नागोराव सा. येवतीकर

Saturday, 3 June 2017

अवघड सोप्यामध्ये अडकलेल्या बदल्या

                      मे महिना उजाडला की सर्वत्र बदल्याचे वारे सुरु होतात. त्यातल्या त्यात शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहते. पूर्वी केव्हाही बदल्या केल्या जायचे त्यामुळे शिक्षक मंडळीना नाहक त्रास होत असे. या कटकटी पासून वाचण्यासाठी गेल्या दहा एक वर्षापासून मे महिन्यात बदली करण्याची पध्दत सुरु झाली. जे सर्वांसाठी सोइस्कर आणि उपयुक्त आहे, यात वाद नाही. बदल्या म्हटले की राजकारण येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. शिक्षक मंडळी देखील आपल्या सोईच्या गावाची शाळा मिळावी म्हणून राजकारणी लोकांकडे फील्डिंग लावतात आणि मग सुरु होतो सत्ता आणि पैश्याचा खेळ. सर्वसाधारणपणे एका शिक्षकाची बदली त्यांच्या मनानुसार करायची ठरविल्यास अर्धा लाख रूपयाची मागणी केली जाते आणि तेवढी रक्कम कसल्याही प्रकारचे आढेमुढे न घेता दिली जाते. काही लोकप्रतिनिधी याच दिवसाची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहतात. याच बदल्याच्या मौसममध्ये ते मालामाल होऊन जातात. इकडे शाळेवर एक रूपया खर्च न करणारा शिक्षक आपल्या सोईच्या गावसाठी वाटेल ती रक्कम मोजण्यास तयार होतो. हीच सर्व देवाणघेवाण पूर्णतः बंद करण्यात यावे यासाठी यावर्षी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा प्रयोग शालेय शिक्षण विभाग करीत आहे. खरोखरच ऑनलाइन पध्दतीने शिक्षकांच्या बदल्या होतील काय ? याबाबत शिक्षकांच्या मनात संभ्रम अवस्था आहे.
दरवर्षी बदल्याच्या मोसम सुरु झाला की, शिक्षकांच्या बदल्याबाबत पेपर मध्ये पानभरून लिहिले जाते. तसे जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी काम करतात मात्र शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे त्यांच्या बदल्या लक्षवेधी ठरतात हे ही सत्य आहे. गेल्यावर्षी शिक्षकांच्या बदल्या पेसा कायद्यामुळे सर्वाना अवघड ठरले होते तर यावर्षी अवघड आणि सोपे क्षेत्र या बाबीमुळे कठिण बनले आहे.
शिक्षण विभाग सध्या ऑनलाइनच्या बाबतीत खुप महत्वाचे कार्य करीत आहे. गेल्या वर्षी सरल प्रणाली शिक्षणात आणून राज्यातील सर्व शाळा, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना ऑनलाइन केले आहे. एका क्लिक वर राज्यातील शैक्षणिक आढावा घेता यावा यासाठी सरल प्रणाली विकसित करण्यात आली. त्या प्रणालीद्वारे काम करताना राज्यातील शिक्षकांना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागले. अनेकांनी या ऑनलाइन प्रक्रियेच्या विरुध्द आवाज देखील उठविला परंतु आज जेव्हा एका क्लिकवर राज्यातील कुठल्याही शाळेची स्थिती जगात कुठून ही पाहता येते ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे यात शंकाच नाही. शाळेत असलेल्या सर्व सोईसुविधा आणि शाळेची निश्चित अशी जागा ही बाब ऑनलाइन वर दिसून येते.  विद्यार्थी पोर्टल वर राज्यातील सर्व विद्यार्थ्याची माहिती त्याच्या आधार क्रमांक आणि इतर माहिती सह उपलब्ध करण्याची किमया येथे करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील बोगस विद्यार्थी संख्येवर आळा बसला. त्याच प्रकारे शाळेत शिकविणारे कर्मचारी त्यांची इत्यंभूत माहिती कर्मचारी पोर्टल वर दिसून येते आणि याच पोर्टलच्या आधारे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा विचार शासन करीत आहे. ज्यामुळे राजकारणी लोकांचा बदल्या मध्ये जो हस्तक्षेप वाढत चालले आहे त्यास कुठे तरी आळा बसेल अशी विचारधारा शिक्षकांसाठी अनुकूल आहे. राज्यातील सर्व शिक्षक मंडळीना पोर्टल वर आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक असताना पोर्टल अजुन ही नीट चालत नसल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. अजुन त्यातल्या त्यात शाळेचे सोपे क्षेत्र आणि अवघड क्षेत्र अश्या दोन गटात विभागणी करून सर्व शिक्षकांना संभ्रम अवस्थेमध्ये टाकले आहे. जिल्हा परिषदेच्या स्तरावर काही जिल्ह्यात अजुनही सोपे आणि अवघड गावे ठरली नाहीत. अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात ह्या गावाच्या बाबतीत एकी नाही. सोपे गाव कशाला म्हणावे आणि अवघड गावे कशी ठरवावी याबाबत प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्यावर शिक्षकानी दाद कुठे मागावी ? यावर्षीच्या बदल्याच्या शासन अद्यादेशानुसार प्रत्येक शिक्षकांना आपली बदली होते की काय ? अशी अनामिक भीती मनात निर्माण होऊन या बदली बाबत अनिश्चितता वाढत चालली आहे. या बदली प्रक्रियेत तालुका सेवाजेष्ठता गृहीत न धरल्यामुळे गेल्या वर्षी जे तालुक्यातुन प्रशासकीय बदलीद्वारे आपल्या घरापासून दूर गेले त्यांच्या मनात हळहळ निर्माण झाले आहे. कारण जुन्या नियमानुसार ज्यांची तालुक्यात सेवा जास्त झाली अश्या दहा टक्के लोकांची यादीनुसार बदली होत असे. त्याच बरोबर त्यांची बदली करताना रिक्त जागेचा ही विचार केला जात असे. मात्र नव्या नियमानुसार रिक्त जागेचा विचार न करता बदल्या होणार असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्याच्या जागेवर कोणी बदलीने आला तर ज्याची बदली होणार नाही त्यास ती जागा सोडावी लागणार आहे. म्हणजे त्याची ही बदली होणार आहे. ह्या अनिश्चितपणा मुळे प्रत्येक शिक्षकांच्या मनात धस्स करीत आहे.
वास्तविक पाहता शाळेच्या विकासासाठी शाळेत अध्यापन करणारे शिक्षक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बाजूने त्रस्त नसेल तर शाळेत आपले सर्वस्व अर्पण करून अध्यापन करू शकतो आणि या उलट जर त्याची बदली घरापासून दूर किंवा नको असेल त्या ठिकाणी देऊन सर्व प्रकारचा त्रास झाल्यास खरोखर शाळेचा विकास होईल काय ? हा ही प्रश्नच आहे. निवडक वीस गावाच्या शाळेची नावे या बदलीच्या वेळी शिक्षकांकडून मागविण्यात येत आहेत, याचा अर्थ असा नाही हे संपूर्णपणे त्याच्या मनासारखे आहे. शिक्षकांना एकप्रकारे चलबिचल करण्याचा प्रकार आहे. शिक्षक मंडळी आत्ता तर कुठे डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आपापली शाळा प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करीत असताना ह्या बदलीच्या प्रक्रियेने शिक्षकांना हलवून ठेवले आहे. मे महिन्यात शाळेला सुट्टी असते मात्र बदल्याची प्रक्रिया महिना भर चालते त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील शिक्षकांना कुठे ही जाता येत नाही, हे वास्तव आहे. बदल्याची प्रक्रिया जितकी सोपी करावी असे वाटते तितके ते अवघड आणि क्लिष्ट बनत चालले आहे. यापेक्षा जुनी पध्दत बरी अशी म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment