नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 11 July 2018

छडी लागे ( ना ) छम छम

छडी लागे ( ना ) छम छम

शाळेमध्ये दहशतीचे वातावरण असल्यास मुलांमध्ये शाळा, शिक्षक आणि शिक्षण याविषयी कमालीचा तिरस्कार निर्माण होतो. शिकणे ही आनंददायी प्रक्रिया होण्याऐवजी ती छडीमुळे एक तिरस्करणीय प्रक्रिया होते. छडीमुळे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होत असून शिक्षणापासून ती दुरावल्या जात आहेत. कोणतेही मूल हसत-खेळत जितके चांगले शिकते तितकेच छडीच्या दहशतीखाली शिकत नाही, असे बालमानसशास्त्रज्ञांचे मत आहे. काही मुले हूड असतात. अभ्यासात, शिकण्यात त्यांचे मन रमत नाही. पण त्यासाठी शिक्षा हा सर्वोत्तम उपाय नाही. त्यासाठी शासनाने शाळेतून छडी बाद करण्याचे विधेयक पारित केले आहे.  छडीच्या बाबतीत वरील सर्व विचार या क्षेत्राशी संबंधित आहेत, परंतु बाह्य बाजूची आहेत. प्रत्यक्षात याविषयी संबंधित व्यक्ती म्हणजे शिक्षक याचा विचार येथे कोणत्याच स्तरावर करण्यात आलेला नाही. शाळेतून छडीला बाद केल्यामुळे शाळेत काय घडत आहे याचा कोणी विचार करणार आहेत का ?
छडीमुळे वर्गातील मुलांमध्ये दहशत निर्माण होते, हे काही अंशी बरोबर असेलही, मात्र छडीच बाद झाल्यामुळे वर्गात मुलांचा जो गोंधळ किंवा धुडगूसवाढीस लागतो त्याचा कुठे तरी विचार व्ह्ययला हवे. शाळेच्या संपूर्ण वेळात म्हणजे सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी व शिक्षक यांच्यात प्रेमळ संबंध राहणे अशक्य आहे. घरात बालकाने गोंधळ किंवा धुडगूस घातल्यास पालक त्यांच्यावर रागवतात, याचा अर्थ असा नव्हे की, ते पालक रागीट आहेत. पालकांना वेळप्रसंगी रागावणे व अती झाल्यावर शिक्षासुद्धा करावी लागते. असाच प्रसंग शाळेतील शिक्षक मंडळीवर आल्यास तेथे शिक्षकांनी रागावू नये, शिक्षा करू नये, म्हणजे नेमके काय करायचे ? याचे उत्तर मिळते, प्रेमाने समजून सांगावे. त्याउपरही ऐकले नाही तर काय करावे ? परत समजून सांगावे. शेवटपर्यंत याला शिक्षकांचे प्रेम समजलेच नाहीत तर काय करावे ? यावर शेवटी उत्तर मिळते. त्याकडे दुर्लक्ष करावे पण शिक्षा करू नये. याचा अर्थ असा निघतो की विद्यार्थ्यावर योग्य संस्कार टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची मुळीच नाही का ? या विधेयकामुळे आम्हाला काहीच करता येत नाही असे उत्तर शिक्षकांमधून आल्यास त्यास काय उत्तर देता येणार आहे ?
दहा एक वर्षांपूर्वी ज्यांनी शाळेतून अंक व अक्षर गिरवण्यास प्रारंभ केला, एखादी बाब वारंवार सांगूनही मुलात अपेक्षित वर्तन दिसले नाही, तर शिक्षक शेवटचा पर्याय म्हणून छडीचा वापर करत. शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी जन्माजन्माचे वैर नाही, दुश्मनी नाही, मग ते विनाकरण मुलांना शिक्षा का करतील ? शाळेची किंवा शिक्षकांचे काही नियम असतील, त्यांचे पालन विद्यार्थ्यांनी करावे अशी अपेक्षा असते. त्या नियमाचा विद्यार्थ्याकडून भंग झाल्यास, तोही वारंवार असेच होत असल्यास काय करावे ? त्यास जर नियमांची ओळख दिली नाही आणि नियमभंग केल्यास शिक्षा दिली नाही तर भावी जीवनात तो एक उत्तम नागरिक म्हणून कसा जगू शकेल ? कारण नागरिक म्हणून जगताना समाजाने किंवा शासनाने जे नियम तयार केले त्यानुसार त्यांना वागावे लागते. अन्यथा आपणास शिक्षा होऊ शकते याचा अनुभव शाळेतूनच दिल्या जातो. वेळेवर शाळेत येणे, ठरवलेल्या दिवशी गणवेश परिधान करणे, रांगेत उभे राहणे, शिक्षकांशी आदराने बोलणे, शाळेतल्या मित्रांशी मैत्रीपूर्वक संबंध ठेवणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ न देणे, अध्यापनाकडे लक्ष देणे, दिलेला अभ्यास पूर्ण करणे, स्वाध्याय किंवा गृहपाठ पूर्ण करणे इत्यादी जी साधी नियमावली आहे. ही सर्वसाधारण सगळ्यात शाळातून आढळून येते. वरील नियमावलीत विद्यार्थ्यांनी एक दोन वेळेस चुका केल्यास शिक्षक प्रेमाने सांगेन, परंतु वारंवार त्याच चुका घडत असतील आणि शिक्षक ज्यांना काहीच शिक्षा करणार नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच संदेश जाऊ शकतो. मुलांच्या मनामध्ये शिक्षकाविषयी एक वेगळीच प्रतिमा तयार होते. अमुक सर आम्हाला काहीच करत नाहीत. ते सर आम्हाला फक्त बोलतात, समजावतात,  परंतु मारत नाहीत. अशामुळे विद्यार्थी शाळेत न घाबरता येईल असा जो शासनाचा कयास आहे तो शत-प्रतिशत खरे असेलही मात्र वर्तनातील अपेक्षित बदल जे व्हायला पाहिजे ते दिसून येत नसल्यास काय करावे ?
शहरात असंख्य माणसे असतात. आपण सर्वांच्या जवळून जातो आणि येतो. परंतु पोलिसाच्या गणवेशातील खाकी वर्दीचा एखादा व्यक्ती समोरुन येत असेल तर आपण त्याच्यापासून दूर राहूनच चालतो. आपण चोरी केली नाही किंवा कोणाला विनाकारण मारले देखील नाही, कोणताच गुन्हा केलेला नाही, मग आपण त्या व्यक्तीला का घाबरतो ? कारण समाजात पोलीस प्रशासनाविषयी जी आदरयुक्त भीती आहे ती या शिक्षेमुळे ! आज पोलिसांना सांगितले गेले की गुन्हेगारांना न पकडता त्यांना प्रेमाने समज द्या व सोडून द्या असे जर झाले तर देशात समाजात किती अराजकता माजेल ? पोलिस शहरातील सर्वांनाच शिक्षा करतात का ? मुळीच नाही. जर असे केलोत तर त्यांच्या नियमावलीत ढवळाढवळ करून त्यांचे महत्त्व कमी केल्यासारखी होत नाही का ? पोलीस प्रशासनासारखेच शाळेचे प्रशासन आहे, असा समज जर थोड्या वेळासाठी ठेवला तर कळून येईल की शाळेत सर्वांनाच छडी मिळत नाही. जे नियमांचे पालन करीत नाहीत त्यांनाच छडीचा प्रसाद मिळतो. आपणाला छडी मिळू नये म्हणून विद्यार्थी नियमानुसार वागतो व राहतो, परंतु तीच छडी बाद झाल्यामुळे विद्यार्थी हसत-खेळत शाळेत येतीलही मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संस्कार टाकणे शिक्षकांना अवघड जाईल, यात शंका नाही. शाळेतील मुले सर्कशीच्या रिंगणातील जनावरे नाहीत मात्र लहानपणी लागलेली शिस्तीची सवय मोठेपणी खूप कामाला येऊ शकते.
लहान मुले संवेदनाक्षम असतात. या वयात त्यांना नीतिनियम अंगवळणी टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या काळातील पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी अत्यंत जागरूक आहेत. मुलांमधील अतिप्रेमामुळे त्याच्याकडे अति लक्ष देऊन त्यांचे लाड केल्या जात असल्यामुळे आजची मुले फारच नाजूक आणि हळवी झाली आहेत. पूर्वीच्या काळी पालक शिक्षकांना त्यांच्या पाल्यास शिक्षा करण्याची परवानगी देत असत. आज ही काही पालक तशी परवानगी देतात.  ज्यामुळे त्यांच्या हातावर ही छडी छम छम करी त्यांना विद्या सुद्धा घमघम येत असे या अनुभवावरूनच ही कविता लिहिल्या गेली असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. परंतु आजच्या पालकांना व शासनालाही छडी त्रासदायक वाटत आहे. याविषयी शासनाने सार्वमत घ्यावयाचे ठरविल्यास शंभरातून फार कमी म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे शिक्षक छडीच्या विरोधात मध्ये टाकतील. मानसशास्त्रज्ञाने मांडलेले विचार सत्य आहेत याबाबत वाद नाही, मात्र छडीचे महत्त्व काय आहे आणि त्यामुळे काय होऊ शकते किंवा काय होत नाही हे शिक्षकाव्यतिरिक्त तर कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे निदान एकदा शिक्षक बनून या विषयाकडे कटाक्ष टाकावे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे म्हणीनुसार हे महत्त्व आपणास लक्षात येईल. कडक शिक्षा नाही तर सौम्य शिक्षेची परवानगी दिल्यास मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊ शकते अन्यथा भावी पिढी लाढावून ठेवलेली पिढी निघेल. ज्यांच्या मनात कोणाविषयी देखील भीती राहणार नाही. ते निर्धास्त होतील. आजपर्यंतचा निरीक्षणातुन असे दिसून येते की, सुरुवातीचे काही दिवस सोडले तर मुलांना शाळेची कधी ही भीती वाटत नाही. त्यास छडीसोबत अन्य अनेक कारणे आहेत. मात्र छडीलाच कात्रीत धरण्यात येत आहे. मुलांना प्रेमाने शिक्षण द्यावे यात नक्कीच मुलांची प्रगती आहे. परंतु त्याचसोबत सौम्य शिक्षा देण्याचा अधिकार शिक्षकांना दिल्यास अजून चांगले परिणाम पाहायला मिळतील असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

2 comments: