नागोराव सा. येवतीकर

Friday, 23 February 2018

कॉपी : एक कलंक

कॉपी म्हणजे एक कलंक

कॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे, तो सुद्धा एक गुन्हाच आहे. शालेय विद्यार्थ्यांचे कामच असते अभ्यास करणे. तेच काम जर तो यशस्वीपणे पूर्ण केला नाही तर भविष्यात त्याला त्याचे फळ भोगावेच लागतात. गेलेली वेळ कधीच पुन्हा परत मिळत नाही म्हणून वेळेचा सदुपयोग जो करतो तो जीवनात कधीच अयशस्वी होत नाही आणि त्याला कॉप्या करण्याची देखील गरज भासत नाही. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करत बसण्यात काही अर्थ नाही. आपल्यासोबत शिकलेले मित्र जेव्हा अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून आपल्यासमोर येतात, त्यावेळी आपल्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात की, मी त्यावेळी शिक्षकांच्या बोलण्याकडे किंवा शिकवण्याकडे लक्ष दिलं नाही अन्यथा मी सुद्धा काहीतरी बनलो असतो. शिक्षकांच्या शिकवण्याकडे किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देणारे, वर्गात अनुपस्थित असणारे आणि शिक्षकाने दिलेले कार्य पूर्ण न करणारे विद्यार्थी या कॉप्याला बळी पडतात. कॉप्या करून एकवेळ या पुस्तकी अभ्यासक्रमातून बाहेर पडाल पण आयुष्याच्या परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हाल ? एखादा विद्यार्थी कॉप्या करून जर डॉक्टर झाला तर एखादा रुग्ण दगावले, एखादा विद्यार्थी कॉप्या करून जर इंजिनियर बनला तर धरण कोसळून शे दोनशे लोक मरतील पण एखादा विद्यार्थी जर कॉप्या करून शिक्षक झाला तर त्याच्या हाताखालच्या किती पिढ्या बरबाद होतात ? याचा कधी विचार केला आहे काय ? परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, कॉप्या करून शिक्षण क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस भरमसाठ वाढत आहे. पैशांच्या बळावर जो तो शिक्षक बनत आहे, हे पुढील भविष्यासाठी नक्कीच चांगली बाब नाही.
दहावी व बारावीच्या परीक्षेत फार मोठ्या प्रमाणावर कॉप्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. कारण हे दोन वर्ग आयुष्यातील महत्त्वाचे वळण देणारे वर्ग असतात. पण जास्तीत जास्त मार्क मिळवायचे म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालक देखील गैरमार्गाचा अवलंब करतात. नुकतेच बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाले आणि पहिल्याच दिवशी 12वीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. याला काय म्हणावे ? लोकांची नीतिमत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या कॉप्यावर बंदी यावी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा संपन्न व्हावेत म्हणून नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी सन 2010 मध्ये नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेचे आयोजन केले. त्यामुळे त्यावर्षी जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला. पण परीक्षेला लागलेली कीड बाजूला करता आले हे महत्त्वाचे आहे. यामुळे नकलावर अवलंबून न राहता मुले अभ्यास करू लागली. एक परिणाम असा झाला की जो निकाल लागत होता तो पूर्ण सत्य होता. त्यात फुगीरपणा नव्हता. त्याचबरोबर परीक्षेच्या काळात होणारा पूर्ण सावळागोंधळ बंद झाला होता. या परीक्षावर अनेक जणांची पोटे अवलंबून होते, झेरॉक्सवाले, नकला लिहिणारे, पुरवठा करणारे, शाळेत असलेली शिपाई, शिक्षक, संरक्षणासाठी असलेले पोलीस, हॉकर्स, एवढेच काय हॉलमध्ये पाणी देणारे वाटर बॉय यांची देखील चलती राहत होती. या काळात शहरातील सर्व धाबे, बियरबार आणि परमिट रूम हाऊस फुल्ल राहत असे. पण हे सारे बंद झाले या कॉपीमुक्त अभियानामुळे. कॉप्या करून भरपूर गुण घेतलेला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या यादीत सर्वात खाली असायचा. प्रत्येक ठिकाणी कॉपी कामाला येत नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी कॉफी करणे हा योग्य मार्ग नाही ते एक प्रकारचे बांडगूळ आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने याविषयी गंभीरतेने विचार करून एक वेळा नापास झाले तरी चालेल पण कॉपी करणार नाही असे ठरविणे आवश्यक आहे. कॉप्यामुळे अभ्यास केलेल्या मुलांचे खूप नुकसान होते. अपार मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास केलेल्या मुलांना कमी गुण मिळतात आणि कॉप्या केलेल्या मुलं जास्त गुण मिळतात. अभ्यास करणारा देखील पुढे अभ्यास करीत नाही. पर्यवेक्षक मंडळीनी देखील जरासा कडकपणाची  भूमिका घेतली तर या कॉपी प्रकरणाला निश्चितच आळा बसू शकेल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )

No comments:

Post a Comment