नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 13 September 2022

गौरव - गाथा ( Gourav - Gatha )

मा. सौ. वर्षा ठाकूर घुगे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री प्रशांत दिग्रसकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. सौ. सविता बिरगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेला अभिनव उपक्रम

गौरव गाथा - मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची

नमस्कार, 
गौरव-गाथा उपक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. 

गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सैनिकांची

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला होता तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्तीसंग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. 

वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आले. 
धन्यवाद .......! 
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

नमस्कार, 
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण श्री गोविंदभाई श्रॉफ यांची माहिती पाहू या. 
गोविंदभाई श्रॉफ  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. भारतीय स्वातंत्र्यलढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातील व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे 24 जुलै 1911 रोजी झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू केले. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले. मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वे विभाग ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोविंदभाई श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सैनिकांस विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद .......!

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण कर्मयोगी साहेबराव देशमुख बारडकर यांची माहिती पाहू या.
श्री साहेबराव देशमुख बारडकर यांचा जन्म 08 एप्रिल 1925 रोजी मौजे बारड जिल्हा नांदेड येथे झाला. सधन व प्रतिष्ठित देशमुख परिवारात जन्मल्यामुळे कोणत्याही बाबीची कमी नव्हती. त्यांचे प्राथमिक शिक्षण बारड येथे झाले. पुढे नांदेड शहरात निवासाची सोय, शहरी आकर्षण व  आर्थिक सुबत्ता यामुळे हायस्कूलच्या शिक्षणासाठी नांदेडला राहिले व हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. या काळात मराठी सोबतच उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे त्यांना ज्ञान झाले. वयाच्या 16 -17 व्या वर्षी त्यांना शाळेसोबत बाहेरच्या वातावरणाची माहिती झाली. धाडसी व खिलाडू वृत्तीमुळे समवयस्क मुलांचा गराडा त्यांच्याभोवती असायचा. ते सर्व मुलांमध्ये केंद्रस्थानी असायचे. अर्थात नेतृत्व गुण अंगी असल्यामुळे नेहमी समाज व समूहात राहत गेले. याच काळात सर्व देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.
भारतीय काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढा पुकारला होता. जनता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या " जयहिंद " नाऱ्यामुळे प्रभावित झाली होती. महात्मा गांधीजींनी अहिंसा व असहकारातून ताकद निर्माण केली होती. याचा सर्व अभ्यास बाल साहेबराव करत होते आणि त्यामुळे त्यांच्यात स्वातंत्र्यासाठी वीरश्री निर्माण झाली व त्यांचे बालपण तेथेच संपले.
विशेषतः सन 1946 ते 1948 मध्ये प्रखर चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वाधिक चळवळी व कारस्थाने बारड भागात झाल्या. त्या काळात श्री राजारामजी देशमुख, श्री विठ्ठलराव बारडकर, श्री आबासाहेब लहानकर इत्यादी मंडळी चळवळीमध्ये अग्रेसर होते. याच वयात साहेबराव बारडकर यांनी नांदेड, किनवट, उमरखेड या भागात जनजागृती केली व स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व केले. केवळ पाच फूट उंची लाभलेली व्यक्ती पण कर्तव्यामुळे, धाडसामुळे आणि पहाडी आवाजामुळे समोरची व्यक्ती प्रभावित होत असे. वक्तृत्वात अशी धार व प्रेरणा होती की आपणही काहीतरी करायलाच पाहिजे असे वाटायचे. त्यांच्या जनसंपर्कामुळे खेड्यापाड्यातील सर्व समाज एकवटला. हा दोन वर्षाचा काळ म्हणजे हैदराबाद संस्थानच्या इतिहासातील  निर्णायक काळ होता. नांदेड जिल्ह्यात सत्याग्रहापासून सशस्त्र चळवळी झाल्या. पारनुर व टेळकी येथील जंगल सत्याग्रह ऐतिहासिक ठरले. या सर्व लढ्यात साहेबरावजींचा सहभाग विशेष होता .
सन 1947 मध्ये स्टेट काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे तिरंगा राष्ट्रीय ध्वज मराठवाडाभर फडकले आणि नांदेडचा कॅम्प उमरखेडला कायम झाला. या सर्व घडामोडीत साहेबरावजींचा मोलाचा वाटा होता.
गावातील लोक साहेबरावजींना मालक या नावाने संबोधित. साहेबरावजींचे घर म्हणजे कार्यकर्त्यांची जणू राजधानीच झाली होती. साहेबरावजींचा मळादेखील केंद्रच होते, ज्याला बारड रापू म्हणत. यामध्ये चाबरा चोरंबा व रावणगाव या गावापासून लहान नागेली चितगिरी ते थेट भोकरपर्यंत जवळपास 60 गावे होते. त्यानंतर हदगाव ते किनवटच्या हद्दीपर्यंत समाविष्ट झाली. साहेबरावजींच्या पुढाकाराने सरकारी दप्तर ताब्यात घेणे शेतसारा वसूल करणे सरकारचा अंमल झिडकारून देणे असे कार्यक्रम सुरू झाले. या सर्व सत्याग्रह व चळवळीसह रजाकारांशी सशस्त्र सामना यांच्या अनुभवातून साहेबरावजी अतिशय प्रवीण झाले व निर्भीड झाले. त्यांनी आपल्या अल्पवयात देशभक्तीचा जगाला परिचय करून दिला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर कर्मयोगी स्वातंत्र्यसेनानी यांना विनम्र अभिवादन .........!
ह्या माहितीचे संकलन एकनाथ शिंदे यांनी 

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण श्री भाऊराव पाटील मतसागर यांची माहिती पाहू या. 

सन 1923 मध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मोडी लिपी आणि मराठी भाषेसह तेलुगू, गुजराती, ऊर्दू, इंग्रजी या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या जरूळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.
औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केला होता. त्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. भाऊराव मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना या मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांना ताम्रपत्र बहाल केले.
कृषिक्षेत्रातही भाऊराव मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सैनिकांस विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई दगडाबाई शेळके यांची माहिती पाहू या. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात मैलाचा दगड रचला तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी. झाशीच्या राणीप्रमाणे अपंग मुलाला पाठीला बांधून एका हातात बंदूक तर, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून त्यांनी सहकारी स्वातंत्र्यसैनिकांना रसद पुरविण्याचे काम मोठ्या नेटाने केली. 
धोपटेश्वर (ता. बदनापूर जि. जालना) येथील दगडाबाई शेळके यांनी निजामी राजवट उलथवण्यासाठी मुक्तिसंग्रामात उडी घेतली. त्यांच्या मर्दानी पराक्रमांची इतिहासाने त्यांच्या जिवंतपणीच नोंद घेतली. दगडाबाईंनी बंदूक आणि हातगोळे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले होते. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. पॅन्ट, शर्ट घालून, मुलाला पाठीशी घेऊन बंदूकीसह घोड्यावर प्रवास करीत असल्याने कुटुंबीय व समाजाने आक्षेप घेतला. पती देवराव शेळके यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्या खचल्या नाहीत. स्वतःच्या जीवाची श्वाश्वती नसल्याने त्यांनी देवराव यांचा मैनाबाईंशी स्वतःहून दुसरा विवाह लावून दिला होता.
दगडाबाईची माहेरची लढाई - 
दगडाबाईंनी निजामाशी अनेकदा दोन हात केले. त्यांची सर्वांत गाजलेली लढाई म्हणजे माहेरची लढाई. भोकरदन तालुक्यातील माहेर कोलते टाकळी शिवारातील लढ्यात त्यांनी हातगोळे टाकून निजामाचा अख्खा कॅम्प उद्धवस्त केला होता.
अश्या धाडसी होत्या दगडाबाई ! त्यांचं आयुष्य म्हणजे एक जीवंत दंतकथाच होती.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सेनानी यांना विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण अनाथांची आई डॉ. ताराबाई परांजपे यांची माहिती पाहू या. 
डॉ. ताराबाई परांजपे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील एक ठळक नाव. समाजसेवेसाठी त्यांनी प्रसंगी नातेवाईकांचादेखील रोष पत्करला; पण आपल्या विचारांना कधीही तिलांजली दिली नाही. मुक्तिसंग्रामाबरोबरच, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, समता परिषद, नशाबंदी, जाती निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. शालेय जीवनातच त्यांना मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहवास लाभला. 
ताराबाईंचा जन्म ५ ऑक्टोबर १९३० रोजी हैदराबाद येथे झाला होता.२६ जानेवारी १९४७ रोजी त्यांचा विवाह स्वातंत्र्य सेनानी नागनाथ यांच्याशी झाला. पूर्वाश्रमीच्या ताराबाई आपटे, या परांजपे झाल्या. मुक्तिसंग्रामामध्ये भूमिगत राहून ताराबाईंनी कधी तेलुगू मोलकरणीच्या वेषात, तर कधी कॉलेजकन्या म्हणून शिताफीने पोलिसांना गुंगारा दिला होता. बुलेटिन छपाई यंत्र किंवा रेल्वे पूल उडविण्यासाठी लागणारा दारूगोळा पळविण्याची धाडसाची कामेही त्यांनी केली होती. शालेय मुलींना एकत्र आणून जागृती केली. अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घातला. मराठवाडा महिला समता परिषदेतर्फे नांदेडला त्यांनी ‘बालसदन’ सुरू केले. या माध्यमातून त्यांनी अनाथांना मायेचा ओलावा दिला. शिक्षण क्षेत्रासहीत सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या ताराबाईंना अवघा मराठवाडा ‘अनाथांची आई’ म्हणून ओळखत असे.
वयाच्या चौदाव्या वर्षीच हैदराबाद येथील सुलतान बाजाराजवळील असलेल्या भंगी कॉलनीत त्यांनी प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतले होते. त्यावरून ‘भंगीणमैत्रीण’ म्हणून त्यांना दूषणे मिळाली; पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. नांदेडच्या समाज कल्याण खात्याच्या सहकार्याने त्यांनी सतत तीन वर्षे महिला सहभोजनाचे कार्यकम घेतले.  तब्बल १४ वर्षे प्रौढ शिक्षण समितीचे कार्य त्यांनी केले. प्रौढ महिलांना त्या, दररोज एक तास मराठी आणि इतिहास शिकवीत होत्या. 
ताराबाईंची साहित्य संपदाही मोठी होती. ‘लोकनेते जयप्रकाश’, ‘संन्यस्त स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ’, ‘सीमा प्रदेशातील लोककथा’, ‘आदिम प्रतिमा आणि स्त्रीजीवन’ आदींचा त्यात समावेश आहे. ‘अनुबंध’साठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा पुरस्कार त्यांना मिळाला, बालसदनातील मुलांवर त्यांनी लिहिलेले ‘निवडुंगाची फुले’ हे पुस्तक अमेरिकेपर्यंत गेले. त्यांना सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. महिला-बालकल्याण क्षेत्रासाठी ‘जानकीबाई आपटे पुरस्कार’,  ‘गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार , महाराष्ट्र सरकारचा दलितमित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यांच्यासह अनेक पुरस्कारांनी ताराबाईंना सन्मानित करण्यात आले होते. ‘लोकसाहित्य’ आणि ‘लोकसंस्कृती’ हे त्यांचे अभ्यासविषय होते. तेलुगू भाषेचा मराठीवरील परिणाम हा त्यांचा ‘पीएच.डी.’चा विषय होता. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सेनानी अनाथांची आई यांना विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण या मुक्तीसंग्रामातील पहिले हुतात्मा ठरलेले गोविंदराव पानसरे यांची माहिती पाहू या. 
गोविंदराव यांचा जन्म 15 मे 1913 ला जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे त्यांच्या मामाच्या घरी झाला. गोविंदराव यांच्या आईचे नाव यमुनाबाई तर वडीलांचे नाव विनायकराव होते. वडील हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते पण पुढे ते शालीबंडी हैदराबाद येथे राहावयास आले. तेथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. गोविंदरावांचे मामा शंकरराव हे बदनापूर येथे स्टेशन मास्तर होते.  गोविंदराव अवघे सहा महिन्याचे असताना त्यांचे आई-वडील वारले. केवळ सहा महिन्याचे बाळ पोरके झाले. अशा अनाथ गोविंदरावांचे पालनपोषण आणि शिक्षण त्यांचे मामा शंकरराव यांनी केले. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हैदराबादच्या विवेक वर्धिनी येथे झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते निजाम कॉलेजमध्ये दाखल झाले. पण त्यांनी पुढे शिक्षण सोडून दिले. त्यांचे मामा शंकरराव यांची धर्माबाद येथे स्टेशन मास्तर म्हणून बदली झाली व ते तिथेच स्थायिक झाले होते. गोविंदराव त्यांच्याकडे येऊन राहिले व सार्वजनिक काम करू लागले.
हरिपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे अत्यंत बुद्धिमान विचारी आणि चिकित्सक होते. ते स्वाभिमानी, स्वावलंबी आणि प्रखर राष्ट्राभिमानी होते. त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व व संघटन कौशल्य होते. जीवनभर विवाह व नोकरी न करण्याचे ठरवून त्यांनी जनसेवेचे व्रत घेतले. त्यांचा स्वभाव मोकळा, प्रेमळ पण करारी व निर्भीड होता. ते गांधीवादाचे पक्के अनुयायी होते. धर्मवत वाचनालय खादी भांडार व पुढे चालून महाराष्ट्र परिषद व स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून व्यापक स्वरूपाचे कार्य केले. धर्माबादच्या भोवती चार तालुक्यांच्या बहुतेक सर्व खेडोपाडी पायी दौरे करून काँग्रेसचे व खादीचे प्रचार कार्य त्यांनी केले. त्यामुळे सहा हजार प्राथमिक सभासद व 300 खादीधारी त्यांचे अनुयायी बनले होते. गोविंदराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक होते. या भागात गोविंदराव करत असलेले कार्य रजाकरांना आवडणे शक्यच नव्हते. गोविंदरावांनी कोंडलवाडी येथे केलेले भाषण सरकारला आक्षेपार्ह वाटले त्यामुळे त्यांना अटक झाली व जामीन मिळाला नाही. शेवटी 21 ऑक्टोबरला त्यांना जामीन दिला गेला. सायंकाळी ते पुंडलिकराव पाटील व इतर कार्यकर्त्यासोबत बैलगाडीतून बिलोलीला जात असताना रजाकारांनी अर्जापूर जवळ गाठून त्यांचा खून केला. गोविंदराव पानसरे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा होत. गांधीवादी गोविंदरावांच्या बलिदानाने या भागातील जनता फार मोठ्या प्रमाणात मुक्तीसंग्राम लढ्यात सामील झाली. नांदेड जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते निर्भीडपणे निजामी राजवटीला आव्हान देऊ लागले. हा निर्भयतेचा वसा येथील जनतेला गोविंदराव पानसरे यांनी दिला होता हे मात्र निश्चित
ह्या माहितीचे संकलन भाऊसाहेब उमाटे, सहशिक्षक ज्ञानेश्वर विद्यालय लातूर यांनी केले आहे 

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी यांना विनम्र अभिवादन .......!
धन्यवाद ......! 
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण या मुक्तीसंग्रामाचे प्रमुख नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांची माहिती पाहू या. 
स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे एक संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी 03 ऑक्टोबर 1903 रोजी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.
‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक त्यांच्यासोबत होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांचे विशेष योगदान होते. 
मुक्तीसंग्राम लढ्यातील सर्व स्वातंत्र्य सेनानीना विनम्र अभिवादन  ........!
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
संकलन :- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद 9423625769
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

No comments:

Post a Comment