नागोराव सा. येवतीकर

Saturday, 3 June 2017

*सरकारी शाळेतच प्रवेश द्यावा*

जून महिना उजाडला की सर्वत्र प्रवेश प्रक्रियेस आरंभ होतो. पालक मंडळी या महिन्यात खुप चिंतातुर असतात विशेष करून पहिल्या वर्गात प्रवेशित असणारे मुलांचे पालक. तेंव्हा यावर्षी आपल्या पाल्याना पहिल्या वर्गात प्रवेश देणाऱ्या पालकाना नम्रतेची विनंती आहे की आपल्या मुलाला कोणत्याही शाळेत प्रवेश देण्यापूर्वी थोड़ा वेळ तरी विचार करा. आज तुम्ही विचार करून घेतलेला निर्णय तुमच्या लेकरांसाठी भविष्य ठरणार आहे. तो चांगला भविष्य असावा असे वाटत असेल तर आपल्या मुलांना प्रवेश देण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपले मूल साडे पाच वर्ष पूर्ण केले आहे काय ? जर नसेल तर एक वर्ष वाट पाहण्यात शहानपण आहे. कारण त्या वयोमानानुसार अभ्यासक्रम तयार केला जातो. एक दोन वर्ष सोपे आणि बरे वाटते पण त्या पुढील अभ्यासक्रम झेपत नाही. म्हणून योग्य वयात मुलांना शाळेत प्रवेशित केलेले केव्हाही योग्य. घराजवळील शाळेत प्रवेश देण्याचा प्रथम विचार करावा. पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय साधारणपणे सहा वर्षाचे असते. या वयातील मुलांना घरा पासून दूर ठेवल्याने त्यांच्यावर शारीरिक व मानसिक त्रास होतो तर पालकाना मुलांच्या रोजच्या जाण्या-येण्यासाठी रिक्षा करावी लागते म्हणजे आर्थिक झळ सोसावे लागते. याउलट घराजवळ असलेल्या शाळेत आपले मूल प्रवेशित केल्याने सर्व बाबी सोइस्कर घडत असतात. आपल्या माघारी आपले घरची मंडळी देखील देखरेख करू शकतात.  मुलांना सुद्धा शाळेला जाणे किंवा येणे कंटाळवाणे वाटत नाही. भविष्यात त्याची चांगली प्रगती होऊ शकते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्यामुळे आज इंग्रजीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, यात शंका नाही. मात्र आपल्या मुलांना इंग्रजी आले नाही तर त्याचा टिकाव लागेल की नाही अशी शंका किंवा समस्या आजच्या पालकांच्या मनात निर्माण होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपले मूल तग धरून रहावे म्हणून प्रत्येक पालक आपल्या मुलांना अगदी लहान वयापासून इंग्रजी शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्रवेश देत आहेत. प्ले ग्रुप, नर्सरी, एल के जी आणि यू के जी असे अभ्यासक्रम झाल्या वर त्यास पहिल्या वर्गात प्रवेश दिला जात आहे. खरोखर इतक्या लहान वयापासून मुलांना बांधून ठेवणे योग्य आहे काय ? त्याला मुक्तपणे खेळू द्यायचे नाही म्हणजे त्यांच्या खेळावर गदा आणण्याचे काम पालक म्हणून आपण करीत आहोत. आपली आर्थिक क्षमता आणि मुलांची बुद्बिमत्ता या बाबीचा विचार करून मुलांना प्रवेश देणे योग्य वाटते. काही शाळेत बाहेरील सौंदर्याने आकर्षित करतात. मात्र प्रत्यक्षात तिथे कसलीच गुणवत्ता नसते. म्हणून दिसण्या पेक्षा असण्याला महत्त्व द्यावे.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा ही सध्या कात टाकत आहेत. बहुतांश शाळा डिजिटल स्वरुपात समोर येत आहेत. शाळेत लोकांचा सहभाग देखील वाढतो आहे. पूर्वी प्रमाणे या शाळेचा दर्जा आत्ता राहिला नसून शाळेतील सर्व विद्यार्थी प्रगत होण्याकडे शासनाच्या अधिकारी पासून कर्मचाऱ्यापर्यंत प्रयत्न करीत आहेत. विविध उपक्रम, प्रकल्प आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तीला वाव दिला जातो. मुलींना आणि मागासवर्गीयासोंबत दारिद्रयरेषेखालील मुलांना मोफत गणवेष दिला जातो. दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली जाते. पहिल्या वर्गा पासून सेमी इंग्रजी शिकविण्याची देखील सुरुवात या शाळेत करण्यात आली आहे. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांचे वारंवार शाळेना मार्गदर्शन मिळत राहते आणि या अधिकारी लोकांच्या नियंत्रणा मुळे शाळा व्यवस्थित वेळेवर भरतात आणि सुटतात. तसेच दर पंधरा - वीस दिवसांनी गुणावत्तेची तपासणी देखील केली जाते. या शाळेत अध्यापन करणारे शिक्षक स्वतः खुप हुशार आणि बुद्धिमान असल्यामुळे ते विद्यार्थ्याना उत्तम ज्ञान देवू शकतात. या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकाना शासन विविध कामाला जुंपतो हे जरी सत्य असेल तरी त्या वेळेमधून ही येथील शिक्षक जीवाचे रान करून मुलांना घडविण्याचे काम करतात, हे सत्य आहे. या शाळेतील एखादा शिक्षक चुकी चे वागत असेल तर सर्व शिक्षक एकाच माळेचे मणी समजून सर्वाना दोष देण्यात काही अर्थ नाही. एक वेळा त्यांच्या वर विश्वास टाकणे आवश्यक आहे. आजपर्यंत जे कोणी वर्ग एकचे अधिकारी झाले आहेत ते सर्व जिल्हा परिषद च्या शाळेत शिक्षण घेतले आहेत, हे ही विशेष आहे. म्हणून पालकानी एक वेळ जरूर विचार करावे आणि जवळच्या जिल्हा परिषद च्या शाळेत आपल्या पाल्याना पहिल्या वर्गात प्रवेश देऊन मुलांचे उज्जवल भविष्य बनवावे.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद

No comments:

Post a Comment