नागोराव सा. येवतीकर

Sunday, 21 June 2026

पुस्तक परिचय - ( Book Review )

हरवलेला माणूस शोधून देणारे पुस्तक " माणूस द्या.. मज माणूस "
माणूस कोणाला म्हणावे ? माणूस म्हणजे फक्त दोन हात, दोन पाय आणि बोलण्याची क्षमता असलेला जीव नव्हे.
ज्याच्या मनात प्रेम, दया, क्षमा, शांती, करुणा, संवेदना आणि इतरांविषयी आदर असतो, त्यालाच खरा माणूस म्हणावे.
स्वतःसाठी जगणे सहज शक्य असते; पण दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदत करणे, सत्य आणि प्रामाणिकपणाने वागणे, चूक मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करणे, ही खरी माणुसकीची लक्षणे आहेत.
ज्याच्याकडे पैसा, पद किंवा सत्ता आहे तो मोठा असू शकतो; पण ज्याच्याकडे चांगले विचार, नम्रता आणि माणुसकी आहे तोच खरा “माणूस” असतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात, 
“जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा.”
यातूनही हेच स्पष्ट होते की, दुसऱ्यांच्या दुःखात साथ देणारा आणि प्रेमाने वागणारा व्यक्तीच खरा माणूस असतो.
सध्याच्या धावपळीच्या युगात माणसातली माणुसकी लयाला गेली आहे, याचा प्रत्यय रोजच्या वर्तमानपत्रातील बातम्यावरून आणि आपणाला येत असलेल्या अनुभवावरून लक्षात येत आहे. आज समाजातून " माणूस " हरवला आहे आणि तो " माणूस " शोधण्यासाठी विनोद पंचभाई यांनी माणूस द्या... मज माणूस हे पुस्तक लिहिलं आहे. प्रसिद्ध साहित्यिक विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे “ माणूस मोठा की पैसा मोठा
प्रश्न अजूनही उभाच आहे. ” आजही समाजात माणसापेक्षा पैश्याला जास्त महत्व दिले जाते. जिथे पैसा आहे तिथे माणुसकी औषधाला देखील शिल्लक राहत नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. अमाप संपत्ती असूनही ज्याचे पाय जमिनीवर असतात अशी व्यक्ती फार कमी बघायला मिळतात. 
लेखकांनी आपल्या पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता या पुस्तकातील अनेक रचना अगदी समर्पक रित्या वापरून माणसाच्या स्वभावाचे चित्रण केले आहे. या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे ही तुकडोजी महाराजांची प्रार्थना प्रत्येक व्यक्तीने नुसते तोंडपाठ करून चालणार नाही तर त्याप्रमाणे कृती देखील आवश्यक आहे. तेव्हा कुठं माणुसकी जिवंत राहू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. संत कबीर यांचे दोहे देखील मानवाला चांगले जीवन जगण्याचा संदेश देतात. लेखकांनी योग्य प्रकारे संत कबीर यांच्या दोह्याचा वापर करून चांगले जीवन जगण्याचा अर्थ सांगितला आहे. संत कबीर म्हणतात, “बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय;
जो मन खोजा आपना,
मुझसे बुरा न कोय.” मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. माणूस स्वतःचे दोष लपवितो आणि दुसऱ्याचे दोष दाखवत सुटतो. ज्यावेळी आपण कोणाकडे बोट दाखवतो पण आपण हे विसरतो की चार बोटं आपल्याकडे निर्देश करतात. म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या अंगातील चांगल्या गुणाकडे बघावं आणि त्याचा स्वीकार केल्यास आपली प्रगती होते असा संदेश ते या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
माणसाचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित नसावे. तो कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्याशी जोडलेला असावा. प्रेम, माया, सहकार्य, दया, करुणा, प्रामाणिकपणा आणि माणुसकी हे गुण माणसाला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. एखाद्याकडे पैसा, सत्ता किंवा प्रसिद्धी असली तरी त्याच्यात माणुसकी नसेल तर त्याचे जीवन अपूर्ण वाटते. म्हणून जीवनात “माणूस” होणे हेच सर्वांत मोठे यश आहे, हे यापूर्वी संतांनी सांगून गेले आहेत. 
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग खूप पुढे गेले आहे. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, अनेक शोध लावले आणि जीवन अधिक सुखकर केले. पण या प्रगतीसोबत माणसामधील संवेदनशीलता कमी होत चालली आहे. स्वार्थ, मत्सर, अहंकार आणि द्वेष यामुळे अनेकदा माणूस माणसापासून दूर जात आहे. एकाच छताखाली असलेल्या चार माणसांमध्ये आज संवाद कमी झालेलं दिसून येत आहे. अशा वेळी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीने एखाद्याला जवळ घेण्याची गरज अधिक जाणवत आहे.
लेखकांच्या मतानुसार चांगल्या विचारांनीच माणूस घडत असतो. सकारात्मक विचार करणाऱ्याची प्रगती लवकर होताना दिसून येते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. लहान मुले ही निरागस असतात पण ते जसे जसे मोठे होत जातात तसे तसे त्यांच्यात ईर्षा, द्वेष, राग, लोभ आणि अहंकार इत्यादी दुर्गुण चिकटत जातात. त्यामुळे त्याच्यातील माणूसपण हरवत जाते. आज समाजात शिक्षणाचा एवढा प्रसार होऊन देखील बुवाबाजी, कर्मकांड आणि अंधश्रद्धा खूप वाढू लागली आहे. त्यामुळे संधीसाधू लोकांपासून सावध होण्याचा सल्ला देखील वाचकांना देतात. 
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील लहान मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत, याची खंत देखील लेखकांनी व्यक्त केली आहे, जे की योग्य वाटते. एक खोटं लपविण्यासाठी शंभरवेळा खोटं बोलावे लागते. म्हणून सजन रे झूठ मत बोलो या प्रकरणात सत्याचे महत्व स्पष्ट केले आहे. लेखक स्वतः डावखुरा असल्याने जगातील 12 टक्के डावखुरा असलेल्या व्यक्तिमत्वाविषयी छान माहिती दिली आहे. वेळ कोणासाठी थांबत नसते. त्यामुळे वेळेला महत्व द्यावे असा सल्ला देतात. देशभक्ती दाखवण्यासाठी सीमेवर जाऊन कार्य करावे लागते असे नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपण आपले देशावर असलेले प्रेम दाखवू शकते यांचे सुंदर उदाहरणं दिले आहेत.
शिक्षण माणसाला ज्ञानी बनवते, पण संस्कार त्याला चांगला माणूस बनवतात. त्यामुळे लहानपणापासूनच चांगले विचार, शिस्त, आदर आणि सहकार्य यांचे महत्त्व मुलांना शिकवले पाहिजे. बालपणी केलेले संस्कार चिरकाल टिकतात, म्हणून त्या छोट्या वयात मुलांवर संस्कार टाकण्याची जबाबदारी पालकांची, शिक्षकांची आणि समाजाची आहे. कारण चांगल्या माणसांमुळेच चांगला समाज घडतो, देश घडतो. खरा माणूस तोच असतो जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, गरजूंना मदत करतो आणि सर्वांना समानतेने वागवतो. जात, धर्म, भाषा किंवा श्रीमंती यापेक्षा “माणूस” हा धर्म मोठा आहे. समाजात शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे, असा मौलिक संदेश अनेक प्रकरणात दिसून येतो.
या पुस्तकात माणसाने माणुसकी कशी जपावी याबाबत एकूण 37 प्रकरण आहेत. प्रत्येक प्रकरण वाचल्यानंतर चिंतन आणि मनन करण्याजोगे आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्लोगन दिलेलं आहे, ज्यामुळे त्या प्रकरणाचा सार लक्षात येतो. आबालापासून वृद्धापर्यंत सर्व प्रकारच्या वाचकासाठी हे पुस्तक एक समुपदेशनाचे काम करणारे आहे. सोपी वाक्यरचना, कमी शब्दात जास्त महत्व सांगणारे प्रकरण, प्रसंगानुरूप दाखले, उदाहरण, अनुभव आणि प्रसंगामुळे हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही असावे असे आहे. उदास मनाला प्रफुल्लित करणारे, जीवन नकोसे वाटणाऱ्या व्यक्तीला पुस्तक वाचल्यावर जीवन हवेहवेसे वाटेल इतके मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळेल. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ लाजवाब आहे. पुस्तकाविषयी सर्व काही मीच सांगण्यापेक्षा प्राजक्त प्रकाशन द्वारे प्रकाशित झालेले हे पुस्तक 9923797725 या क्रमांकावर संपर्क करून नक्की मागवावे. लेखकांना पुढील लेखनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...!

पुस्तकाचे नाव :- माणूस द्या.. मज माणूस..
लेखक - श्री विनोद श्रा. पंचभाई 
प्रकाशक - प्राजक्त प्रकाशन, पुणे 
पृष्ठ - 136  किंमत - 200 ₹


पुस्तक परिचय 
- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, 
प्रा. शाळा पिंपळगाव ता. धर्माबाद जि. नांदेड 
9423625769

No comments:

Post a Comment