नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 22 November 2017

स्मार्टफोनचा विळखा

स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज देशातील निम्यापेक्षा ज्यास्त लोकांकडे मोबाईल उपलब्ध आहे. तसेच जास्तीत जास्त लोक हे स्मार्टफोनधारक आहेत. जिओ सारख्या कंपनीने इंटरनेटची सुविधा कमी दरात उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेट वापर करणाऱ्या लोकांची संख्या सुध्दा गेल्या एका वर्षात भरमसाठ वाढली. इतर कंपनीने देखील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तोडीसतोड म्हणून वेगवेगळी ऑफर लोकांना देऊ केले. त्याचा एक परिणाम असा झाला की, सोशल मीडियातील फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर इत्यादी सारख्या क्षेत्रात यूजरची संख्या वाढली. ही बाब व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून खुप चांगली असेल कदाचित. मात्र त्याचे दूरगामी परिणामाचा विचार केल्यास याचा प्रभाव सर्वच क्षेत्रात झपाट्याने दिसून येत आहे. ब्ल्यू व्हेल सारख्या गेमने अनेक शाळकरी किशोर मुलांचे बळी घेतले आहेत. अश्या गेमपासून मुलांना दूर ठेवणे आवश्यक आहे असे बोलण्यापूर्वी त्यांच्या हातात चोवीस तासासाठी मोबाईल असणे हेच घातक आहे. कारण ब्ल्यू व्हेल गेमच नाही तर इतरही अनेक तंत्रज्ञानचे ऍप्स या मोबाईलमध्ये आहेत, ज्यामुळे ही शाळकरी किशोर वयातील मुले काही कळण्याच्या आत हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज बरेच तरुण-तरुणी मोबाईल पाहिजे म्हणून घरात हट्ट करतात. मोबाईल ते ही स्मार्ट फोनच पाहिजे म्हणून मागणी करतात आणि मागितल्यानंतर मोबाईल मिळाले नाही तर अगदी टोकाची भूमिका घेण्यास देखील मागेपुढे पाहत नाही. अश्या वेळी पालक चिंताग्रस्त होतात. काय करावे आणि काय नाही हे त्यांना कळत नाही. मोबाईलपेक्षा आपल्या पाल्यांचे जीवन त्यांना अनमोल वाटते म्हणून पालक मुलांना मोबाईल घेऊन देतात. तरी ही अधुनमधून मुलांना गोडीगुलाबीने बोलून, दोन-चार दिवसांनी त्यांचे मोबाईल तपासून पहाणे आवश्यक आहे. समाजात अनेक लबाड माणसे आहेत जे की, अश्या किशोरवयीन मुलांना वेगळ्या काही प्रकरणात गुंतवून ब्लॅकमेल करतात. हे सहन न झाल्याने मुले आत्महत्या करण्याकडे वळु शकतात. म्हणून त्यांच्याशी संपर्कात राहणे आवश्यक आहे. 
> स्मार्टफोन आल्यापासून लोकां-लोकांतील संवाद देखील कमी झाले असून स्मार्टफोनवरील चॅटींग फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रात्री बारा वाजेपर्यंत तर काही जण पहाटेच्या चार वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटींग करताना दिसून येत आहेत. ह्या मोबाईल चॅटींगचा रोग सर्वत्र पसरलेले आहे. घरात ही आत्ता एकमेकात बोलणे खुप कमी झाले आहे. जो तो सोशल मीडियात चॅटींग करण्यात व्यस्त झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी कौटुंबिक वाद झाल्याचे देखील बातम्या ऐकण्यात आले आहेत. यावरून आपण विचार करू शकतो की, स्मार्टफोन किती गरजेची वस्तू बनली आहे. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन अत्यावश्यक आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाकडून येणाऱ्या सर्व सूचना आत्ता थेट व्हाट्सअपच्या माध्यमातून मिळत आहेत. त्यामुळे त्यांना स्मार्टफोनचा वापर करणे गरजेचे बनले आहे. एखादी माहिती बघितली नाही की, त्याचा फटका कर्मचाऱ्यांना नक्की बसतोच, हे सत्य असले तरी पण वास्तव काही वेगळेच दर्शविते. कार्यालयीन कामासाठी म्हणून जी स्मार्टफोनची सुरुवात झाली त्याचे त्यानंतर करमनणुकीचे साधन केंव्हा बनले हे त्यांना देखील कळले नाही. आज अनेक कर्मचारी या स्मार्टफोनच्या संपूर्ण आहारी गेले असुन कार्यालयीन वेळात मोबाईलवर चॅटींग करणे आणि कॅण्डी क्रॅश सारखे गेम खेळत बसल्याचे चित्र अनेक ठिकाणी जनतेला पाहायला मिळते. त्यामुळे शासनानी कार्यालयात या स्मार्टफोनचा वापर करण्यावर बंदी घालायला हवी असे जनतेनी मागणी केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. माणसाला ज्याप्रकारे बिडी ओढण्याची किंवा पान-तंबाखू खाण्याची सवय असते अगदी तशीच काहीशी सवय स्मार्ट फोनची झालेली आहे. तलब आल्यावर व्यसनी माणसाला जसे राहवत नाही तसे एखाद्या दिवशी सोबत स्मार्टफोन नसेल किंवा इंटरनेट सुरळीत नसेल तर माणसाचा जीव कासावीस होतो. पूर्वी जसे येथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे असे फलक जागोजागी दिसत होते त्याऐवजी आत्ता येथे स्मार्ट फोन वापरण्यास मनाई आहे असे फलक जागोजागी लवकरच दिसतील असे वाटते. काही लोकांना आज कोणत्याच गोष्टीची गरज भासत नाही फक्त हातात स्मार्ट फोन असावा आणि त्यात अनलिमिटेड डाटा असावा मग घरात आटा नसेल तरी चालते. त्यांचा दिवस आणि रात्र कसे संपले हेच त्यांना कळत नाही. बहुतांश जणाना या स्मार्टफोन मुळे जग खूप जवळ आले आहे असे वाटत आहे मात्र याचा अति वापर कधी ना कधी मानवासाठी घातक ठरणार आहे, हे मात्र खरे आहे. शासन एकीकडे डिजिटल इंडिया करण्यास पुढे पाऊल टाकत आहे, आहे मात्र या स्मार्टफोनच्या अति वापरामुळे अनेक नवनवीन समस्या निर्माण होत आहेत आणि भविष्यात देखील निर्माण होतील. म्हणून शासनानी कायदा करण्याच्या अगोदर प्रत्येक नागरिकांनी स्मार्टफोन बाबत जागरूक होणे आवश्यक आहे. नविन तंत्रज्ञानामुळे जीवनाचा जेवढा विकास होतो असे वाटते तेवढाच भकास देखील होतो हे ही नेहमीसाठी लक्षात असू द्यावे. म्हणून म्हणावेसे वाटते स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

2 comments: