नागोराव सा. येवतीकर

Monday, 12 February 2018

महाशिवरात्री स्पेशल

*कलाकुसरीने सजलेले येवतीचे हेमाडपंथी मंदीर.*

प्रत्येक गावात मंदिर असतेच. त्याशिवाय गाव ही संकल्पना अपूर्णच ठरते. त्यातल्या त्यात महादेवाचे मंदिर म्हटले कि शिल्पकला अनायासपणे तेथे येतेच. आजपर्यंत अनेक जागी शिल्पकला पाहिले. अजिंठा-वेरुळची काम असो वा औढा येथील नागनाथ असो या सर्वच स्थळांसारखे शिल्पकलेतील हेमाडपंती मंदिर धर्माबाद तालुक्यातील येवती या जेमतेम हजार ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गावात पाहायला मिळते. हे महादेवाचे मंदीर या गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. फार पूर्वी गरीब घरातील लोक या मंदिरात येऊन लग्नाचा कार्यक्रम उरकून घेत असत, असे काही लोकांनी माहिती दिली. एवढेच नव्हे तर गावातील प्रत्येक धार्मिक कार्य याच मंदिरात केले जाते. भजन असो, स्वाध्याय असो वा काकडा आरती असे कार्यक्रम याच ठिकाणी होतात.
गावाच्या अगदी मध्यभागी वसलेल्या या मंदिराभोवती अनेक जातीचे लोक निवास करतात. मंदिराबाबत अनेकांमध्ये जिज्ञासा लागून राहते. या लोकांना सुद्धा माहित नाही की या मंदिराची स्थापना कोणी आणि केव्हा केली ? याबाबत लोकांना विचारपूस केली असता येथील पुजाऱ्यांनी सांगितले की, " हे मंदिर साधारणतः साडेसातशे वर्षांपूर्वीचे असून, हे बांधकाम कोणी सामान्य व्यक्तीने केलेले नसून ते राक्षसच असतील " अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मंदिराचा या बांधकामात कोठेही माती वा लाकूड सापडणार नाही तसेच मोठ्या दगडाचा वापर यात केला गेला. छत स्थिर रहावे यासाठी जेमतेम दहा-बारा फूट असलेला दगड उभा केलेला आहे. ज्यास आपण पिल्लर असे म्हणतो. त्या दगडावर चांगले कोरीव काम केलेले शिल्पकाम आहे. एखादा चित्रकार आपल्या मऊशीर कागदावर सुद्धा एवढे चांगले नक्षीकाम करू शकला नसता एवढी चांगली कला त्या दगडावर दिसून येते. या कलेबाबत बोलताना येथील चित्रकार म्हणाले की, " हे शिल्पकला म्हणजे स्वप्नात दिसते ती सत्यात उतरते" आपण स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही एवढे सुंदर शिल्पकाम केलेले आहे. 
उत्तरेमुखी दिशेला महादेवाची जेमतेम अडीच ते तीन फूट उंचीचे पिंड आहे. एवढ्या उंचीची पिंड कोठेही पाहण्यास मिळत नाही असे येथील लोक म्हणतात. दर सोमवारी या पिंडाची नित्यनियमाने पूजा केली जाते. त्याच दिवशी रात्री आठ वाजता परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय कार्यक्रम चालतो. श्रावण महिन्यात या मंदिरात प्रचंड गर्दी असते. पाच ते सहा वर्षापूर्वी धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदीर आणि त्याचा परिसर स्वच्छ करून जीर्णोद्धार केले असल्याची माहिती येथील युवा पिढीनी दिली.

दक्ष गावकरी

एवढे सुंदर असलेल्या मंदिराची स्वच्छता आपण नाही ठेवणार तर कोण ठेवणार ?, या भावनेने गावातील सर्व नागरिक मिळून मंदिराची  अधूनमधून साफसूफ करतात. शासनास सुद्धा लाजविल एवढी स्वच्छता या गावातील दक्ष नागरिकांनी केलेली आहे. येथे अशीसुद्धा चर्चा ऐकायला मिळते की, स्वाध्यायी बंधूमुळे या मंदिराची देखभाल चांगल्याप्रकारे ठेवण्यात आली आहे. लहानपणी मी मंदिरात जायला भीत होतो आज त्या मंदिरात विजेची सोय केल्यामुळे व बरेच लोक तिथे जमतात यामुळे माझी भीती निघून गेली अशी बोलकी प्रतिक्रिया युवकांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
या मंदिरात महादेवाचा पिंडीशिवाय श्री गणपती, श्री विष्णू, श्री हनुमान, नागदेवता,  रामाच्या पादुका तसेच पृथ्वीवर अवतार घेतलेल्या दहा अवताराचे चित्र क्रमाने काढलेली आहेत. खरोखरच तेंव्हाचे लोक या संगणक युगातील मानवापेक्षा हुशार होते,  नाहीतर एवढ्या कल्पक बुद्धीने काम केले असते का ? या मंदिराच्या बाजूला पाण्याचा एक कोनरा आहे,  त्याचे वैशिष्ट्य हे आहे की, त्या  कोनरामध्ये सदासर्वदा पाणी आढळते. दुष्काळ पडला तरी तिथे पाणी राहते अशी माहिती मंदिराजवळील व्यक्तीने दिली. पण सध्या येथे पाण्याचा साठा कमी झाला असून त्या कोनेरा मध्ये वनस्पती वाढून गेले आहे.

संकलन : नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद

No comments:

Post a Comment