नागोराव सा. येवतीकर

Saturday, 3 June 2017

सायरन

रमजानच्या महिन्यात रोज सायंकाळी सायरन वाजल्यानंतर मुस्लीम बांधव आपला उपवास सोडतात. ठराविक वेळेला नमाज करण्यासाठी मोठ्या आवाजात सर्वाना सूचित केल्या जाते. पूर्वीचे लोक याच आवाजावरुन दिवसाचे वेळ ओळखून घेत असत. आज सुद्धा सकाळच्या वेळी नमाजाचे आवाज ऐकून लोक अलार्म न लावता उठतात आणि आपल्या कामाला सुरुवात करतात. कारखान्यात मोठा भोंगा वाजले की कामगाराची सुट्टी होते. महत्वाच्या लॉकरला एखाद्याने चोरीच्या उद्देश्याने हात लावल्याबरोबर तेथे सायरन वाजले जाते आणि अधिकारी मंडळी सतर्क होतात. आमदार, खासदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाना विशेष सायरन असलेली गाडी दिली जाते मात्र नुकतेच त्यांची लाल दिव्याची गाडी कमी करण्यात आली. रात्रीच्या वेळी गस्त देणाऱ्या पोलीसाकडे असलेली गाडी विशिष्ट आवाज करीत फिरत असते. आकाशवाणी किंवा दूरदर्शन वरील बातम्या सुरु होण्यापूर्वी एक विशेष धुन वाजते आणि त्यानंतर बातम्या सुरु केल्या जातात. आज वाहिन्याची संख्या खुप वाढली. त्यातल्या त्यात बातम्या देणाऱ्या वाहिन्याची संख्या तितक्याच प्रमाणात वाढले आहे त्यामुळे दूरदर्शनची ती धुन आज ही आपले वेगळेपण जपून आहे. आकाशवाणी केंद्र सुरु होण्याची धुन ऐकल्यावर आज ही वाटते की आकाशवाणी केंद्र आता सुरु होत आहे, मन प्रसन्न होते. शाळेत वाजविली जाणारी घण घण घंटीचा आवाज ऐकून गावातील सर्व मुले शाळेच्या मैदानात जमा होतात आणि तीच घंटा ऐकून सायंकाळच्या वेळी घराकडे पळतात. ट्रिन ट्रिन घंटी ऐकून दारावर उभा असलेला सेवक धावत पळत येऊन साहेबापुढे उभे राहतो. जर साहेबाना जास्त वेळा घंटी वाजविण्याची वेळ आली तर सेवक शिव्या खाल्याशिवाय राहणार नाही हे ही सत्य आहे. म्हणून घंटी वाजल्या बरोबर धावत जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. शाळेच्या मैदानात खेळाच्या शिक्षकांने शिटी मारली की सर्व मुले एका रांगेत येऊन उभे राहतात, ज्याला शिटी ऐकू आली नाही किंवा शिटीचा अर्थ समजले नाही, त्यास काही ना काही शिक्षा होणार हे ठरलेले असते. रेल्वेस्थानकावर थोड्याच वेळात रेल्वे येणार असल्याची सूचना दिली जाते त्याची ही ठराविक पध्दत असते. नियमित प्रवास करणारे लोक त्याचा बरोबर अर्थ लावून स्थानकावर येत असतात. पूर्वी रेल्वे येण्याच्या वेळेत घंटा वाजविला जायचे. रेल्वे स्थानकावरुन सुटते वेळी दोन शिटी देते. यावरून प्रवाशी सहज अंदाज बांधतात आणि आपला प्रवास सुखमय करतात.
घरात स्वयंपाक करीत असताना दाळ किंवा भात शिजवि ण्यासाठी ठेवालेला कुकर तीन शिटी दिली की बंद केल्या जाते. कुकरच्या शिटीकडे लक्ष दिले नाही तर जेवण नाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही घरात असे घड्याळ असतात की जेवढे वाजले असतील तेवढे घड्याळमध्ये टोल पडतात. रात्री बाराच्या सुमारास हे ऐकावे असे वाटत नाही. कोणतीही परीक्षा देण्यासाठी गेल्यावर आपल्या कडे घड्याळ नसेल तरी तिथे दर अर्ध्या तासाला टोल देण्याची व्यवस्था असते त्यावरून परीक्षार्थी आपल्या वेळेचे नियोजन करू शकतो. परिक्षेच्या काळातील टोल आपणास वेळेचे महत्त्व स्पष्ट करून सांगत असते. सिनेमा संपायला आल्या वर ही सिनेमा हॉल मधील घंटी वाजविल्या जाते यामुळे काही मंडळी चित्रपट पाहण्यासाठी येत नसतात तर वातानुकूलित भागात झोप घेण्यासाठी येतात. त्यांना उठवि ण्यासाठी ह्या बेलचा उपयोग होतो असे म्हणने संयुक्तिक ठरेल. आजकाल सर्वाजवळ मोबाईल आवश्यक बाब बनली आहे. विविध रिंगटोन च्या माध्यमातून फोन आल्याची वर्दी दिली जाते. ते आवाज जर बंद केले तर फोन आल्याची सूचना मिळत नाही आणि संवाद होत नाही. या मोबाईल मध्ये सर्व बाबी पुन्हा आठवण करून द्यावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे एक मेमरीयोबल वस्तू झाले आहे. पूर्वी घराघरात टेलीफोनची घंटी वाजली जायची आणि हैलो म्हणून संवाद सुरु व्हायचे. आज टेलीफोनची घंटी फार दुर्मिळ झाले आहे. रास्त्याने जात असताना लोक बाजूला सरकले जावे म्हणून सायकलस्वार आपल्या सायकलची घंटी वाजवित असे. त्यानंतर मोटरसायकल आली ज्याला मोठा हॉर्न बसविन्यात आले. त्यानंतर मोटारकार, ट्रक, बस यासारखी मोठी वाहने आली. तेंव्हा प्रत्येकाचे हॉर्न वेगवेगळे. दुरवर कुठे तरी टिन टिन असा आवाज ऐकू आला की जवळपास एखादे मंदीर असल्याची जाणीव होते. मंदिरात जाऊन देवळातील घंटा वाजविली नाही तर रुख रुख लागते. मोठ्या शहरात कचरा गोळा करणारी गाडी असते. प्रत्येक नगर, वॉर्ड किंवा गल्लीमध्ये जाऊन कचरा गोळा केल्या जाते. त्यासाठी विशिष्ट कचऱ्याची घंटी किंवा शिटी वाजविली जाते तेंव्हा घरातील लोक आपला कचरा त्या गाडीत टाकू शकतात. हे असे आवाज म्हणजे लोकांचे लक्ष वेधुन घेणे होय.
विविध पक्षी आणि प्राणी विविध आवाजाद्वारे एकमेकाला सूचना देऊन एकत्र येतात. त्यांचा आवाज त्यानाच कळतो. जे नेहमी जंगलात राहतात त्यांना त्यांच्या आवाजाचे महत्त्व लक्षात येते. मृग नक्षत्र सुरु होत असताना एक पक्षी विशिष्ट आवाज करतो आणि शेतकऱ्याला म्हणतो पेरते व्हा. तो पक्षी असा आवाज दिल्या शिवाय पूर्वी लोक शेतात काही पेरत नव्हते . तो पक्षी त्यांचा खरा साथीदार होता. आज ही तो पक्षी त्या वेळेला पेरते व्हा म्हणून संदेश देत असतो पण त्यांच्या संदेशाकडे कुणाचे ही लक्ष नाही. जो तो धावत्या युगात सुसाट धावत आहे. त्यामुळे कधी कधी नुकसान देखील होत आहे.
रात्रीच्या वेळी कुत्रे जास्त भूंकु लागले किंवा रडण्याचा आवाज काढले की, म्हातारी माणसे म्हणायचे आज कुणी तरी देवघरी गेलं. सकाळी उठले की बातमी यायची हमखास. आज असे काही घडत नाही किंवा घडत ही असेल पण कोणा जवळ वेळ आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायला. पूर्वी गावात काही महत्वाची बातमी असली की दवंडी दिली जायची ज्यामुळे काही बातमी कळायाची मात्र आज ते ही बंद आहे. काही गावात चालू आहे. भूक लागली की लेकरु कशी रडते अगदी तसेच वासरु देखील सायंकाळ होत आले की हंबरडा फोडते आणि आपली माय म्हणजे गायीला बोलविते आणि गाय आवाज ऐकून गोठ्याकड़े पळत येते. लहान मूल जास्त रडू लागले की आपण वेगवेगळे आवाज काढून त्याचे मन रिझविण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक आवाजाला प्रसंगानुरूप वेगवेगळे महत्त्व आहे. राष्ट्रगीताची धुन कानावर पडल्या बरोबर आपण आपोआप उभे राहतो हे राष्ट्रावरील प्रेमापायी होय. असे समाजात विविध सायरन, आवाजाचा अनुभव येतो ज्यावरुन आपले रोजचे व्यवहार चालत असतात.
- नागोराव सा. येवतीकर,
मु. येवती ता. धर्माबाद

No comments:

Post a Comment