नागोराव सा. येवतीकर

Thursday, 23 November 2017

मुलांच्या प्रगतीसाठी


मुलांच्या प्रगतीसाठी .........!

शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक दिशादर्शक आहे. मात्र त्या दिशेचे पालन योग्य प्रकारे होत नसेल तर शिक्षक त्यात दोषी कसा असू शकतो असा ही प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्याची प्रगती ही तीन बाबीवर अवलंबून असते. एक म्हणजे तो स्वतः असतो, दुसरा त्यांचा पालक आणि त्यानंतर शेवटी येतो शिक्षक.  विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाविषयी गोडी, अभिरूची किंवा आवड जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कोणत्याही शिक्षकाला काहीच करता येत नाही. बहुतांश वेळा पालक शिक्षकांकडे तक्रार करतात की, हा शाळेलाच जात नाही. शाळेला जा म्हटले की, रडत बसतो. काय करावे कळत नाही. अशी समस्या जेंव्हा पालक व्यक्त करतात तेंव्हा शिक्षक काय करू शकतो ? एखादा उपक्रमशील शिक्षक काही तरी आयडिया वापरून त्याला शाळेत आणण्याचे काम करेल. पण हे सर्व शिक्षकांना जमेल असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आज देशात किती तरी मुले शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्याची संख्या लाखाच्या घरात आहे. न्यायालयाने देखील सरकारला याविषयी मार्चअखेर सर्वेक्षण करण्याचे सूचविले आहे. ही मुले विविध कारणामुळे शाळाबाह्य राहतात. महिन्यातून अर्धे दिवस शाळेतून गायब राहणाऱ्या मुलांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांना जबाबदार धरणे संयुक्तिक वाटत नाही. घरात नवरा-बायकोचे भांडण किंवा वाद झाले की बायको माहेरी निघुन जाते आणि सोबत शाळेतील मुलांना घेऊन जाते. काही महिन्यानंतर त्यांचा वाद मिटतो. तोपर्यंत त्या मुलांची शाळा वाऱ्यावर असते. असे उदाहरण ग्रामीण भागातील अनेक शाळेत अनुभवास येतो.  काही पालक घरातील आणि शेतातील कामासाठी अधुनमधून शाळेत शिकणारी मुले गुरुजींना सांगून घेऊन जातात. असे एक दोन वेळा झाले तर ठीक आहे. मात्र सुगी आली की, त्यांचे हे रोजचे असते. उडीद-मुग सोयाबीन तोडणीच्या वेळी आणि त्यानंतर कापूस वेचणी अश्या काळात मुलांची उपस्थिती कमी आढळून येते. तिथे पालकाना देखील काही म्हणता येत नाही कारण ती त्यांची गरज असते. उद्याच्या काळजी पेक्षा त्यांना आजची चिंता जास्त खाते. यामुळे नाइलाजास्तव काही पालकाना असे पाऊल उचलावे लागतात. अश्या वेळी ही मुले अभ्यासात मागे राहतात. मग दोष कुणाला द्यावा. अश्या वेळी परिस्थिती ही फार मोठी दोषी आहे, बाकी काही नाही, असे वाटते. पालक शिक्षणाच्या बाबतीत जागरूक असेल तर त्यांची मुले नक्कीच हुशार असतात. असा आपल्या सर्वांचा अंदाज आहे आणि तो खरा आहे. मग जागरूक नसलेल्या पालकांची मुले गुणवंत नसतात काय ? तर ते देखील असतात कारण त्यांना गरीबीचे चटके लागलेले असतात. त्यांना शिक्षणात एक ज्योत दिसते म्हणून ते चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यास करतात. दिवसरात्र मेहनत करून यश मिळवितात. त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांना आहे काय ? शिक्षकांना श्रेय मिळतेच पण खरी मेहनत त्या मुलांची आहे. मला असे मुळीच म्हणायचे नाही की, चांगले झाले की ते श्रेय शिक्षकांनी घ्यावे आणि काही वाईट झाले की पालकावर सोडावे. मुलांच्या प्रगतीत जेवढा पालकांचा वाटा असतो तेवढाच वाटा शिक्षकांचा देखील असतो. शाळेत शिकविणारा शिक्षक घरात पालक होऊन मुलांना शिकवू शकत नाही. म्हणून पालक किती ही ज्ञानी असला तरी त्याला त्याच्या मुलांना यशस्वीपणे शिकविता येत नाही. आमचे गुरुजी जे म्हणाले तेच खरे असे बरीच मुले घरी बोलतात. म्हणून शिक्षकांनी देखील मुलांच्या प्रगती आणि गुणवत्ता याबाबतीत पालकासोबत हातात हात घालून चालल्यास मुलांची प्रगती नक्कीच दिसून येईल, असे वाटते.

- नागोराव सा.येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. सर प्रत्येक पालकाला वाटते की आपला पाल्य शिकुन मोठे होऊन आपले नाव पुढे न्यावे, परंतु आजची शिक्षण व्यवस्था व त्याची आर्थिक परिस्थिती तोंड देऊ शकत नाही.

    ReplyDelete