नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 24 June 2020

समजदार नागरिक

समजदार नागरिक होऊ या

#nasayeotikar

माणूस एकटा किती काळ जिवंत राहू शकतो ? याचे उत्तर फार काळ जिवंत राहू शकत नाही, समुहात राहिला तर जास्त काळ जिवंत राहू शकतो. म्हणूनच फार पूर्वीपासून मनुष्य वस्ती करून समुहात राहत होता, असे दिसून येते. समुहात राहायचे असेल तर समूहाचे काही नियम ठरवले जातात आणि त्याचे पालन करावे लागते. नियमाचे पालन केले नाही की वाळीत टाकले जाते, त्या व्यक्तींना कोणी काही मदत करत नसे असे चित्र पूर्वीच्या काळात होते. आज असे चित्र कुठे ही दिसत नाही म्हणजे समूहाचे काही नियम नाहीत, असे नाही. तर आज व्यक्तीला स्वनियम तयार करून समुहात आपली नाचक्की होणार नाही असे वर्तन करत असतो. जी व्यक्ती बेजबाबदारपणे वागते त्याला समूहाकडून वेळीच ताकीद दिली जाते किंवा शिक्षा केली जाते. आपला कुटुंब आणि परिवार याची समाजात प्रतिष्ठा राहावी, मानसन्मान राहावा आणि पत राहावी म्हणून माणूस जागरूकपणे वागत असतो. देशाला अश्याच समजदार नागरिकांची खरी गरज असते. जपान देशातील लोकं खूप कष्टाळू आहेत अशी त्यांची ख्याती तेथील समजदार नागरिकांच्या वर्तनावरून सांगितली जाते. भारत देशातील लोकं जबाबदारीने वागत नाहीत अशी आपल्या लोकांची प्रतिमा बाहेरच्या देशात का निर्माण झाली असेल तर ते ही आपल्या वागण्यावरून. एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या देशात लोकशाहीने काही हक्क आणि कर्तव्य दिले आहेत. आपण आपल्या हक्कावर नेहमीच दावा सांगतो त्याचवेळी आपले कर्तव्य मात्र साफ विसरतो. देशाची प्रतिमा मालिन होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. सरकारने तयार केलेल्या अनेक नियमांची आपल्या हातून पायमल्ली होते. कधी कधी आपण सरकारने तयार केलेले कायदे कलम लक्षात न घेता वर्तन करत असतो त्यामुळे समजदार नागरिक ठरू शकत नाही. घरात शांती आणि समृद्धी राहावी म्हणून कुटुंबप्रमुखांच्या नियमाचे पालन आपण करतो म्हणून तर घरात वातावरण सुरक्षित आणि आनंदी असते. त्याच पद्धतीने देशाचे काही नियम असतात आणि त्याचे पालन केल्यास देशात देखील आनंदी व समृद्धीचे वातावरण दिसू शकते. शालेय जीवनात सर्वाना नागरिकशास्त्र विषयातून बरीच बारीकसारीक माहिती दिली जाते. ती सर्व माहिती परीक्षेतील मार्कापुरते मर्यादित ठेवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण होत आहे. आपण किती नियमाचे पालन करतो हे कोरोना संकटाने दाखवून दिले आहे. मी माझ्या मनाचा राजा आहे, माझे जीवन मी कसे ही जगतो अशी विचारधारा देशाला तर कधीच पुढे नेणार नाही. ते तर सोडा, या वृत्तीमुळे व्यक्तीचा देखील विकास होत नाही. आपण टाकलेले एक जबाबदारीचे पाऊल दुसऱ्यासाठी जीवनदायी ठरू शकते. या सकारात्मक विचाराने देशातील प्रत्येक नागरिक वागला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आपणाला यापुढे कोरोना सोबत जगावे लागणार आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायचे असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे काही नियमावली तयार केली आहे त्याचे तंतोतंत पालन करावे लागेल. तेंव्हाच खरे आपण समजदार नागरिक बनून आपल्या सोबत इतरांना जिवंत ठेवू शकू. म्हणून आता तरी जागे होऊ या आणि समजदार नागरिक बनू या.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment