नागोराव सा. येवतीकर

Monday, 6 March 2023

जागतिक महिला दिन ( World Women Day )

08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त

कविता - नको भृणबळी

आई, मला जग बघू दे
बाबाला एकदा भेटू दे

माझी मुलगी होती 
गर्भातुन बोलत
मी ओझे नाही होणार
कोणाच्या घरात

मी काम करेंन 
घरातील सारी
शिक्षण घेईन खुप 
होईन अधिकारी

तुझ्या हाताला देईन
नेहमी मदत 
विचार करू नको
दे मला साथ

आई, तुझं मन कर
एकदा कठोर
तुझ्यासारखेच माझं
जीव आहे तर

निश्चय केला पक्का 
नको भृणबळी
मुलगा-मुलगी समान
संधी द्या वेळोवेळी

तिचे बोलणे ऐकून
मन गहिवरलं
गोंडस कन्या रत्नाला
जन्म दिलं

- नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••


जागतिक महिला दिनानिमित्त 

" ती " ला समर्पित माझी कविता


कविता - ती

- नासा येवतीकर, 9423625769


ती रोज सकाळी

सर्वांच्या अगोदर उठते

आम्ही सर्व झोपेत असतो

तिच्या कामाला सुरू होते


ती रोज सर्वांसाठी

चवदार स्वयंपाक करते

आम्ही त्याला नावे ठेवतो

त्याकडे ती कानाडोळा करते


ती रोजच आम्हा सर्वांची

एवढी देखभाल ठेवते

आमच्या कडून कसलीच

तिची कधी ही अपेक्षा नसते


सकाळपासून झोपेपर्यंत

ती खूप राब राब राबते

आम्हांला तिची किंमत कळते

ती जेंव्हा आजारी पडते


मग ती कोण आहे ? 

आई आहे ताई आहे

कुणाची मावशी तर 

कुणाची बायको आहे

••••••••••••••••••••••••••••••••••••

कविता - ती काय करते ?

सर्वाना असंच वाटते की
ती काहीच करत नाही
ती काय करते म्हणून कोणी
विचारल्याशिवाय राहत नाही

नेहमी हा प्रश्न सतावतो
कोणी विचारलं ती काय करते
माझं ठरलेलं उत्तर असल्याचं
ती खूप काही काम करते

सकाळी भल्या पहाटे उठून
घरासमोर सडा टाकते
छान छान रंगाची रांगोळीने
सारे अंगण सजवून टाकते.

आम्ही सारे अंथरुणात असतो
सर्वाना चहा फराळ करते
सर्वांची अंघोळी होईपर्यंत
जेवणाचा डबा तयार करते

सारे गेले आपापल्या कामाला
घरदार पुसून स्वच्छ करते
घरात पडलेला पसारा आवरून
धुणी-भांडी स्वच्छ करून घेते

दुपारच्या वेळी विश्रांती म्हणून
जराशी डुलकी काय घेते
घड्याळात चारचा ठोका वाजला
आमची परत येण्याची वाट पहाते

तिन्ही सांजाच्या सायंकाळी ती
सर्वाना चहा देऊन ताजे करते
बैठकीत आम्ही टीव्ही पाहतो
ती किचनमध्ये स्वयंपाक करते

पटकन आम्ही झोपी जातो
तिच्यामुळे काळजी नसते
दाराची कडी कोंडा पाहूनच
ती समाधानाने झोपी जाते

सारे आनंदात मजेत राहावे
यासाठी तिचा खटाटोप असते
परत मला कोणी विचारू नका
ती काय करते ? ती काय करते ?

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - स्‍त्री जन्‍माचे स्वागत करूया ...!


" नकोशीला फेकून मातेचे पलायन, मुलीला जन्म दिला म्हणून सुनेला जाळले, मुलींची भ्रूण हत्या करण्यात जिल्हा अग्रेसर " अशा मथळ्याच्या बातम्या जेंव्हा  ऐकायला आणि वाचायला मिळतात तेव्हा वरील क्रूर कर्म करणार्‍या मंडळीविषयी तळपायाची आग मस्तकाला जाते आणि वाटते की, आपल्या पाल्याविषयी एवढे निष्ठुर का होतात ? समाजात आजही असे कुटुंब आढळते की ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असते मग ती मुलगा असो वा मुलगी, याचा ते अजिबात विचार करीत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला त्याच समाजात नकोशीला फेकणारी ही मंडळी आढळतात. आपल्या संस्कृतीमध्ये ' कुपुत्रो जायेत क्वचिदपि, कुमाता न भवती ' असे म्हटल्या जाते. परंतु काही वेळा महिलांना कुमाता होताना पाहून मन खिन्न होते. एवढ्या थराला ते का जातात ? असे जे कोडे पडते ते कोडेच राहते, त्याची उकल होत नाही. याहीपुढे समाजात असे बघायला मिळते की, एखाद्याच्या घरी मुलगा जन्माला आला की, नवरा-बायको, आई-वडील, भाऊ-बहीण असे  घरातील, परिवारातील आणि नात्यातील लोकांना खूपच आनंद होतो. आपला आनंद ते सर्वाना पेढे वाटून व्यक्त करतात. याउलट जेव्हा एखाद्याच्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा 'अरेरे ' असे सहजच उद्गार तोंडातून बाहेर पडतात. तिच्या येण्याने कुणालाच आनंद वाटत नाही. उलट प्रत्येकाच्या कपाळावर आठ्या पडलेल्या दिसून येतात. मुलगा जन्मल्यास पेढे आणि मुलगी जन्मल्यानंतर पेढेच्या ऐवजी जिलेबी वाटण्याची प्रथा समाजात दिसून येते. म्हणजे मुलगी म्हणून जन्माला येण्याचा एका सेकंदापासून मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. भारत देश वगळता कोणत्याही देशात मुलगा किंवा मुलगी यांच्या जन्मास किंमत किंवा भाव दिला जात नाही. म्हणजे मुलगा होवो किंवा मुलगी त्याना त्या ठिकाणी अपत्य समजल्या जाते आणि येथे आपल्या देशात मुलगा जन्मल्यास ' वंशाचा दिवा, कुलदीपक ' आणि मुलगी जन्मल्यास ' परक्याचे धन, डोक्यावरील ओझं ' असे समजले जाते. समाजात चालू असलेल्या घाण प्रथा, अनिष्ट चालीरीती, सनातन पद्धती, लग्नात वधू पक्षाकडून मागितली जाणारी वरदक्षिणा या सर्व रुढीपरंपरामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत समाजात केल्या जात नाही. म्हणून तिच्या स्वागतासाठी काय करावे लागेल ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
समाजात चालू असलेल्या अनिष्ट रूढी व परंपरा यामुळे पालक मंडळी स्त्री जन्मास घाबरत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जर या प्रथा भारतात नसते तर काय झाले असते ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? मुलींच्या बापाला काय त्रास होतो ? मुलांच्या आई बापाला कधी कळणार ? जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे या म्हणीप्रमाणे समाजात असे नित्यनेमाने बोलले जाते ते उगीच नाही.  पण मुलगा आणि मुलगी यांच्या बुद्धिमत्ता किंवा गुणवत्ता याचा जर विचार केला तर मुलगी ही मुलापेक्षा काकणभर सरसच असते हे दरवर्षीच्या दहावी व बारावीचा निकालावरून स्पष्ट होत असते. प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकांच्या मतानुसार या प्राथमिक वर्गात सुद्धा मुली या मुलांच्या बाबतीत सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. कदाचित मुलींना देण्यात येत असलेल्या विविध योजनांचा अनुकूल परिणाम असू शकतो. दहावी बारावीपर्यंत चांगले गुण घेणारी मुली पुढे मात्र दिसेनाशी होतात. उच्च शिक्षणात मुलांची संख्या लक्षणीय दिसते. प्राथमिक वर्गात हुशार  नसलेल्या किंवा सर्वसाधारण असलेला विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करतो आणि काही ना काही रोजगार मिळवितो. मात्र दहावी बारावीपर्यंत हुशार असलेली मुलगी उच्च शिक्षणात न दिसता कुणाच्या तरी घरी सून म्हणून दिसते. तिचे पुढील शिक्षण खुंटल्या जाते. शंभरातून एक-दोन मुली यशस्वी झाल्या म्हणजे त्याचे सारे श्रेय सर्व मुलींना देता येत नाही. मुलींच्या संरक्षणासाठी भारतात भरपूर कलम व कायदे तयार केल्या जातात मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यामुळे समाजात ही अराजकता माजली आहे. कायद्याची भीती इथे कुणालाच वाटत नाही. त्यामुळे इथे प्रत्येकजण कायदा मोडण्याची व तोडण्याची भाषा बोलतात. आपल्या अज्ञानपणामुळे निरक्षर व अडाणी माणूस चुकतो असे म्हटले तर कोणी समजून घेतील पण सुशिक्षित सुजाण व साक्षर मंडळीसुद्धा याबाबतीत चुका करताना दिसत आहेत. त्यांना कसे समजावलं ?  झोपी गेलेल्या माणसाला एखाद्यावेळी उठविणे सोपे आहे मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठविणे महाकठीण आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी समाजाने काही प्रथा व पद्धतीमध्ये बदल करणे भावी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
समाजातील अनिष्ट प्रथा आणि पद्धतीत शासन किंवा कायद्यापेक्षा समाजानेच त्यात बदल करणे अपेक्षित आहे. सर्वात पहिल्यांदा वधूपित्याने द्यावयाची वरदक्षिणा म्हणजे हुंडा ही पद्धत समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वरपित्याने याची सुरुवात केली पाहिजे आणि समाजाने त्या वरपित्यांचा वेळोवेळी विविध ठिकाणी सत्कार करावा म्हणजे याचा प्रचार व प्रसार योग्य प्रकारे होईल. कायद्याने सर्व काही बदलता येत नाही. काही वेळा आणि काही ठिकाणी कायद्याच्या ऐवजी तडजोड कामाला पडते. प्रथम ही वरदक्षिणा किंवा हुंडा पद्धत बंद झाली की स्त्री जन्माचे स्वागत नक्कीच हसत हसत होईल. घरी आलेली सून ही सून नसून माझी मुलगी आहे, असे प्रत्येक सासू-सासऱ्यांचा मनात तयार होणे गरजेचे आहे. आपण आपल्या मुलींची काळजी ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने सुनेची काळजी घेतली जावी. याठिकाणी सुनेने सुद्धा आपल्या सासू-सासऱ्यांना आई-वडील मानून त्यांची मनोभावे सेवा करणे गरजेचे आहे. नातेसंबंध हे प्रेमावर टिकतात आणि संवादामुळे विस्तार पावतात. बऱ्याच कुटुंबात वाद होतात मात्र प्रेमाचे संवादच होत नाहीत त्यामुळे कलह निर्माण होते आणि त्या वादाचे रुपांतर काहीतरी अघटित स्वरूपात समोर येतात. मुलगा किंवा मुलगी यांचा भेद मनात न ठेवता आई-वडिलांनी आपल्या लेकराचे संगोपन करावे. लहानपणी त्यांच्या मनात मुलगा मुलगीचा भेदभाव निर्माण केल्यास मोठेपणी त्यांच्यावर तेच संस्कार कायम राहतात. त्यासाठी मुलगा-मुलगी समान ही भावना त्यांच्यात लहानपणीच रुजवावे. शासन मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवित आहेत त्यात सातत्यपणा ठेवून मुलींच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बरेच पालक आर्थिक अडचणीमुळे आपल्या मुलींना उच्च शिक्षणाला पाठवित नाहीत मात्र तेच पालक मुलांना मात्र पाठवितात हा विरोधाभास दिसून येतो. त्यास्तव मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केल्यास त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी होऊ शकते. आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने काही महिलांचा सत्कार करून किंवा गुण गौरव करून मुलींच्या जन्माचा दर वाढविता येणार नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाची मानसिक स्थिती बदलल्याशिवाय स्त्री जन्माचे स्वागत वाजत गाजत होईल असे तरी वाटत नाही.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

ग्रामीण महिला आणि महिला दिन


आज 08 मार्च अर्थात जागतिक महिला फिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलोय ? कुठपर्यंत यश लाभलं ? यांच्यासमोर काय करायचं ? इत्यादी विविध प्रश्नांच्या बाबतीत आज चर्चा केली जाते. अश्या या बाबीमुळे आज महिला थोडीफार सुधारली ( ? ) असे म्हणायला हरकत नाही. 

नेमिची येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण हा उत्सव साजरा करणार, यात काही शंका नाही. शहरात असलेली मुलगी पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभी राहण्यास पात्र ठरत आहे. महानगरातील मुली ही शिक्षण घेऊन सरकारी, खाजगी किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या कार्यालयात विविध पदावर काम करतांना दिसत आहेत, शहरातील मुलीं मुलांबरोबर शिक्षण घेऊन त्यांच्या पेक्षाही वरचढ ठरत आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील मुलींचे जीवन चांगले आहे, याचा अर्थ असा नव्हे की, मुली शिक्षणाच्या बाबतीत आता वंचित राहिलेल्या नाहीत. पण जरा शहारावरचा आपला कॅमेरा ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या विकासाकडे फिरविल्यास आपणास अनेक समस्या आणि प्रश्न तेथे दिसून येतात. 

शहरातल्या मुली शिक्षणात किंवा अन्य क्षेत्रात जेवढ्या पुढारलेले आहेत, तेवढेच ग्रामीण भागातील मुली मागासलेले आहेत. एकदम विरुद्ध टोक आहेत. ग्रामीण मुलीवर आज देखील अन्याय होत आहे. ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षण आवश्यक नसून त्यापेक्षा आवश्यक आहे त्यांना घरात स्वयंपाक करता येणे, धुणी-भांडी करता येणे, मुलं बाळांना सांभाळता येणे, घरातील पुरुषांना आनंदी ठेवता येणे, इत्यादी कामे तिला जमलेच पाहिजे. पण तिला शाळेत जाण्याची किंवा काही नवीन शिकण्याची संधी मात्र दिल्या जात नाही. आज ही ग्रामीण भागात शंभर मुलींमागे सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले पन्नास टक्के आढळतील मात्र पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सापडतात. ही किती चिंतनीय बाब आहे. मुलींसाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आणि त्या राबविल्या देखील तरी ही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आज ही म्हणावी तेवढी प्रगती नाही, असे का ? कारण ग्रामीण भागातील लोक आजही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि कर्मकांडमध्ये रुतलेले आहेत. त्याच्या विरोधात त्यांना वागणे कदापिच जमणार नाही. विज्ञानाच्या आधारे माणूस चंद्रावर गेला पण ग्रामीण भागातील लोकं आहे त्याच ठिकाणी घट्ट बसून आहेत. त्या लोकांचा विकास फक्त शिक्षणाने होते हे सुद्धा एक निर्विवाद सत्य आहे. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकविले जाते. काळजी आणि सुरक्षा या कारणांमुळे मुलींना पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पाठविले जात नाही. यात पालकांची मानसिकता लक्षात घेण्यासारखे आहे. आजच्या विषम वातावरणात कोणत्याही पालकांना असे विचार मनात येणे साहजिक आहे, मात्र त्यासाठी तिला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याची चूक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना कार्यान्वित झाल्यापासून अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलींच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे बहुतांश महिला शिक्षिकानी मत व्यक्त केले. अशीच काही योजना ग्रामीण भागात राबविणे आवश्यक आहे. महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी शहरात ज्याप्रकारे सोयी सुविधा निर्माण केल्या जातात अश्याच सुविधा ग्रामीण भागात पोहोचविणे आवश्यक आहे. छोटे छोटे काम शिकण्यासाठी त्यांना शहरात येणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या गावांत जाऊन मुलींना स्वयंरोजगाराचे धडे दिल्यास ते स्वतःच्या पायावर नक्की उभे राहतील. 

जगात सर्वत्र कायद्याला मान दिला जातो. त्यात खूप शक्ती आहे, याची जाणीव असून देखील महिलांवरील अत्याचार व अन्याय का कमी होत नाही ? एक दिवस सुद्धा असे उजाडत नाही, ज्या दिवशी महिलांवर अन्याय, अत्याचार, अमानुष छळ, किंवा बलात्कार झाले नाही. पैशाच्या जोरावर श्रीमंत लोकं नाचतात, कायदा हातात घेतात, पैशाच्या बळावर काही ही करायला ते तयार असतात. कधी जर त्यांच्या घरातील महिलांवर असा प्रसंग ओढवला तर तेंव्हा त्यांना कळते की खरोखरच किती वेदना होतात ते ? 

आपण दरवर्षी असे दिन उत्सवाप्रमाणे साजरा करतो. काही जुने संकल्प सोडतो तर काही नवीन संकल्प करतो. नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे त्या संकल्पला ही विसरतो. एखाद्या महिलेवर आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर आपण फक्त अरेरे असा खेद व्यक्त करून तोंड जरासे वेडेवाकडे करून निघून जातो किंवा पाहत बसतो. त्यापलीकडे आपण काही करत नाही. ग्रामीण भागातील लोकांना अनेक गोष्टी मुळात माहिती नसतात म्हणून त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम पहिल्यांदा करणे आवश्यक आहे. माहिती नसल्यामुळे येथील लोकं वर्षनुवर्षे मागासलेले आहेत. 

आजच्या या महत्वपूर्ण दिवशी असा संकल्प करू या की, गावातील प्रत्येक तरुणीला स्वयं रोजगार करण्यासाठी मदत कारेन, त्यांना योजनांची माहिती देऊन जागृत करेन आणि मी महिलांवर अत्याचार करू देणार नाही, तिला जे हवं ते मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. 


- नागोराव सा. येवतीकर

स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक

मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - मुलींचे शिक्षण: प्रगतीचे लक्षण

शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा किंवा नाही या बाबत समाजात, मि‍डियामध्‍ये जोरदार चर्चा होते.. खरोखरच शनि मंदिराच्‍या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळाला तर त्‍यांचे सारेच प्रश्‍न सुटतात काय ? चारशे वर्षापासून चालू असलेली परंपरा सहजा सहजी बदलेल असे वाटत नाही. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण, महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलल्‍या जाते. त्‍यांच्‍या प्रश्‍नांना वाचा फोडल्‍या जात नाही त्‍यांमूळे त्‍यांच्‍या वरील अन्‍याय काही केल्‍या कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्‍ंयत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अन्‍याय महिलांनीच सक्षमरित्‍या सामना करून सोडविले पाहिजे, त्‍याशिवाय महिलांची प्रगती अशक्‍य आहे आणि ही शक्‍ती महिलांमध्ये फक्‍त शिक्षणामूळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्‍त्रोत आहे. शिक्षण घेतल्‍यामुळे आपल्‍या जीवनाला एक दिशा मिळते, संजिवनी मिळते.  यांचे उत्‍तम उदाहरण म्‍हणून आपण महात्‍मा ज्‍योतिबा फुले आणि त्‍यांची पत्‍नी सावित्राबाई फुले यांच्‍या जीवनचरित्राकडे पाहू शकतो. अनाडी व निरक्षर पत्‍नी मूळे एके दिवशी ज्योतिबाना त्यांचा महत्‍वाचा कागद गमवावा लागला आणि त्याच वेळी पत्‍नी सावित्रीबाईला साक्षर  करण्‍याचा त्यांनी मनसुभा केला. तेवढ्याच तत्परतेने त्‍यास सावित्रीबाईंनी होकार दिला. घरातल्‍या घरात शिक्षण दिले. त्‍याचा फायदा एवढा झाला की, देशातील पहिली महिला शिक्षिका होण्‍याचा मान सावित्राबाई फुले यांना मिळाला. साहित्‍याच्‍या क्षेत्रात त्‍यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महात्‍मा फुले यांना शिक्षणाचे महत्‍व कळाले होते. त्‍यामुळे त्‍यांनी सन १८४८ मध्‍ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात खास करून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. एक स्‍त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते अशी त्‍यांची धारणा होती त्‍यातूनच मग त्‍यांनी आपल्‍या पत्‍नीला शिकवले. असे महत्‍व प्रत्‍येक पालकांना,  नव-यांना म्‍हणजेच  पुरूष मंडळींना कळणे गरजेचे आहे. समाजात आजही मुलींच्‍या शिक्षणाच्‍या बाबतीत पालक जागरूक नाहीत. असे  म्‍हणण्‍यापेक्षा मुलांच्‍या व मुलींच्‍या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार ? ही पालकांची  भावना  अजूनही दुर झालेली नाही. इंग्रजांच्‍या गुलामीगिरीच्‍या काळात महिलानी घराबाहेर जाणे अगदी तुच्‍छ समजले जायचे. महिला या " चूल आणि मूल " एवढ्याच कामासाठी समाजात राबत असत, तर शिक्षणासाठी घराबाहेर जाणे दूरची गोष्‍ट. भारत स्‍वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्‍या होती. त्‍यातल्‍या त्‍यात महिलांची निरक्षरता तर देशाच्‍या प्रगतीत फार मोठी अडसर ठरत आले आहे. त्‍यामुळे शासन प्रथम पासुनच महिलांच्‍या शिक्षणावर भर देत आले आहे. गेल्‍या वीस एक वर्षापासुन शिक्षणाच्‍या बाबतीत भारताची प्रगती उल्‍लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार  नाही. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्‍या शिक्षणाला प्रेरणा मिळाली.  शासनाने मुलींच्‍या  शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्‍हावा या साठी मुलींचा उपस्थिती भत्‍ता,  सावित्रीबाई फुले दत्‍तक पालक योजना, मोफत  गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्‍यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटी ने  मोफत  प्रवास  करण्‍यासाठी अहिलाबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना, तसेच लेक वाचवा लेक शिकवा या सारख्‍या अनेक योजनाच्‍या माध्‍यमातून मुलींच्‍या शिक्षणासाठी शासन  प्रयत्‍न करीत होते आणि करीत आहे. त्‍यांना त्‍यात काही अंशी यश  मिळाले पण पुर्ण यश मिळालेच नाही. त्‍यांची अनेक कारणे आहेत. त्‍या कारणाचा  विचार करून त्‍यावर उपाय योजना  करणे आवश्‍यक  आहे. 
* पालकांची शिक्षणाबात अनास्‍था - 
मुलींच्‍या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील  पालकामध्‍ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही, जेवढे शहरी  भागातील पालक जागरूक असतात. ग्रामीण भागातील पालक स्‍वत: शिक्षणाच्‍या  बाबतीत अनभिज्ञ असतात,  त्‍यामुळे त्‍यांना शिक्षणाचे महत्‍व पटत नाही. बरं  शिक्षणाचे महत्‍व पटत नाही असे जर म्‍हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्‍या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू  देत नाहीत. पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पुर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरुन थांबवितात. गावात ज्‍या वर्गापर्यंत शाळा त्‍याच  वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्‍याची मुभा  दिली जाते. पुढील शिक्षणासाठी जवळच्‍या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्‍याठिकाणी जाण्‍यासाठी मुलींना परवानगी दिली  जात नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. त्‍यामुळे आज प्राथमिक  वर्गातील मुलींची  संख्‍या माध्‍यमिक वर्गात गेल्‍यावर ५० % पेक्षा कमी  होते ही गळती मुलीच्‍या विकासास नक्‍कीच बाधक ठरत आहे. 
* अनिष्‍ठ रूढी व परंपरा - 
ग्रामीण भागातील समाज आज ही अनिष्‍ठ रुढी व परंपरेच्‍या खोल गर्तेतुन बाहेर येण्‍यास तयार नाहीत. मुलींच्‍या शिक्षणा विषयी त्‍यांच्‍या मनात आज ही तेच विचार घोळत आहेत जे की, वीस वर्षापूर्वी होते. मुलीने शिकून काय करावं ? शेवटी घरच तर सांभाळायचे आहे. त्‍यासाठी एवढं शिक्षण पुरेस आहे या विचाराने ग्रामीण भागातील पालक आपल्‍या मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायला भाग पाडतात. काही पालक मंडळी मुलींना सुरक्षेच्या कारणांवरून शाळेत पाठविणे बंद करतात. मुलींचे लग्‍न होईपर्यंत आई-वडिलांना तिची काळजी वाटते, मुलींच्या वाट्याला कोणतेही वाईट प्रसंग येऊ नये असे प्रत्येक पालकांना वाटते त्यामुळे त्यांचे  पुढील शिक्षण बंद करण्‍यात आल्‍याचे काही पालक खाजगीत बोलतात. तर काही पालक मुलगी आता उपवर झाली, तिच्‍या साठी एखादे चांगले स्‍थळ बघुन एकदाचं हात पिवळं केलं की, मी मोकळा होईन असे बोलतात. त्‍यांच्‍या या बोलण्‍यातून मुलीं विषयी असलेली त्यांची तळमळ व काळजी स्‍पष्‍टपणे दिसून येते. सध्‍या समाजात असलेले गढूळ वातावरण आणि मुलींच्‍या बाबतीत वाढत चाललेली असुरक्षितता यामूळे कोणीही मुलीच्‍या शिक्षणासाठी पुढील पाऊल टाकताना दिसून येत नाही. त्‍याच बरोबर देशात चालत आलेली वधूपक्षाकडून वरपक्षाला द्यावी लागणारी देणगी म्‍हणजे हुंडा. यामुळेसुध्‍दा मुलींच्‍या शिक्षणावर फार मोठा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. एखाद्या पालकांने आपल्‍या मुलींना खुप शिकविले, तिच्‍या शिक्षणावर खूप खर्च केला, असे असले तरी मुलींच्‍या लग्‍नाच्‍या वेळी देणगी द्यावीच लागते अशी परंपरा मुलींच्‍या शिक्षणास घातक ठरत आहे. त्‍यामुळे अश्‍या अनिष्‍ठ रूढी व परंपरा यास तिलांजली देणे अत्‍यावश्‍यक आहे. एवढं शिकवून, खर्च करून जर पुन्‍हा आहे तीच प्रथा सांभाळायची असेल तर मुलींच्‍या शिक्षणावर खर्च का करावा ? असा सर्व सामान्‍य विचार पालक करतोच, यात त्‍याचा तरी काय दोष ? पण याउलट मुलगी शिकून सवरून नौकरीला लागली किंवा स्‍वत:च्‍या बुध्‍दीमत्‍तेच्‍या बळावर रोजगार मिळवून कमावती झाली तर समाजात तिची पद, प्रतिष्‍ठा, मानसन्‍मान या सर्वच गोष्‍टी वाढीस लागतात. महिलांच्‍या हातात स्‍वत:चा पैसा असला किंवा पुरुषांकडे भीक मागण्‍याची वेळ जर महिलांवर येत नसेल तर तिला स्‍वाभिमानाने जीवन जगता येते. स्‍वाभिमानी स्त्रिया ह्या अनिष्‍ठ रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्‍याविरोधात लढा देऊ शकतात आणि त्‍यात यश सुध्‍दा मिळवू शकतात. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण अत्‍यंत महत्‍चाचे आहे.
* हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण - 
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत. ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. त्‍या सर्वाची यादी करीत बसलो तर फारच लांबलचक यादी होईल. महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार  समाधानकारक नाही. कारण आज ही महिलांना म्‍हणावी तशी संधी मिळत नाही, हे वास्‍तव नाकारून चालणार नाही. देशाच्‍या राजकारणात आणि इतर महत्‍चाच्‍या क्षेत्रात महिलांना संधी मिळावी, त्‍यांच्‍यात धाडस, साहस, प्रगती व्‍हावी यासाठी सरकारने महिलांना पन्‍नास टक्‍के आरक्षण देण्‍याच्‍या तयारीत आहे. परंतु आज जे काही महिला राजकारणात आहेत किंवा ज्‍यांनी निवडणूक जिंकून सत्‍ता व पद मिळविले आहेत. त्‍या पदावर खरोखरच महिलाच राज्‍य करीत आहेत काय ? याचे वास्‍तव चित्र असे आहे की बहुतांश ठिकाणी सरपंच, पोलिस पाटील, तालुक्‍याचे सभापती, शहराचे नगराध्‍यक्ष किवा जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षपदी महिलांची वर्णी लागत आहे.  त्‍यांचे रिमोट मात्र त्यांच्या पतीराजच्‍या हातात आहे. यास कारण एकच आहे ते म्‍हणजे या पदाधिकारी महिला शिकलेल्‍या नसल्‍यामूळे ते आपल्‍या पतीच्‍या हातून कारभार पाहत असतात. संविधानाने ज्‍या हेतूने किंवा उदेश्‍याने नियमावली तयार केली त्‍याचा आपण अश्याप्रकारे अनादर करीत असतो.  आपणाला आपले हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण निर्माण करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरक्षर किंवा अडाणी बाई लोकप्रतिनिधी झाली तर त्‍या विभागाचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा होतो का ? निदान याचा एक वेळा विचार करून आपल्‍या मुलींना शिकवू या. उद्या कदाचित ती गावची सरपंच बनून गावाचा कायापालट करू शकेल. 
* पालकांचे दारिद्र्य – मुलींच्‍या शिक्षण विकासात पालकांचे दारिद्र्य ही फार मोठी समस्या आहे. पोटाचे प्रश्‍न जो पर्यंत सुटत नाहीत तो पर्यंत माणसाचे कशातच लक्ष नसते. शेती काम करतांना घरातील लहान मोठी कामे करण्‍याची गरज घरातील मुलीं कडून पूर्ण केल्‍या जाते. घरातील छोटी भांवडे सांभाळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, घर सांभाळणे इत्‍यादी कामे अर्थातच मुलींना करावे लागते. याउलट मुले काहीच काम करीत नाहीत तरी आई-वडीलांचा मुलांविषयी वेगळाच भाव असतो आणि मुलीं विषयी वेगळाच. एवढं असून सुध्‍दा प्राथमिक वर्गात मुलींची अभ्‍यासातील प्रगती मुलांपेक्षा जास्‍त दिसून येते. याची प्रचिती दहावी व बारावीच्या निकाल ज्‍यावेळेस लागतो त्यावेळेस निदर्शनास येते. मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा नेहमीच सरस असतो. पहिल्‍या दहा मध्‍ये सर्व श्रेष्‍ठ गुणांत मुलींच बाजी मारतात. मात्र पुढे पदवीचे शिक्षण घेतांना मुलींच्या संख्येत लक्षणीय घट होते. गुणवत्‍ता यादीत झळकणा-या मुलीं कदाचित कुठे तरी नौकरी मिळवतिल परंतु बाकीच्या मुलींचे पुढे काय प्रगती होते ? या बाबत प्रश्‍न चिन्‍हच आहे. याउलट दहावी-बारावीत सर्वसाधारण गुण मिळविलेला मुलगा मात्र आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्‍न करतो. ही प्रथा कुठे तरी बंद व्‍हायला पाहिजे मुलगा असो वा मुलगी सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे. याउलट मुलींचे शिक्षण समाजाच्‍या व देशाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. आज देशात जे काही अनैतिक किंवा अराजकता वाढत चालले आहे. त्‍यास मुलींना शिक्षण न देणे हेच प्रमुख कारण दिसून येते. मुलीने शिक्षण घेतले तर तिला स्‍वत:बद्दल आत्‍मविश्‍वास निर्माण होतो. आज घरोघरी हुंडाबळी किंवा विवाहित मुलींचा जो छळ चालू आहे त्यास शिक्षण घेतलेली मुलगी नक्कीच विरोध करेल यात शंकाच नाही. मुलींच्‍या सुरक्षित आयुष्‍यासाठी तिला वयाच्‍या आठराव्‍या वर्षा पर्यंत शिक्षण देणे आवश्‍यक आहे. देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण हे फारच आवश्‍यक आहे. पराया धन किेंवा परक्‍या घरची सून म्‍हणून जाणारी, आपल्‍या घरांसाठी तिचा ज्ञानाचा काय फायदा ? अश्‍या गोष्‍टीचा विचार न करता मुलींना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यायाच्‍या विरूध्‍द आवाज उठविण्‍यासाठी  मुलींना शिकवलेच पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण म्‍हणजे प्रगतीचे लक्षण असे म्हटल्या जाते ते काही खोटे नाही हे आपण नेहमी साठी लक्षात ठेवावे. 


- नागोराव सा. येवतीकर 

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद

ता. धर्माबाद जि. नांदेड
 
  9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी.....

" यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवता " या संस्कृत भाषेतील सुवचनाचा अर्थ आहे ज्याठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी देव रमतो. हे झालं त्या श्लोकाचा शब्दशः अर्थ परंतु प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा आहे. ज्या घरात स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजे स्त्रियांना मानाचे स्थान दिले जाते, त्यांच्या विचारांना वाव दिले जाते, त्यांचा मान ठेवला जातो आणि त्यांना समानतेची वागणूक दिली जाते, त्या घरात देव रमतो यांचा अर्थ त्या घरात शांतता व समृद्धी राहते. त्या घरची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. वरील सुवचन आपणांस बऱ्याच ठिकाणी वाचण्यात येते. नेहमीप्रमाणे वाचन करणे आणि सोडून देणे यापलीकडे आपण काहीच करीत नाही हे ही सत्यच आहे. पुरातन काळापासून महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता अजूनही बदललेला नाही हे वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या छोट्या मोठ्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यामधून कळून येते. आजही स्त्रियाना चूल आणि मूल या क्षेत्रापुरतेच बांधून ठेवले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आजही त्यांना त्यांचा दर्जा मिळालेला नाही. तेंव्हा त्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? यांचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे असॆ वाटते. 
शनि मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी समाजात वादविवाद झाले आणि  न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु समाज तो निकाल मानण्यास तयार नाही. तेंव्हा प्रश्न असा पडतो की, महिलांना मंदिरात प्रवेश दिल्याने त्यांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत काय ? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, अमानुष छळ या विषयावर आंदोलने झाली असती तर कदाचित महिलांना मोकळा श्वास घेता आले असता.  स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या समस्येवर सर्वांनी भरभरून लिहिले आहे मात्र समाजात आजही महिलांच्या समस्या काही कमी झाले नाहीत कारण या समस्यावर ठोस अशी उपाययोजना झालीच नाही. फक्त चर्चा आणि चर्चाच झाली. म्हणूनच उपायांची अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. संसारात पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान महत्व आहे. रथाच्या चाकाप्रमाणे पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक आहेत. एक जरी चाक खराब झाले तर ज्याप्रमाणे रथ चालत नाही अगदी तसेच पुरूष आणि स्त्रियांचे आहे. दोघांच्याही प्रगतीत एकमेकास असलेला आधार महत्वाचे आहे त्याशिवाय जीवनाची प्रगती शक्यच नाही. 
शिक्षणाने माणसाचा संपूर्ण विकास होतो हे यापूर्वी महात्मा फुले यांनी सांगितले आहे. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण होते. अन्यायाविरूध्द लढण्याची शक्ती मिळते. समाजात मान आणि सन्मान दोन्ही मिळतात. याचमुळे समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसोबत याच शिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले तर कोणत्याही संकटाला न डगमगता यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात. आज कित्येक स्त्रिया स्वतःच्या पायांवर उभे होत आहेत. त्यामुळेच समाजात त्यांचा दर्जा सुध्दा उंचावला जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलींची संख्या समाधानकारक आहे मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय फरक दिसते. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मुली उच्च शिक्षण पूर्ण करतात, यांत बदल झाले पाहिजे. शासनाने सुध्दा मुलींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मुलगा - मुलगी यांत भेद न मानता समान तत्वावर चालले पाहिजे असॆ वाटते. 
जी व्यक्ती पैसा कमाविते, त्यांस घरात, समाजात आणि गावात प्रतिष्ठा मिळते आणि आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये पैसा फक्त पुरुष कमावितो म्हणूनच त्यालाच प्रतिष्ठा मिळते, यांत काही चूक नाही. मग स्त्रियांनी देखील रोजगार किंवा नौकरी मिळविले आणि त्याद्वारे पैसे कमावू लागले तर समाजात, घरात आणि गावात त्यांची सुध्दा प्रतिष्ठा नक्कीच वाढू लागेल, यांत शंकाच नाही. यांचाच विचार करून प्रत्येकाने आपल्या बहिणीला किंवा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असॆ शिक्षण देऊन त्यांना रोजगार किंवा नौकरी करण्याची संधी दिली तर ते स्वतः प्रगल्भ होतील आणि त्यांची समाजातील पत वाढून दर्जा सुध्दा वाढण्यास मदत होईल. कायद्याने प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याची तरतूद केलेली आहे. आज नोकरी असो वा राजकारण तेथे महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल न ठेवणारी महिला आज रात्र पाळी च्या ठिकाणी काम करण्याची तयारी दर्शविते यावरून तिचा दर्जा उंचावला आहे असे नक्कीच म्हणता येईल. पण हे वर वर दिसणारे चित्र आहे. याच चित्राची दुसरी बाजू फारच भयानक आहे. आज बऱ्याच स्त्रिया  नोकरी किंवा इतर कारणाने घराबाहेर पडत आहेत, पुरुषा सारखे काम करून पैसा देखील कमावित आहेत मात्र तरी ही त्यांना त्यांच्या मनासारखे जीवन जगता येत नाही. नोकरी करावी महिलांनी आणि तिच्या पगारावर नियंत्रण पुरुषाचे. ATM सारख्या कार्डने पुरुषांना खूप  सोईचे केले आहे. नाही तर पूर्वी पैसे काढण्याच्या निमित्ताने बँकेत जायला भेटायचे. आत्ता ती ही सोय उपलब्ध नाही. काही महिलांची एवढी बिकट अवस्था आहे की ATM चा पिन क्रमांकदेखील त्यांना माहीत नसतो. मग आपल्या एवढ्या शिक्षणाचा आणि नोकरीचा फायदा तो काय ? इकडे राजकारणामध्ये ही महिलासाठी अच्छे दिन आहेत असे वाटत नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील राजकारण मध्ये सहभागी व्हावे म्हणून त्यांना आरक्षण दिले आहे. त्याचमुळे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी श्रीमती इंदिरा गांधी विराजमान होऊ शकल्या. भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीच्या पदावर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची निवड झाल्यावर सर्व महिलांना नक्की अभिमान वाटला असेल यात शंका नाही. भारतीय राजकारणात नाव घेण्याजोग्या अजून भरपूर महिला आहेत. जे की स्वबळावर पुढे आले आहेत. पण नेमके याच ठिकाणी आपल्या हातून चूका होतात आणि ग्रामपंचायतच्या सरपंचपदापासून ते महापालिकेच्या महापौरपदापर्यंत महिलांना संधी दिली जाते. मात्र याठिकानी त्या महिलांना निर्णय घेण्याची संधी फार कमी वेळा मिळते. कारण त्यांचे पतिदेव किंवा घरातील कर्तबगार पुरुष निर्णय घेत राहतो. महिलांना फक्त सहीपुरते सिमीत  ठेवल्या जाते. कळसूत्रीबाहुली प्रमाणे यांचे वागणे होऊन जाते. याठिकाणी एक गोष्ट खास करून नमूद करावेसे वाटते, सभापती किंवा अध्यक्ष पदावर महिला असेल तर त्यांचे पती किंवा इतर कोणी तरी पुरुष सर्व सूत्रे हातात घेऊन काम पाहतात. असेच जर एखादी महिला नोकरदार आहे, याठिकाणी त्या महिलेच्याऐवजी तिच्या पतीला किंवा घरातील एखाद्या पुरुषांना तिथे पाठविले तर याच लोकप्रतिनिधी मंडळीना ही बाब नक्की पटत नाही. असे का ? याचा ही जरा विचार करावा लागेल. नुकतेच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका पूर्ण होऊन त्याचे निकाल देखील जाहीर झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी सभापती, अध्यक्षा किंवा महापौर होण्याची संधी महिलांना मिळाली असेल. त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानासाठी जरा विचार करावा. पुरुष मंडळीनी सुद्धा महिलेला मिळालेल्या संधीनुसार तिला मार्गदर्शन करावे आणि स्वतंत्र व्यवहार तिला करू दिल्यास काही तरी विकास नक्की होईल.
जुन्या विचारांचा पगडा डोक्यावर असल्यामूळे समाज आज सुध्दा त्या सनातन परंपरेत अडकून पडले आहे. महिला वर्ग या विचार पध्दतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. श्रध्दा आणि अंधश्रद्धाच्या विळख्यातून महिला अजूनही बाहेर आले नाहीत. तेंव्हा महिलांनी आत्ता आपला समाजातील दर्जा वाढविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे सुध्दा तेवढेच आवश्यक आहे. समाजात एकाएकी असॆ बदल होणार नाही. त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही सामंजस्यपणे वागणे ही गोष्ट सुध्दा विसरून चालणार नाही. 

नागोराव सा . येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. ) 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
nagorao26@gmail.com

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - तिला मदत .... ?*

आठ मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिन साजरा केला जातो. महिलांना सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस फक्त आजच्या दिवशी साजरा करण्यात काही अर्थ आहे का ? महिला दिन रोजच साजरा करण्यासारखा आहे. कारण पुरुषांच्या जीवनातून महिला वजा केल्यावर जीवन काय उरते ? याची साधी कल्पना देखील करवत नाही. विचार करण्यासारखी बाब आहे, पण यावर कोणाताच पुरुष विचार करत नाही, हीच फार मोठी खेदाची बाब आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना देखील वागणूक मिळायलाच हवे असे बोलणारे अनेक भेटतील पण बोलल्या प्रमाणे कृती करणारे फारच कमी बघायला मिळतात. महिलांना घरात मिळणारे दुय्यम स्थान हा विषय सर्वांसाठी चिंतन करणारा आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा पुरुषाला स्वतः मध्ये बदल करणे आवश्यक आहे तरच महिलांना काही करता येईल.
घरात, समाजात कामाची झालेली विभागणी यावर चर्चा व्हायला पाहिजे. आपल्याकडे कामाची अशी विभागणी झालेली आहे की, अमुक काम पुरुषांनी आणि तमुक काम स्त्रियांनीच केली पाहिजे. याठिकाणी कसलीही तडजोड स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. याची शिकवण अर्थात लहानपणापासून मिळते ज्यामुळे एकामेकांची कामे वाटून घेतली आहे. म्हणून महिलांच्या या कामामध्ये पुरुषांनी स्वतः हुन सहभागी झाल्यास काही बदल होऊ शकेल. प्रत्येक पुरुषांनी घरातील महिलांच्या कामात थोडीशी मदत करायला हवी. आपली जराशी मदत देखील महिलांना खुप काही बळ देऊन जाईल. प्रत्येक घरातील महिला सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भरपूर काम करत असते. त्या सर्व कामातील काही काम पुरुषांनी केले तर तेथे खरी समानता सुरू होईल. ज्या घरात पुरुष आपल्या पत्नीला किंवा आईला मदत करतो त्या घरात असणारे मुलं देखील भविष्यात तसे वर्तन करतील. म्हणजे नकळत आपण आपल्या मुलांवर असे संस्कार करत असतो हे महत्वाचे आहे.
आज रोजची वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चालू केले की महिलांवर होत असलेल्या अनेक अन्यायकारक बातम्या वाचायला व पाहायला मिळते. अनैतिकता खूप वाढली आहे असे चिंताजनक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडते पण ही अनैतिकता का निर्माण झाली असेल यावर चिंतन करत नाहीत. पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती आज त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळून देखील ते निर्भयपणे फिरू शकत नाहीत. म्हणजे ते आज ही आपल्या घरातच कैद असल्यासारखे आहेत. एखादी महिला रात्रीच्या वेळी सुमसान रस्त्यावर असेल तर तिच्या जीवाला धोखा ठरलेला आहे. दिल्ली, मुंबई सारखी महानगरे रात्रीला झोपत नाहीत असे म्हणतात पण त्याच न झोपणाऱ्या शहरात लोकांची झोप उडून जाईल अश्या घटना घडत आहेत. महिलांच्या मनातील भीती काढण्यासाठी प्रत्येकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नुसते असे महिला दिन साजरे करून काही निष्पन्न होणार नाही. म्हणून महिला दिन एक दिवस नाही तर 365 दिवस ही साजरे व्हायला पाहिजे असे वाटते.

- नासा येवतीकर, 9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लघुकथा - मुलांपेक्षा मुलगी बरी.....!

आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन तपासून निघुन गेले. काही त्रास होते काय ? अशी विचारण करून डॉक्टर आपल्या जागेवर गेली. तसे सासुबाई आणि डॉक्टर यांच्यात काही तरी कुजबुज बोलणे झाले. पण तिला काही त्यातले कळू दिले नाही. घरी आल्यावर चर्चा झाली. गर्भात मुलींचे अंश असल्यामुळे गर्भपात करावा अशी सासुबाईची ईच्छा होती. कारण तिला पहिली अडीच तीन वर्षाची एक सुंदर मुलगी होती. सध्या तिला दिवस गेले होते. सासुबाईची ईच्छा होती की यावेळी मुलगाच हवा अशी ती हट्ट करत होती. कारण मुलगा हा वंशाचा दिवा असतो. तो जर नसेल तर आपल्या साऱ्या संपत्तीचे करायचे काय ? या समस्येमुळे तिला खुप त्रास होत होता. तो सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होता. त्याला तिची समस्या कळत होती पण तो आईला समजावू शकत नव्हता. काही केल्या ती कोणाचे ऐकत नव्हती. ती जुन्या विचारसरणीची होती.  त्यामुळे त्या दोघांना पण डोक्यावर टेंशन येत होते. पण गर्भपात करायचे नाही यावर ते दोघे ठाम होते. त्यादिवशी पोटात त्रास होत असल्यामुळे सकाळी सकाळी तिला दवाखान्यात भरती करावे लागले. काही वेळानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलींपेक्षा ही ती खुप सुंदर दिसत होती. तो तिच्या सोंबतच होता. मुलगी झाली हे कळताच सासुबाईचा चेहरा खुप उतरुन गेला. सासुबाई मुलगी जन्मली हे कळाल्यावर देखील दवाखान्यात आली  नाही. त्यामुळे तिला खुप दुःख वाटले पण त्याची खंबीर सोबत होती म्हणून तिला काळजी वाटत नव्हती मात्र चिंता लागली होती पुढे काय होणार ?
दिवस असेच पुढे सरकत होते. दोन्ही मुलीं चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. दोन्ही मुलीं खुप हुशार होत्या त्यामुळे चांगले गुण घेत प्रत्येक वर्गात उत्तीर्ण होत गेल्या. दोघांनाही मेडिकलला प्रवेश मिळाला आणि एक मुलगी डोळ्याची डॉक्टर झाली तर छोटी मुलगी मेडिकल ऑफिसर झाली. सर्व काही आनंदात होते. दोघीचे थाटामाटात लग्न झाले. लग्न होऊन ते सासरी जरी गेले असतील तरी आई बाबा आणि आजी यांना ते विसरले नाहीत. दोन्ही मुलीं आजीवर खुप प्रेम करायचे एवढे असून देखील सासुबाई अजुन मोकळेपणाने बोलत नव्हत्या. पण एके दिवशी सासुबाईला डोळ्याचा त्रास झाला तेंव्हा तिला मोठ्या मुलींच्या दवाखान्यात एडमिट करण्यात आले. मोठ्या मुलीने आपल्या अभ्यासाच्या बळावर डोळ्याची यशस्वीपणे शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळी तिच्या आई बाबाला खुप आनंद झाला. डोळ्यांची समस्या सुटल्यामुळे सासुबाईचे डोळे उघडले आणि आज ती म्हणते मुलापेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी.
( आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने मुलींच्या जन्माविषयी प्रत्येकाने डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. हेच या कथेच्या माध्यमातून सांगण्याचा एक छोटा प्रयत्न. )

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

साहित्य वाचन केल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया खाली comment करावे plz. 

No comments:

Post a Comment