नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 25 April 2017

नासा नावात जादू ........

कल्पतरू सम तो

नासा नावात जादू ........

स्व-अनुभवावरून संपूर्ण जग पारखता येते, हे मी स्वतः सिध्द करते. स्वतंत्र जीवन जगत असतांना अनेक व्यक्तींचे अनेक अनुभव आलेत. पण त्यातील काही त्यांच्या वर्तणुकीमुळे नजरेतून उतरल्या, तर काही व्यक्ती माझ्या जीवनाच्या दिशा-दर्शक गुरुवर्य झाल्यात त्यामुळे मला त्या एकप्रकारे कल्पतरु समानच आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नासा सर

ही गोष्ट साधारणपणे एका वर्षापूर्वीची आहे. त्यास मी अविस्मरणीय असे म्हणेन साहित्य सेवा देणारा ग्रुप साहित्य दर्पण याला मी जुळले, त्यातील साहित्यकांचा एकमेकांबद्दल आदर बघून मी अलगद भारावून गेले. कारण इंटरनेट मुळे बरेच काही आमचे सखी ग्रुप पण उदयास आले होते. मनामनातील संवेदना नेटच्या माध्यमातून देवाण-घेवाण सहज होत असते.
पण या अनोख्या साहित्य दर्पण या ग्रुप मध्ये साहित्य सेवा ही स्पर्धांच्या माध्यमातून घेतली जाते, त्यामुळे सर्वांची प्रगल्भ लेखणी नजरेत खेळते आणि मनात रुजते देखील. साहित्यकांच्या रचना उच्चांक निदर्शनास येत असतात. मी या ग्रुप मध्ये नवीन असतांनाच पहिल्याच दिवशी मला अचानक एक मेसेज दिसला, तो असा होता ' शक्यतोवर स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा, लेखनासाठी सर्वांना शुभेच्छा आणि खाली लिहिले होते  नासा .
मला या नासा शब्दाविषयी आणि नावाविषयी फार कुतूहल वाटले आणि आश्चर्य पण. नजरे समोर NASA म्हणजे National Aeronautics and Space Administration असे दिसू लागले. पण या  नावामुळे मी जास्त संभ्रमात पडले हे नक्की. या सरांचे नाव नासा कसे ? हे नंतर मी ग्रुप मध्ये माझ्या सखी स्नेहींना विचारून शोधून काढले.
हेच ते नासा सर साहित्य ग्रुपचे ऍडमीन आहेत हे तोवर कळून चुकले होते. कारण हे नासा सर खूप कमी वेळा ग्रुपवर दिसायचे, अगदी मोजक्या शब्दात सहज उत्तर देऊन ते सर्वांच्याच मनात रुजले होते. कारण मी त्यांच्या नावामुळे आधीच प्रेरित झाले होते, त्यातील त्यांची विचारशक्ती पुन्हा मला वेड लाऊन गेली. पण तरीही मी त्यांच्या नावाचा विचार करू लागले नी अखेर एके दिवशी त्यांच्या मित्राकडून संपूर्ण नाव कळले. ते असे नासा म्हणजे नागोराव सायन्ना येवतीकर असे. खरोखर हा योगायोग म्हणावे लागेल त्यांचे नावातील पहिले अक्षर आणि वडिलांच्या नावतील पहिले अक्षर मिळून सुंदर असे टोपणनाव तयार झाले.
ओळख नसतांनाही या व्यक्तीने माझ्या मनात अलगद वडील भाऊ असे नाते स्थान मिळवले ते एका साहित्य दरबार वैचारिक लेखस्पर्धेने. साहित्य दर्पण वर लेख स्पर्धा होती, पण माझा लेख मी जसा स्पर्धेकरिता दिला तेव्हा ते काहीच बोलले नाही, पण स्पर्धा संपल्यावर नेमके टाईप करतांना कुठे चुका होतात, कुठे जास्त स्पेस नको, मुद्देसूद लेख कसा हवा याबद्दल त्यांनी मला वैयक्तिक मार्गदर्शन केले. नंतर मी त्यांच्या प्रत्येक लेख-मांडणीचे निरीक्षण केले तर सर्व लेख खुपच सुंदर आणि वाचनीय असतात. त्यांचे लिखाण खरोखर अप्रतिम, कौतुक करायचे तेही नासा सराचे हे काही मनाला पटले नाही. कारण त्यांची लेखणी कौतुक करण्यापलीकडे आहे. हे मी वारंवार त्यांच्या लेखणीतून अनुभवत आले. माझ्या चुका त्यांनी मला वेळीच दाखवल्यामुळे मी आज माझ्या  लेखणीमध्ये समाधानी आहे. अधुन मधून केव्हाही काही माहिती घ्यायची असेल तर ते वेळोवेळी मार्गदर्शन देखील करतात. त्यांचे एक वाक्य माझ्या मनात घर करून बसलेले आहे ते म्हणजे, ' जे सत्य लिहायचे ते बिनधास्त लिहा ' असे हे माझे गुरूवर्य कधी वडीलबंधु झाले हे मला देखील कळले नाही.
ह्याच नासाबंधु विषयी सर्व काही कौतुकास्पद घडत गेले. ते आमच्या साहित्य दर्पण मध्ये सर्वांचे आवडते व्यक्ती देखील आहेत असे म्हणतांना माझ्या मनात कुठलीच शंका नाही. रोज सकाळी प्रसिद्ध होणाऱ्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिन जे की सकाळी जसे पेपर घरी येऊन पडते तसे रोज सकाळी सात वाजता प्रत्येकांच्या व्हाट्सएप्प वर ही पोस्ट ते न चुकता गेल्या दीड वर्षापासून अविरत करीत आहेत. असे त्यांच्या मित्र परिवार कडून कळले. यात ते त्या दिवसाची दिनविशेष पासून ते ताज्या बातम्या , सुविचार, बोधकथा, विचारधारा, गुगली आणि आजचा वाढदिवस द्वारे सर्वाना वाढदिवस ची माहिती असे मनाला वेधणारे लेखन ते रोज लिंकद्वारे देत असतात. लेखन स्पर्धाद्वारे नवनवीन उपक्रम ते घेत असतात, अचानक ग्रुप वर संवेदना ई प्रकाशन करून सर्वाना सरप्राईज दिले आणि सर्वांना लेखनास प्रोत्साहित केले. एकाच व्यक्तीबद्दल आपण एवढे यश संपादन करतांना पुन्हा एका आशेने बघत आहोत, की ही व्यक्ती नेमकी कुठेतरी थांबेल का ? पण नाही थांबणार कारण दिवस-रात्र एक करून ह्या व्यक्तीने समाजाचा सखोल अभ्यास केला, नी सर्व बाबीचा अभ्यास अजूनही चालूच आहे. दिवसाचा एकही मिनिट वाया न घालवणारे हे नासा बंधु नेमके कोणते शिखर गाठणार ? मी याच विचारात असताना मी सहज एके दिवशी प्रश्न केला की तुम्ही तुमच्या जीवनात लिखाणाला सुरुवात कधी केली? तर ते म्हणाले कि दहावीत असतांना पहिला लेख लिहिला, की दहावीची परीक्षा कशी वाटली ? तेव्हा पासून या प्रगल्भ लेखकाचा खरा श्रीगणेशा झाल्याचे समजत आहे.
अश्या या सर्वगुणसंपन्न वडील बंधुला मी अजूनही प्रत्यक्षात भेटलेली नाही. तीच एक खंत आहे, परमेश्वर लवकरच ही भेट घडवेल कारण येत्या काही दिवसात याच सरांच्या कल्पनेतून साकार केलेला पुस्तक प्रकाशन चा सोहळा नांदेड नगरीत होणार आहे. त्यावेळी नक्की भेट होईल असा मला विश्वास नाही तर खात्री आहे.
कारण त्यांच्या शाब्दिक आधाराने सुद्धा कोणाचेही जीवन वळणावर येईल असे हे नासा व्यक्तीमत्व आहे. त्यांचे 2016 या एका वर्षात प्रकाशित लेखाची संख्या शंभरच्या वर गेली असून आतापर्यंत त्यांच्या प्रकाशित लेखाची संख्या 300 पर्यंत पोहचलेली आहे. अजूनही मला त्यांच्या विषयी खूप काही जाणून घ्यायचे आहे, कारण माझ्या काळजात प्रभावीतेज म्हणून ते अखंड राहणार. ही प्रतिभावंत व्यक्ती मला बहीण मानतात, हीच माझी अनमोल कमाई.
नासा बंधूंचे अगदी जवळचे मित्र क्रांती बुद्धेवार आपल्या शब्दात सांगतात की नासा म्हणजे जीव ओतणारे प्रतीक. मित्रत्व म्हणजे काय असते ? हे नासा कडून शिकावे. 40 कि.मी. वरून नासा फक्त मित्राच्या आग्रहखातर निजामबादला येतो, नी मनसोक्त बोलतो, एखाद्या सुगरणीला आणि फाइव स्टार नामांकित हॉटेलला लाजवेल असे रुचकर पदार्थ हेच नासा बंधु करतोय. क्रांती म्हणतात कि त्यांचे हस्ताक्षर बघून माझ्या अक्षरांनी अलगद वळण घेतले. काय हे अफाट क्रांतीमय नासा. कसे आणि किती कौतुक करायचे हे शब्दात सांगणे कठीण.
मी तर या वडील बंधूंचे कौतुक करणार नाही कारण माझे जीवन बदलायला शब्दांच्या पलीकडे या वडील बंधूंचा शाब्दिक आधार तोच माझ्या यशाचा किरण. उत्तम लेखक, कवी, मार्गदर्शक, वृत्त निवेदक, गायक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या या वडील बंधुला आज वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना अखंड करते.

- वृषाली वानखडे, अमरावती

No comments:

Post a Comment