नागोराव सा. येवतीकर

Saturday, 23 March 2024

पुस्तक परिचय - जगणे इथेच संपत नाही ( Jagne ithech Sanpat Nahi )


*जगण्याची आस सांगणारा कवितासंग्रह - जगणे इथेच संपत नाही*


माणसांचे जीवन अनेक सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र आहे. कधी सुखाची किनार आहे तर कधी दुःखाची. जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगातून माणूस काही ना काही शिकत राहतो. आलेले अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतो. चित्रकार आपल्या कुंचल्यातून या भावना व्यक्त करत असतो तर कवी मनाचा माणूस कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना मांडत असतो. कवी हणमंत पडवळ हे देखील असे एक कवी आहेत ज्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखांच्या अनुभवाना,  त्यांच्या डोळ्याने पाहिलेल्या निसर्ग सौन्दर्य असेल वा समाजातील लोकांचे हाल असेल याचे चित्रण अतिशय मार्मिक शब्दांत ' जगणे इथेच संपत नाही ' या पहिल्या कवितासंग्रहात केले आहे. म्हणूनच कवी आपल्या मनोगतात म्हणतो की, भावनांच्या ओलाव्यात शब्दांची पेरणी केली तर कवितेच्या झाडाला सुंदर फळे लागतात. मनात भावनांची गर्दी दाटली की ते लगेच शब्द रूपाने कागदावर उमटले जाते आणि अनुभवसंपन्न अशी रचना जन्मास येते अशी कवीची धारणा आहे ते त्यांच्या कविता वाचतांना लक्षात येते. कवीने आपल्या रचना लिहितांना ओढून ताणून शब्द लिहिलेलं नसून त्यांच्या हृदयातून आलेल्या भावना आहेत. कवी स्वतः व्यवसायाने शिक्षक असल्याने त्यांना अनेक प्रसंग, घटना आणि स्थळ यांचा अनुभव मिळालं आहे. कविता करण्यापूर्वी ते छोटे छोटे नाट्यलेखन करत होते. यातूनच त्यांना कविता लेखन करण्याचा छंद लागला आणि त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहे.
आपलं आयुष्य म्हणजे एक कोडं आहे. जीवन जगत असतांना अनेक कठीण प्रसंग येतात, त्याला न घाबरता त्याचा सामना करणे आवश्यक आहे, असा संदेश देतांना जगणं या कवितेत कवी म्हणतो,

जगत आलो ... जगायचं पुढं
आपणच आपलं सोडवायचं कोडं

जीवनात आलेले अनेक अनुभव, कडू-गोड प्रसंग आणि जे न देखे रवी ते देखे कवी या उक्तीनुसार कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. कवितेचा जन्म या कवितेतून कवी म्हणतो,

वेदनेची कळ काळजाला टोचते
तेव्हाच मला कविता सुचते

प्रत्येक संकटाला आणि दुःखाला तोंड देणे हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे. संकटाला भिऊन पळणारा कधीच यशस्वी होत नाही हाच संदेश बळ ऊर्जेचे या कवितेत कवी देताना म्हणतो,

काय करतील काटे
बधीर माझ्या पायाला
पुन्हा नव्याने सुरू केला
मी रस्ता चालण्याला

स्वाध्याय चळवळीचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी माणसात देव पहा असे सांगितले आहे तर संत गाडगेबाबा यांनी देखील तसाच काही संदेश दिलेला आहे. आई-वडील हेच खरे आपले दैवत आहेत. पण या लोकांना अजूनही ही गोष्ट का कळत नाही ? असा प्रश्न कवींच्या मनात पडला. म्हणून कवी उद्विग्न होऊन देवाच्या शोधात रचनेत कवी म्हणतो,
माळावरल्या दगडांना आम्ही राऊळात नेले
घरातील दैवतांना आम्ही आश्रमात सोडले

प्रार्थनेमुळे मनाला समाधान मिळते. असे म्हटले जाते की, दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. आपण सर्वजण आपल्या सुखासाठी देवाजवळ प्रार्थना करत असतो मात्र कवी प्रार्थना या कवितेत देशावरील सीमेवर डोळ्यात तेल घालून, आपले जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रार्थना करतो,

रोजच जीव तुझा धोक्यात
केवळ देशासाठी
कर जोडतो देवाला आज
फक्त तुझ्याचसाठी
मुलींच्या जन्माबाबत आणि स्त्रियांवरील अत्याचाराबाबत कवीचे मन खूप संवेदनशील आहे असे त्याच्या कविता वाचून लक्षात येते. ज्या वस्तूपासून आपणाला समृद्धी मिळते त्याच वस्तू माणसं का नष्ट करतात ? असा एक प्रश्न कवीला पडतो. अंधारातील वात या रचनेतून कवी म्हणतो,

अंधारात प्रकटते एक वात
वातीलाच का विझवतात माणसे ?

जन्म देणारी आई जगात सर्वश्रेष्ठ आहे. पण कुटुंबाचे पालनपोषण करणारा बाप देखील तितकाच महत्वाचा आहे. वडिलांचे महत्व विशद करतांना कवी खूप सुंदर विश्लेषण करतो,

बाप वाटे उत्साहाचा मळा
तसा तो निर्धाराची शाळा
थकवा ना विसावा त्याला
मायेचं पांघरूण लावितो लळा

चाकाचा शोध लागला, दळणवळण वाढली, लोकांच्या राहणीमान मध्ये सुधारणा झाली पण झोपडीत जे सौख्य लाभते ते कुठे ही मिळत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माझ्या या कवितेची प्रकर्षाने आठवण होते. भारत स्वातंत्र्य होतांना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी देखील खेड्याला विसरू नका असा संदेश दिला होता. कारण खरा भारत हा खेडयात वसलेला आहे. झोपडी या कवितेत कवी देखील वाचकांना असाच संदेश देतो,

सुधारणेचे हे कसले वारे
उगाच नुसता बोलबाला
बापूजी का मग म्हणले होते
लोकहो, खेड्याकडे चला
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात राबतो, कष्ट करतो, घाम गाळतो म्हणून तर सर्वांना खाण्यासाठी दोन घास मिळतात. पण हाच जगाचा पोशिंदा मात्र उपेक्षित राहतो अशी खंत आत्मवृत्त या कवितेतून कवी व्यक्त करतो,

काळ्या ठिकार छातीवर
असे घामाचं शिंपण
काळ्या काळ्या मातीमधी
सालो साल नशिबाचं रोपण
काव्यसंग्रह शीर्षक असलेल्या जगणे इथेच संपत नाही या कवितेतून कवी वाचकांना खूप चांगला संदेश देतो. निरुत्साही, नाउमेद झालेल्या व्यक्तींच्या मनात या रचनेतून स्फूर्ती निर्माण होते. कवी म्हणतो,

घाव घालून आडवे केले झाड
खोडालाही फुटली पालवी
खुलून पालवी वाऱ्यावर डोले
सांगून जाते झाड काही
जगणे इथेच संपत नाही
या कवितासंग्रहात विविध विषयांवर आधारित एकूण 81 कविता आहेत. प्रसिद्ध साहित्यिक व कवी योगीराज माने यांची प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभले असून डॉ. शिवाजी शिंदे यांनी पाठ राखण केली आहे. अरविंद शेलार यांनी अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले असून परीस पब्लिकेशनकडून हे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आहे. एकूण 104 पृष्ठ असलेल्या काव्यसंग्रहाची किंमत - 150 ₹ आहे. कवी हणमंत पडवळ यांच्या कविता वाचतांना वाचक मंत्रमुग्ध होऊन जाते. वाचक या काव्यसंग्रहाचे नक्कीच स्वागत करतील अशी आशा आहे. कवीच्या पुढील काव्यलेखनासा मनस्वी शुभेच्छा ......!

पुस्तक परिचय -
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment