नागोराव सा. येवतीकर

Sunday, 16 August 2020

M S Dhoni

विश्वचषक जिंकून देणारा कूल कॅप्टन माही
भारताचा यशस्वी कर्णधार व यष्टीरक्षक कॅप्टन कुल या नावाने ओळखला जाणारा माही अर्थात महेंद्रसिंग धोनी यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. प्रत्येक क्रिकेट रसिकांसाठी हा एक धक्कादायक निर्णय म्हणता येईल. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेला माहीचा हा निर्णय देखील आपल्या योग्य वेळी घेतला आहे, असेच म्हणता येईल. आपल्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 क्रिकेटच्या एकूण कारकिर्दीत 538 सामन्यात 17266 धावा काढल्या असून त्यात 16 शतक आणि 108 अर्धशतकांचा समावेश आहे. विकेटच्या मागे विद्युतल्लतेच्या चपळाईने 195 स्टम्पिंग करण्याचा एक अनोखा विक्रमही त्याच्या नावे आहे. बांगलादेश विरुद्ध 2004 मध्ये माहीने आपल्या क्रिकेट जीवनाला सुरुवात केली होती आणि पहिल्याच सामन्यात शून्य धावावर तो रनआउट झाला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळताना धोनीने आपली सर्वोत्तम खेळी खेळताना 183 धावा काढल्या आणि सर्व विक्रम मोडीत काढले. याच सामन्यात माहीने जगाला हेलिकॉप्टर शॉटची ओळख दिली. या सामन्यानंतर धोनी मागे वळून पाहिला नाही. आपली यशस्वी घोडदौड पुढे चालूच ठेवली. सन 1983 मध्ये कपिलदेव यांनी भारताला विश्वचषक मिळवून दिले होते. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी म्हणजे 2011 मध्ये माहीने भारताला विश्वचषक जिंकून दिले होते. तत्पूर्वी 2007 मध्ये आयसीसी वर्ल्ड टी-20 जिंकून दिली तसेच 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉपी देखील त्याच्या नेतृत्वात भारताला मिळाली. नव्वदच्या दशकात सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातला देव होता. सचिनची जागा कोणी घेईल की नाही असे वाटत होते. भारतीय संघात सचिनची कमतरता भासू न देण्याचे काम माहीने केले. त्याची जगावेगळी खेळण्याची पद्धत विरोधकांच्या छातीत धडकी भरत होती. 
पूर्वी सचिन मैदानावर आहे म्हणजे सारे खेळाडू आणि प्रेक्षक निश्चित राहत होते अगदी तेच माहीच्या बाबतीत नंतर अनुभवायला मिळाले. धोनी मैदानावर आहे तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने आहे असे विरोधकांना देखील वाटत होते. शेवटच्या षटकात फटके मारून त्याने अनेक सामने जिंकून दिले म्हणून सारेच धोनीला मॅचफिनिशर असे म्हणत असत. खरं तर ज्यावेळी माही भारतीय संघात पदार्पण केले त्यावेळी संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, युवराज सिंग असे अनेक महान खेळाडू होते. त्या सर्वांच्या खेळात माहीने आपली स्वतःची अशी वेगळी छाप निर्माण केली. सर्वांचे मन जिंकणारा तो मनकवडा होता. आपल्या संघातील खेळाडूचेच नाही तर विरोधी संघातील खेळाडूचे मन देखील तो वाचत होता. प्रत्येक खेळाडूची लकब आणि कच्चा दुवा याचा त्याला खूप अभ्यास होता. बॉलिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा तो एकप्रकारे कोच होता. विकेटच्या मागे उभे राहून प्रत्यक्ष मैदानावर तो बॉलरला काही ना काही टिप्स देत होता. म्हणूनच त्याच्या काळात अनेक हरणारे सामने जिंकता आले. निर्णायक क्षणी धोनीने घेतलेले अनेक निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरत आले होते. बॅटिंग करताना माहीसोबत असला की पुढचा फलंदाज दिलखुलास खेळत असे. महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन आश्विन, हरभजनसिंग ही नावे नेहमी लक्षात राहतात. सचिन आणि राहुल यांच्या प्रयत्नामुळेच माहीला 2007 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले. कर्णधार पद मिळाल्यावर त्याच्या खेळण्यावर काही परिणाम होईल असे अनेकांना वाटत होते मात्र तसे काही घडले नाही. खेळाडू देखील एक व्यक्ती असतो, त्यालाही काही मर्यादा असतात. त्याचे शरीर देखील त्याला किती साथ देणार. शेवटच्या काही सामन्यात तो संथ खेळत होता अशी टीका त्याच्यावर झाली. सन 2019 च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून जो पराभव झाला त्यात धोनीची संथ खेळी जबाबदार धरण्यात येऊ लागली मात्र धोनी परिस्थिती पाहून खेळत होता हे ही सत्य आहे. स्व. सुशांतसिंग राजपूत अभिनित एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून महेंद्रसिंग धोनी कसा घडला ? याची संपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचली. त्यामुळे झारखंड राज्यातल्या एका छोट्या गावाचे नाव धोनीने जगभर पोहोचविले. त्याचे जीवनपट पाहून अनेक युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल. ज्याप्रकारे सचिन तेंडुलकर याने आपली दहा क्रमांकाची जर्सी सोडली नाही तसे माहीने देखील आपली सात क्रमांकाची जर्सी शेवटपर्यंत सोडली नाही. धोनीची जन्मतारीख सात होती म्हणून त्याने हा क्रमांक आजीवन सोबत ठेवत असे. सन 2007 मध्ये धोनीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्याचसोबत 2009 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर आयसीसी ने 2008 व 2009 साठी प्लेअर ऑफ दि इअर म्हणून पुरस्कृत केले होते. सन 2018 मध्ये धोनीला भारत सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भविष्यात क्रिकेटचे सामने कसे आयोजित होतील आणि केंव्हा आयोजित होतील याबाबत शाश्वती नाही, अशा विषम काळात धोनीने जाहीर केलेली निवृत्तीची वेळ योग्य आहे, असे वाटते. प्रेक्षकांना महेंद्रसिंग धोनी निळ्या जर्सीत आता दिसणार नाही याची हुरहूर लागलेली असली तरी आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीत त्याला नक्की पाहता येणार आहे. यासोबत भारतीय क्रिकेट संघातील डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता धोनी व रैना आपल्या स्वतःच्या जीवनाची दुसरी इनिंग सुरू करणार आहेत, त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा .....!

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

No comments:

Post a Comment