हनुमान जयंती विशेष
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान या दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गीताने आज सकाळ झाली. कारण ही तसंच होतं, आज हनुमान जयंती त्यानिमित्ताने सकाळी सकाळी हे गीत कानावर पडले. तसं तर लहानपणापासून हनुमानाविषयी विशेष आकर्षण होतं. त्यांचा तो रुबाब, पिळदार शरीर आणि त्यांच्या शौर्यकथा ऐकून हनुमानासारखे आपण व्हावे म्हणून त्यांची नित्य प्रार्थना करीत असू. हनुमानाला तसे बजरंगबली, मारुती, पवनपुत्र, पवनसुत, वायुदूत असे अनेक नावांनी ओळखले जाते. जन्माल्या बरोबर सूर्या कडे झेप घेणारे अशी त्यांची ख्याती आख्यायिकामध्ये सांगितली जाते. गाव म्हटले की मारुतीचे मंदिर असतेच असते. सहसा मारुतीचे मंदीर गावाच्या बाहेर असते. त्याशिवाय गाव ही संकल्पना पूर्ण होत नाही. संत रामदास स्वामी यांनी त्यांच्या काळात गावोगावी हनुमान मंदिराची स्थापना केली. मारुती रायाचे चरणस्पर्श केल्याशिवाय कोणत्याही नवरदेवाचे लग्न होत नाही. ते स्वतः ब्रह्मचारी होते मात्र लग्न करणारे नवरदेव मारुतीचे दर्शन करून बोहल्यावर चढतात. विनोदाने लोकं म्हणतात की, मारुती राया आजपासून मी माझे ब्रम्हचर्य पथ सोडत असून गृहस्थाश्रमात पदार्पण करीत आहे, तेंव्हा मला आपले आशीर्वाद द्यावे. आम्ही लहान असताना एक चित्र हमखास दिसायचे. नवरदेवाला मारुतीच्या समोर खुर्चीवर बसवून कपडे चढवीत असत आणि तेथून वाजत गाजत नवरदेवाची मिरवणूक निघत असे. मित्रपरिवार ला ही एक सुवर्णसंधी राहत असे नवरदेवच्या घोड्यासमोर नाचायची. मंडप दूर असेल तर नाचत-नाचत जायला खूप वेळ लागत असे. मग सर्वांची एकाच घाई होत असे. लवकर चला लवकर चला म्हणत कोणीतरी सर्वाना ढकलत नेत असत. आज ती प्रथा पूर्णपणे बंद झाली नसली तरी त्यात खूप काही बदल झाले आहे. मारुती हे श्रीरामाचे परमभक्त. श्रीरामाशिवाय त्यांना कशाचीही गोडी नव्हती. म्हणूनच जेथे जेथे श्रीराम दिसतात तेथे तेथे हनुमान दिसतातच. कुस्ती खेळणारे मल्ल म्हणजे पहिलवानांची तर मारुती राया परम दैवत होय. त्यांच्या चरणाला स्पर्श करून ते कुस्तीच्या खेळाला सुरुवात करतात. तसे तर हनुमान खूपच शक्तिशाली पण त्याला कधी ही आपल्या शक्तीचा गर्व नव्हता. गदाधारी भीम हा तसाच एक शक्तिशाली, त्याला आपल्या शक्तीचा गर्व आला होता म्हणून हनुमानाने एका वृद्धाचे रूप घेऊन आपले शेपूट त्याच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर टाकून ठेवले. भीमाला खूप राग आले. त्याने शेपूट हटविण्याची विनंती केली. मारुतीने आपण वृद्ध असल्यामुळे तुम्हीच शेपूट उचलून बाजूला करावं असे म्हटले. तेंव्हा भीम खाली वाकून मारुतीची शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले पण शेपटी जागचे काही हलेना. खूप प्रयत्न करून देखील शेपूट हलत नाही हे पाहून भीमाला आपली चूक लक्षात आली आणि मारुती रायाच्या त्यांनी पाया पडले. अश्या पद्धतीने मारुतीने भीमाचा आपल्या शक्तीवरील अहंकार दूर केले. दर शनिवारी हनुमान भक्त त्यांच्या दर्शनाला जातात. काही जण यादिवशी उपवास देखील करतात.
मनोजवं मारुततुल्य वेगं
जिंतेंद्रियम बुद्धीमतां वरीष्ठम
वातात्मजं मारुततुल्यवेगम
श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये
ह्या श्लोकाची दररोज वाचन करणे म्हणजेच मारुतीरायाची उपासना करणे होय.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment