नागोराव सा. येवतीकर

Friday, 31 July 2020

My First Book

मी लिहिलेलं पहिलं पुस्तक
पाऊलवाट हे मी लिहिलेलं पहिलं पुस्तक. शालेय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली. ज्याप्रकारे एखाद्या स्त्रीला पहिलं बाळंतपणाचे डोहाळे असतात अगदी तसेच मलाही माझ्या या पहिल्या पुस्तकांविषयी झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी सांगायचो त्या त्या गोष्टी घरी आल्यावर टिपून ठेवायचो. विद्यार्थ्यांना ठरवून असे काही बोलायचे नाही मात्र जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना गप्पा मारण्याच्या ओघात सांगत गेलो. त्यातून एक कल्पना सुचली की हे सारे इतर मुलांनाही कळायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षक हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून त्यांच्या विषयीदेखील या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलोय. पुस्तक प्रकाशन झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी ते पुस्तक रोज एका प्रकरणाचे अभिवाचन केले. तेवढा एक आनंद या पुस्तकाच्या निमित्ताने मिळालं.
   ( माझ्या पुस्तकाचे पहिले वाचक म्हणजे माझे विद्यार्थी )

पुस्तक वाचणे खूप सोपे आहे मात्र एखादे पुस्तक लिहून काढणे आणि प्रकाशित करणे खूपच कठीण बाब आहे. प्रकाशकांचा शोध घेणे ही एक दिव्यपरीक्षा आहे, असे मला वाटते. नवोगत साहित्यिकांना लवकर प्रकाशक भेटत नाहीत, एखादे वेळी भेटले तरी पुस्तक प्रकाशनासाठी लागणारा खर्च बघून कोणी पुस्तक प्रकाशित करण्याचा आपला विचार मागे घेतात. पुस्तक लिहिणे, त्यांची छपाई करणे आणि प्रकाशन करणे खरोखरच खूप कठीण असते याची जाणीव एखादे पुस्तक काढल्याशिवाय लक्षात येत नाही. पुस्तक निघाल्यावर त्याची विक्री होईल की नाही याची देखील खात्री नसते. प्रकाशक ही लेखकांना खूप कमी पुस्तक देतात. अर्ध्याहून जास्त पुस्तकं मित्रांना किंवा नातलगांना भेट म्हणून देण्यात संपतात. ते या पुस्तकाचे वाचन करतात की नाही याचे कधी कधी मनात शंकाच येते. 
( सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. )

उत्तम साहित्याला प्रसिद्धी नक्कीच मिळते. पण एखादा गरीब साहित्यिक असेल, त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याचे साहित्य कोण प्रकाशित करणार ? त्याचे साहित्य त्याच्याच जवळ पडून राहील. आज सगळेच प्रकाशक व्यावसायिक झाले आहेत. ( हाताच्या बोटावर मोजता येतील असे प्रकाशक सोडून ) मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यातून अशा एक दोन गरीब साहित्यिकांचे साहित्य त्या व्यासपीठावरून प्रकाशित केल्यास संमेलनाचे सार्थक होईल असे वाटते. यदाकदाचित ही पद्धत सुरू झाली आणि पुन्हा तिथे वशिलेबाजी सुरू झाली तर पुन्हा या लेखकांच्या नशिबी वाईट दिवस येतील. एका पुस्तकाचा अनुभव पाठीशी घेऊन त्यानंतर दुसरे पुस्तक प्रकाशन करण्याची कधी हिंमत केली नाही. मात्र याच काळात ई साहित्य प्रकाशनाशी माझा संबंध आला आणि दरवर्षी एक दोन पुस्तकं ई साहित्याच्या माध्यमातून प्रकाशित केलोय. आज माझ्या नावावर पाऊलवाट या पुस्तकासह सात वैचारिक लेखसंग्रह असलेले सात, एक कवितासंग्रह व कथासंग्रह असे एकूण 10 पुस्तकं प्रकाशित केलो आहे. 

एक कादंबरी व दोन कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, लवकरच प्रसिद्ध होतील. पुस्तकाची छपाई करून वीस पंचवीस हजार रुपये खर्च करून माझ्या पुस्तकाला जी प्रसिद्धी मिळाली नाही ती प्रसिद्धी ई बुकने मिळवून दिली. आपल्या राज्यातीलच वाचक नाही तर देश-विदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे माझे ई पुस्तक वाचले गेले आणि वाचले जात आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि पर्यावरण वाचविण्यासाठी ई साहित्य एक चांगले मध्यम असून अगदी अल्प खर्चात आपले पुस्तक प्रकाशन होऊ शकते. वाचकांची संख्या देखील आपण विचार करू शकत नाही यापेक्षा मोठी आहे. पुस्तकं विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे मात्र मोफत पुस्तकं मिळवून वाचणाऱ्याची संख्या जास्त आहे. या वाचकांसाठी खास करून ई साहित्य मोलाची भूमिका बजावत आहे. इंटरनेटवर ई साहित्य लिहून शोधल्यास आपणांस अनेक प्रकारचे आपल्या मनासारखे साहित्य वाचण्यास मिळू शकेल. लॉकडाऊनच्या काळात घरी बसल्या बसल्या आपण कंटाळले असाल तर नक्की वाचत राहा. 

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

( टीप :- माझे ई साहित्य वाचण्यासाठी esahity.in या वेबसाईटवर भेट द्यावे.)

1 comment:

  1. हे अगदी बरोबर लिहीलं आहे. लवकरच सर्व साहित्य व्यवहार नेटवर येतील. सर्व मोठ्या प्रकाशकांना आता ई पुस्तकं आठवली आहेत.

    ReplyDelete