नागोराव सा. येवतीकर

Friday, 5 July 2024

Which School do you like ?

*पाऊले चालली खाजगी शाळेची वाट*

वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल शाळेत पाठवण्याची आस लागते. आपले पाल्य चांगल्या शाळेत शिकावं असं प्रत्येक पालकांना वाटते. चांगली शाळा कोणती ? असा प्रश्न देखील पालकांच्या मनात येतो. त्यासाठी ते अनेक बाबी विचारात घेतात जसे की, शाळेत शिकविणारे शिक्षक ज्ञानी असावेत, शाळेची परंपरा नावाजलेली असावी, शाळेतून मुलांना चांगले ज्ञान मिळावे, शाळेला चांगली इमारत असावी अश्या अनेक गोष्टींचा विचार करून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत प्रवेशित करतात. काही पालक श्रीमंत वर्गातील असतात, ते आपल्या पाल्यासाठी हवी तेवढी रक्कम खर्च करू शकतात तर काही पालक खूप गरीब असतात. आपल्या पाल्यावर ते अवाजवी रक्कम खर्च करू शकत नाहीत. असे दोन वर्ग आज समाजात पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिक्षण देखील दोन वर्गात विभागली गेली आहे. एक म्हणजे श्रीमंत मुलांची शाळा आणि दुसरी म्हणजे गरिबांची शाळा. शिक्षणात असा दुजाभाव सध्या फार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे काही शाळेतील वर्गात विद्यार्थ्यांना बसायला जागा अपुरी पडत आहे तर दुसरीकडे शाळेत विद्यार्थी कमी आहेत. अशी असमानता सध्या सर्वत्र दिसत आहे. पूर्वीच्या काळात म्हणजे तीस एक वर्षापूर्वी गावातील शाळेच्या व्यतिरिक्त विद्यार्थी अन्य कोणत्याही शाळेत जात नव्हता. गावातील शाळेतील शेवटच्या वर्गापर्यंत विद्यार्थी शिकून पुढील वर्ग नसल्यामुळे शेजारच्या गावातील शाळेत जात होता. ग्रामीण भागात सरकारी शाळेशिवाय अन्य पर्याय नव्हता त्यामुळे ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थी संख्या भरपूर राहत होती. शहराच्या शाळेच्या बाबतीत देखील पालक आपल्या घराजवळील शाळेचा पर्याय निवडत असे. परंतु आज काळ पूर्ण बदलून गेला आहे. आज ग्रामीण व शहरी भागातील शाळाशाळामध्ये खूप स्पर्धा तयार झाले असून अनेक पालक आपल्या गावातील व घराजवळील शाळेच्या व्यतिरिक्त अन्य शाळेचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे काही शाळेची विद्यार्थी संख्या रोडावत चालली आहे तर काही शाळेत विद्यार्थी संख्या फुगत चालली आहे. त्याचबरोबर पूर्वी सहा ते सात वर्षाची मुले शाळेत येत असत आणि आज वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून मुलांना शाळेत पाठविले जाते. नर्सरी, LKG आणि UKG असे वर्ग आज चालविले जात आहेत. या वर्गात शिक्षण घेण्यासाठी पालकांना प्रचंड खर्च देखील सोसावा लागत आहे. पुणे-मुंबई सारख्या महानगरात या प्ले ग्रुपच्या शाळेसाठी लाख-लाख रुपये मोजावे लागत आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात ही मुले शाळेच्या पिंजऱ्यात कैद होत आहेत. तशी आजची पिढी देखील खूप स्मार्ट आहे. पहिल्या वर्गात येण्यापूर्वी या मुलांना अंकाची व अक्षरांची ओळख पूर्ण होत आहेत म्हणून ही मुले पहिल्या वर्गात आल्यावर सहजतेने अभ्यासक्रम पूर्ण करू शकत आहेत. मात्र याच शिक्षण प्रक्रियेत दुसरी बाजू बघितली तर लक्षात येते की, गरीब पालकांची मुले पहिल्या वर्गात प्रवेशित होण्यापूर्वी कोणत्याच शाळेत जात नाहीत. बरीच गरीब पालक आपल्या मुलांना नर्सरी पासून पैसे देऊन शिकवू शकत नाहीत. अश्या गरीब वर्गातील पालकांची मुले चालू अभ्यासक्रमात मागे पडताना दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी देखील दोन वर्ग निर्माण होत आहेत. अभ्यासक्रम तयार करणारी मंडळी नर्सरी शिकून आलेल्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमाची आखणी केल्यामुळे या मुलांना सदरील अभ्यासक्रम अवघड जात आहे. याबाबीचा विचार प्रकर्षाने करायला पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष संपल्यावर देखील भारतात अजूनही शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. ग्रामीण भागात अंगणवाडीच्या माध्यमातून गरीब पालकांच्या मुलांना शिक्षणाची सोय झाली मात्र त्या अंगणवाडीमध्ये शहरातील खाजगी नर्सरी प्रमाणे शिकविले जाते का ? हा मुद्दा गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे. ग्रामीण भागात अंगणवाडी तरी आहे पण शहरी भागातील गरीब पालकांसाठी तर ती व्यवस्था देखील बघायला मिळत नाही. शहरात देखील प्रत्येक वॉर्डमध्ये एक अंगणवाडी असणे अपेक्षित असतांना शहरात किंवा महानगरपालिकेच्या भागात एकही अंगणवाडी दिसून येत नाही. यावर देखील विचार होणे आवश्यक आहे, असे वाटते. कोणतीही इमारत ही त्याच्या भक्कम असलेल्या पायावर उभी राहते. तसेच काही शिक्षण प्रक्रियेत देखील असते. ज्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम असेल तर त्याचे उच्च शिक्षण देखील तेवढेच चांगले असेल. पण मुळात या प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष्य केल्या जात असल्याने पुढील वर्गात त्या विद्यार्थ्यांची पीछेहाट होत आहे. दहावी व बारावीच्या निकालावर एक नजर फिरवली तर लक्षात येईल की गणित व इंग्रजी या विषयात नापास होणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. कारण गणित आणि इंग्रजी या विषयाची तयारी प्राथमिक वर्गात म्हणावी तशी चांगली होत नाही. अनेक शाळांमधून या विषयाकडे तेवढया गांभीर्याने पाहिले जात नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनातून या विषयाची भीती घालविण्यासाठी प्राथमिक वर्गात चांगली तयारी करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शाळेला पुरेसा शिक्षक वर्ग देखील द्यायला पाहिजे. माध्यमिक शाळेत गेलेला विद्यार्थी जरा प्रगल्भ झालेला असतो. तो स्वयं अध्ययन देखील करू शकतो. मात्र प्राथमिक वर्गात तसे नसते. प्राथमिक वर्गात शंभरातून एखादा विद्यार्थी हुशार असतो जो की स्वयं अध्ययनाने पुढे जाऊ शकतो. पण इतर नव्यानव विद्यार्थ्यांचे काय ? प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची असेल तर प्राथमिक वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना कोणतेच अशैक्षणिक कामे लावण्यात येऊ नये. कारण या वर्गातील मुलांना शिक्षकांची जास्त गरज असते. जर विद्यार्थी शाळेचा पूर्ण वेळ शिक्षकांच्या सान्निध्यात घालविला तर त्याचे अनुकूल परिणाम जरूर पाहायला मिळतील. पण खाजगी अनुदानित व कायम विना अनुदानित शाळा वगळता बाकी सरकारी शाळेतला शिक्षक हा शाळेसाठी कमी आणि शासनासाठी जास्त वेळ काम करतांना दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावत चालली. त्याचसोबत सरकारी शाळेच्या बाबतीत पालकांची मानसिकता देखील बदलून गेली. कोणताही पालक आपल्या पाल्याना चांगले शिक्षण देऊ इच्छितो. जर शिक्षकांना शाळेवर कमी आणि शाळेच्या बाहेरील कामांसाठी जसे की निरक्षर लोकांचे सर्व्हे, शाळा बाह्य मुलांचे सर्व्हे, नवीन मतदार नोंदणी इत्यादी कामांसाठी जास्त वेळ द्यावे लागत असेल तर कोणता पालक आपल्या पाल्याना अश्या शाळेत प्रवेश देणार. म्हणून पाऊले चालली खाजगी शाळेची वाट असे खेदाने म्हणावे लागते आहे.

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment