नागोराव सा. येवतीकर

Saturday, 17 July 2021

वाचनाची आवड ( interest in reading )

मुलांमध्ये वाचनाची आवड कशी वाढवाल ?

वाचन हे आपल्या डोक्यातील मेंदूचे खुराक आहे. माणसाला भूक लागली की माणूस भाकर-भाजी खातो आणि पोटाची भूक मिटवितो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या डोक्यातील मेंदूला भूक लागली तर वाचन करून त्याची भूक भागवावी लागते तरच आपला मेंदू नेहमी क्रियाशील राहतो. भाषा विकासाच्या कौशल्यात श्रवण आणि भाषण यानंतर वाचनाचा नंबर लागतो. आजकाल असे ऐकायला मिळत आहे की, मुलांचे वाचन खूप कमी झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत जर विचार केला तर नक्कीच ते ऐकलेले सत्य आहे, असे वाटते. त्याला कारण ही तसेच आहे. पूर्वीच्या काळी ज्ञान मिळविण्यासाठी वाचनाशिवाय अन्य कोणताच पर्याय नव्हता. आज आपल्यासमोर टीव्ही, संगणक, मोबाईल यासारखे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे मुले वाचनापासून दूर गेले आहेत किंवा जात आहेत. 
जरासे आपण वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवून बघू या. किराणा दुकानातून साखर आणलेला पेपर वाचल्याशिवाय राहत नव्हता. हातात काहीही पडले की अधाशासारखे वाचनाची सवय होती कारण दुसरं काही मिळतच नव्हतं. रोजच्या रोज पेपर तरी कोठे वाचायला मिळायचं ? काही हौशी वाचक मंडळी वाचनालयातील पुस्तकं वाचायची. वाचनालयातील पुस्तकं देखील वाचून संपून जायची पण त्यांची भूक मिटायची नाही. मला आठवते मी लहान असताना रद्दीमध्ये गुजराती भाषेतील पेपर यायचे. गुजराती भाषेची लिपी देवनागरी लिपीशी जवळपास सारखी असल्याने ते गुजराती भाषेतील पेपर वाचून काढत असे. त्या रद्दी पेपरातून मला वाचनाची सवय लागली. घरी किशोर आणि चंपक नावाचे मासिक यायचे. त्यातील चित्र आणि कविता पाहून मला वाचनाचे वेड लागले. 
आजच्या मुलांना देखील वाचनाची आवड निर्माण करणे काही अवघड गोष्ट नाही. त्यासाठी पालकांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवं असे मला वाटते. मुलांना उपयुक्त असलेले किशोर, चंपक यासारखी पुस्तके त्यांना द्यावे, बालकविता वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे, चित्ररूप कथा वाचून दाखवावे आणि त्यांना वाचण्यास द्यावे, घरात नेहमी वाचन करण्याचा वातावरण ठेवावे, मोबाईलवर वाचन करण्यापेक्षा पुस्तकं वाचण्याचा प्रसंग तयार करावा. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून मुले वाचनाकडे वळू शकतात. लहानपणी एकदा त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण केली की, त्यांना त्या वाचनाची भूक लागत राहते आणि ते भूक मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुळात हल्ली आपण मुलांना वाचनाची भूक निर्माण करण्यात अपयशी ठरलो आहोत म्हणून आजची मुले वाचन करण्यात निरुत्साह दाखवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, आपल्याजवळ दोन रुपये असतील तर एक रुपयांत पाव खरेदी करा म्हणजे पोटाची भूक मिटवेल आणि उरलेल्या एक रुपयांत पुस्तक खरेदी करा म्हणजे ते मेंदूची भूक मिटवेल. म्हणून आतापासून ठरवा की दर महिन्याला एकतरी पुस्तक विकत घेऊन घरातील मुलांना ते वाचण्यास देईन. असे झाले तरच वाचन संस्कृती वाढीस लागेल असे वाटते. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याची प्रक्रिया ही एका तासाची किंवा एका दिवसाची नाही तर ही निरंतर आहे. याचे परिणाम आपणाला लगेच दिसून येत नाही. आजचा बालक जेव्हा यशस्वी पालक म्हणून समाजात वावरेल त्यावेळी आजच्या वाचनाचे महत्व कळेल. बी पेरलं, अंकुरले, मोठे झाले आणि लगेच फळ लागले असे चमत्कारिक बदल येथे दिसत नाहीत. यासाठी खूप तपश्चर्या आणि मेहनत करावी लागते. म्हणून पालकांनी जरा सतर्क राहून मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करू शकतात. हा लेख वाचून झाल्यावर पुस्तक विकत घेऊन वाचण्यासाठी आपण प्रेरित व्हाल एवढी माफक अपेक्षा आहे. 

- नासा येवतीकर, भाषा विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

1 comment: