नागोराव सा. येवतीकर

Monday, 9 July 2018

जागतिक लोकसंख्या दिन

लोकसंख्येचा भस्मासुर आणि त्याची कारणे

भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर देशात पहिली जनगणना सन 1951 या वर्षी घेण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या 36 कोटी 10 लाख होती. 2018 या वर्षी झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्या 98 कोटी 19 लाखने वाढली असून आज भारताची लोकसंख्या 134 कोटी 29 लाख अशी आहे. दर दहा वर्षांनी करण्यात आलेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार सन 1951 ते 61 या दहा वर्षात लोकसंख्या सात कोटीने वाढली. सन 1961 ते 71 या वर्षात 9 कोटीने, सन  1971 ते 81 या वर्षात 14 कोटीने, सन 1981 ते 91 या वर्षात 16 कोटीने, सन 1991 ते 2001 या वर्षात 18 कोटीने तर सन2001 ते 2011 या वर्षात 19 कोटीने वाढून देशाची लोकसंख्या 121 कोटी झाली. दर दहा वर्षात लोकसंख्या वाढतच आहे हे वरील आकडेवारी वरुन लक्षात येते. पुढच्या दहा वर्षांनंतर जेव्हा सन 2021 यावर्षी जनगणना होईल तेव्हा भारताची लोकसंख्येत अंदाजित 21 कोटीने वाढ होऊन 142 कोटी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकसंख्येच्या बाबतीत आज जरी भारताचा दुसरा क्रमांक असेल तरी याच पटीने संख्या वाढत गेल्यास भविष्यात पहिल्या क्रमांकावर येणार ही गोष्ट नक्कीच आपल्यासाठी अभिमानास्पद नाही. कारण लोकसंख्या वाढीचा अनेक बाबीवर परिणाम होतो. त्यामानाने चीनने लोकसंख्येवर आळा घालण्यात यश मिळवलेले आहे. सन 2000 यावर्षी चीनची लोकसंख्या 126 कोटी 58 लाख होती तर सन 2010 या वर्षी फक्त 7 कोटीने लोकसंख्या वाढून 133 कोटी 97 लाख अशी झाली. देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून लोकसंख्या 11 कोटी 23 लाख आहे. त्याखालोखाल बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी लोकसंख्या 6 लाख 7 हजार असे सिक्कीम या राज्याची आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईची आजमितीची लोकसंख्या 1 कोटी 24 लाखाच्यावर गेलेली आहे. मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत तर ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्ज अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे.
वाढत असलेली लोकसंख्या ही जगासमोर तोंड वासून उभी असलेली सर्वात मोठी समस्या आहे. विशेष करून भारतासारख्या विकसनशील देशासाठी तर ती प्रमुख समस्या बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनाने सर्वतोपरी उपाय करून बघितले परंतु सर्व व्यर्थ ठरले. एका दृष्टीने मनुष्यबळाची संख्या वाढू लागली परंतु ती तेवढीच चिंताजनक सुद्धा होऊ लागली. अखेर शासनाच्या असंख्य प्रयत्नाला यश न मिळण्यामागे काय कारणे असू शकतात ? याचा शोध घेऊन त्यावर कठोर उपाययोजना करणे काळाची गरज बनत चालली आहे.
*अज्ञान व अंधश्रद्धा - आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन पासष्ट वर्षाचा कालावधी उलटला असला तरी देशात अज्ञानी व अडाणी लोकांची संख्या काही कमी झाली नाही. भारत स्वातंत्र्य होतांना देशासमोर ही एक प्रमुख समस्या होती. शिक्षणाच्या अभावामुळे व्यक्तीची कशी दयनीय अवस्था होते हे महात्मा फुले यांनी आपल्या काव्यात म्हटले आहे, 

" विद्येविना मती गेली, 
मतिविना नीती गेली
नीतीविना गती गेली, 
गतीविना वित्त गेले, 
वित्तविना शुद्र ही खचले, 
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. 

शिक्षणाने माणसाचा नुसता विकास होत नसून त्यांचे जीवन सुंदर आणि नंदनवन होते. नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घ्यायचे नसते तर जीवन कसे जगावे ? याचे ज्ञान शिक्षणातून मिळते याची जाणीव लोकांमध्ये अजूनही झाल्याचे दिसून येत नाही. ज्ञानासोबत लोकांमध्ये अंधश्रद्धेची ही जोड सोबत असल्यामुळे आपणाला किती अपत्ये असावीत ? याचे भान त्यांना राहत नाही. मुले म्हणजे देवाघरची फुले आहेत म्हणत एका एका घरात पाच ते सात फुलांची उगवण करण्यासही अज्ञानी जनता मागेपुढे पाहत नाहीत. जास्त अपत्यामुळे आपल्या कुटुंबाची काय वाताहत होते ? याची जरासी ही कल्पना करीत नाहीत. आपल्या एकट्याच्या अशा वागण्याने काय फरक पडेल ?अशी विचारधारा करणारी मंडळी आपल्या गावासह राज्याची व देशाची हानी करतात याची कल्पनासुद्धा करीत नाहीत.
*बालविवाह - मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न लावण्यात येऊ नये म्हणून शासनाने बालविवाह प्रतिबंध कायदा निर्माण केलेला आहे. तरी सुद्धा या कायद्याची पायमल्ली करीत ग्रामीण भागातून आजही सर्रासपणे बालविवाह केले जातात. बालविवाह आणि लोकसंख्या वाढ यांचा संबंध येत नाही असे प्रथमदर्शनी वाटते ते सत्य ही असेल, मात्र मुलींचे 18 वर्षांनंतर लग्न लावल्यास त्यानंतर एक-दोन वर्षांनी तिला मूल होईल परंतु बालविवाह केल्यामुळे मुलगी अठरा वर्षाच्या आत आई बनते. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच लोकसंख्या वाढू लागते. तेव्हा बालविवाह हे मुलीच्या शारीरिक दृष्टीने घातक आहेच शिवाय देशासाठी सुद्धा घातक आहे. याबाबत जनप्रबोधन करून बालविवाहास आळा घालणे आवश्यक आहे.
*वैद्यकीय सेवा - भारताने वैद्यकीय क्षेत्रात एवढी मोठी प्रगती साधली आहे की येथील वैद्यकीय तज्ञ मंडळी गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मृत्यूच्या जबड्यातून सोडवून आणत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आहे. मात्र यामुळे मृत्यूचा दर कमी झाला आणि जन्मदर वाढीस लागला. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ज्या वेळी वैद्यकीय सेवा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा एखादा साथीचा रोग पसरला की त्यात शेकडो लोक मृत्यू पावत असत. त्यामुळे त्या वर्षातील लोकसंख्येची तेवढी वाढ दिसून येत नाही. वीस वर्षापासून वैद्यकीय सेवेत संशोधन खूप झाल्यामुळे स्वाईन फ्लूसारख्या साथीच्या आजाराला वैद्यकीय मंडळी अटकाव करण्यात यश मिळवत आहेत. त्याच कारणास्तव लोकसंख्येचा विस्फोट होत आहे त्यामुळे जन्म व मृत्यू यांचा जो प्रमाण असायला पाहिजे तो न राहता व्यस्त बनत चालले आहे. लोकसंख्या वाढीमागे वैद्यकीय सेवा हे एक प्रमुख कारण बनले आहे.
*मुलगाच हवा - वंशाचा दिवा म्हणजे मुलगा असा समज आजही समाजात घट्ट रुतून आहे. मुलगा मुलगी एकसमान असा कितीही नारा दिला तरी तशी वागणूक त्यांना मिळत नाही. परंपरागत चालत आलेली प्रथा जोवर देशात रुढ राहील तोपर्यंत मुलगाच हवा या हट्टापायी ते तीन ते चार अपत्यांना जन्म देतच राहतील. दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालकांसाठी शासनाने ही योजना काढली असली तरी त्याला समाजातून उदंड प्रतिसाद मिळतोय असे दृश्य आज तरी बघायला मिळत नाही. मुलगी म्हणजे पराया धन ही संकल्पना जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत शासनाच्या कोणत्याच योजनेला प्रतिसाद मिळणार नाही. मुलांविषयी असलेल्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
*लैंगिक शिक्षणाचा अभाव - पाश्चिमात्य देशात पुरुष व स्त्री यांच्यात अजिबात आकर्षण दिसून येत नाही त्यामागे नेमके कारण म्हणजे तेथील लोकांना लैंगिक शिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना लैंगिक विषयी बरीच गोष्टीची माहिती दिली जाते जे की नवदांपत्यांना किंवा वयात येणाऱ्या मुलामुलींना आवश्यक आहे. आपल्या देशात मात्र लैंगिक शिक्षणाला विरोध होतो कारण आपण लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त सेक्स या शब्दापुरताच मर्यादित विचार करतो. त्यापलीकडील विचार करण्याची शक्ती आपल्यात नसते किंवा ते करत नाही. करण पुरुष आणि स्त्री फक्त एकाच कारणासाठी एकत्र येतात याच विचारात गुरफटून जातात. यांच्याच आकर्षणामुळे देशात अल्पवयीन मुलींचे अपहरण, महिलेचा विनयभंग, बलात्कार आणि खून असे प्रकार वारंवार घडताना दिसून येत आहेत. वास्तविक पाहता लैंगिक शिक्षणातुन विवाहपूर्वी आणि विवाहानंतर कसे वागले आणि राहिले पाहिजे याचे ज्ञान दिले जाते. पुरुष आणि स्त्री हे दोन भिन्नलिंगी जरी असले तरी दोघांच्या भावना, वेदना, सुख आणि दुःख एकसारखेच असते याची जाणीव या शिक्षणातून देण्यात आले तर या शिक्षणाला विरोध का ? आजपर्यंत आपण यास विरोध करीत आल्यामुळे देशातील तरुण मंडळी याविषयी अनभिज्ञ आहेत. त्याविषयी युवकात आकर्षण नैसर्गिकपणे असल्यामुळे चोरट्या मार्गाने माहिती गोळा करू पाहतात आणि नको त्या संकटात सापडतात. यातूनच खेळ सुरू होतो मग गर्भपाताचा आणि भ्रूणहत्येचा.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे अनेक गोष्टीवर त्याचे प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. देशात प्रामुख्याने अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे. देशात खाणार्‍याची तोंडी वाढू लागली मात्र त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत नसल्यामुळे देशातील एक तृतीयांश लोकांना एक वेळच्या जेवणावर दिवस काढावा लागत आहे. लोकांना राहण्यासाठी निवाऱ्याची गरज भासू लागली तसे घरे बांधण्यासाठी जंगलतोड होऊन जंगलाचे प्रमाण कमी होऊ लागले. त्याचा पर्यावरणावर परिणाम होऊन त्याचे संतुलन बिघडत चालले आहे. निसर्गातील तीन ऋतू पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा यांच्यात संतुलन बिघडल्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले आहे. पूर्वीपेक्षा आता उद्योगधंदे व कारखाने वाढले त्यामुळे रोजगाराचाही वाढ झाली मात्र लोकसंख्या भरमसाठ वाढल्यामुळे सगळ्यांच्या हाताला काम मिळेल याची खात्री नाही. त्यास्तव बेरोजगार लोकांची संख्या कोटीच्या घरात मोजावी लागत आहे. बेरोजगाराचे पाय वाईट कामाकडे वळत चालल्यामुळे तेही देशासाठी घातकच ठरणार. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा चालू आहे. रस्त्यावरून चालणारा व्यतीसुद्धा जीव मुठीत घेऊन चालत आहे एवढी अफाट लोकसंख्या वाढलेली आहे. भविष्याचा विचार करता लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आजच्या युवक वर्गाने सकारात्मक विचारधारा स्वीकारून आपल्या जीवनशैलीत सुधारणा करायला पाहिजे. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment