यास पुढे येतात यातून त्यांचे शत्रूवर असलेले प्रेम ही कळते. कष्किंध व लंका राज्य जिंकून त्यांनी आपले साम्राज्य वाढविले नाही. याउलट ते दान करून तेथील लोकांचे मन जिंकले. दुसऱ्याची वस्तू घेण्याने त्याच्यात प्रेम तर राहणारच नाही उलट वितुष्ट निर्माण होते. भगवान श्रीरामाच्या अंगी असलेल्या मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, शत्रूप्रेम, मित्रप्रेम, पत्नीप्रेम, राज्यप्रेम, जनप्रेम, आणि गुरूप्रेम या नऊ गुणांचा जीवन जगतांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास पृथ्वीतलावर असलेले दुःख, क्लेश, तणाव नक्की नाहीशे होतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी सुद्धा जनतेला रामाच्या जीवनाचे पालन करण्यास सांगितले होते. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम ह्या त्यांच्या धूनमुळे संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन जाते. श्रीरामनवमीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
(लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment