नागोराव सा. येवतीकर

Saturday, 31 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 01 ते 27

नमस्कार

शालेय मुलांसाठी खास करून लिहिण्यात आलेले लेख ज्यात छोट्या छोट्या सवयीमधून कसे संस्कार होतात याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या लेखनाचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यावेत.

भाग 1

भाग 2


भाग 3


भाग 4


भाग 5


भाग 6


भाग 7


भाग 8


भाग 9

भाग 10


भाग 11


भाग 12


भाग 13


भाग 14


भाग 15


भाग 16


भाग 17


भाग 18


भाग 19


भाग 20


भाग 21


भाग 22


भाग 23


भाग 24


भाग 25


भाग 26


भाग 27


लेखक - नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद 
09423625769

बालपणीचे संस्कार भाग 26

आधी वंदू तुज मोरया . . . 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ: 
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा 

आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला आपण तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिल्यामुळे गणेशोत्सव कधी एकदा येतो याची आपणाला उत्सुकता लागलेली असते. प्रत्येक शुभ कार्यात मग तो लग्न समारंभ असो वा  लक्ष्मीपूजन असो, कोनशिला समारंभ असो वा  वास्तू शांती असो की सत्यनारायणाची पूजा असो त्यात सर्वसाधारपणे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच श्री गणेशाला आद्य दैवत म्हटले जाते. हिंदू धर्मातील लोकांच्या उंबरठय़ाकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे घराच्या  चौकटीतील वरच्या आडव्या लाकडी फटीवर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. त्याशिवाय घराला घरपण येत नाही. ज्यांच्या घराच्या चौकटींवर श्री गणेशाची मूर्ती नाही असे घर शोधून सुध्दा सापडणार नाही. घरातून बाहेर पडताना आपण कोणत्या कामांसाठी बाहेर जात आहोत ?  स्वार्थासाठी की निस्वार्थ कामांसाठी जात आहोत यांची नोंद चौकटींवर विराजमान असलेले श्री गणेशा करतात, असे पुराणात सांगितले आहे. त्याचमुळे घराबाहेर पडताना वडील मंडळी विशेष करून महिला नेहमीच चौकटीचे दर्शन घेतांना आढळून येतात व ठरविलेले काम वेळेत पूर्ण होवो अशी प्रार्थना श्री गणेशाजवळ करतात. 
तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला घरात श्री गणेशाची पूजा केली जाते. मात्र भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत त्यांची पूजा केली जाते. याच दिवसाची आबाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात.  हत्तीचे सोंड असलेले तोंड, सुपासारखे मोठे कान, बारीक डोळे, अगडबंब पोट आणि त्याचा लहानसा वाहन मुषकराज या सर्वाविषयी आपल्या मनात कमालीची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जात असे असा उल्लेख इतिहासात आढळते. भारतीय असंतोषाचे जनक आणि जहाल नेते लोकमान्य टिळकांनी इंग्रजाच्या जुलमी राजवटीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, लोकांत एकता आणि एकात्मतेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सन 1890 च्या दशकात श्री गणेशाच्या घराघरातील उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची सन 1894 मध्ये स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केली.  तेंव्हापासून आजतागायत आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागलोत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केली तो उद्देश आज सफल होत आहे काय ? यांचा विचार करण्याची वेळ आपणावर आलेली आहे. या दिवसांत " गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया " या गीतांने सर्वत्र चैतन्यमय वातावरण होऊन जाते. तेंव्हा बोला एकदाचे गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$.

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
nagorao26@gmail.com 

बालपणीचे संस्कार भाग 25

मरावे परी कीर्तिरूपे उरावे 
                     आज भारताचा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी या दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही. 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाई चे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात. 
या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामाच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. 
आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्यचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. कवी भा. रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात की, ' जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? ' असा प्रश्न त्या॑नी सर्वांना विचारला  परंतु आपल्या मृत्यूनंतर या जगात काय उरते तर ते फक्त नाव आणि कीर्ती. म्हणून आपल्या माघारी आपले नाव सर्वांनी घ्यावे असे वाटत असेल तर काही जगापेक्षा वेगळे करू या. स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. 

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

बालपणीचे संस्कार भाग 24

" आई - वडील हेच खरे दौलत "

एका कवितेत घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे वाचले आहे. खरोखरच आई वडीलांची आपल्या लेकरांबाबतची माया निराळीच असते. तळहाताच्या फोडाप्रमाणे आई वडील मुलांची देखभाल करतात, त्यांना मोठी करतात. आजच्या काळात मात्र मुले मोठी झाल्यावर आपल्या जन्मदात्यालाच विसरतात. ज्यांनी आपणाला या सुंदर अश्या पृथ्वीवर आणले, त्यांना वृध्दाश्रमात धाडण्यास सुध्दा मागे पुढे पहात नाहीत. ज्या आई वडिलांनी आपणाला लहानाचे मोठे केले त्यांच्याप्रति आपले काहीच कर्तव्य नाहीत काय ? त्यांच्यावर आपण एवढा अन्याय का करावा ? आजच्या विभक्त कुटुंब पध्दती मुळे नातवंडाना आजोबांची कथा आणि आजीचे गाणी ऐकायलाच मिळत नाहीत.आजी - आजोबांचे प्रेम कसे असते हे फक्त चित्रपटातून पाहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या नातवंडाचे किती दुर्भाग्य ! अशा घटनांना सर्वस्वी ही मुलेच जबाबदार आहेत असे मला वाटते. 
काही कुटुंबात भावाभावाचे वाद होतात. काही वेळा बायकोच्या कटकटीमुळे ईच्छा असूनही मुलांना आई वडिलांपासून दूर रहावे लागते. अशा वेळी घरातील चिमुकल्याचे खूप नुकसान होते. दिवसेंदिवस समाजातील नितिमत्ता खालवली जात आहे. घरातील थोरासाठी ज्या काळात वृध्दाश्रमाची सोय झाली, त्याच काळात नितिमत्ता लयास जाण्यास सुरुवात झाली. मी माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, असे म्हणताना आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपले पोट भरविले या गोष्टीची आठवण मुलांनी एकदा तरी ठेवायला हवी. रोज सकाळी उठून देवपूजा करते, देवाला गोडधोड नेवैद्य देते, पण सासू सासऱ्याच्या तब्येतीबद्दल न विचारणाऱ्या सुनेला आयुष्यभर देव कळणार नाही. आजकाल माहेरच्या सांगण्यावरून किंवा कुठल्याही कारणावरून " आम्ही दोघे राजा राणी, घरात नको परका कोणी " अशीच संसाराची पध्दत नवीन मुलींच्या मनात रूढ होऊ पाहत आहे. संकृतमध्ये एक श्लोक आहे मातृ देवो भव, पितृ देवो भव अर्थात आई वडिलांना देव माना व त्यांचा आदर करा, सेवा करा, यांतच मुलांची पुण्याई आहे. एखाद्या तीर्थक्षेत्री ठिकाणी भेट दिल्याने जे पुण्य मिळविता येते असे वाटते त्यापेक्षा जास्त पुण्य आई वडिलांच्या सेवेतून मिळते. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर वृध्दाश्रमात पाठवित असाल तर उद्या तुम्हांला सुध्दा याच वृध्दाश्रमात तुमची मुलं तुम्हांला पाठवणार नाहीत कश्यावरून. कारण जसे पेराल तसे उगवणार ते तर ठरलेलेच आहे. तेंव्हा प्रत्येक मुलाने " वृध्दाश्रम कश्यासाठी " यावर सखोल चिंतन करून आपल्या आई वडीलांची आजन्म सेवा करावी ते आपले परम कर्तव्य आहे
- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद 
  09423625769

बालपणीचे संस्कार भाग 18

जनसेवेतच ईश्वराचीही सेवा

माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा तरी आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जाण्याची प्रत्येकाला आवश्यकता भासते. याशिवाय इतरही प्रसिद्ध क्षेत्रांना भेटी देण्याचे नियोजन प्रत्येक जण करीत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात सगळीकडेच देव-देवतांच्या निवासस्थानी यात्रा व जत्रा यांच्या निमित्ताने भाविक भक्तांचा महापूर ओसंडलेला दिसतो. विशेषतः जत्रा पाहूनच अनेक जण दर्शन सोहळ्याचा बेत ठरवितात असे वाटते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे यात्रेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी मांढरदेवीच्या यात्रेत भाविकांच्या चेंगराचेंगरी अनेकांना आपला जीव गमवावे लागले होते. त्यास्तव अमुक यात्रेच्या वेळीच देवाचे दर्शन घेतल्यास ईश्वर प्राप्ती होते का ? गर्दीतल्या प्रचंड भाविकांकडे पाहून पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येते. म्हणूनच यात्रा वगळून इतर वेळी दर्शन घेतले तर बिघडते कुठे ? गर्दीत अगदी पाच-सहा तास ताटकळत उभे राहून दर्शन घेतल्याने ईश्वर प्राप्ती तर होणारच नाही शिवाय वृद्ध व बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, हे वेगळेच. माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा म्हणतात की, देव दगडात नाही, त्याची पुजा करू नका. देव माणसात आहे, म्हणून त्यांची सेवा करा. कारण जनसेवेतच ईश्वराचीही सेवा दडलेली आहे. म्हणून देवळात, मंदिरात गर्दी करण्यापेक्षा समाजातील दीन-दुबळ्या, रंजले-गांजले असहाय-अनाथ लोकांची सेवा करावी. ईश्वराच्या देवदर्शनासाठी दूरवर गेल्याने जो आनंद मिळत नाही, तो आनंद गरजू, गरीब लोकांना मदतीचा हात देऊन सेवा केल्यास नक्कीच मिळू शकते. अनेक महात्म्यांनी जनसेवेतच ईश्वरसेवा मानून कार्य केले म्हणूनच ते महान बनले. आपणही त्या तत्त्वाचा अवलंब करून ईश्वराचा मागे न धावता जनसेवा करीत राहावे, असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

बालपणीचे संस्कार भाग 17

मित्रावरुन आपली ओळख

मित्रानो,तुमचा स्वभाव कसा आहे ? हे तुमच्या मित्रमंडळी वरून सहजपणे ओळखता येते. ज्या प्रकारचे आपले मित्र असतील अगदी त्याच प्रकारचा आपला स्वभाव असतो. मानसशास्त्राने हे सिद्ध करून दाखवले आहे. जीवनात आई, वडील, भाऊ, बहिण इत्यादी नातेसंबंध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच मित्रांचे नातेसुद्धा महत्त्वाचे आहे. एखादा चांगला मित्र मिळविणे म्हणजे जीवनातील ती एक कसोटीच ठरते. संपूर्ण आयुष्यात आपण एकही मित्र बनविण्यात अयशस्वी झालो तर आपले जीवन व्यर्थ आहे, असे वाटायला लागते. मित्र कोणाला म्हणायचे, तर खूप पूर्वीपासून याची व्याख्या अशी केली आहे संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्र. शालेय जीवनापासून ते व्हाया कॉलेजचे जीवन संपवून जेंव्हा  आपल्या आयुष्याला खरी सुरुवात होते तेव्हा फार कमी मित्र आपल्या वाट्यास येतात आणि मग हेच मित्र संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतात. अगदी लहानपणापासून आपल्यासोबत खेळलेले, नाचलेले, बागडलेले असे लंगोटीयार असो पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर वर्गात आजूबाजूला बसलेले पाटीमित्र असो, त्यांचे विस्मरण सहसा होत नाही.
शालेय जीवनात कळते वय झाल्यानंतर मात्र आपण वर्गातील सर्वच मुलांना मित्र करीत नाही, तर ज्याच्यासोबत आपले सुत जुळते, आपले विचार जुळतात अशा निवडक मुलांसोबतच मैत्री करतो. याच ठिकाणी आपली खरी कसोटी प्रारंभ होते. निव्वळ स्तुती करणारे मित्र म्हणजे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी जे अलंकार वापरले जातात त्याप्रमाणे असतात. असे मित्र फक्त स्वार्थ साधतात. कामापुरता मामा करून ते आपल्यापासून दूर होतात. वाईट विचारांच्या किंवा व्यसनी मित्रापासून नेहमीच अंतर ठेवून रहावे. संतानी ज्याप्रकारे म्हटले आहे सुसंगती सदा घडो । सुजन वाक्य कानी पडो ।। त्यामुळे नेहमी चांगल्या मित्राच्या संगतीत राहिल्याने आपले चांगलेच होते. समाजात सुद्धा आपली चांगली ओळख होते. आरशात ज्याप्रकारे आपली जशास तशी प्रतिमा दिसते त्यावरून आपण ठरवितो की मी कसा दिसतो ? तसेच काम मित्राचे असते. आपल्यातील नुसते गुणच नाही तर दोष सुद्धा दाखविण्याचे काम मित्र करतात. म्हणूनच मित्रांना जीवनप्रवाहाला वळण लावणारे तट असे म्हणतात. नदीच्या प्रवाहाप्रमाणे मित्र आपल्या जीवनाला वळण देणारे असावेत याचा शोध घ्या आणि अशा मित्रांच्या सहवासात नियमित राहण्याचा प्रयत्न करा

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

बालपणीचे संस्कार भाग 16

पाप आणि पुण्य

मुलांनो वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी कसा झाला हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. जंगलातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाचे तो धड व शिर वेगळे करीत असे आणि त्याबदल्यात एक खडा रांजणात टाकीत असे. किती तरी रांजणे त्याच्या घरी भरून होती म्हणजे त्याने किती लोकांना ठार केले होते याचा अंदाज आपणाला येऊ शकतो. त्याच जंगलातून एकदा नारदमुनी पायी चालले होते. त्यांच्यावर सुद्धा त्यांनी हात उगारला. त्यावेळी त्यांनी एक प्रश्न विचारला होता की, या पापात किती जण भागीदार आहेत ? यावर घरी जाऊन वाल्या कोळी प्रत्येकाला तो प्रश्न विचारला. पण सर्वांनी या पापात भागीदार होण्यास नकार दिला. त्यावेळी वाल्या कोळींचे डोळे उघडले. त्यांनी नारदमुनीचे पाय धरले व यावर पश्चातापाचा मार्ग विचारला असता, त्यांनी राम राम नावाचा जप करण्यास सांगितले. पण वाल्या कोळीला ते म्हणता येत नव्हते, तेव्हा मरा मरा असे म्हणत म्हणत वाल्या कोळी रामायणाचे रचियेता बनून वाल्मिकी ऋषी बनले. अशीही ही आख्यायिका. यातून आपणास पाप व पुण्य दोन्ही गोष्टी कळतात. मात्र घरात व समाजात वावरताना हे करू नको अन्यथा पाप होते आणि असे कर म्हणजे पुण्य मिळते ही वाक्ये पदोपदी आपणाला ऐकण्यास मिळतात. तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो आणि पाप म्हणजे काय ? पुण्य म्हणजे काय ? याचा विचार करतो. आपणाला समजेल, रुचेल व पटेल अशा भाषेत वेदव्यास ऋषींनी पुण्य व पापाचे विवेचन करताना म्हटले आहे की इतरांचे कल्याण करणे म्हणजे पुण्य आहे तर दुसऱ्यांना दुःख देणे पापकर्म आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे इतरांना आपल्या वागण्याने, बोलण्याने, कृतीने दुःख होणार नसेल तेच पुण्य आहे. दररोज देवळात जावून देवाला नमस्कार करणे, एवढ्यानेच पुण्य प्राप्त नाही. घरात आई-वडील, भाऊ-बहीण शाळेत मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत प्रेमाने वागणे, चांगले बोलणे इत्यादी क्रियांमधून आपणाला पुण्य मिळविता येऊ शकते. प्राणीमात्रावर दया दाखविणे, लुळे,  पांगळे, आंधळे, असहाय्य लोकांना मदत करणे यातून सुद्धा पुण्य मिळविता येऊ शकेल. संत तुकाराम महाराज म्हणतात की,  परपीडा परनिंदा हे खरे पाप तयाचे । पुण्य ते जाणा रे भाईनो परउपकाराचे ।।  इतरांना दुःख देणे किंवा निंदा करणे हेच खरे पाप आहे आणि इतरांवर उपकार करणे हेच खरे पुण्य आहे. आपल्या मनात सदोदित पुण्याचा विचार येण्यासाठी ज्ञानाचा वापर करावा कारण ज्ञानाच्या प्रकाशाने पापरूपी अंधकार नाहीसा होतो असे प्रख्यात कवी कालिदास यांनी म्हटले आहे. त्यामुळे खूप ज्ञान मिळवा आणि आपले घर कुटुंब समाज गाव राज्य आणि देशाला विकासाकडे न्या, हेच खरे पुण्य आहे

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

बालपणीचे संस्कार भाग 15

हम सब एक है

भारतातील कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू आदी सदस्य एकत्र नांदण्याची पद्धत आहे. एकत्रित कुटुंब पद्धत हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. परंतु ही पद्धत गेल्या काही वर्षांपासून इतिहास जमा झाली असून हम दो हमारे दो अशी  विभक्त कुटुंबपद्धत अस्तित्वात आली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका लहान मुलांना बसत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा यांचेकडून श्लोक, स्तोत्र, गोष्टी सांगणे विविध बौद्धिक खेळ आधी क्रिया सहज घडतात. सर्वांसोबत राहताना समानतेची जाणीव सहज निर्माण होते. इतरांना सहकार्य करण्याचे व प्रेम, माया करण्याची भावना मनात तयार होण्यास मदत मिळते. त्याचसोबत एकटा जीव सदाशिव ही भावना मनात राहत नाही. भरपूर पैसा कमावण्याच्या नादात आई-वडील दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडल्यानंतर मुलांची काळजी किंवा चिंता करण्याची गरज राहत नाही. परंतु आजच्या काळातील राजा-राणीला एकत्र कुटुंबपद्धती पेक्षा विभक्त राहणे हेच जास्त आवडत आहे. आपल्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून ते विभक्त राहताना दिसत आहेत. मात्र यामुळे पती-पत्नी यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्याचे परिवर्तन फार मोठ्या परिणामात होत आहे. तेच जर एकत्रित कुटुंबात राहत असतील तर त्यांची वाद फार कमी प्रमाणात होतात आणि यदाकदाचित वाद झालेच तर वडील मंडळी मध्यस्थी करून ते वाद मिटवितात. त्यामुळे पुढील अनर्थ टळतो. दोघेही नोकरी करून भरपूर पैसा कमवितात. त्यामुळे ते आपल्या मुलांना हवी ती आणि मागेल ती वस्तू विकत घेऊन देऊ शकतात. त्यामुळे आपण मुलांना खुष ठेवू शकतो असा भ्रम होतो. कारण दिवसभर एकटे राहिल्याने मुले एकांगी विचार करणारे एकलकोंडी होतात आणि मागेल ती वस्तू मिळत गेल्याने त्याचा स्वभाव हट्टी बनत जातो. जे की भविष्यासाठी धोकादायक आहे. नोकरीच्या निमित्ताने दूर गावी वास्तव्य करून राहणाऱ्या जोडप्यांनी आपल्या मुलांना आजी-आजोबांचे स्नेह, प्रेम व माया मिळवून देण्यासाठी काही सणानिमित्त खासकरून सुट्टी काढावे व चार दिवस त्यांच्यासोबत घालविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धतीत राहून सुद्धा आपणाला एकत्रित कुटुंब पद्धतीचा आनंद मिळविता येऊ शकतो. त्यास्तव हम दो हमारे दो ही विचारधारा बाजूला ठेवून हम सब एक है लक्षात ठेवावे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

अति क्रोध करू नये

अति क्रोध करू नये

मुलांनो, आज आपण ज्याविषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. एखादी मागितलेली वस्तू तुम्हाला जर पटकन मिळाली नाही तर लगेच तुम्हाला राग येतो. हवी असलेली वस्तू मिळविण्यासाठी कधीकधी रुसून बसता, तर कधी मौनव्रत धारण करून आई बाबांना भंडावून सोडता. काही मुले तर याहीपुढे जाऊन घरातील वस्तूची आदळआपट करून आपला राग व्यक्त करतात. क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे असे दयानंद सरस्वती म्हणतात. त्यामुळे आपण क्रोधावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आपणाला लहानसहान गोष्टीवरून सुद्धा राग निर्माण होतो. जसे की टीव्हीवर कार्टूनचा वा इतर तुमच्या आवडीचा चांगला कार्यक्रम चालू असेल आणि आई-बाबा किंवा ताई दादांनी टिव्ही बंद केला की लगेच तुम्हाला राग येतो. खेळ रंगात येत असताना तुमचा खेळ बंद करून अभ्यासाचा तगादा लावला की राग येतो. कारण हे सर्व तुमच्या मनाविरुद्ध  होते, म्हणूनच तुम्हाला राग येतो. त्याच प्रकारे आई-बाबांनी सांगितलेली बाब जर तुम्ही पूर्ण केली नाही तर त्यांनासुद्धा राग येतो की नाही ! गुरुजींनी सांगितलेला अभ्यास वा स्वाध्याय पूर्ण केला नाही तर त्यांनासुद्धा राग येतोच ना ! तुमच्यासारखेच आई बाबा व गुरुजी यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास त्यांनाही राग येतच असतो. त्यासाठी त्यांनी आपल्यावर रागावू नये आणि आपण त्यांच्याविरुद्ध राग निर्माण करून घेऊ नये असे जर वागलो तर जरूर याचा एकदा विचार केल्यास एकमेकांबद्दल राग ऐवजी प्रेम, लोभ, माया, ममता निर्माण होईल. त्याच्याऐवजी आपण आपली मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे त्यांना सांगावे. असे जर केले नाही तर मनात अजून अधिक राग निर्माण होतो असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे. कधीकधी आपला क्रोध एवढ्या टोकाला जातो की त्यापासून काही नुकसान सुद्धा होते जॉन वेबस्टर म्हणतात की निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाला पशु बनविते, विकृत करते. त्यामुळे आपल्या मनात राग निर्माण करायचा नाही, असा ठाम निर्णय करावा. समर्थ रामदास स्वामी यांचे श्लोक नेहमी स्मरणात ठेवावेत. ते श्लोक म्हणजे ' अति क्रोध करू नये । जिवलगास खेदू नये । मनी वीट मानू नये। सिकवणेचा ।। रागाने कधीही कुणाचे भले झाले नाही

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769