नागोराव सा. येवतीकर

Friday, 22 March 2024

पुस्तक परिचय - काजळपाणी ( Kajalpani )

काळजाला भिडणारी गाणी काव्यसंग्रह काजळपाणी
      नाशिक येथील 'अलका कुलकर्णी' म्हणजे लेखिका कवयित्री, निवेदिका, अनुवादक , संपादिका अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. त्यांनी विविध मंचावर , आकाशवाणीवर कविता सादरीकरण तसेच विविध कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले आहे . विविध प्रकारच्या साहित्याचे संपादन केले आहे, म्हणून त्या उत्तम लेखिका देखील आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच त्यांच्या निबंध लेखन, कथालेखन, लघुकथा, ललित लेखनाला देखील पुरस्कार मिळाले आहेत. कवयित्रीचे मन निसर्ग व अध्यात्म यांच्याशी जुळलेले आहे. त्यांच्या कविता वाचताना त्यांच्या मनातील वेदना, समाजाप्रती असलेली तळमळ लक्षात येते. काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरून एक गोष्ट लक्षात येते की कवयित्री ह्या कृष्णभक्त आहेत. ह्या काव्यसंग्रहाविषयी कवयित्री आपल्या मनोगतात म्हणतात, ' मुळात काव्य, कविता हे प्रत्येकात भिनलेलं आहेच. कवितेचा छंद हाच कवितेचा प्राण असतो. कवितेची निर्मिती ही मुळी वेदनेतून होते. कविता ही आपल्या अनुभवांची सावली असते. एखादा शिल्पकार जसा ओबडधोबड पाषाणातून त्याला हवेसे नेटके शिल्प साकारतो तशीच काहीशी ही धडपड.' कवीच्या मनात कविता कशी जन्मास येते याचे सुंदर वर्णन 'जन्मते कविता ....' ह्या कवितेत केले आहे. जीवन जगताना जे अनुभव मिळतात, सुख आणि दुःख मिळतात, मनातील घुसमट, वेदना, तळमळ हे सारे शब्दात उतरतात आणि त्या शब्दाला एक वेगळा अर्थ मिळतो. आभाळात जशी वीज चमकते आणि सर्वत्र लख्ख प्रकाश पडतो, त्या प्रकाशाकडे सर्वांचे लक्ष जाते तशी कवयित्रीची कविता साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आपल्या कवितेत त्या म्हणतात,
"कधी नजाकत नक्षत्रांची, या शब्दा अर्थाना येते
चंद्र चांदणे विहंग होते, निळ्या नभी चमचमते कविता!"

      मुसळधार, संततधार तर कधी कधी रिमझिम पडणारा पाऊस श्रावण महिन्यात दिसून येतो. प्रत्येक कवी श्रावण या विषयावर कविता करतो. श्रावणाविषयी त्यांच्या मनातील भाव-भावना व्यक्त करतो. या ठिकाणी श्रावण या कवितेत कवयित्रीने देखील श्रावणाचे खूप छान वर्णन करताना श्रावणाला धरतीचा एक महत्त्वाचा सण असा उल्लेख केला आहे. कारण ही तसेच आहे याच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, गोपाळकाला अश्या नेक सणांची रेलचेल असते. 
"श्रावण म्हणजे सण आहे हा,
अवघ्या धरतीच्या देहाचा.."

      आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच पाऊस हवाहवासा आणि आवडणारा आहे. लहान मुले तर पावसाला विनवणी करतात ' ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ' असे म्हणतात. कवयित्रीने निळ्या आभाळाला पावसाळ्यामध्ये जांभूळ रंगाची उपमा दिली आहे. पहिल्या पावसात झिम्मड भिजून जावं अशी इच्छा त्या कवितेतून व्यक्त करतात. पाऊस येण्यापूर्वी आणि पाऊस पडल्यानंतर माणसांची अवस्था, घराची स्थिती, वेली, वनस्पती, गवताचे पाते याचे सुंदर असे वर्णन करताना जांभुळल्या आभाळात ह्या कवितेतून म्हणतात की ,
      "जांभुळल्या आभाळात पावसाचं गावं
      नवथर सर येता झिम्माड भिजावं..."

     ह्या काव्यसंग्रहातील अनेक कविता गजल प्रकारातील आहेत. यावरून गजल लिहिण्यात कवयित्रीचा हातखंडा आहे असे दिसून येते. त्यांना गझल कशी सुचली याचे वर्णन करताना 'त्याचा सुंदर मिसारा होतो' ह्या कवितेत कवयित्री म्हणतात,  जीवनात अनेक वळणे आली ज्यात काही सुखाची होते तर काही दुःखाची होती . त्या सर्वच संकटाला दोन हात करण्याची शक्ती व त्यातून नवा मार्ग दाखवण्याचे काम या गजलेने केले आहे. याच गजलेने कवयित्रीचे जीवन नितांत सुंदर केले आहे.  
      कितीतरी वळणे वाटेवर, तरी पुढे चालते निरंतर
      दोन हात संकटास करण्या, मार्ग नवा दाखवी गजल ही...!

       पंढरपूरचा सावळा विठ्ठल हा प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचा दैवत आहे. वारी, वारकरी, टिळा, तुळशीमाळा, मृदंग, टाळ हे सर्व त्या सावळ्या विठ्ठलाचे प्रतीक आहेत. कवयित्रीला देखील ती सर्व प्रतीके आकर्षित करतात. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट याची उपमा ढोल ( मृदंग ) आणि टाळ यांना देऊन कवयित्री आषाढ कार्तिकी मध्ये पंढरपूरच्या वाटेवर जे चित्र दिसते ते आपल्या रचनेतून व्यक्त केले आहे. 
      'दैवत माझे ......' या कवितेत कवयित्री म्हणते,
      "ढोल ढगांचा टाळ विजांचे, सजले अंबर भक्तीने
मस्तक चरणावरती माझे, भान हरपले घोषाने"

        'मी सखी माझीच होता .....' ह्या कवितेत कवयित्रीने मनातील सल व्यक्त केली आहे. आपल्या मनातील दुःख इतरांना सांगितले तर दुःख हलके होते असे म्हणतात. पण कधी कधी आपल्या दुःखामुळे इतरांनाही दुःख होते, त्यांची चिंता वाढते. त्यापेक्षा माझ्या दुःखाची मी जर मैत्रीण झाले तर माझे एकटेपण दूर होईल असे कवयित्रीला वाटते.
       "काळजाची काळजी घेण्या कुणी आतुर झाले ,
     मी सखी माझीच होता एकटेपण दूर झाले"

दोन वर्षांपूर्वीचा कोरोनाचा काळ कोणीही विसरू शकत नाही. या कोरोनामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली, अनेक जण अनाथ झाले, मरणाची एक अनामिक भीती सर्वांच्याच मनात होती. आज आहे उद्या असेन की नाही याची शाश्वती नव्हती, अशा या विषम काळात कवयित्रीने 'आधार पुन्हा' कवितेत मनातल्या भावना सुंदररीत्या शब्दबद्ध केल्या आहेत. माणुसकी काय असते त्याची शिकवण देखील याच काळात अनुभवास मिळाले. आधार पुन्हा .... या कवितेत कवयित्री म्हणतात,
"कोप जाहला तुझा निसर्गा रौद्र रूप अवतार पुन्हा
आले वादळ सोसाट्याचे कोसळले घरदार पुन्हा"

   ‌‌     नारी म्हटले की, दासी, अबला, कोमल, कमजोर हे चित्र रेखाटले जाते. पण कवयित्रीने ह्या सर्व चित्राला दूर सारत नारीचे सुंदर चित्र निर्माण केले आहे. नारीच्या हातातील हिरव्या बांगड्या हे समृद्धीचे लेणे आहे, जे की कुटुंबाला उर्जित अवस्था देते. कुटुंबावर संस्कार करणारी, मर्यादा शिकवणारी, ओठावर हसू तसेच मृदु बोलून व्यवहार करणारी, घरात सर्वांशी प्रेमाचे नाते जीवापाड जपून, कुटुंबातील सुसंवाद वाढवणारी, ती नारी आहे असे यथार्थ सुंदर वर्णन गर्व मला मी नारी आहे ...या कवितेत केले आहे. कवयित्री म्हणतात,
"जीवन परिभाषित करणारा, प्रबंध विद्याधारी आहे,
सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे..!" 

       त्याही पुढे जाऊन 'स्त्री कुणास पुरती कळली नाही' या कवितेत झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, पौराणिक कथेतील उर्मिला, राधा, सीता, यशोधरा, गांधारी, आणि आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले यांचे कार्य लोकांना कळते पण अजूनही स्त्री पूरती कळाली नाही याची खंत कवयित्री व्यक्त करते. 

        कोणालाही कळणार नाही असे हे मन आहे. मनकवड्याला दुसऱ्याच्या मनातील ओळखता येईल ही कदाचित, पण खरंच माझ्या मनात काय चाललंय ? हेच मला कधी-कधी कळत नाही असे म्हणताना कवयित्रीने आपल्या मनाला सोसाट्याचा वादळ, भिरभिरणारा वारा, चमचमणारा पारा, सागराच्या लाटा, खोल जलाशय अशा अनेक उपमा दिल्या आहेत.  
कवयित्री कृष्ण भक्त असल्याने कृष्ण आणि राधा यांच्यावर आधारित अनेक कविता या कवितासंग्रहात वाचण्यास मिळतात. कृष्णावर अनेकांचे प्रेम होते. कृष्णासारखा सखा भेटावं असे प्रत्येक स्त्रीला वाटते, तसे कवयित्रीला देखील वाटते म्हणून ते म्हणतात, 
"कृष्णासम कोणी भेटावा तोच असावा प्राणसखा
हळवे कोमल चंचल मन हे राधेसम पावन व्हावे..!"

      कवयित्री ह्या आत्माचे ऐकून लिहिणाऱ्या कवयित्री आहेत. त्यांची इच्छा आहे की, जे जे माझ्या डोळ्यांना दिसेल ते ते मी लिहिणार आहे. निसर्ग असेल, कुटुंबातील नाते असेल, आयुष्यात येणारे चढ-उतार असतील वा पशु-पक्षी या सर्व बाबींवर कवयित्री लिहीणार आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे अर्थातच याच कवितेच्या माध्यमातून कवयित्रीचे दुसरे काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होईल अशी खात्री वाचकांना येते. 
     काजळपाणी काव्यसंग्रहाला कवयित्री 'नीलम माणगावे' ह्यांची प्रस्तावना लाभली असून 'वैशाली प्रकाशन पुणे' यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केले आहे. 'सौ. रूपिका पाटील' यांनी ह्या काव्यसंग्रहाचे सुंदर मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. या काव्यसंग्रहात एकूण १२४ पाने असून निसर्ग, पाऊस, श्रावण, सावळा विठ्ठल, कोरोना, आणि नववर्षं  अश्या वेगवेगळ्या विषयावरील १०२ कवितांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाची किंमत १५० रुपये आहे. या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या संग्रहातील काही कवितेच्या खाली बारकोड छापलेले आहे ज्याला स्कॅन केल्यावर ती कविता युट्युबवर पाहता देखील येईल. 
     कवयित्री अलका कुलकर्णी यांच्या पुढील काव्यलेखनास मनःपूर्वक शुभेच्छा..!

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, स्तंभलेखक , 
विषय शिक्षक कन्या शाळा 
धर्माबाद जि. नांदेड : 9423625769

No comments:

Post a Comment