नागोराव सा. येवतीकर

Friday, 16 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 24

जीवन जगण्याचा खरा आनंद

ध्येयाविना जीवन जगण्याचा अर्थ फक्त जिवंत राहणे असा होतो. अशा प्रकारच्या जिवंतपणाचा स्वतःला तर फायदा होतच नाही शिवाय कुटुंब, समाज, देश यांना सुद्धा फायदा होत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी ध्येय नक्कीच ठरवावे. मग त्याच्या प्राप्तीसाठी कितीही त्रास सोसावा लागला तरी त्यास सर्व संकटांना तोंड देत जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. शिक्षणाने मानवी जीवनाचा उत्तम प्रकारे विकास होतो. त्यासाठी प्रत्येकाने उच्चशिक्षण मिळविण्याचे ध्येय जीवनात ठेवल्यास त्यांच्यासोबत देशाचाही विकास होतो. आज आपल्या देशातील शिक्षण प्रणाली ही फक्त नोकरी पुरती मर्यादित आहे. शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की मला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. परंतु ते शक्य नाही. कारण सर्वांनाच नोकरी मिळणे कठीण आहे नोकरीसाठी शिक्षणाचे ध्येय ठेवणे चुकीचे आहे. ज्यांना नोकरी मिळते ते मात्र आता मला अभ्यास करून काय करायचे आहे म्हणत अभ्यासाचा नाद सोडतात. त्यामुळे नोकरदार वर्गाचे जीवन चाकोरीबद्ध बनत चाललेले आहे. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो ही बाब ज्यांना समजली ते जीवनाच्या त्यांच्या खर्‍या ध्येयाकडे वाटचाल करतात. भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांना संपूर्ण देश मिसाईलमॅन म्हणून ओळखते ते डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान असतानाही त्यांचा जास्तीत जास्त वेळ वाचनात जात असे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करणारे अनेक लोक आपला वेळ अभ्यासात घालवतात. अशा लोकांनाच जीवनात खरा आनंद मिळतो. कारण अभ्यासामुळे त्यांना दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज किमान दोन नाही तर नाही निदान एक तास तरी आपल्या आवडीच्या विषयावर अभ्यास करीत राहिल्यास जीवनाचा खरा आनंद उपभोगता येईल.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment