नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 13 February 2018

शिक्षकांची भरती

शिक्षकांची भरती होईल काय ?

राज्यात लवकरच 27 हजार शिक्षकांची भरती होणार असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले ही बातमी ( दि. 11 फेब्रुवारी )वाचून तमाम डी. एड. आणि बी. एड. धारक युवक जे बेरोजगार आहेत त्यांना आशेचा एक किरण दिसला असे म्हणायला काही हरकत नाही. मात्र शिक्षणमंत्र्यांनी केलेली घोषणा त्यांच्या नावाप्रमाणे नुसते विनोद होऊ नये याची काळजी देखील या युवकांमध्ये बोलताना दिसून येत होती. गेल्या सात-आठ वर्षांपासून शिक्षकांची भरतीच करण्यात आली नाही त्यामुळे डी. एड. आणि बी. एड. धारकांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली. अगदी पूर्वी मागता येईना भीक तर मास्तरकी की शिक असे म्हटले जायचे पण गेल्या वीस वर्षाच्या काळात हे चित्र पूर्ण बदलून गेले आहे. त्यानुसार सुखी जीवन जगायचे असेल तर मास्तरकी शिकायची कारण झट मंगणी पट ब्याह म्हणीप्रमाणे शिक्षण पूर्ण झाले की हमखास नोकरी मिळू लागली. त्यामुळे प्रत्येक जण या क्षेत्राकडे वळले. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्राकडे ज्यांचा क्रमांक लागला नाही असे विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी प्रवेश घेऊ लागले. ही आनंदाची आणि जमेची बाजू झाली. महिलांसाठी तर हे अभ्यासक्रम म्हणजे एक सुवर्णसंधी वाटू लागली. डी.एड. शिकलेल्या मुलींसाठी चांगले स्थळ बोलून येऊ लागले त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मुलींना येथे प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करू लागले. या सर्व बाबीचा परिणाम असा झाला की या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढीस लागली. जनता लाख -लाख रुपये खर्च करून ह्या अभ्यासक्रमास पसंती देऊ लागले. दरवर्षी एक लाख मुले हे अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडू लागले आणि त्याच काळात शासनाने भरतीवर बंदी आणली. त्यामुळे बेरोजगार युवकांची संख्या दरवर्षी लाखाने वाढत गेली. काही जणांचे नोकरीच्या प्रतीक्षेत लग्न ही झाले आणि त्यांना मुलं बाळ देखील झाले. मात्र कालच्या बातमीने त्यांच्यात अजून एकदा चैतन्य निर्माण झाले आहे. पण अजून देखील मनात शंकेची पाल चुकचुकत आहे की, खरोखरच शिक्षकांची भरती होईल काय ? कारण नुकतेच राज्यातील तेराशे शाळा सरकारने बंद केल्या तेंव्हा या शाळेतील सरासरी दोन शिक्षक याप्रमाणे अडीच हजार शिक्षक अतिरिक्त ठरतात. त्यांना कुठे तरी समायोजन करावेच लागते. त्याचसोबत दरवर्षी काही शिक्षक अतिरिक्त ठरतात तेंव्हा त्यांचे समायोजन करण्याचा प्रश्न असतोच. याउपरही राज्यात शिक्षकांची रिक्त पदेच नसतील तर भरती होणार कशी ? हा यक्ष प्रश्न पडतो. त्याचसोबत खात्या अंतर्गत पदोन्नती सुद्धा गेल्या पाच सहा वर्षात करण्यात आले नाहीत. त्यामुळे देखील पदे रिकामे होत नाहीत. खरोखरच जर शिक्षकांची भरती करायची असेल तर सर्वात पहिल्यांदा पदोन्नती कराव्यात ज्यामुळे रिक्त पदे तयार होतात. संचमान्यतेचे निकष बदलण्यात यावे. सध्याच्या निकषांनुसार पाहिले तर मुलांची संख्या आणि शिक्षक हे गुणवत्तेला मारक आहेत. वर्ग पाच आणि शिक्षक दोन असेल तर त्या शाळेची गुणवत्ता काय म्हणून पहावी. त्याऐवजी प्राथमिक शाळेत जर एकही अप्रगत विद्यार्थी राहू नये, संपूर्ण महाराष्ट्र प्रगत पहायचे असेल तर वर्गास एक शिक्षक असायलाच हवे. त्याशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. एका प्राथमिक शाळेत कमीत कमी चार शिक्षक असायलाच हवे. आज द्विशिक्षकी शाळा आहेत असे चित्र पाहायला मिळते पण वास्तव वेगळेच दिसते, तेथे एकच शिक्षक कार्य करतो. शिक्षकांच्या कमतरतेमुळे सरकारी शाळांची स्थिती खूप बिकट आहे. राज्यकर्त्यांनी जर ही बाब मनावर घेतली म्हणजे राजकीय इच्छाशक्ती जर प्रबळ झाली आणि प्रत्येक प्राथमिक शाळेला एक वाढीव शिक्षक दिल्यास राज्यातील अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल आणि राज्याची गुणवत्ता देखील वाढीस लागेल. शेताच्या प्रमाणात मजूर काम करत असतील तरच शेतातील उत्पन्न वाढू शकेल. जास्त शेती असेल त्याठिकाणी दोन मजूर दिवसभर कष्ट केल्याने सकस उत्पादन होणार नाही किंवा उत्पादनात वाढ दिसणार नाही. त्याप्रमाणात मजुरांची संख्या वाढवावी लागेल. हे गणित शेतीच्या बाबतीत जसे आपण विचारात घेतो तसे शिक्षणाच्या बाबतीत का विचार करीत नाही. एक शिक्षक चार वर्ग काय, पूर्ण शाळा सांभाळतो, यात वाद नाही पण तो अध्यापन करू शकत नाही, तर तो फक्त ढोरं राखल्यासारखा मुलांना सांभाळतो. त्यामुळे वेळीच यावर उपाययोजना करून शिक्षक संख्या वाढवून शिक्षकांची भरती करणे राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने हितकारक आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment