नागोराव सा. येवतीकर

Sunday, 30 April 2017

जीवनात श्रमाचे महत्त्व

            जीवनात श्रमाचे महत्त्व

ज्या युगात फक्त बटन दाबले की, चुटकीसरशी अनेक कामे होतात, अशा संगणक युगात आज आपण सर्वजण वावरत आहोत. त्यामुळे काम करून घाम गाळणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. काम करणे हे कमीपणाचे मानले जात असून शारीरिक कष्ट करणाऱ्या श्रमिकांना यंत्र युगाच्या काळात निकृष्ट मानल्या जात आहे आणि बसल्या ठिकाणी बौद्धिक कष्ट करणाऱ्याना श्रेष्ठत्व दिल्या जात आहे. परंतु असे करणे म्हणजे एक प्रकारे श्रमाचा व त्या श्रमिकांचा अपमान नव्हे काय ? बौद्धिक कष्टाइतकेच शारीरिक कष्ट सुध्दा महत्वाचे आहे. काबाडकष्ट केल्यामुळेच मानवाची प्रगती होते. आयत्या वाढलेल्या कुरणात चरणे एखाद्या पशुला शोभते माणसाला नक्कीच नाही. त्यास्तव कष्ट वा श्रम मग ते कोणतेही असो ते मनापासून करावे. वरवर केलेल्या कामात आनंद तर मिळत नाहीच तसेच त्याचे फळ ही मिळत नाही. मनातून केलेल्या कामाची कुणालाही बोझा वाटत नाही. मात्र तेच काम अनिवार्य किंवा बंधनात टाकले की कधी एकदा संपते असे वाटते. उदा. शाळेतील मुलांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासाचे किंवा इतर काम लावल्यास ते त्यात तल्लीन होऊन काम करतात. याउलट हे काम केलेच पाहिजे असा हेका धरल्यास किंवा बंधन टाकल्यास तो अभ्यास किंवा इतर काम त्याला कंटाळवाणे व नीरस वाटते
एखादे काम सुरु करण्यापूर्वी त्याचे ध्येय ठरविणे  सुद्धा गरजेचे आहे. ध्येयाविना काम करणे म्हणजे ढोरासारखे काम करण्यासारखे आहे. त्यामुळे उचित ध्येय प्राप्तीसाठी नियोजनपूर्वक केलेले कामच यशस्वी होऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम कामाचे नियोजन करणे महत्वाचे ठरते. शालेय जीवनातील विद्यार्थ्याना या नियोजनाची ओळख झाली तर त्यांचे प्रत्येक काम यशस्वी होताना दिसून येते. बहुतांश विद्यार्थी दहावी वा बारावीच्या परीक्षा तोंडावर आली किंवा त्या वर्षी भरपूर मेहनत घेतात, अभ्यास करतात, सराव सुध्दा भरपूर करतात. मग अशा विद्यार्थ्याना घवघवीत यश मिळेल असे सांगता येईल काय ? कारण तहान लागली म्हणून विहीर खणण्यापेक्षा आपणास कधी तरी तहान लागणार आहे म्हणून जो आधीच विहीर खणुन ठेवतो त्याची खऱ्या अर्थाने तहान भागते. त्यास्तव फक्त महत्वाच्या वर्षी अभ्यास करून चालणार नाही. त्यासाठी प्रारंभी पासून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात नक्कीच यश मिळू शकते. मनात नुसते संकल्प वा स्वप्नाचे महल बघितल्यास आपले कोणतेच मनोरथ पूर्ण होणार नाही. दे रे पलंगावरी भावनेतून आपण विचार करत असू तर ते आपल्या जीवनासाठी नक्कीच घातक आहे. त्यासाठी नेहमी प्रयत्न करत रहाणे अत्यंत गरजेचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न केल्यास वाळूतून देखील तेल गळू शकते. त्यासाठी सर्वप्रथम स्वतः ची कामे स्वतः करायला शिकणे महत्वाचे आहे.
कुटुंबात वावरताना एक बाब प्रकर्षाने जाणवते, लहान असलेली मुले त्यांना कसल्याच प्रकारच्या कामाची जाणीव नसताना आपण मुलांची आणि मुलींच्या कामाची विभागणी करतो. घरामध्ये एखादा मुलगा ज्याला कामाची काहीच कल्पना नाही असा तो झाडू घेऊन घर साफ करीत असेल तर घरातील आईं किंवा जे कोणी श्रेष्ठ असतील ते नकळत म्हणून जातात, अरे ते झाडू ठेव बाजूला, ते तुझं काम नाही. अश्या अनुभवातुन मग मुलांच्या आणि मुलींच्या कामाचे वर्गीकरण सरळ आपल्या घरापासून जे सुरु होते ते देशाच्या संसदेच्या दारापर्यंत जाऊन पोहोचते. कोणत्याही कामाची अंगवळण जर टाकायचे असेल तर त्यांना सर्व प्रकारची कामे देणे वा सांगणे गरजेचे आहे. घरातील केर साफ करणे, भाजी निवडणे, सांडपाणी भरणे, अंथरुण टाकणे व त्याचा घड्या करणे, आंघोेळीसाठी पाणी गरम करणे, छोटे कपडे धुणे, कपड्यास इस्त्री करणे, दुकानातून सामान आणणे, बाजारातून भाजीपाला आणि वर्त्तमानपत्र आणणे, इत्यादी सर्व कामे वर्गीकरण न करता घरातील मुलां-मुलींना लावल्यास त्यांच्यात या कामाच्या बाबतीत विभागणी होणार नाही. ज्या घरात फक्त मुलगा किंवा मुलगीच असेल तर त्या घरात कामाचे वर्गीकरण करता येते काय ? नक्कीच नाही. या लहानपणाच्या वयात जर मुलांना कामाच्या बाबतीत स्वावलंबी बनविलो तरच त्याचे दूरगामी चांगले परिणाम निश्चितपणे बघायला मिळतात. याबाबतीत भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे जीवन चरित्र वाचले तर लक्षात येते की, त्यांनी जीवनात काम वा श्रमाला महत्वाचे पहिले स्थान तर दिलेच शिवाय ते स्वतःची कामे स्वतः पूर्ण करण्यात धन्य मानित म्हणूनच तर ते भारताच्या महत्वपूर्ण अशा पंतप्रधान पदापर्यंत पोहोचु शकले.
समर्थ रामदास स्वामी यांनी कष्टाची महती सांगताना ' कष्टेविना नाही फळ ' असे स्पष्टपणे सांगितले आहे. खरे तर सध्याच्या काळात घाम गाळून कष्ट करणाऱ्याची संख्या खुपच कमी झाली आहे, असे वाटते. सर्व काही जागेवर विनासायास मिळावे अशीच प्रत्येकाची अपेक्षा बनत चालली आहे. समाज मनाची ही स्थिती बदलण्यासाठी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंतच्या कष्टाच्या गोष्टी वदवून घेऊन संस्कार करण्याचे प्रयत्न होतात परंतु प्रत्यक्ष कृती मात्र शून्य असते. बऱ्याच जणाना कासल्याच प्रकारचे कष्ट न करता आपले पोट भरले जावे असे वाटते. यात बिनभांडवली धंदा म्हणजे भीक मागणे. शरीर धड धाकट असून देखील अनेक जण भीक मागताना दिसतात. कष्ट करणे जीवावर येत असल्याने दुसऱ्यांस मागून खाणे, दुसऱ्यांसमोर मदतीसाठी हात पसरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा एखादे धार्मिक स्थळ ही त्यांची ठरविलेली ठिकाण आहेत. जेथे भिकाऱ्याचा वावर सर्वात जास्त होतो. या बाबीचा त्रास प्रवाश्याना आणि भाविकाना होतो. पण यावर काही उपाययोजना होत नाही. हे विदारक चित्र पाहून मन विषण्ण होते. यातील काही जण खरोखरच अपंग असतील ही वा काही जणाना काहीच करता येत नाही. पण अश्याची संख्या फार कमी आहे. यापेक्षा धडधाकट भिकाऱ्यांची भरणा अधिक असतो. अशा लोकांना भीक देऊन आपण एकप्रकारे त्यांच्या या व्यवसायाला प्रोत्साहन देत असतो, असे नाही का वाटत ? परीक्षेत कॉप्या करून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी विना कष्टाचे फळ मिळावे अशी अपेक्षा करणाऱ्याचे आणखी एक उदाहरण. लॉटरीने नशीब खुलते म्हणून घरातील एक-एक भांडी-कुंडी विकून केवळ लॉटरी खेळणारे अनेक महाभाग सापडतात. कष्ट करण्याची जणू त्यांची काहीच तयारी नाही असे ही काही जण समाजात भेटतात. सामान्यांची अशी वृत्ती का व्हावी याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फुकटची मिळविण्याची वृत्ती सोडून प्रत्येकाने कष्टाची सवय लावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
भगवान गौतम बुध्द यांनी आळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हटले आहे. जी माणसे कष्टाळू आणि मेहनती असतात त्यांना रिकामा वेळच मिळत नाही. सदा न कदा ते कामात व्यस्त असतात. तर त्याउलट आळशी माणसे एक तर काम करीत नाहीत आणि करणाऱ्या व्यक्ती ला करू देत नाहीत. म्हणून अश्या लोकांपासून चार हात दूर राहणे केव्हाही चांगले असते. रिकाम्या डोक्यात भूताचा वास असतो. काही काम नसले की नसती उठाठेव केली जाते जे की जीवनाच्या प्रगतीत खुप मोठे अडसर ठरते. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत प्रत्येकाचे कष्ट करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. लहान मुलांचे कष्ट म्हणजे आपला शाळेतील अभ्यास वेळेवर पूर्ण करून घरकामात आई-बाबांना मदत करणे. घरातील लहान सहान कामे स्वयंस्फुर्तीने पूर्ण करणे, काम करणाऱ्या लोकांविषयी मनात आदर ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असूच शकत नाही. प्रत्येक काम आपणास काही तरी देऊन जातो. बहुतांश ठिकाणी शालेय वयातील मुले हॉटेल मध्ये किंवा इतरत्र काम करताना दिसून येतात. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते अगदी लहान वयात कष्ट करण्यास सुरु करतात. त्यामुळे फार कमी वयात वयस्कर वाटतात. ज्या वयात जे काम करायला हवे तेच काम केल्यास शरीर सुध्दा साथ देते. बालमजूरी प्रतिबंधक कायदा असुन देखील बाल कामगारांची संख्या अजुन देखील कमी झाले नाही. नोकरी करणाऱ्या कर्मचारी मंडळीनी प्रामाणिकपणे आपले काम पूर्ण करणे हेच त्यांचे खरे कष्ट आहे. मात्र काही कर्मचारी लवकरात लवकर श्रीमंत व्हावे म्हणून पैश्याच्या हव्यासा पायी लाच घेतात. अश्या लोकांना कष्ट करून कमाविलेल्या पैश्यासारखे या पैश्याची किंमत कळत नाही. वाटेल तसे पैश्याची उधळपट्टी केल्या जाते. त्यामुळे यांच्या घरातील संस्कार सुध्दा लुप्त होतात आणि त्यांची येणारी पिढी निष्क्रिय निघते. कारण त्यांना श्रमाचे महत्त्व कळलेले नसते. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असलेल्या लोकांनाच श्रमाचे महत्त्व कळलेले असते म्हणून तर त्यांना चटनी भाकर देखील गोड लागते आणि इकडे खाण्यास सर्व काही असुन मधुमेह किंवा विविध कारणा मुळे ते खाऊ शकत नाहीत. एकीकडे पोटासाठी पाय पीट होते तर दूसरी कडे खालेले पचविण्यासाठी सकाळी संध्याकाळी पायपीट करावी लागतें.
कोणतेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. काम करणाऱ्या माणसाविषयी प्रत्येकानी आपल्या मनात कृतज्ञता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. आज शारीरिक श्रम करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस घटत चालले आहे
ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सर्वजण बौद्धिक श्रमावर आधारित जीवन जगण्यास सुरुवात केली तर शारीरिक श्रमाने उत्पादित होणारे पदार्थाची गरज जे जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे ते काम कोण करणार ? प्रत्येक जण कामाची टाळाटाळ करीत असेल तर भावी आयुष्य कसे असेल ? याचा विचार देखील फारच कठीण वाटते. म्हणून उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी असो वा इतर छोटे मोठे काम करणारे कामगार यांच्याविषयी त्यांच्या श्रमाचे मोल पैश्याच्या मापामधून न बघता कधी तरी माणुसकीच्या नात्यातून पाहायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे असे वाटते. महात्मा गांधीजीनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही कामाची सुरुवात स्व म्हणजे आपल्या पासून करावी. आपण एक जण पुढे पाऊल उचला हजारो पाय तुमच्या सोबत येतील.
आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन त्यानिमित्त आपणास शक्य होईल ते काम आपण तर करावेच त्यासोबत श्रम, काम करणाऱ्या लोकांविषयी मनात आदर ठेवू या आणि त्यांचा सन्मान करू या या दिवसाचे हेच खरे फलित आहे असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

17 comments:

  1. वा!!! तुम्ही खुपच छान लिहितात।। अशीच प्रगति रहू दया Sir

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान लिहिले sir
      Thank you so much to explain this
      💐💐👍👌

      Delete
    2. Very nice 👍👍👌👌

      Delete
  2. वाचायला बोअरिंग 😒👎

    ReplyDelete
  3. Writing for comments 😣bad worst your daddy 🤦🤦

    ReplyDelete
  4. What a essay it's great & true brilliant sir 👏🏻👌🏻

    ReplyDelete
  5. What a essay it's great & true brilliant sir 👏🏻👌🏻

    ReplyDelete
  6. सुरेख आणि सुंदर लेख आहे सर। ।

    ReplyDelete
  7. Very amazing sir please give more topics it is very helpful for me for the boards.🙌🙌

    ReplyDelete