नागोराव सा. येवतीकर

Friday, 16 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 22

मजबूत मन म्हणजेच यश

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असा एक सुविचार प्रसिद्ध आहे. मात्र हा सुविचार त्यांनाच लागू पडतो जे अपयश मिळाल्यानंतर सुद्धा खचून न जाता धाडसाने येणाऱ्या संकटांचा सामना करतात. एखादी नर्तिका आपले पाय अपघातात गमाविल्यानंतर सुद्धा कृत्रिम पायाने पुन्हा नाचू शकते. जसे की सुधा चंद्रन. कर्करोगासारखा आजार झाल्यानंतर तर आपण संपलोच अशी भावना बळावते. तरीही अशा दुर्धर आजाराला तोंड देत त्यावर मात करून खेळाडू मैदानावर हजर होतो तेव्हा संपूर्ण जग त्याची वाहवा करते. जसे की भारतीय क्रिकेट संघातला तडाखेबंद युवा खेळाडू युवराज सिंग. सिनेसृष्टीत पदार्पण केल्याबरोबर कोणत्याच अभिनेत्याला यश मिळत नाही सुरूवातीचे दोन-तीन चित्रपट सपेशल आपटतात. त्या कठीण समयी त्यांच्यासाठी कसोटीचा क्षण असतो. त्यानंतरच्या एका चित्रपटाने ते रात्रीतून सुपरस्टार होतात. उंचपुरा असलेल्या अमिताभ बच्चनला सिनेसृष्टीत सुरुवातीला अनेक प्रकारचे अपयश पचवावे लागले परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. अपयशाने खचून गेले नाहीत. म्हणूनच आज ते भारतीय चित्रपटसृष्टीचे अजूनही सुपरस्टार आहे. जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी अपयशातून यश मिळवून जीवनात सर्वस्व मिळविले आहे. कारण ते सर्वच मजबूत मनाचे होते. जीवनात येणार्‍या संकटाचा धैर्याने व धाडसाने सामना करण्याची ताकद मजबूत मनच देते. टीकाकारांनी कितीही टीका केली तरी ही त्यांचे मनोधैर्य ते बदलू शकत नाही. अपयशाबाबत ते कुणाकडे तक्रार करीत नाहीत वा रडत बसत नाही. हिमतीने त्यातून मार्ग करतात. प्रत्येक घटनेचा सकारात्मक बाजूने विचार करतो तो जीवनात नक्की यश मिळवितो. कोणत्याही गोष्टीत न न चा पाढा वाचणारे लोक नेहमीच अपयशाच्या दलदलीत रूतलेले असतात. त्यांचा त्यांच्यावरच विश्वास नसतो. कारण त्यांचे मन मजबूत नसून कमजोर असते. कमजोर मनाची माणसे आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर मारून मोकळे होतात. अपयश पचविण्याची ताकद त्यांच्या अंगात नसते. संकटाच्या वेळी धाडस न दाखविता भित्र्या भागुबाईसारखे ते पळ काढतात. आपल्या सहकार्यांचे हे गुण ओळखूनच सूर्याजी मालुसरे यांनी लढाईत गडावरील दोर कापून काढले होते आणि म्हणाली होते एक तर लढा नाही तर मरा.
सकारात्मक विचार करणारा कधीच भित्रा बनू शकत नाही आणि त्याचे मनसुद्धा कमजोर राहत नाही. देशात अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने मातीमोल केला आणि राजकारणी लोकांनी आचारसंहितेमुळे परत एकदा शेतकऱ्यांना नागविले. अशा विषम परिस्थितीत राज्यात अनेक शेतकऱ्यांनी विष पिऊन किंवा इतर मार्गाने आत्महत्या केल्या आहेत. त्यांचे मन फारच कमजोर होते. संकटाचा सामना करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. पुढे काय होईल या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडले होते. म्हणून आत्महत्या करणे हा काही पर्याय होऊ शकतो काय उलट त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबाची अजून वाताहत होते याचे एकदातरी आत्मपरीक्षण त्यांनी का करू नये. सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. त्यासाठी एक ना एक दिवस आपले भाग्य उजळेल, आपले दुःख, दारिद्र्य संपेल या आशेवर जो कष्ट करीत जीवन जगतो तो मजबूत मनाचा असतो. आजचा दिवस उद्या राहत नाही. यासाठी प्रत्येकाने धीरूभाई अंबानी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. त्यांची भावी जीवनाची आशा ठेवून स्वप्ने पाहिली नसतील तर आज अंबानी दिसले नसते.
आपली आशा स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा ही आपल्या जीवनाची त्रिसूत्री असावी. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी सागर किनारी उडणा-या पक्षांना पाहून मी सुद्धा एके दिवशी असेच हवेत उडेन अशी आशा ठेवली, स्वप्न पाहिले आणि खरोखरच त्यांनी एके दिवशी उडान घेतली सुद्धा. त्यांच्या स्वप्नाने महत्वकांक्षी योजनेने आणि मजबूत मनामुळे ते भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकले. त्यांची आत्मकथा अग्निपंख पुस्तक वाचल्यानंतर कळते. त्यास्तव प्रत्येकाने आपले मन कमजोर न ठेवता मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे. करण मजबूत मनाचेच लोक उच्च विचारशक्ती व आत्मविश्वास ठेवून काम करतात आणि यशस्वी होतात. म्हणूनच मजबूत मन हाच आपल्या सुखी, समृद्धी व यशस्वी जीवनाचा मंत्र आहे

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment