नागोराव सा. येवतीकर

Sunday, 12 November 2017

शाळेचे वेळापत्रक

एका वर्षात 365 दिवस असतात आणि वर्षभरात शाळेचे कामकाज 238 ते 241 दिवस चालतात. याचाच अर्थ 125 दिवस जवळपास सुट्या म्हणजे सर्वसाधारणपणे तीन महिन्याचा काळ सुट्यात जातो. अर्थात या सुट्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकांना देखील असतात. साधारणपणे दररोज घड्याळी साडेचार ते पाच तास या सरासरी वेळाप्रमाणे शाळेत अध्ययन आणि अध्यापनांची प्रक्रिया चालते. मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काही गोष्टीचा अंतर्भाव करता येईल काय ? त्या अनुषंगाने विचार होणे आवश्यक आहे. राज्यातून ज्या विषयाच्या बाबतीत असंख्य तक्रारी मांडल्या जातात त्याविषयी गांभीर्याने विचार करून त्यात वेळीच सुधारणा केल्यास तक्रारीचा पाऊस कमी होईल. काही सुधारणा करणे अत्यावश्यक असल्यास त्या बाबतीत जनमत घेऊन नविन योजना तयार करणे गरजेचे वाटते.
कवी केशवसुत आपल्या तुतारी कवितेत असे म्हणतात की, " जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका " या ओळीचा अर्थ लक्षात घेऊन गेल्या कित्येक वर्षापासून जे नियम आणि पद्धतीने शाळा चालू आहेत त्यात थोडा बदल किंवा सुधारणा करणे अत्यावश्यक वाटते. शाळेचे कार्यदिन तेवढेच असतील आणि शाळेचा वेळ सुध्दा तेवढाच ठेवून भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण लक्षात घेऊन हा बदल शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी फायदेशीर होऊ शकतो का याचा विचार आवश्यक आहे. सध्याच्या प्रचलित पध्दतीनुसार दिवाळीपूर्वी 120 दिवस आणि दिवाळीनंतर 120 दिवस सरासरी अशी शाळा चालते. त्यात महिनावार कामकाजांचा आढावा घेतल्यास दिसून येईल की, शाळा किती कठीण परिस्थितीमध्ये चालविली जाते. शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्याच्या मध्यातून म्हणजे 15 जूनपासून सुरु होते. यात विद्यार्थी प्रवेश आणि निर्गम करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे लागते. त्यामुळे मुलांची मागील वर्षाची उजळणी केल्या जाते. जुलै महिन्यात अभ्याक्रमास सुरुवात केली जाते. नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेत मोठ्या जोमात आणि उत्साहात सहभागी होतात. ऑगस्ट महिना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाने गजबजलेला असतो. सप्टेंबर महिन्यात श्रीगणेशाची स्थापना होते व शाळेतील मुलांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवू लागते. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये नवरात्राची रेलचेल त्यामुळे देखील मुले शाळेत कमी आणि बाहेर जास्त दिसून येतात. जवळपास नोव्हेंबर महिना संपूर्ण दिवाळी सुट्यात संपतो. परत एकदा डिसेंबर महिना सुट्यानंतरचा काळ म्हणून चांगला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या तयारीमध्ये संपूर्ण जानेवारी उलटून जातो. फेब्रुवारी महिन्यात सुट्या जवळ येत असल्याची चाहुल लागते. उन्हाची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे मुले वर्गात बसताना हाश-हुश करतात. त्यांचे अभ्यासाकडे लक्ष फार कमी असते. उन्हाच्या घामाघूमीत मार्च कधी संपतो असे वाटते. एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा असतात, ज्याची सर्व मुलांना प्रतीक्षा असते. या महिन्यात मुले शाळेत बसण्याच्या तयारीत देखील नसतात मुळी मात्र परीक्षा द्यावे लागते म्हणून वाट पाहतात. परीक्षा घेतली की मुलांना अघोषित सुट्टी असते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 01 मे रोजी झाल्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा झाल्यानंतर अधिकृत सुट्टीची घोषणा केली जाते. वास्तविक पाहता या महिन्यात अध्यापन-अध्ययन ही क्रियाच होत नाही ; परंतु 01 मे महाराष्ट्र दिनासाठी शाळेची कालमर्यादा वाढविण्यात येते. मात्र यात कोणी बदल करण्याचे साहस करीत नाहीत किंवा तसा बदल करता येऊ शकतो काय यावर विचार विनिमय देखील होत नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सोइस्कर बदल स्वीकार्य असेलच.
सध्याच्या या प्रचलित पध्दती मध्ये थोडा फार बदल केल्यास सर्वांच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. जून महिन्यात पूर्वी जशी शाळा सुरु होतात त्यात काही बदल नसावा, ते योग्य आहे. मात्र दिवाळीचे जे तीन आठवडे सुट्टी दिली जाते, त्यात बदल करून फक्त दहा दिवस सुट्टी देण्यात यावी आणि उरलेले सुट्टी हे उन्हाळी सुट्या जे की महाराष्ट्र दिनापासून दिली जाते ते 20 एप्रिलपासून देण्यात यावी. यामुळे सुट्या कमी होण्याच्या प्रश्न येणार नाही. वास्तविक एप्रिल महिन्यात वातावरणात खुप उष्ण असते. त्याचा त्रास पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना होतो ; परंतु याच काळात सुट्या दिल्यास सर्वाचा त्रास कमी होईल. राहिला प्रश्न महाराष्ट्र दिनाचा, तर त्या दिवशी झेंडावंदन प्रचलित नियमानुसार करण्यात यावे. या पध्दतीचा खराखुरा अभ्यास करायचे असेल तर शेजारच्या तेलंगणा किंवा आंध्रप्रदेश राज्याचा करता येईल. त्या ठिकाणी याच पध्दतीने शाळा भरविले जातात. सुट्यामध्ये कसल्याच प्रकारचे बदल नाही त्यामुळे यास विरोध देखील कमी होईल असे वाटते.
पूर्णवेळ शाळा ज्या ठिकाणी भरविली जाते तेथे सकाळची वेळ मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न होते. मात्र दुपारची वेळ कंटाळवाणे वाटते, असे चित्र बहुतांश शाळातून बघायला मिळते. त्यानंतर दप्तराचे ओझे सुध्दा कमी करायचे मोठे संकट शाळेसमोर आहे. त्या अनुषंगाने जर उपाय योजना केल्यास विद्यार्थ्यामध्ये शाळेचे आकर्षण वाढेल. एक उपाय म्हणजे एका दिवशी एक विषय घ्यावे. सकाळच्या सत्रांत अध्यापन आणि दुपारच्या सत्रांत त्यावर आधारित स्वाध्याय, गृहकार्य पूर्ण करणे असे काम केल्यामुळे दप्तराचे वजन कमी होईल आणि दिवसभर त्या विषयाचा सखोल अभ्यास करता येईल. त्याचबरोबर शिकविलेल्या भागावर प्रश्न उत्तरे लेखन केल्यास त्याचे आकलन देखील होईल. ज्या पध्दतीने सरकार विद्यार्थ्याना क्रमिक पुस्तके देते, त्याच धर्तीवर संपूर्ण वर्षाचे विषयनिहाय नियोजन करून वार्षिक आराखडा दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पध्दतीत अध्यापन करता येईल. शिवाय वार्षिक आराखडा पुस्तक रुपात योग्य मार्गदर्शनासह उपलब्ध झाल्यास शिक्षकांना शिकविणे सोपे आणि तेच पुस्तक पालकापर्यंत पोहोचले तर खुपच चांगले. ही प्रायोगिक तत्वावर मांडलेली कल्पना आहे. दिवाळीच्या सुट्यात शेजारच्या राज्यात असे चित्र बघायला मिळते आणि विद्यार्थ्याची प्रगती देखील म्हणून हा एवढा लेख प्रपंच. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवसाचे शिक्षक आणि विद्यार्थ्याना खूप-खूप शुभेच्छा ...!

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment