नागोराव सा. येवतीकर

Sunday, 28 January 2024

मराठी सिनेमा आणि प्रेक्षक ( Marathi Cinema )

मराठी सिनेमा आणि प्रेक्षक


भारतात चित्रपटाची निर्मिती करणारे पहिले व्यक्ती म्हणजे  दादासाहेब फाळके हे होत. महाराष्ट्रातील सन 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा मूकपट त्यांनी तयार केला. म्हणून त्यांना मराठी चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. मराठी चित्रपटानेच सिनेसृष्टी प्रारंभ झाली, त्यामुळे मराठी सिनेमाला फार मोठा इतिहास आहे. त्यानंतर बाबुराव पेंटर सारख्या दिग्दर्शकाने मराठी सिनेमाला वैभव मिळून दिले. त्याकाळी पौराणिक कथा, मराठ्यांच्या इतिहासातील घटना, प्रसंग तसेच रोजच्या जीवनातील हलकेफुलके प्रसंग यावर आधारित चित्रपट तयार होत होते. त्यामुळे प्रेक्षक वर्ग त्या चित्रपटांकडे आकर्षिला जात होता. समाजात बदलणाऱ्या काळाचे ठसे चित्रपटातून व्यक्त होत असल्यामुळे चित्रपट आणि लोकांमध्ये एक प्रकारचा जिव्हाळा होता. त्याचसोबत चित्रपट बनविणे हा त्या लोकांचा एक छंद होता. त्याकडे त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीही पाहिले नाही.
भारतीय चित्रपट सृष्टीचा श्री गणेशा मराठी माणसाने व मराठी सिनेमाने जरी झाला असेल तरी, मराठी सिनेमाचा विकास त्या गतीने झाला नाही. सन 1931 मध्ये हिंदीतील आलम आरा या चित्रपटाची निर्मिती झाली आणि आपला मराठी माणूस हळूहळू मराठी चित्रपटापासून दुरावत गेला. मराठीमध्ये सुद्धा एकापेक्षा एक चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपटा द्वारे मराठी सिनेमाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. श्वास या मराठी चित्रपटाने ऑस्कर वारी करून आली. यावरून आजही मराठी सिनेमा जिवंत आहे याचा विश्वास वाटतो. एवढेच नाही तर त्यास राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कला ही भाषेमध्ये अडकून राहणारी नाही त्यामुळे मराठीतील कलाकार इतर भाषांच्या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करतात असे वाटते, परंतु तसे काही नाही. आपल्या मराठी सिनेमाला नेहमीच प्रेक्षकांची संख्या कमी असते कारण सतत रटाळ पटकथा, तेच ते विषय आणि तेच कलाकार घेऊन कमी बजेटमध्ये सिनेमा तयार केल्या जातात. त्यामुळे प्रेक्षक वर्ग मराठी सिनेमाकडे पाठ करतात. शंभर पैकी जे एक दोन चित्रपट चांगले तयार होतात त्यांची अवस्था  गव्हासोबत किडे रगडणे यासारखी होऊन जाते.
मराठी सिनेमासाठी मध्यंतरीचा काळ हा चांगला होता. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, रंजना जोशी, जयश्री गडकर या मराठी कलाकाराने प्रेक्षकांची नाडी ओळखून चित्रपट तयार केले. त्यामुळे मराठी सिनेमा बघायला प्रेक्षक मिळत होता. अलका कुबलच्या माहेरची साडी या सिनेमाने कित्येक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले. चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक केव्हाही दाद देतात. त्यास्तव निर्मात्यांनी सर्वस्व पणाला लावून सिनेमा तयार करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे पण तसे अभावानेच बघायला मिळते. प्रदीर्घ विश्रांतीनंतर सचिन व सुप्रिया या जोडीने नवरा माझा नवसाचा हा चित्रपट घेऊन आले. विषयाची मांडणी आणि हलकेफुलके विनोद यामुळे लोकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतले. मकरंद अनासपुरे व सिद्धार्थचा दे धक्का सर्व प्रेक्षकांना खरंच धक्का देऊन गेला. मैत्री वरचा दुनियादारी चित्रपट हा एका वेगळ्या जगात घेऊन जातो. लैला-मजनू, सोहनी-महिवाल, हीर-रांझा ही प्रेमी युगुल जोडी जशी आपल्या प्रेमकथेसाठी प्रसिद्ध आहे तेवढीच प्रसिद्धी नागराज मंजुळे यांनी सैराट या मराठी चित्रपटात आर्चि-परश्याची जोडी प्रसिद्ध केली.
मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत ही ओरड काही खरी नाही. सिनेसृष्टीतील लोकांकडे काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, तीव्र इच्छाशक्ती, आगामी दृष्टिकोन, नवनवीन कल्पना अमलात आणण्याची इच्छा असेल तर नजीकच्या काळात मराठी सिनेमा सुद्धा दमदार पाऊल टाकेल. मराठी पाऊल पडती पुढे असे म्हणायला त्या ठिकाणी संधी मिळणार यात शंका नाही. मराठी सिनेमा जेमतेम 50 70 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच गल्ला जमा करतो. म्हणून निर्माते मंडळी सुद्धा कमी बजेटचे चित्रपट तयार करतात. अशा विपरीत काळात डबल सीट चित्रपटाने आठवडाभरात पाच कोटी रुपयांचा गल्ला जमा करून दाखविला आहे, हे नोंद घेण्यासारखे आहे. भविष्यात मराठी सिनेमा वाचविण्यासाठी आपण सर्वचजण मराठी चित्रपट जरूर पाहूया आणि थिएटरवाल्यांनी सुद्धा प्रत्येक तिकिटामागे सवलत देण्याची प्रथा मराठी चित्रपटांसाठी सुरू करावी जेणेकरून प्रेक्षक चित्रपट गृहाकडे आकर्षिले जातील. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. मराठी सिनेसृष्टी जिवंत ठेवणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

 
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment