नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 14 November 2017

वेळ नाही मला

वेळ नाही मला

मोहन आणि त्याची पत्नी कमला शेतात मोलमजुरी करून आपल्या चार लेकराला शिक्षण दिले. आमच्यासारखे खडतर जीवन लेकरांच्या नशिबी येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःच्या दोन एकर जमीन मध्ये कष्ट केलेच त्याशिवाय वेळप्रसंगी इतरांच्या शेतात जाऊन मोलमजूरी केली. मुलगा हवाच बायकोच्या या हट्टापायी तीन मुलीं झाल्या. पहिली मुलगी जन्माला आली त्यावेळी दोघांनाही आई बाप झाल्याचा आनंद गगनात मावला नाही. मोठी मुलींच्या जन्माने घरात लक्ष्मीची पाऊले देखील आली होती. त्यावर्षी शेतात खुप कापूस पिकले, घरात पैसा बऱ्यापैकी आले म्हणून तीचे नाव लक्ष्मी ठेवले. घरात सर्वत्र आनंदी आनंद होते. कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. दोन वर्षांनंतर कमला गरोदार राहिली. मुलगा व्हावा अशी त्यांची मनोमन ईच्छा होती. परमेश्वराजवळ तशी प्रार्थना देखील केलेत. नवस देखील बोलले. पण दुसरी मुलगीच झाली. लक्ष्मी पेक्षाही दिसायला ही सुंदर होती. मुलगी झाल्याचे कळताच कमला नाराज झाली. कारण तिला मुलगा हवा होता. मोहनने तिची समजूत काढली आणि दैवात जे असेल तेच मिळते. असे म्हणून तिची समजूत काढली. पण ती दुःखीच होती. मोहनने दोन मुलींवर कुटुंब नियोजन करण्याचा निर्धार केला होता. पण कमला ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हती. मला मुलगाच हवा म्हणून तीने कुटुंब नियोजन करण्यास नकार दिला. मोहनचा नाईलाज होता. त्यांच्या मनात विचार चक्र चालू होते. आपल्याकडे तर काही जास्त जमीन नाही, ना पैसा आहे. या मुलींचे शिक्षण आणि लग्न याचा खर्च कसा काय पेलणार ? या सर्व प्रश्नाच्या चिंतेत दिवसामागून दिवस जात होते. लक्ष्मी शाळेत जाऊ लागली आणि शारदा अंगणवाडी मध्ये जाऊ लागली. मोहनच्या मनात नसताना ही कमला तिसऱ्यादा गर्भवती राहिली. कमलाने कुलदेवताच्या नावे नवस केली, उपास तपास केली की यावेळी मुलगा हवा. पण नशीब यावेळी देखील साथ दिली नाही. परत मुलगीच झाली. मोहनच्या कपाळावरील आट्या स्पष्ट दिसत होत्या. त्याची काळजी अजून जास्त वाढली. कमला देखील नाराज झाली. तिच्या डोळ्यासमोर फक्त मुलगा दिसत होता. ती देखील चिंतातुर झाली. काय करावे कळत नव्हते. कुटुंब नियोजन करावे की करू नये या संभ्रम अवस्थेत होती. यावेळी देखील कुटुंब नियोजन करण्यावर मोहन आणि कमलाची चर्चा झाली. परत तीने आपला हट्ट सोडला नाही. मला मुलगा हवाच म्हणत कुटुंब नियोजन करण्यास नकार दिली. मोहनची काळजी दिवसेंदिवस वाढतच होते. सर्व लेकरांची जेवण्या-खाण्याची सर्व व्यवस्था करून तिला शेतातील कामे होत नव्हती. लक्ष्मी अधुनमधून कमलाला घरकामात मदत करीत होती. तेवढा तिला हातभार वाटत होते. घरची गरीबी आणि तीन मुलीं यांना पाहून मोहन काळजीत चिंता करायचा. पण पत्नीच्या हट्टापुढे त्याचे काही चालेना. लक्ष्मी आत्ता पाचव्या वर्गात, शारदा तिसऱ्या वर्गात आणि आरती पहिल्या वर्गात शिकत होती. सर्व मुलीं खुप हुशार आणि सर्वांशी मिळून मिसळून राहत होती. त्यामुळे शाळेत आणि गावात मोहन आणि कमलाच्या मुलीं खरोखर रत्न आहेत असे म्हटले जायचे. देवाच्या वारी, नवस, उपास तपास आणि कमलाच्या दृढ़ इच्छेमुळे चौथ्या वेळेस कमलाने एका मुलाला जन्म दिला. तेंव्हा सर्वानाच आनंद झाला. मोहनने तर गावात सर्वाना लड्डूचे जेवण दिले. तिन्ही बहिणीला देखील भाऊ लाभल्याचा खुप आनंद झाला. लाडाने सर्व जण त्याला बाबू म्हणू लागले. आईचा तर तो सर्वात लाडका बनला होता. त्याला काही त्रास होणार नाही याची काळजी सर्वजण घेऊ लागले. मुलांच्या जन्मानंतर मोहनचा चेहरा खुलला होता. त्याला समाधान वाटले. पण दोघांनी अगोदर ठरविले होते की, यावेळी मुलगा होवो की मुलगी कुटुंब नियोजन करायचे म्हणजे करायचे. त्यामुळे बाबू जन्मल्यावर कमलाने खुशीखुशीने कुटुंब नियोजन करून घेतली. दिवसामागून दिवस सरत होते. बाबू हळूहळू मोठा होत होता.
बाबू आत्ता शाळेत जाऊ लागला तेंव्हा लक्ष्मी दहावी पास झाली होती. घरातील काम करता करता ती शेतातल्या कामात कधी पोहोचली हे कळले देखील नाही. तिचे पुढील शिक्षण बंद झाले आणि घरातले आणि शेतातील कामे वाढली. दोन एक वर्षानंतर शारदा आणि त्यानंतर पूजा हिचे देखील शिक्षण बंद झाले. सर्वांचे लक्ष आत्ता बाबू कडे होते. त्याले काय हवे- काय नाही याची काळजी घरातील प्रत्येकजण घेत होते. आई आणि वडिलांना आत्ता मुलींच्या लग्नाची काळजी लागली होती. एका पाठोपाठ एक असे तिघांचे लग्न लावून मोहन मोकळा झाला. तोपर्यंत बाबू दहाव्या वर्गात आला होता. खुप अभ्यास करून बाबूने चांगले मार्क मिळविले त्यामुळे त्याला तालुक्याच्या ठिकाणी न ठेवता जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवण्याचा विचार त्यांनी केला. बारावीच्या परीक्षेत देखील चांगला अभ्यास करून मेरिटचे मार्क मिळविला. बाबूच्या या यशाचे सर्वाना कौतुक वाटत होते तर मोहन आणि कमलाला अभिमान वाटत होता. बारावी नंतर बाबूने इंजीनियरिंगला प्रवेश घेतला. मोहनने सर्व जमीन जुमला विकून बाबूच्या शिक्षणाला लावले होते. आत्ता त्याच्याजवळ काही शिल्लक नव्हते. बाबूचे शिक्षण पूर्ण झाले आणि तो नोकरीच्या शाेधात फिरु लागला. त्याला जास्त फिरावे लागले नाही. कारण त्याच्याजवळ बुद्धिमत्ता होती आणि डिग्रीपण होती. मुंबईच्या एका कंपनीत त्याला चांगली नोकरी मिळाली. दोन एक वर्षानंतर बाबूने मुंबईत चांगले घर विकत घेतले आणि आपल्या आई बाबांना घेऊन गेला. काही दिवसानंतर त्याचे मुंबईमधल्या एका श्रीमंत बापाच्या मुलीसोबत लग्न अगदी थाटामाटात झाले. बाबूची पत वाढली होती. बाबूची पत्नी जॉली ही श्रीमंतीमध्ये वाढलेली, तिला घरातील काही काम येत नव्हते. स्वयंपाक करता येत नव्हते. सर्व काही कमलाच करायची. बाबूचे लग्न झाल्यापासून मोहन आणि कमला अक्षरशः घरातील नोकर झाले होते. हे बघायला बाबूला वेळ नव्हता आणि बाबूचे मन दुखू नये म्हणून त्यांनी त्याला कळू देत नव्हते. एके दिवशी घरात खुप वाद झाला आणि बाबूच्या कानावर ही गोष्ट गेली. मोहन आणि कमला यांना देखील त्या घरात रहावे असे वाटत नव्हते. अखेर एके दिवशी मोहन ने बाबुला गावी परत पाठविण्याची विनंती केली. बाबूने देखील लगेच आपली गाडी काढली आणि गावाकडे आणून सोडले. कंपनीमध्ये भरपूर काम असल्यामुळे तो लगेच मुंबईला परतला. जॉलीला खुप आनंद झाला होता कारण आत्ता ते राजा राणी सारखे राहु शकत होते. दिवसामागून दिवस सरत होते. बाबूचा कंपनीमध्ये वावर वाढत होता. त्याच्यावर जबाबदारी वाढत होती. त्याच्याकडे वेळ देखील अपुरा पडत होता. स्वतःचे कौशल्य आणि बुध्दिमत्ताच्या बळावर त्याने खुप संपत्ती कमविली होती. त्याला कशाचीही कमी नव्हती. जेवढे दुःख लहानपणी पाहिले होते त्यापेक्षा किती तरी पटीने सुख आज त्याच्या पायाशी लोळण घालत होते. मुंबईहून गावाकडे आल्यापासून  कमलाची तबीयत दिवसेंदिवस खालावत चालली होती. शेवटी एकदाचे कमलाचे देहावसान झाले. ही बातमी कळविण्यासाठी मोहन ने बाबूला खुप फोन लावले पण फोन काही लागत नव्हता. कदाचित त्याने मोबाईल बदलला असेल. गावात त्याचा एक मित्र होता सखाराम. त्याला कमला गेल्याची बातमी कळाली तसा तो घरी आला. मोहनने बाबूला ही बातमी कशी तरी कळवा असे बोलला आणि गप्प बसाला. सखारामने त्याच्या जवळ असलेल्या सर्व मोबाईल चेक केले पण कोणत्याच नंबर वर फोन लागत नव्हता. कारण ही तसेच होता , बाबू आत्ता मुंबईत नाही तर दुबईत नोकरी करत होता. कसे फोन लागणार. सखारामला त्याचा email मिळाले आणि त्यावर त्याने तुझी आई कमला आपणाला सोडून गेली, तू लवकर ये. असा मेल केला.  Email त्याला मिळाला. त्याने तो पहिला आणि काही वेळात reply आले, सखा, सध्या माझ्याकडे वेळ नाही. मी येऊ शकत नाही. तेंव्हा पुढील सर्व क्रिया माझ्याकडून तू कर आणि देवा जवळ प्रार्थना देखील कर. प्लीज यार एवढं माझ्यासाठी कर. हा संदेश वाचून सखारामाच्या तोंडून एक ही शब्द निघाला नाही. तोच त्यांचा मुलगा मानून कमलाची अंतिम संस्कार क्रिया पार पाडला. एका वर्षानंतर मोहन देखील जगाचा निरोप घेतला तेंव्हा त्याचे देखील सर्व क्रिया सखारामनेच पूर्ण केला. मोहन आणि कमला या दोघांच्या आत्म्या आज ही हेच म्हणत असतील याच साठी का रे तुला आम्ही जन्म दिला.

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

1 comment:

  1. Khup Chan Lekh.pan mulala jast mahatwa dilyachi kimmat chukvavi Kali ya doghanna. Muli kadhihi kami navhtya nahit aani nastilhi. Proud to be a girl. Proud to be a mother.

    ReplyDelete