नागोराव सा. येवतीकर

Saturday, 3 June 2017

कमवा आणि शिका


कमवा आणि शिका हेच उपयोगी

स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले. सुमारे दोनशे वर्षा पूर्वी महात्मा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. शिक्षण हेच समाजाच्या परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आले होते म्हणून तर त्यांनी अस्पृश्यासाठी, मुलीसाठी पहिली शाळा काढली. नुसती शाळा काढून थांबले नाहीत तर समाजातील गोरगरीब आणि तळागाळातल्या मुलींना तेथे प्रवेश मिळवून दिला. शाळेत शिकविण्यासाठी कोणी पुढे येत नाहीत हे पाहून स्वतःची पत्नी सवित्राबाई फुले यांना साक्षर करून भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्यास प्रोत्साहित केले. सावित्रीबाई फुले शिकल्या त्यामुळे बावनकशी लिहू शकल्या. त्यांनी अनाथाश्रम काढले, वृत्तपत्रे काढली. धर्म जन्माने न मिळता माणसाने स्व:त च्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. शिक्षणामुळे मनुष्याच्या जीवनाचा विकास होतो म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे ते म्हणत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाकडे एक कटाक्ष टाकले तर लक्षात येईल की त्याकाळी शिक्षण घेणे किती अवघड बाब होती. भारतावर इंग्रजाचे राज्य होते आणि ते लोक फक्त त्यांच्या कामासाठी कारकुन तयार होतील असेच शिक्षण देत होते. सर्वसामान्य लोकासाठी त्यांचे शिक्षण काही कामाचे नव्हते. म्हणून महात्मा फुले यांनी हंटर कमीशन पुढे सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यावे अशी साक्ष दिली. देशात उच्च वर्णीय लोकासाठी फक्त शिक्षण चालु होते. गरीब लोकांसाठी कसलीच व्यवस्था नव्हती. देशात अज्ञानी आणि पारंपारिक अंधश्रधेमध्ये असलेली जनता भरपूर प्रमाणात होती. त्यांच्या वर्तनात आणि वागणुकीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे सारेच समाजसुधारकानी ओळखले म्हणून तर सर्वानी शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला तरी म्हणावे तेवढे लोकांनी शिक्षणाकडे वळले नाहीत. लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळले नव्हते. अति मागास असलेल्या लोकांना विविध प्रकारच्या सोई सुविधा देऊन त्यांचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात. अगदी कडक शिस्तीचे गुरुजी असायचे. कुठल्याच प्रकारची तडजोड त्यांना चालायचे नाही. छडी लागे छम छम चा प्रत्यय त्या काळातील लोकांना आला. आज ही त्या शिक्षकांना पाहिल्यावार मनात आदरयुक्त भीती जाणवत राहते. माझ्या मुलाना का मारलात अशी तक्रार करायला कोणी पुढे येत नसत कारण शाळेत काय घडले हे कोणीही घरी काही सांगत नव्हते. शिक्षकांच्या या भीती पोटी बऱ्याच मुलांचे जीवन सुधारले तर तितक्याच मुलांचे जीवन बरबाद ही झाले असतील यात शंका नाही. मात्र ज्यांच्या जीवनात या प्रणालीमुळे सुधारणा झाली ते ते यास दोष देणार नाहीत, विसरून चालणार नाही, हे ही खरे आहे. त्याकाळी पालकापेक्षा मुलांना आपल्या शिक्षणाची काळजी जास्त होती. तहान लागलेल्या प्राण्याला विहीर, नदी किंवा तलावापर्यंत नेता येते पण, पाणी पिणे अथवा न पिणे हे सर्वस्वी त्या प्राण्यावर अवलंबून असते. अगदी त्याच प्रकारचे शिक्षणाविषयी बोलता येईल. पालकापेक्षा मुलांना शिक्षणाची गोडी आणि काळजी लागली तरच विकास शक्य आहे अन्यथा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असुन देखील आज मुलाची शैक्षणिक प्रगती म्हणावी तेवढी दिसत नाही असे का ?
* अपत्याची संख्या -
पूर्वी कुटुंबात एका दाम्पत्याला चार-पाच मुले असायची. त्यामुळे कोणाचे लाड किंवा कोडकौतुक व्ह्ययचे नाही. स्वतःच्या बळावर ही मुले शिकायाची. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले असायचे. वेळप्रसंगी कमवा आणि शिका या तत्वाचा देखील त्यांनी अवलंब करीत असत. त्यांचे स्वावलंबी जीवन त्यांना जीवनात खुप काही शिकविले आहे. एका घरात दहा-दहा माणसे राहायची. कमवायचे एक हात आणि खायाची दहा तोंडे त्यामुळे घरातील कर्ता पुरुषाना घरातील लेकरां-बाळाच्या शिक्षणाकडे बघण्यास अजिबात वेळ राहत नसे. म्हणून त्यांचे पालकत्व बरोबर नव्हते अशातली बाब नव्हती. पण त्यांचे आस्तित्वच घरातील सर्वाना प्रेरणा देणारी होती. परंतु आज वेगळी परिस्थिती बघायला मिळते. हम दो हमारे दो असे कौटुंबिक चित्र असलेल्या घरात आई-बाबा दोघे पण कमावते झाली आहेत. आजचे कुटुंब खुप सीमित झाले आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत हे पालक खुप जागरूक झाली आहेत. हवे नको असलेले सर्व काही क्षणात पुरवठा करू शकतात. तरी देखील मुलांची प्रगती म्हणावी तशी का होत नाही. त्याला कारण आहे जास्तीची घेतलेली काळजी. जेंव्हा मुलांना आपण अति संरक्षण किंवा खुप काळजी घेतो तेंव्हा ती मुले एक तर डरपोक होतात किंवा एकलकोंडी होतात. त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही एखादी बाब करण्याची त्यामुळे ते यांत्रिक पध्दतीतने वागतात. पैश्याची काहीच कमतरता नसते आणि पैश्याच्या जोरावर सर्व काही विकत घेता येऊ शकते अशी धारणा असलेले पालकाना संस्कार नावाची वस्तू बाजारात कुठे मिळते ? याचा पत्ता मात्र मिळत नाही. आजची मुले फक्त आणि फक्त पुस्तकी कीडे बनत चालली आहेत. पालकाना सुध्दा आपली मुले तसेच व्हावीत असे वाटते. असे होताना मात्र ही मुले संस्कारहीन होत आहेत याकडे दुर्लक्ष चालू आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पध्दतीमध्ये जे नकळत संस्कार पडत होते त्याचा कुठे तरी शोध घेणे आजच्या पालकाना जड जात आहे. विभक्त कुटुंब पध्दत ही क्षणिक सुखाची आणि खुप आकर्षक वाटते मात्र आपल्या समोरील पिढी बरबाद करीत असते याची जाणीव ज्या पालकांत निर्माण होईल ते आपले पालकांची भूमिका निश्चितपणे निभावतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपाल्टीच्या विद्युत प्रकाशात अभ्यास करून जीवनात एवढे महान कार्य करू शकले. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री, परमपूज्य साने गुरुजी यासारखी अनेक व्यक्ती आहेत ज्याना घरातील पालकानी नाही तर स्वतःच्या हिमतीवर जीवनात यशस्वी होता आले. फक्त आणि फक्त शिक्षणामुळे त्यांना जीवन विकास साधता आले. समाजात आज असे ही चित्र बघायला मिळते की ज्याला कसल्याच प्रकारची सुविधा नाही अशी मुले विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवित आहेत. कारण त्यांना गरीबीचे चटके लागलेले असतात. जेंव्हा जळते तेंव्हाच कळते या म्हणीनुसार अशी मुले रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. तर दूसरीकडे आपले पाल्य परीक्षेत यशस्वी व्हावे म्हणून त्याची सर्व प्रकारची सोय करून देखील त्याला कसलेही यश मिळत नाही. उलट यावेळी पेपर खुप अवघड होते. माझे नशिब खराब आहे असे नशिबावर खापर फोडून वर्षभर बाप कमाई वर फिरणारे मुले खरोखर यश मिळवतील काय याबाबत शंकाच आहे. नांदेड, औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात अभ्यासाच्या नावाखाली राहणाऱ्यां मुलांविषयी पालकानी एकदा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या शिक्षणाची पध्दत पूर्ण बदलून गेली आहे. कारण आज पालक मुलांपेक्षा जास्त जागरूक झाले आहेत. अभ्यासाची गोडी आणि महत्त्व जेवढे पालकाना आहे तेवढे मुलांना नाही त्यामुळे शिक्षणात पालकांची खुप गोची होत आहे. पालक मंडळीनी आपल्या मुलांकड़ून खुप मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे आजची मुले खुपच दबावाखाली वावरत असतात. काही दिवसापूर्वी एका मुलाने अभ्यासाचे ओझे सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. हे कश्याचे द्योतक आहे. पूर्वीच्या पालकांत आणि आजच्या पालकांत एकच फरक आहे ते म्हणजे आजचे पालक आपल्या मुलांविषयी खुप स्वप्न बाळगुन आहेत. स्वप्न भंग होऊ नये या काळजी मध्ये मुले वावरत आहेत. जे पालक आपल्या मुलाना कसलाही दबाव ठेवत नाहीत त्यांचीच मुले जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे पालकानी मुलाना त्यांच्या मनानुसार अभ्यास करू द्यावे आणि आपण फक्त मार्गदर्शकाची भूमिका करणे हेच खरे आपले पालकत्व आहे ,असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
  9423625769

6 comments: