नागोराव सा. येवतीकर

Saturday, 31 March 2018

अति क्रोध करू नये

अति क्रोध करू नये

मुलांनो, आज आपण ज्याविषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. एखादी मागितलेली वस्तू तुम्हाला जर पटकन मिळाली नाही तर लगेच तुम्हाला राग येतो. हवी असलेली वस्तू मिळविण्यासाठी कधीकधी रुसून बसता, तर कधी मौनव्रत धारण करून आई बाबांना भंडावून सोडता. काही मुले तर याहीपुढे जाऊन घरातील वस्तूची आदळआपट करून आपला राग व्यक्त करतात. क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे असे दयानंद सरस्वती म्हणतात. त्यामुळे आपण क्रोधावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आपणाला लहानसहान गोष्टीवरून सुद्धा राग निर्माण होतो. जसे की टीव्हीवर कार्टूनचा वा इतर तुमच्या आवडीचा चांगला कार्यक्रम चालू असेल आणि आई-बाबा किंवा ताई दादांनी टिव्ही बंद केला की लगेच तुम्हाला राग येतो. खेळ रंगात येत असताना तुमचा खेळ बंद करून अभ्यासाचा तगादा लावला की राग येतो. कारण हे सर्व तुमच्या मनाविरुद्ध  होते, म्हणूनच तुम्हाला राग येतो. त्याच प्रकारे आई-बाबांनी सांगितलेली बाब जर तुम्ही पूर्ण केली नाही तर त्यांनासुद्धा राग येतो की नाही ! गुरुजींनी सांगितलेला अभ्यास वा स्वाध्याय पूर्ण केला नाही तर त्यांनासुद्धा राग येतोच ना ! तुमच्यासारखेच आई बाबा व गुरुजी यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास त्यांनाही राग येतच असतो. त्यासाठी त्यांनी आपल्यावर रागावू नये आणि आपण त्यांच्याविरुद्ध राग निर्माण करून घेऊ नये असे जर वागलो तर जरूर याचा एकदा विचार केल्यास एकमेकांबद्दल राग ऐवजी प्रेम, लोभ, माया, ममता निर्माण होईल. त्याच्याऐवजी आपण आपली मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे त्यांना सांगावे. असे जर केले नाही तर मनात अजून अधिक राग निर्माण होतो असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे. कधीकधी आपला क्रोध एवढ्या टोकाला जातो की त्यापासून काही नुकसान सुद्धा होते जॉन वेबस्टर म्हणतात की निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाला पशु बनविते, विकृत करते. त्यामुळे आपल्या मनात राग निर्माण करायचा नाही, असा ठाम निर्णय करावा. समर्थ रामदास स्वामी यांचे श्लोक नेहमी स्मरणात ठेवावेत. ते श्लोक म्हणजे ' अति क्रोध करू नये । जिवलगास खेदू नये । मनी वीट मानू नये। सिकवणेचा ।। रागाने कधीही कुणाचे भले झाले नाही

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

2 comments: