नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 14 June 2016


opening day



*शाळा प्रवेशोत्सवाचा उत्सव*

जून महीना उजाडला की सर्वत्र शाळा प्रवेशाची धामधुम चालू होते. शहरात या प्रक्रियेसाठी किती हालअपेष्टा सहन करावे लागते याची जाणीव शहरात गेल्याशिवाय येणार नाही. पालक  आपल्या मुलाना चांगल्यात चांगली शाळा मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न करतात. वाटेल तेवढे पैसे खर्च करण्याची ही त्यांची तयारी असते. काही शाळेत प्रवेशासाठी रांगाच्या रांगा असतात, मुलाच्या प्रवेशासाठी अनेक जण सुट्टी सुध्दा टाकतात. मोठ्या लोकांची शिफारस पत्र लावतात. मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर लाखो रूपये खर्च करणारे ही पालक आढळून येतात तर एक ही रूपया खर्च न करणारा पालक ही येथे सापडतो. मात्र खेडोपाडी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील प्रवेश प्रक्रिया वेगळीच असते. गरीबाची शाळा म्हणून या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेची ओळख आहे ,त्यामुळे या शाळेकडे लोकांचे आकर्षण व्हावे आणि या शाळेत प्रवेश वाढावा यासाठी शासनच्या शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात उदाहरणार्थ प्रवेश पंधरवडा, लक्षवेधी नमस्कार यासारखे उपक्रम तयार केले जातात आणि त्या अनुषंगाने कार्यवाही केल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढेल अशी प्रशासनाला खात्री आहे.
शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या प्रवेशानिमीत्त प्रवेश उत्सव म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. गावात देशभक्तिपर गीते व नारे देत बालकाची प्रभातफेरी काढणे आणि प्रवेशपात्र मुलांची त्याच्या घराजवळ फूल देऊन स्वागत करून त्याच फेरीतून प्रवेश प्रक्रिया करण्याची योजना खरोखरच मुलाना शाळेत सहजरित्या प्रवेश देऊन जाते. शाळेत आणि परिसरात रांगोळी टाकून वर्ग सजावट केल्यामुळे मुले पहिल्या दिवसापासून उत्साही असतात. शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या नविन अभ्यासक्रम आणि नविन वर्गशिक्षकाची ओळख करून देणे, हा एक चांगला कार्यक्रम होतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे बहुतांश शाळेवर जुन्या शिक्षकांच्या ठिकाणी नविन शिक्षक आलेले आहेत. त्यांची ओळख करून देणे आणि त्यांचे स्वागत करणे यामुळे सर्वाना उत्साह येईल. पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम गवाकरी समक्ष करून, गेल्या वर्षी अभ्यासात चांगली प्रगती केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचा गौरव केल्यास त्याचे फायदे आपणास वर्षभर अनुभवास येतात. शालेय गणवेश वाटप करण्याचा कार्यक्रम सुध्दा याच अनुषंगाने पार पाडल्यास मुले अजुन आनंदुन जातील. अर्थातच शाळेचा पहिला दिवस कोणालाही अवजड वाटू नये ,याप्रकारे खेळीमेेळीच्या वातावरणात पूर्ण केल्यास शाळेत नवागत येणाऱ्या बालकावर अनुकूल परिणाम बघायला मिळतात. याउलट जर चित्र शाळेत पाहायला मिळले तर त्या नव्याने प्रवेश करणाऱ्या मुलांवर प्रतिकूल परिणाम होऊन मूल हळूहळू शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वीच्या काळात शाळेत येणारी मुले सदा रडतच येत होती. आंगणवाडी किंवा बालवाडी नावाचा प्रकार फार कमी होता. मुलाना शाळेचा अजिबात गंध राहत नव्हता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही , तीन वर्षाच्या मुलापासून शाळेला सुरुवात होत आहे त्यामुळे पहिल्या वर्गात येणारा मुलगा हसत खेळत प्रवेश करीत आहे. या गोष्टीचा विचार करून शासनाने प्रत्येक शाळेला आंगणवाडी किंवा बालवाडी जोडल्यास शाळेच्या गुणवत्तेत आणि शैक्षणिक प्रगतीत नक्कीच वाढ होईल. सर्वाना मोफत शिक्षणाच्या कायदे मध्ये सुधारणा करून सहा ऐवजी तीन ते चौदा वयोगट करणे भविष्यात अत्यंत आवश्यक आहे असे वाटते.
मुलाना प्रवेश करणे या उपक्रमाची जबाबदारी ही शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाची आणि शिक्षकांची तर आहेच शिवाय गावस्तरावरील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच ,उपसरपंच व इतर सदस्य , महिला बचतगट आणि इतर समित्त्या यानी यात सहभाग घेतले तर उपक्रम पूर्णपणे यशस्वी होईल. गावाच्या विकासासाठी शाळेने पूर्ण प्रयत्न करावे तर शाळेच्या विकासासाठी गावातील प्रत्येक घटकानी मदतीच्या स्वरुपात उभे राहिल्यास गावातील शाळा नावरूपास येण्यास वेळ लागणार नाही.
कोणत्याही कामाची सुरुवात चांगली झाली तर अर्धे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असे म्हटले जाते त्यामुळे शाळा प्रवेशोत्सव आपण सर्वानी अगदी आनंदात आणि उत्साहात सहभागी झालात म्हणजे मुलाना शाळेच्या वातावरणचे दडपण वाटणार नाही आणि त्याच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण होईल.

नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती पो. येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड 
09423625769

No comments:

Post a Comment